ज्येष्ठांचे लिव्ह इन : उत्तरायणाला मुलांच्या विरोधाची झळ!

मी हैदराबादला येते आहे म्हणताच ‘थोडू नीडा’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या घरात माझी राहण्याची सोय केली.

‘थोडू नीडा’ च्या संस्थापक राजेश्वरी यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते आणि सरिता आवाड.

|| सरिता आवाड

‘‘उतारवयात लग्न करू इच्छिणाऱ्या किंवा सहजीवनात राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांमधील पुरुषाच्या मालमत्तेची वाटणी ही मोठी समस्या ठरते आहे. हैदराबादला ज्येष्ठांच्या सहजीवनासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘थोडू नीडा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांना आणि ज्येष्ठ जोडप्यांना भेटल्यावर या प्रश्नाचं गांभीर्य  कळलं. त्याचवेळी एकाकी आई-वडिलांसाठी जोडीदार शोधणारीही काही मुलं आहेत, हे जाणून बरं वाटलं. संथगतीनं का होईना, पण बदलाची सुरुवात झाली आहे. हे जास्त मोलाचं. ’’   

अहमदाबादमध्ये एकाकी ज्येष्ठांचे विवाह आणि लिव्ह इन रीलेशनशिप यांसाठी मदत करणारी ‘अनुबंध’ संस्था चालवणाऱ्या नटवरलालभाई पटेल यांच्याकडून मला हैदराबादमधील याच विषयावर काम करणाऱ्या ‘थोडू नीडा’ (तेलगू भाषेत थोडू म्हणजे सहचर आणि नीडा म्हणजे सावली) या संस्थेसंबंधी कळलं. या संस्थेच्या राजेश्वरी देवी यांच्याशी माझं फोनवर प्रदीर्घ बोलणं झालं आणि त्यांना भेटायलाच हवं, असं ठरवून मी लगेच हैदराबादला रवाना झाले.  

मी हैदराबादला येते आहे म्हणताच ‘थोडू नीडा’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या घरात माझी राहण्याची सोय केली. त्यामुळे मला अगदी निर्धास्तपणे तीन दिवस हैदराबादमध्ये राहता आलं. राजेश्वरी देवी, राधा, चिन्नय्या, आलिवेलू या कार्यकर्त्यांशी या विषयावर भरपूर बोलता आलं. ज्यानं मला हैदराबादला खेचून नेलं तो राजेश्वरी देवींनी फोनवर सांगितलेला प्रसंग आधी सांगते, ‘थोडू नीडा’ ही संस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी दर दोन महिन्यांनी मेळावे घेते. परंतु करोनाच्या साथीमुळे जवळजवळ दोन वर्षं हे मेळावे घेतले गेले नव्हते. मोठ्या प्रमाणात करोना लसीकरण झाल्यावर, साथीचा जोर कमी झाल्यावर नुकताच ५ सप्टेंबर २०२१ ला मेळावा घ्यायचा ठरलं. आठवडाभर आधी या कार्यक्रमाची वर्तमानपत्रातून प्रसिद्धी झाली. यानंतर ‘थोडू नीडा’च्या संस्थापक राजेश्वरी यांना एका गृहस्थाचा फोन आला. हे अंदाजे ७० वर्षांचे विधुर होते. आपल्या एकुलत्या एका लेकीकडे राहात होते. लेक तिच्या संसारात, कामात मग्न होती. साहजिकच वडिलांना एकाकी वाटत होतं. त्यांना या मेळाव्याला जावंसं वाटलं. त्यांनी फोन केल्यावर राजेश्वरीबाईंनी मेळाव्याची माहिती दिली. मेळाव्याला येताना स्वत:चं आधार कार्ड आणि पत्नीच्या मृत्यूचा दाखला घेऊन यायला सांगितलं. (ओघात आलं म्हणून सांगते, मेळाव्याला येताना प्रत्येकानं आपलं आधार कार्ड आणि जोडीदाराच्या मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोटाची डिक्री बरोबर आणावी लागते.) फोनवर झालेलं हे बोलणं राजेश्वरीदेवी नंतर विसरूनही गेल्या. इकडे या गृहस्थाच्या लेकीला समजलं, की वडील ‘थोडू नीडा’च्या मेळाव्याला जाणार आहेत. ती भडकली आणि वडिलांशी तिचं कडाक्याचं भांडण झालं. वडील त्यांच्या निश्चयापासून ढळत नाहीत, हे पाहून लेकीनं वडिलांच्या मालमत्तेची कागदपत्रं बरोबर घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. तिथे तक्रार केली, की ‘माझे वडील या मेळाव्याला जाणार आहेत. कुठल्या तरी बाईंशी ते लग्न करतील आणि या मालमत्तेत वाटेकरी निर्माण होईल. म्हणून काहीही करून या मेळाव्याला जाण्यापासून त्यांना थोपवा.’ तक्रार ऐकून त्या पोलीस निरीक्षकानं राजेश्वरी यांना फोन केला आणि सांगितलं, की मेळाव्याला हजर असलेल्या प्रत्येकानं आपल्या मुलांकडून ‘मेळाव्याला हजर राहण्यासाठी ना हरकत पत्र’ आणावं असा तुम्ही आग्रह धरा. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांची ही मागणी ऐकून राजेश्वरी चकित झाल्या. १८ वर्षं पूर्ण झालेला माणूस जर सज्ञान असतो, तर साठी ओलांडलेलाही नक्कीच सज्ञान असतो. तर मग ही मागणी कशासाठी?, असा प्रश्न त्यांच्या मनात आला. पण पोलिसांशी वाद न घालता त्या म्हणाल्या, की ‘मी याबाबत आमच्या वकिलांचा कायदेशीर सल्ला घेईन आणि योग्य ती पावले उचलीन.’ संबंधित मेळावा नीट पार पडला. ते गृहस्थ मेळाव्याला आले. पोलीस आले नाहीत. मुलांकडून ‘ना हरकत पत्र’ आणण्याचा मुद्दा विरून गेला. परंतु या प्रसंगामुळे ज्येष्ठांच्या मुलांकडून किती विरोध होऊ शकतो हे अधोरेखित झालं. त्याचबरोबर अशा प्रसंगांत गडबडून न जाता शांतपणे काम करत राहण्याचा राजेश्वरीबाईंचा खंबीरपणाही माझ्या लक्षात आला. या खंबीर स्त्रीला भेटायलाच हवं असं माझ्या मनानं घेतलं.

१४ सप्टेंबरला दिवेलागण झाल्यावर मी मुक्कामी पोहोचले. उस्मानिया विद्यापीठाच्या पिछाडीस असलेल्या दुर्गाबाई देशमुख नगरात माझ्या राहण्याची सोय झाली होती. जवळच राहणाऱ्या राधादेवी माझी वाटच बघत थांबल्या होत्या. त्यांनी मला त्यांच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ‘थोडू नीडा’चे आठ कार्यकर्ते मला भेटायला आले होते. राजेश्वरीही आल्या होत्या. गव्हाळ वर्णाच्या, नाकीडोळी नीटस राजेश्वरी सत्तरी ओलांडलेल्या आहेत हे सांगूनही खरं वाटणार नाही. चिन्नय्या हे रेल्वेमध्ये अभियंता म्हणून काम करून निवृत्त झालेले कार्यकर्ते मस्त बोलके होते. सुरुवातीलाच त्यांनी एक निरीक्षण नोंदवलं. त्यांच्या अवतीभवती अनेक मुलं परदेशात- विशेषत: अमेरिकेत काम करतात, भरपूर पैसे कमावतात. इथे त्यांचे आई-वडील एकटे असतात. मुलगा अमेरिकेत असल्याचा त्यांना अभिमान असतो. पण त्यांचा अभिमान हा देखावा असतो. मनात ते झुरत असतात. त्यातून एक जोडीदार जर काळाच्या पडद्याआड गेला, तर ते दु:खानं मोडून पडतात. ‘थोडू नीडा’मुळे अशा ज्येष्ठ नागरिकांना आपलं मन उघड करायची संधी मिळाली आहे. त्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे.

साहजिकच नुकत्याच झालेल्या मेळाव्याकडे चर्चेची गाडी वळली आणि पोलिसांनी मुलांचं ‘ना हरकत पत्र’ मागण्याचा उल्लेख झालाच. मुख्य म्हणजे ज्येष्ठांच्या ‘लिव्ह इन रीलेशनशिप’ला किंवा लग्नाला मुलांचा होणारा विरोध हा धुमसणारा मुद्दा होता. राजेश्वरी म्हणाल्या, ‘याबद्दल तात्त्विक चर्चा कशाला? हे वासुदेव आणि ललिता आपल्या समोरच आहेत. त्यांचीच गोष्ट बघा की…’

माझ्यासमोरच काळेसावळे आणि मजबूत हाडापेराचे वासुदेव बसले होते आणि शेजारीच नीटनेटकी साडी नेसलेल्या शांत चेहऱ्याच्या ललितागौरी होत्या. सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून मला त्यांची गोष्ट सांगितली. माझ्यासमोर बसलेलं जोडपं इतकं साधं होतं, की त्यांच्या एकत्र येण्यात अशी चित्तरकथा असल्याचा संशयसुद्धा आला नसता!  ती कथा अशी- वासुदेव सैन्यात हवाई दलात काम करत होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. बायको सुगृहिणी होती. निवृत्तीनंतर ते हैदराबादला स्थायिक झाले. मुलगा शिकून नोकरीला लागला. त्याचं आणि मुलीचंही लग्न झालं. त्यानंतर त्यांच्या बायकोचं क्षयरोगानं निधन झालं. एकटेपणात वासुदेव यांची दोन वर्षं गेली. त्यानंतर वर्तमानपत्रातून त्यांना ‘थोडू नीडा’ची माहिती मिळाली आणि त्यांच्या संमेलनांना वासुदेव हजर राहायला लागले. तिथे त्यांचा परिचय ललितागौरी यांच्याशी झाला.

 ललिता यांचं लग्न झालं होतं, मात्र लैंगिक अडचणीमुळे हे लग्न सफल होऊ शकलं नाही. ललिताबाईंनी घटस्फोट घेतला. माहेरी पुढचं शिक्षण घेऊन त्या शिक्षिकेची नोकरी करत होत्या. त्याही आता निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या भावानं त्यांना ‘थोडू नीडा’ची माहिती दिली. मेळाव्यांना जायला प्रोत्साहन दिलं. या मेळाव्यात त्यांना वासुदेव भेटले. पहिल्या भेटीतच त्यांचे सूर जुळले. ते फोनवर बोलू लागले आणि प्रत्यक्षही एकमेकांना भेटू लागले. आपले वडील ‘थोडू नीडा’त जातात, त्यांची पुन्हा सहजीवन सुरू करायची इच्छा आहे, याची कुणकुण वासुदेव यांच्या मुलाला लागली आणि त्याचा संताप संताप झाला. मालमत्तेच्या वाटणीचा तर प्रश्न होताच, पण त्या जोडीला आणखी एक मुद्दा होता. वासुदेव यांच्या मुलाला राजकीय महत्त्वाकांक्षा होती. नगरपालिकेची निवडणूक त्याला लढवायची होती. वडिलांनी दुसरं लग्न केलं किंवा ते ‘लिव्ह इन रीलेशनशिप’मध्ये राहिले तर आपल्या प्रतिमेला धक्का बसेल, आपण वडिलांची काळजी घेत नाही, असा समाजात संदेश जाईल, असं त्याला वाटलं. त्यामुळे त्यानं वडिलांना मेळाव्यांना जायला सक्त विरोध केला. शाब्दिक वादावादीवर प्रकरण थांबलं नाही, तर वडिलांना त्यानं खोलीत कोंडलं आणि खोलीला कुलूप घालून तो चालता झाला. वासुदेव यांनी १०० नंबरला फोन करून आपली सुटका करून घेतली. अशा टोकाच्या विरोधामुळे पुन्हा सहजीवन सुरू करण्याची वासुदेव यांची इच्छा अधिकच प्रबळ झाली. ललिता आणि वासुदेव यांनी सहजीवन सुरू करण्याचा निश्चय केला.

मात्र त्यात आणखी काही अडचणी होत्या. ललिता ब्राह्मण, तर वासुदेव ब्राम्हणेतर होते. ललिता कट्टर शाकाहारी होत्या. वासुदेवसुद्धा शाकाहारी होते, पण घरी येणारे नातेवाईक मांसाहारी असणार होते आणि मांसाहारी पदार्थ रांधण्याची ललिताबाईंची मुळीच तयारी नव्हती. तेव्हा घरात शाकाहारच असेल आणि जर मांसाहारी पाहुणा आला तर बाहेरून पदार्थ आणले जातील, असं ठरलं. दुसरं म्हणजे

‘लिव्ह इन रीलेशनशिप’मध्ये राहण्याला ललिताबाई धजावत नव्हत्या. ‘लिव्ह इन’मध्ये करार करू, त्यावर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊ, असे पर्याय त्यांनी सपशेल धुडकावले. त्यावर आर्य समाजाच्या पद्धतीनं लग्न करून कालांतरानं त्याची नोंदणी करावी असं ठरलं.

आपल्या वडिलांच्या मनात काय चाललं आहे याचा सुगावा वासुदेव यांच्या मुलाला लागलाच. त्यामुळे घरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मुलाने लालिताबाईंचा फोन नंबर शोधून काढला आणि त्यांना तो धमकीचे फोन करायला लागला. ललिताबाईंची घाबरगुंडी उडाली. त्यामुळे कार्यकत्र्या राधादेवी त्यांना आपल्या घरी घेऊन आल्या.

राधादेवी वकील आहेत. त्यांच्या पतीचं निधन होऊन बरीच वर्षं झाली आहेत. त्या आपल्या मुलगा आणि सुनेबरोबर राहतात. मुलाचा आईच्या कामाला पाठिंबा असतो. ललिताबाई घरी आल्यावर वासुदेव यांच्या मुलाचे राधादेवींनासुद्धा अर्वाच्य भाषेत फोन आले, पण त्या घाबरल्या नाहीत. मग एका ठरलेल्या दिवशी वासुदेव घरातून सटकले आणि राधादेवींच्या घरी आले. ‘थोडू नीडा’च्या कार्यकर्त्यांनी राधादेवींच्या अंगणात मांडव घातला. लग्नाच्या आदल्या दिवशी मेंदीचा कार्यक्रम केला. वासुदेव यांनी सर्वांना मेजवानी दिली आणि दुसऱ्या दिवशी आर्य समाजाच्या पद्धतीनं लग्न करण्यात आलं. पण वासुदेवांचा मुलगा हार मानायला तयार नव्हता. त्यानं पोलिसात जाऊन वडील हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी शोध घेतल्यावर त्यांना खरी परिस्थिती समजली आणि त्यांनीच मुलाला समजावलं. तेव्हा मुलाची कशीबशी समजूत पटली. नंतर वासुदेव यांनी मालमत्तेची मुलगा आणि मुलगी यांच्यात विभागणी केली. मूळ गावी असलेला जमिनीचा तुकडा ललिताबाईंच्या नावानं केला. ते गेली सहा वर्षं ललिताबाईंच्या घरी सुखासमाधानात राहात आहेत. मुलाशी आता त्यांचा संवाद होतो. वासुदेव ललिताबाईंच्या घरी स्थिरस्थावर झाल्यावर मुलानं ‘थोडू नीडा’च्या राधादेवींना फोन करून उद्धट बोलल्याबद्दल क्षमा मागितली. जणू दुसऱ्याच कुणाची तरी गोष्ट चालली आहे, अशा आविर्भावात वासुदेव आणि ललिता हसऱ्या चेहऱ्यानं ही गोष्ट ऐकत होते!

अवघ्या काही दिवसांपूर्वी घडलेला मुलांकडून ‘ना हरकत पत्र’ आणण्याची पोलिसांकडून सूचना येण्याचा प्रसंग आणि सहा वर्षांपूर्वी वासुदेव यांच्या सहजीवनाला मुलानं केलेला सणसणीत विरोध, हे सर्व ऐकू न मी चरकले. मी विचारलं, की ‘मुलांचा विरोध हा तुमचा सार्वत्रिक अनुभव आहे का?’ यावर राधादेवी आणि चिन्नय्या एकमुखानं ‘नाही’ म्हणाले. उलट आता आम्हाला परदेशातून काही मुलांचे फोन येतात, की त्यांच्या आईला किंवा वडिलांना जोडीदार शोधा म्हणून.

 संथ गतीनं का होईना, पण बदल घडत आहे. हे ऐकून मी जरा खुशालले. बाहेर खास हैदराबादी मसालेदार बिर्याणी आमची वाट बघत होती…            

  (या गोष्टीतली के वळ वासुदेव व ललिता ही नावे बदललेली असून बाकीची नावे वास्तवातील आहेत.)

(‘थोडू नीडा’ च्या संस्थापक राजेश्वरी यांच्यासह

संस्थेचे कार्यकर्ते आणि सरिता आवाड.

wsarita.awad1@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jesthanche live in author sarita article avad uttarayana to the children opposition akp

Next Story
लढा दुहेरी हवा!
ताज्या बातम्या