ज्येष्ठांचे लिव्ह इन : उत्तरायण समृद्ध करणारा ‘अनुबंध’!

आजतागायत त्यांच्याकडे १३ हजार लोकांचा बायोडेटा आहे.

|| सरिता आवाड

अहमदाबादमध्ये ‘अनुबंध फाउंडेशन’ ही ज्येष्ठांच्या विवाह व ‘लिव्ह इन रीलेशनशिप’साठी काम करणारी संस्था बघायला जाण्याचा अनुभव वेगळाच. ज्येष्ठांचा उतारवयातील काळ सुखद व्हावा म्हणून मनापासून काम करणारे या संस्थेचे संस्थापक नटवरलालभाई पटेल म्हणजे एक वल्लीच! देशभरातून त्यांच्याकडे आलेले इच्छुक ज्येष्ठांचे अर्ज पाहताना डोळे विस्फारतात. मुलांच्या विरोधामुळे नाउमेद होणाऱ्या, प्रसंगी पळून जाऊन सहजीवन सुरू करावं लागलेल्या जोडप्यांचं कारुण्य मनाला  स्पर्शून जाणारं…  

२६ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या शेवटी मी नटवरलाल ऊर्फ  नटुभाई पटेल यांच्या ऑफिसला भेट दिल्याबाबतचा उल्लेख आहे. आता सविस्तर या भेटीविषयी…

ठरलेल्या वेळेवर मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. अतिशय साधी आणि शहराच्या मोक्याच्या ठिकाणी असलेली, छोट्या बंगल्यांची ती सोसायटी होती. या सोसायटीचे प्रवर्तकही नटुभाईच होते, ही माहिती नंतर त्यांनी मला दिली. हे ऐकून संस्था उभ्या करून त्या सुरळीत चालवणं ही नटुभाईंची खासियत असल्याची माझ्या मनानं नोंद घेतली.

 अगदी सर्वसाधारण दिसणाऱ्या, मध्यम उंचीच्या, सौम्य आवाजात बोलणाऱ्या नटुभाईंची आणि माझी जवळून जानपहचान होत होती. आणि खरंच सांगते, पु.ल. देशपांडे नामक रसायनाचा टिपूस जरी माझ्यापाशी असता ना, तर सखाराम गटणे, नारायण वगैरे वल्लींच्या पंक्तीत बसेल अशी ही व्यक्ती मराठी वाङमयात अजरामर झाली असती! ते शक्य नसलं, तरी निदान त्यांच्या कामाचं रेखाचित्र काढायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतेय. आपल्या छोट्याशा बंगल्याच्या अंगणात शेड उभी करून नटुभाईंनी ऑफिस थाटलं आहे. बंगल्याच्या भिंतीला लागून एक कडाप्प्याचं कपाट, त्यात सगळ्या फाइली, कागदपत्रं ठेवली आहेत. कंपाउंडला लागून कडाप्प्याचीच बाकं आहेत, आलेल्यांना बसायला. वर शेडच्या छताला टांगलेले दोन पंखे. एक टेबल आणि दोन प्लास्टिकच्या खुच्र्या. कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त काम कसं करावं, हे शिकावं तर नटुभाईंकडून. पैशांचं काटेकोर नियोजन हा त्यांच्या कार्यशैलीचा भाग असल्याचं माझ्या लक्षात आलं.

मी तिथे दोन तास होते, पण तेवढ्या वेळातही चाळिशीच्या पुढच्या स्त्रीपुरुषांची तिथे रीघ लागलेली मला बघायला मिळाली. आळीपाळीनं प्रत्येकाशी नटुभाई बोलत होते. पाच ते दहा मिनिटंच. रांग शांतपणे पुढे सरकत होती. लोकांकडून भरून घेण्याच्या फॉर्मचा नमुना त्यांनी मला दिला. त्यात वय, जात, शिक्षण, वैवाहिक स्थिती, उत्पन्न, घर भाड्याचं की स्वत:चं, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याची तयारी आहे की नाही, याबरोबरच जन्मपत्रिकेचा आराखडासुद्धा होता. ‘मंगळ आहे की नाही’ तेही विचारलं होतं! हे प्रश्न का, असं मी त्यांना विचारलं. यावर नटुभाईंचं म्हणणं असं, की उतारवयात लग्न किंवा ‘लिव्ह इन रीलेशनशिप’मध्ये प्रवेश करताना दूरस्थ ग्रहगोलांचा ‘ग्रीन सिग्नल’ घ्यावा, असं अजूनही बहुसंख्य लोकांना वाटतं, त्यामुळे ही माहिती  घेतो. म्हणजे समाजाच्या ज्या काही धारणा आहेत त्यांना धक्का न लावता ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रेम आणि आनंद देणारं साहचर्य निर्माण करणं हाच त्यांचा एकमात्र उद्देश आहे. अगदी ‘अर्जुनाच्या पोपटाचा डोळा’च जसा काही!

मला नटुभाईंनी वानगीदाखल दोन फाइल्स बघायला दिल्या. आजतागायत त्यांच्याकडे १३ हजार लोकांचा बायोडेटा आहे. भारतभर ज्येष्ठ नागरिकांचे त्यांनी ६२ मेळावे घेतले आहेत आणि गुजरातमध्ये प्रत्येक जिल्ह्यात किमान एकदा मेळावा घेतला आहे, हे मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलंच. अहमदाबादेत तर त्यांनी अनेक मेळावे घेतले आहेत. २० नोव्हेंबर २०११ ला अहमदाबादला त्यांनी ‘लिव्ह इन रीलेशनशिप’ साठीचं पहिलं संमेलन घेतलं. यामध्ये ३०० पुरुष आणि ७० स्त्रिया आल्या होत्या.

त्याअगोदर ज्येष्ठांसाठी याच प्रकारची ‘विनामूल्य अमूल्य सेवा’ ते देत होतेच. सुरुवातीच्या काळात जमवलेल्या लग्नांमध्ये काही लग्नं अयशस्वी झाली. कोर्टकचेऱ्या करून घटस्फोट घेण्यात काही जोडप्यांना मनस्ताप झाला. वेळेचा आणि पैशांचा अपव्यय झाला. या घटस्फोटांमागे मुलांशी असलेले संबंध, मालमत्तेची वाटणी आणि लैंगिक संबंधांत आलेल्या अडचणी ही प्रमुख कारणं होती. हे लक्षात घेऊन ‘लिव्ह इन…’चा पर्याय नटुभाईंना व्यवहार्य वाटायला लागला. ते स्वत: विवाहसंस्थेच्या विरोधात नाहीत. काही काळ एकत्र राहिल्यावर जर योग्य वाटलं तर त्या जोडप्यानं जरूर विवाह करावा, मात्र त्याआधी नात्यामधल्या संवादाची, साहचर्याची खातरजमा करून घ्यावी, असं त्यांचं मत आहे. (त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर ‘एक दिन की शादी, आगे दस साल बरबादी’ असं होण्याचा धोका घाईनं केलेल्या लग्नात संभवतो.) त्यांचं हे मत लोकांना मान्य व्हायला लागलं आहे. अलीकडे त्यांच्या मेळाव्यांमध्ये मुलं आपल्या आई किंवा वडिलांसाठी, सून आपल्या सासऱ्यांसाठी जोडीदाराचा शोध घ्यायला आल्याचीही उदाहरणं आहेत. उत्तरायणाच्या या पर्वात प्रेम, परस्पर विश्वास, मैत्रभाव असलेलं साहचर्य आवश्यक असल्याचं नटुभाई आग्रहानं- विशेषत: पुरुषांना पुन्हा पुन्हा सांगतात.

‘लिव्ह-इन रीलेशनशिप’च्या बाबतीत नटुभाई दोन गोष्टींचा आग्रह धरतात. एक तर जोडप्यानं घरकाम, खर्च, यांची वाटणी, इतर जबाबदाऱ्या, या संबंधात करार करावा आणि तो नोटराईज करून घ्यावा. हा करार प्रत्येक केसप्रमाणे वेगळा असतो. दुसरं म्हणजे ‘लिव्ह इन’मधल्या स्त्रीच्या नावे जोडीदारानं १० ते १५ लाखांची तरतूद करावी किंवा काही मालमत्ता तिच्या नावावर करावी. जेणेकरून जोडीदाराच्या पश्चातही तिचं भविष्य सुरक्षित राहील. जर ‘लिव्ह-इन’ संबंधातून बाहेर पडावं लागलं, तर स्त्रीला देण्याच्या भरपाईची तरतूद करारात करून ठेवावी, असा त्यांचा आग्रह असतो. त्याप्रमाणे कागदपत्रं झाल्याची खातरजमा ते करून घेतात.

त्यांच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचं खंबीर पाठबळ मिळालं. त्याचं असं झालं, की २०१० मध्ये वेलुस्वामी-पाचाईयाम्मल या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  मार्कं डेय काटजू आणि न्यायमूर्ती ठाकूर यांच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयात ‘लिव्ह इन रीलेशनशिप’चा ऊहापोह झाला. लग्नासारखे संबंध कशाला म्हणायचे, याचे स्पष्ट निकष न्यायालयानं दिले. हे संबंध स्वेच्छेचे असावेत, त्याचप्रमाणे लक्षणीय काळासाठी असावेत, लग्न जरी केलं नसलं तरी कायद्यानं उभयता लग्न करण्यास योग्य असावेत, समाजामध्ये ते लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणेच वावरत असावेत, असे ते निकष होते. या निर्णयामुळे या निकषांच्या चौकटीत बसणाऱ्या जोडप्यांच्या ‘लिव्ह इन रीलेशनशिप’ संबंधांना कायद्याची अभिमान्यता मिळाली. यामुळे नटुभाईंचा उत्साह वाढला. त्यांनी २०११ मध्ये ‘अनुबंध फाउंडेशन’ ही संस्था काढली. त्यात गुजरातच्या बाहेर काम करणाऱ्या लोकांनाही सामावून घेतलं.

   जुलै २०१२ मध्ये प्रसारित झालेल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात अभिनेता

आमीर खान यांनी नटुभाईंची मुलाखत घेतली.

( https://www.youtube.com/watch?v= G22Up6JogqQ ) या कार्यक्रमामुळे त्यांच्या कामाची भारतभर प्रसिद्धी झाली आणि त्यांचा आत्मविश्वास खूप वाढला.

माझ्या हातात नटुभाईंनी दिलेली फाइल होती. त्यात भारतातून निरनिराळ्या भागातून आलेले अर्ज होते. मध्य प्रदेश, गोवा, तर राज्यातील नाशिक, पालघर, पण अधिक संख्येनं गुजरातमधलेच. यात महिना दीड लाख रुपये उत्पन्न असलेल्या डॉक्टर होत्या, त्याचप्रमाणे उत्पन्नाचं साधन नसलेल्या स्त्रियाही बऱ्याच होत्या. त्यांची शैक्षणिक पात्रता जेमतेमच होती. या बाबतीत नटुभाईंचा अनुभव असा, की उत्तरायणातल्या या संबंधांत स्त्रिया आर्थिक सुरक्षेला अधिक महत्त्व देतात. त्यांच्या मेळाव्यांना स्त्रिया कमी संख्येनं हजर असतात. बंगळूरूमध्ये मात्र हे प्रमाण त्यांना ५० टक्के  इतकं आढळलं. गुजरातमध्ये हे प्रमाण हळूहळू वाढत आहे. मात्र ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये असल्याचं तर सोडाच, पण उतारवयात लग्न केल्याचंही चारचौघात सांगणं सहसा कुणाला नको असतं. कारण अजूनही वैधव्याची सांगड समाजमनात वैराग्याशी आहे. साठीनंतरचा काळ हा ‘रीटायर’ होण्याचा नसून ‘रीवाईव्ह’ होण्याचा आहे, हे समाजानं अजून पचवलेलं नाही.

नटुभाईंच्या अनुभवांप्रमाणे लोकांनी ‘लिव्ह इन…’ स्वीकारण्यामागे निरनिराळी कारणं आहेत. एकमेकांची नीट ओळख झाल्यावर, नात्याबद्दल विश्वास निर्माण झाल्यावरच लग्न करणं अधिक श्रेयस्कर आहे, असं अनेकांचं मत असतं. स्त्रियांना पतीच्या मृत्यूनंतर मिळणारं पतीचं निवृत्तिवेतन पुनर्विवाहानंतर बंद होतं. नोकरशाहीवरचा पुरुषप्रधानतेचा पगडा या नियमातून दिसतो. आर्थिकदृष्ट्या माजी नवऱ्याच्या पेन्शनचाच आधार असलेल्या स्त्रिया त्यामुळे ‘लिव्ह इन रीलेशनशिप’मध्ये राहाणं पसंत करतात. दोघांपैकी एका जोडीदाराला आधीच्या लग्नापासून घटस्फोट मिळालेला नसणं, हेही हा पर्याय निवडण्याचं कारण आहे. जेव्हा दोघंही जोडीदार सर्वदृष्ट्या सक्षम असतात, स्वत:चा अवकाश त्यांना जपायचा असतो, तेव्हाही अनेकदा त्यांना लग्नाच्या बंधनाची आवश्यकता वाटत नाही. बऱ्याचदा आढळणारं कारण म्हणजे मुलांचा, विशेषत: वडिलांच्या पुनर्विवाहाला होणारा विरोध. लग्नानंतर मालमत्तेत पत्नी भागीदार होतेच. यामुळे मुलांचा वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध होतो. अशा वेळी ‘लिव्ह इन’चा पर्याय स्वीकारावा लागतो. नटुभाईंच्या अनुभवात मुलांच्या विरोधामुळे तरुणाईला शोभेल असं साहस करून पळून जाऊन सहजीवन सुरू केलेलीही ज्येष्ठ जोडपी आहेत.

नटुभाईंच्या बाबतीत एक मुद्दा मला फारच लक्षणीय वाटला. त्यांना स्वत:ला विसंवादी लग्नाचा अनुभव आला किंवा स्वत:ला एकाकी वाटलं म्हणून या कामाकडे ते वळले असं झालेलं नाही. त्यांचं स्वत:चं कौटुंबिक आयुष्य आनंदी आणि सुखी-समाधानी आहे. शीलाबेन- म्हणजे त्यांच्या पत्नी यांचं त्यांच्या कामात यथाशक्ती सहकार्य असतं. त्यांच्या दोन्ही मुलांची लग्नं झाली आहेत. धाकटा मुलगा शिक्षक आहे, सून फिजिओथेरपिस्ट आहे. ती सरकारी रुग्णालयात काम करते. त्यांना १२ वर्षांची नातसुद्धा आहे. सुखी कौटुंबिक आयुष्याचं महत्त्व ते जाणतात. म्हणूनच एकाकी ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात सहजीवनाची हिरवळ यावी यासाठी त्यांची धडपड असते. साठीनंतर मिळालेल्या सुखी सहजीवनामुळे आयुष्य वाढतं, चैतन्यमय होतं. याउलट एकाकी आयुष्य कणाकणानं मृतवत होत जातं. हे वास्तव निश्चित समजलेल्या ७२ वर्षांच्या नटुभाईंच्या आयुष्याचं, ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रेम आणि परस्पर काळजी या आधारावर सहजीवन रुजवणं हे ‘मकसद्’ झालं आहे. ‘बुड्ढा होगा तेरा बाप’ असं म्हणून साठी ओलांडलेल्यांना ते टवटवीत करत असतात! या कामावर आता आंतरराष्ट्रीय मान्यतेची मोहोर उमटली असून २०१८ मध्ये त्यांना ‘आंतरराष्ट्रीय ब्रावो अ‍ॅवॉर्ड’ मिळालं.  

त्यांच्या या कामात त्यांचे सहकारी कोण आहेत, कोण आपले अनुभव मोकळेपणानं सांगतील, असं विचारल्याबरोबर हैद्राबादच्या राजेश्वरी देवी यांचं नाव त्यांनी घेतलं. हैद्राबादला त्या ‘थोडू नीडा’ ही संस्था चालवतात. तेलुगू भाषेत ‘थोडू’ म्हणजे सहचर आणि ‘नीडा’ म्हणजे सावली. ‘थोडू नीडा’ची ज्येष्ठांसाठी ‘डे केअर सेंटर’ चालवणं, त्यांना एकत्र येण्याची संधी देणारं केंद्र उभं करणं, पुनर्विवाह किंवा ‘लिव्ह इन’साठी इच्छुक ज्येष्ठांना एकमेकांना भेटण्याची संधी देणं, अशी अनेक कामं आहेत. हे सगळं ऐकल्यावर राजेश्वरीदेवींना भेटण्याची मला तीव्र इच्छा झाली. नटुभाईंकडून फोन नंबर घेऊन मी त्यांच्याशी संपर्क साधला. फोनवर आमचं सविस्तर बोलणं झालं. त्यांच्या संस्थेची, कामाची त्यांनी कल्पना दिली. नुकताच

५ सप्टेंबरला त्यांनी हैद्राबादला ज्येष्ठांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्याची हकीकत त्यांच्या तोंडून ऐकल्यावर तर कधी मी हैद्राबादला जाते आणि राजेश्वरी देवी आणि ‘थोडू नीडा’च्या कार्यकत्र्यांना भेटते असं मला झालं. जरुरीपुरतं सामान घेऊन मी हैद्राबादला रवाना झालेसुद्धा! तिथे अनुभवांचा आणि हकीकतींचा भलामोठा खजिनाच माझी वाट पाहात होता.

या खजिन्यातले मासलेवाईक नमुने २३ ऑक्टोबरच्या अंकात.

sarita.awad1@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jesthanche live in author sarita avad article anubandh foundation elderly marriage life in a relationship akp

ताज्या बातम्या