जगण्याला पॉज..

आपल्या जीवनाची सिस्टीम जर हँग होत असेल तर आता गरज आहे ती दोन नवीन बटणांची.

आपल्या जीवनाची सिस्टीम जर हँग होत असेल तर आता गरज आहे ती दोन नवीन बटणांची. ती आहेत ‘पॉज’ (थांबा, थोडी विश्रांती घ्या) आणि ‘स्लो मोशन’ (म्हणजे जरा दमानं). या दोन बटनांचा वापर अधूनमधून करून बघायला काय हरकत आहे? एखादा दिवस मोबाइलचा ‘उपास’ केला तर नेहमी २४ तासांचा लहान वाटणारा दिवस मोठा होईल. कधी टीव्ही पाहायला ‘रजा’ टाकली तर निसर्गातले, आजूबाजूचे ‘खरे’ रिअ‍ॅलिटी शो बघायला मिळतील आणि ‘ब्रेकिंग’च्या ऐवजी ‘मेकिंग’ न्यूज देणारे तुम्हीच पहिले असाल.

‘शाळा सुटली, पाटी फुटली. आई, मला भूक लागली’. खूप वर्षांपूर्वीचे अगदी प्रसिद्ध बालगीत. लहानपणी, यमक जुळतंय म्हणून म्हटलं जायचं आणि या गाण्यात आणखी काही असेल असं वाटायचं नाही. पण आता मागे वळून पाहताना त्या गीतातली ‘मजा’ कळते, अनुभवायला येते. ‘शाळा सुटली’ म्हणजे त्या दिवसापुरती तरी शाळा संपली आणि मुलांच्या दृष्टीने, त्या दिवसापुरती का होईना, शाळेतून सुटका झाली. सुटका होणं म्हणजे बंधनातून मुक्त होणं. (कारण बऱ्याच पालकांनी मुलांना शाळेत ‘अडकवलेलं’ असतं.) बंधनात राहायला तर कुणालाच आवडत नाही. त्यामुळे ‘शाळा सुटली’ या वाक्यातून सुटकेचा नि:श्वास ऐकू येतो. नंतरची ओळ ‘पाटी फुटली’. शब्द दोनच, पण बोलके. पूर्वी शाळेत फक्त पाटीच नेली जायची. काही श्रीमंत मुलांकडे ‘डबल’ पाटी असायची. दगडी पाटी फुटणं जरी कॉमन असलं तरी ते रोज होणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे या पाटी फुटण्यामध्ये मला तर वेगळाच अर्थ दिसतो. कुणी एखादा जर त्याचं काम झाल्यावर तिथे उगीचच रेंगाळत असेल तर ‘तू आता फुट’ असं म्हटलं जातं. त्या दृष्टीने पाटी ‘फुट’ली म्हणजे पाटीने (दप्तराने) पळ काढला.

तर आता दृश्य कसं आहे पाहा.. मुलाची शाळेतून सुटका झालेली आहे. घरी येऊन पाटी-दप्तर जागेवर गेलेलं आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून ते मूल ‘स्व’स्थ झालेलं आहे. म्हणजे ‘विद्यार्थी’ या भूमिकेतून ‘मूल’ या नैसर्गिक अवस्थेत आलेलं आहे आणि त्याची ‘मूल’भूत प्रेरणा भूक ही वर येऊ  लागली आहे. म्हणून सहजच तोंडातून शब्द जातात, ‘आई मला भूक लागली’. लहान मुलांना काही प्रयत्न न करावा लागता झोप येते, तहान लागते तशीच भूकही लागते. जे काय असतं ते निसर्गाचे, प्रकृतीचे काम. म्हणूनच जर सहज भूक लागत नसेल किंवा सहज झोप येत नसेल तर आपली प्रकृती बिघडली असे ओळखावे. प्रकृतीचा दुसरा अर्थ आहे निसर्ग. निसर्गाचं आणि आपलं इतकं जवळचं नातं आहे म्हणूनच की काय, आपल्याला निसर्गात जायला किंवा निसर्गात राहायला आवडतं. अजून एक गोष्टही आपल्या अनुभवाची आहे. आपला नेहमीचा अनुभव आहे की आपण ज्या वाहनात बसतो त्या वाहनाचा वेग आपल्याला मिळतो. जर आपण सायकलवर स्वार झालो तर जो सायकलचा वेग तोच आपला वेग होतो आणि जर आपण विमानात बसलो तर विमानाचा वेग आपला वेग होतो. तसंच निसर्गाजवळ राहिल्याने निसर्गाची आणि आपली लय एक होते. दुसरं असं की निसर्गामध्ये इतक्या विविध वस्तू आहेत पण त्या एकमेकांशी कधीही स्पर्धा करत नाहीत. प्रत्येक गोष्ट आपापल्या वेगाने आणि दिशेने जात असते म्हणून निसर्गामध्ये ‘स्ट्रेस-ताण’ नसतो. चंद्र कधीही पृथ्वीच्या वेगाशी स्पर्धा करत नाही की पृथ्वीलाही कधी अधिक वेगाने सूर्याभोवती फिरावे असे वाटत नाही. उद्या जर निसर्गातील सूर्य, चंद्र, पृथ्वी, ग्रह इत्यादींनी एकमेकांबरोबर स्पर्धा करायची ठरवली तर काय अनर्थ होईल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही.

पण माणसाने बुद्धीचा उपयोग करून विज्ञानाच्या साहाय्याने निसर्गाचे अजब कोडे उलगडण्याचा प्रयत्न करताना कळत न कळत निसर्गाशीच स्पर्धा करण्याचा, इतकेच नाही तर त्याच्यावर मात करण्याचा उद्योग सुरू केला आणि तेव्हापासून निसर्गाचीच प्रकृती बिघडायला लागली! हे जसं बाहेरच्या जगाबद्दल झालंय तसंच आपल्या आतल्या जगाबद्दल म्हणता येईल. निसर्गाप्रमाणेच आपल्या शरीरातसुद्धा एक घडय़ाळ असतं. (अतिशय गुंतागुंतीच्या अशा कॉम्प्युटरमध्येही एक घडय़ाळ असतं, ज्याच्या तालावर तो कॉम्प्युटर व्यवस्थित काम करत असतो.) या शरीरातल्या घडय़ाळाला बॉडी-क्लॉक म्हणतात. त्याचा स्वत:चा एक वेग असतो आणि लय असते. ते बॉडी-क्लॉक निसर्गाच्या घडय़ाळाशी मेळ घालून चालतं. म्हणजे दिवसाचे प्रहर, वर्षांचे ऋतू याप्रमाणे आपले आतले घडय़ाळही आपल्या शरीराची कामे आपल्या न-कळत सुरळीत चालण्याकरता मदत करत असते. आपण त्या घडय़ाळाशी जर वेडय़ासारखे खेळलो नाही तर ते आपल्या भल्याकरता शेवटपर्यंत मदत करायला सिद्ध असते.

पण लेखात वर म्हटल्याप्रमाणे माणसाला हे निसर्गाचे घडय़ाळ फारच संथ वाटू लागले. म्हणून ‘याच्यामागे धाव’, ‘त्याच्यापुढे पळ’, ‘हे हवं’, ‘तेही हवं’, ‘अजून हवं’, ‘आत्ताच हवं’ या गडबडीत दिवसाचे चोवीस तास कमी पडू लागले. जसजसे हातातल्या घडय़ाळातले काटे भराभर फिरायला लागले तसतसा बॉडीक्लॉकचा बॅलन्स जायला लागला. हृदयाचे ठोके जलद पडू लागले, रक्तवाहिन्यातून रक्ताचा प्रवाह जास्त दाबाने होऊ  लागला. काही ग्रंथीमधून रस स्रवणे कमी झाले किंवा अधिक झाले. तरी पण हातातल्या घडय़ाळाने बॉडीक्लॉकवर मात करण्यात आपण भूषण मानू लागलो. मोबाइलवरचे मेसेज पाहण्याच्या नादात झोपेची वेळ मध्यरात्रीच्याही पुढे गेली. शांत बसून सकाळचा ब्रेकफास्ट घेण्याऐवजी ‘ऑन-द-गो’ एनर्जी-बार खाणे म्हणजे स्मार्टपणा समजला जाऊ  लागला. कामामध्ये ‘बिझी’ म्हणून लंच स्किप होऊ  लागली. काही काळानंतर भूक सहज लागेना, झोप वेळेवर येईना, तहानेला नुसते पाणी पुरेना अशी ‘प्रगती’ आपण करून घेतली. मग भूक लागावी म्हणून औषध शोधून काढायला लागलो, झोप यावी म्हणून गोळ्या घ्यायला लागलो. आजारी पडू अशी खात्री वाटायला लागली म्हणून हेल्थ इन्शुरन्सवर खर्च करू लागलो. थोडक्यात साध्या, सरळ, सोप्या नैसर्गिक आयुष्याची आपण ‘लाइफस्टाइल’ करून टाकली. आता स्टाईल म्हटलं की ‘फोटो आणि व्हिडीओ शूट’ आलेच. मग काय ‘स्टुडिओ’मध्ये जाऊन एक्स-रे, एमआरआय, सोनोग्राफी आणि बरंच काही. वेगवेगळ्या टेस्ट करून घेऊन त्याच्या फाइल्स तयार होऊ  लागल्या.

हे सगळं कशावरून निघालं तर, ‘आई, मला भूक लागली’वरून. भूक ही कोणत्याही प्राण्याची नैसर्गिक प्रेरणा असल्यामुळे व्यवस्थित भूक लागणे हे आपले शरीर नैसर्गिक अवस्थेत म्हणजेच आरोग्य स्थितीत आहे हे दर्शवते. म्हणजेच आपले बॉडी क्लॉक योग्य गतीने चाललेले आहे. पण आपण निसर्गापेक्षा ‘शहाणे’ झालो आणि अनेक नवीन बटणे ‘शोधून’ काढली. त्यात ‘फास्ट फॉरवर्ड’ नावाचे बटण मुख्य आहे. त्याचे परिणाम लेखात वरती आलेलेच आहेत. आपला असा अनुभव असतो की एखादं बटण जर सारखं सारखं वापरलं तर ते अडकून बसतं आणि मग तो त्या यंत्राचा स्थायीभाव (सवय) बनतो. सर्वाना कळणाऱ्या भाषेत बोलायचं म्हणजे त्या यंत्राची सिस्टीम ‘हँग’ होते. विंडोज कॉम्प्युटरमध्ये अशावेळी कंट्रोल + आल्टर + डिलीट बटणं दाबून ते रीस्टार्ट करावं लागतं. आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर कंट्रोल बटण म्हणजे मनावर ताबा, आल्टर म्हणजे आपल्या घातक सवयी बदलणे आणि डिलीट म्हणजे आपल्या स्वभावातल्या नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्याचा प्रयत्न करणे. तेव्हा आपल्या जीवनाची सिस्टीम जर हँग होत असेल तर आता गरज आहे ती दोन नवीन बटणांची. ती आहेत ‘पॉज’ (थोडी विश्रांती घेणे) आणि ‘स्लो मोशन’ (म्हणजे जरा दमानं). या दोन बटनांचा वापर अधूनमधून करून बघायला काय हरकत आहे? एखादा दिवस मोबाइलचा ‘उपास’ केला तर नेहमी चोवीस तासांचा लहान वाटणारा दिवस मोठा होईल. कधी टीव्ही पाहायला ‘रजा’ टाकली तर निसर्गातले आजूबाजूचे ‘खरे’ रिअ‍ॅलिटी शो बघायला मिळतील (कुठल्याही जाहिराती पुन:पुन्हा न बघाव्या लागता!) आणि ‘अरे, बऱ्याच दिवसांनी आज या झाडाला फूल आलं वाटतं!’ असं म्हणून त्या फुलाचं सौंदर्य आणि त्या फुलावर बसलेलं गोजिरवाणं फुलपाखरू न्याहाळता येईल  किंवा क्वचितच दिसणारी चिमणी ‘स्पॉट’ करता येईल. अशा ‘ब्रेकिंग’च्या ऐवजी ‘मेकिंग’ न्यूज देणारे तुम्हीच पहिले असाल.

बघता बघता आपण (वयाने) मोठे झालो. आता लहानपणची ती शाळा नाही. मग पाटी कुठली आणि फुटणार कशी? आणि पाटीच फुटणार नाही तर मग (पुढच्या ओळीत म्हटल्याप्रमाणे) भुकेचं काय? भूक लागणारच नाही का? तर तसं काहीच नाहीये. आता आपण जीवनाच्या खूपच मोठय़ा शाळेत आहोत. इथे कोणताही विषय सक्तीचा नाही. आपल्या आवडीचा कोणताही एक किंवा अनेक विषय आपण घेऊ  शकतो. कोणताही विषय घेतला तरी सर्टिफिकेट एकच ..आनंदाचं. आपला अमूल्य वेळ हीच या शाळेची फी आणि आपलं अविचल (स्वस्थ) मन हीच कधीही न भरणारी पाटी. मुख्य म्हणजे कोणत्याही परीक्षेची भीती नाही. कारण जी व्यक्ती या जगाच्या शाळेत आनंदात राहते तिचा निकाल एकच.. फर्स्टक्लास फर्स्ट. कारण इथे इतर कुणाशीच स्पर्धा नाही. तेव्हा आता पाटी कधी फुटणार नाही आणि आनंदाने तृप्त असल्यामुळे कुणाकडे ‘भूक लागली’ म्हणायचीही गरज नाही.

अंजली श्रोत्रिय health.myright@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व जगू आनंदे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stop watching tv and mobile phones for better life

ताज्या बातम्या