सरिता आवाड sarita.awad1@gmail.com

साठीच्या आसपासच्या एकल व्यक्तींच्या मेळाव्यात हेतलबेन आणि रमेशभाईंनी एकमेकांना प्रथम पाहिलं. नंतर ओळख वाढली आणि सहजीवन सुरू करण्याची गरज प्रकर्षांनं जाणवू लागली. वरवर सोप्या दिसणाऱ्या त्यांच्या गोष्टीतले छुपे कं गोरे मात्र लक्षात घेण्याजोगे आहेत. जोडीदाराअभावी एकटय़ा पडलेल्या ज्येष्ठांचं एकत्र येणं अजूनही समाजात सहज स्वीकारलं जात नाही, हेच त्यातून स्पष्ट होतं. हे वातावरण जर आपण दूर करू शकलो, तर कदाचित अनेक वृद्धांना सोबतीचा आधार मागताना संकोच वाटणार नाही आणि त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध आनंदात जाऊ शकेल.

loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
lokmanas
लोकमानस: मोदींचे ‘गेमिंग’बद्दलचे मत धक्कादायक
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

मागच्या लेखात (२८ऑगस्ट) आपण ज्यांची गोष्ट पाहिली, त्या दक्षाबेन आणि रमणिकभाईंना भेटायला नटुभाई पटेल (अहमदाबादमधील ज्येष्ठांच्या पुनर्विवाह वा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’साठी प्रयत्नशील असलेल्या ‘अनुबंध फाऊंडेशन’चे अध्यक्ष) आणि मी शहराच्या एका टोकाला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हेतल आणि रमेश यांना भेटायला आम्ही दुसऱ्या टोकाला पोहोचलो. हा भाग नव्यानं विकसित झालेला दिसला. फ्लॅट सिस्टीम असलेल्या मोठय़ा इमारती, नवीकोरी दुकानं, असा सगळा माहोल होता. काल पाहिलेल्या शहरापेक्षा अगदी वेगळा. रस्त्यात मी नटुभाईंशी बोलत होते. या कामाकडे ते वळले कसे? हा माझा प्रश्न होता. तसं ‘गूगल गुरुजीं’नी या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर मला दिलं होतं, पण मला ते स्वत: नटुभाईंकडून ऐकायचं होतं.

नटुभाई केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करत होते. कच्छ भागात त्यांची बदली झाली होती. जोडून सुट्टी आली म्हणून अहमदाबादला ते घरी आले होते. तेव्हा- म्हणजे २००१ मध्ये गुजरातला भूकंपाचा महाभयंकर तडाखा बसला. कच्छ भागात ज्या इमारतीत नटुभाईंचे इतर सहकारी राहात होते ती जमीनदोस्त झाली आणि ते सगळेच्या सगळे प्राणास मुकले. अपरिमित जीवितहानी झाली. तेव्हा पन्नाशीच्या आत-बाहेर असलेल्या नटुभाईंना जबरदस्त धक्का बसला. त्या धक्कय़ातून सावरल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की आपला जोडीदार गमावलेले, एकटे पडलेले, साठीच्या दरम्यानचे कित्येक लोक होते. अशा लोकांच्या एकाकी आयुष्याला कशी संजीवनी मिळेल, त्यांच्या मनाला कशी उभारी येईल, असा विचार ते करू लागले. अशा एकाकी लोकांचे अनुबंध बांधता येतील, नव्या जोडीदाराबरोबर त्यांना नव्यानं आयुष्याला सामोरं जाता येईल, असा विचार नटुभाईंना सुचला. स्वत: नटुभाईंचे वडील गावात मुखिया होते. लग्न जमवण्याचं काम ते मोठय़ा हौसेनं करत. तो वारसा कळत-नकळत नटुभाईंमध्ये रुजला असावा. दोन एकाकी व्यक्तींची गाठ घालून देण्याच्या कामाला त्यांनी ‘विनामूल्य अमूल्य सेवा’ असं नाव दिलं.  गेली पंधरा वर्ष ते हे काम सातत्यानं करत आहेत. भारतभरात त्यांनी थोडेथोडके नाही, ६२ मेळावे घेतले आहेत. तर गुजरातमध्ये प्रत्येक जिल्ह्य़ात हा मेळावा घेतला आहे. आजपर्यंत १७२ जोडप्यांच्या जोडय़ा त्यांनी जमवल्या. त्यातल्या १६० लोकांनी लग्न केलं, तर १२ जणांनी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ मध्ये राहणं पसंत केलं. आता आम्ही ज्यांना भेटायला जात होतो त्यांनीही ‘लिव्ह-इन’चा पर्याय स्वीकारला होता.

एका नवीनच बांधलेल्या मोठय़ा सोसायटीत आम्ही शिरलो. तिथल्याच हेतलबेन आणि रमेशभाईंच्या घरी आम्ही पोहोचलो. दोघांनी आमचं मनापासून स्वागत केलं. दोघंही उतारवयाकडे झुकले होते, तरी उत्साही आणि सुदृढ दिसत होते. हेतलबेनचा वेश सलवार-कमीज होता. नटुभाईंनी माझी ओळख करून दिली. हेतलबेन मूळच्या राजकोटच्या. लग्न झाल्यावर राजकोटलाच त्या स्थायिक झाल्या होत्या. त्यांचे पती रेशनिंग ऑफिसमध्ये काम करत होते. त्यांना मूलबाळ नव्हतं. पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचा पोटाच्या विकारानं मृत्यू झाला आणि हेतलबेन एकटय़ा पडल्या. त्यांच्या सासर-माहेरचे बरेचसे नातेवाईक अहमदाबादला असल्यानं त्यांनी घर बदलायचा निर्णय घेतला. राजकोटचं घर विकून आलेले पैसे आणि नवऱ्याच्या निधनानंतर त्याच्या नोकरीतून मिळालेल्या रकमेतून भावांच्या मदतीनं त्यांनी हे काहीसं गावाबाहेर असलेलं घर घेतलं. माहेरचे बरेच नातेवाईक जवळपास असल्यानं त्यांना सुरक्षित वाटत होतं.

रमेशभाईंची पार्श्वभूमी थोडी निराळी होती. ते बडोद्याजवळच्या छोटय़ा खेडय़ातल्या शेतकरी कुटुंबातले. त्यांचं लग्न झालं ते मुंबईच्या तरुणीशी. ही तरुणी लग्नानंतर त्यांच्या गावी आली. त्यांना एक मुलगा झाला; पण बायकोला खेडय़ात अगदी करमेनासं झालं. जुन्या वळणाच्या सासूशी जमवून घेता येईना. मुलगा दोन वर्षांचा असताना त्यांनी परस्परसंमतीनं घटस्फोट घेतला. मुलाचा ताबा रमेशभाईंकडेच होता. गुजराती भाषेत सांगायचं तर ते ‘छूटाछेडा’ झाले. नंतर त्यांनी आपल्या भवितव्याचा गंभीरपणे विचार केला. त्यांच्या नातेवाईकाचा इंग्लंडमध्ये व्यवसाय होता. त्या व्यवसायात मदत करण्यासाठी मुलाला घेऊन ते इंग्लंडला रवाना झाले. (महाराष्ट्रात राहाणाऱ्या मला हुशार मुलंमुली ‘जीआरई’ वगैरे परीक्षा देऊन परदेशात जातात हे पाहणं सवयीचं झालं आहे; पण गुजरातमध्ये व्यवसायासाठी परदेशी जाणं सर्वाच्या सवयीचं झालेलं दिसलं. अर्थात मला वेगळं वाटलं.) म्हणता म्हणता एकवीस वर्ष गेली. रमेशभाईंचा मुलगा तिथेच शिकला. तोही व्यवसाय करायला लागला. भारतात असणारे रमेशभाईंचे वडील आजारी पडले. त्यांची आई तर आधीच वारली होती. वडिलांच्या शेवटच्या आजारपणात आपण त्यांच्याजवळ असायला हवं, या कर्तव्यभावनेतून आणि मुलाची समजूत घालून ते भारतात आले. बडोद्याजवळच्या गावात राहून शेतीत लक्ष घालायला लागले. वडिलांच्या निधनानंतर ते परत इंग्लंडला गेले नाहीत. भारतातच स्थायिक व्हायचं त्यांनी ठरवलं. तेव्हा त्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली होती.

त्याच वेळेला त्यांनी गुजरातीत प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकात नटुभाईंचा लेख वाचला. त्यांच्या ‘विनामूल्य अमूल्य सेवे’बद्दलची त्यांची तळमळ त्या लेखात दिसत होती. रमेशभाईंना ती तळमळ भिडली. आपलं एकाकी निरस आयुष्य सरस आणि सुरस होण्याची शक्यता त्यांना भावली. लेखाच्या खाली दिलेल्या पत्त्यावर त्यांनी संपर्क साधला. संके तस्थळावर जाऊन संस्थेची अधिक माहिती काढली. या लेखानंतर लवकरच भरूच येथे नटुभाईंनी पन्नाशी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याला रमेशभाई हजर झाले.

इकडे हेतलबेनच्या वहिनीनं या मेळाव्याची आणि नटुभाईंच्या उपक्रमाची माहिती त्यांना दिली. काहीसं घाबरतच हेतलबेन तयार झाल्या. अशा मेळाव्याला स्त्रिया कमी प्रमाणात हजर असतात, असा नटुभाईंचा अनुभव आहे. म्हणून मेळाव्याला येणाऱ्या स्त्रियांना ते येण्याजाण्याचा प्रवास खर्च देतात, एखादी भेटवस्तूसुद्धा देतात. याच्या आमिषानं नाही, पण मेळाव्याची संकल्पना आवडल्यानं हेतलबेन आपल्या वहिनीबरोबर या मेळाव्याला गेल्या. साधारणपणे मेळाव्यात आधी प्रमुख पाहुण्यांचं भाषण होतं, मग जेवण, त्यानंतर सर्वाचा परिचय करून दिला जातो. प्रथेप्रमाणे  हेतलबेन आणि रमेशभाई यांनी आपापला परिचय करून दिला. तिथे या दोघांची पहिली ओळख झाली. मेळाव्यात भेटलेल्या लोकांना अधिक बोलता यावं, ओळख वाढवता यावी म्हणून नटुभाई छोटय़ा-मोठय़ा सहली आयोजित करतात. मेळाव्यांसाठी ते प्रायोजक शोधतात. (या मेळाव्यांचा खर्च त्यांच्या अनुभवाप्रमाणे एक ते दीड लाख रुपये येतो.) पण सहली मात्र ते स्वत: काटेकोरपणे आयोजित करून कमीत कमी खर्चात पार पाडतात. तशी भरूचच्या मेळाव्यानंतर त्यांनी काश्मीरला सहल काढली होती. हेतलबेन आणि रमेशभाई यांची या सहलीत ओळख वाढली. सहलीहून परत आल्यावर फोनवरून संपर्क होत राहिला. हेतलबेनना पतीच्या मागे निवृत्तिवेतन मिळत होतं. रमेशभाई आर्थिकदृष्टय़ा सुस्थितीत होते. शेतीचं उत्पन्नही होतं. मुख्य म्हणजे हसतखेळत, आनंदात आयुष्याला सामोरं जाण्याचा दोघांचा स्वभाव अगदी जुळणारा होता. हे जुळणारे धागे लक्षात घेऊन या दोघांना सहजीवन सुरू करावंसं वाटायला लागलं.

रमेशभाईंनी आपल्या मुलाला या सगळ्या घडामोडी कळवल्या. हेतलबेनबद्दल सांगितलं. मुलानं या नव्या नात्याचं उत्स्फूर्त स्वागत केलं. हेतलबेन मात्र थोडय़ा साशंक होत्या. पुन्हा नव्यानं सहजीवन सुरू करण्याचा विचार आपल्या सासरच्या लोकांना सांगण्याची त्यांना हिंमत होत नव्हती. शिवाय लग्न केल्यावर निवृत्तिवेतन बंद झालं असतं. त्या उत्पन्नावर काट मारायची त्यांची तयारी नव्हती. या अडचणींशिवाय आणखी एक मुद्दा हेतलबेनना खटकत होता, तो म्हणजे हेतलबेन ब्राह्मण तर रमेशभाई अब्राह्मण. त्यामुळे रोजच्या जगण्यातील चालीरीतींवर परिणाम होणार होता. खटकणारा दुसरा मुद्दा म्हणजे रमेशभाई हेतलबेनपेक्षा सहा महिन्यांनी लहान होते. स्त्रीचा सहचर तिच्यापेक्षा वयानं मोठा असण्याची सामाजिक रीत अगदी हाडीमाशी भिनलेली आहे. त्यामुळे रमेशभाईंचं जवळजवळ समवयस्कच असणं स्वीकारणं हेतलबेनना जड जात होतं. या सगळ्या अडचणींची चर्चा त्यांनी नटुभाईंबरोबर केली. रमेशभाईंच्या सुस्वभावाचा, सुस्थितीचा हवाला नटुभाईंनी दिला. पेन्शन बंद होऊ नये म्हणून लग्न न करता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहाण्याचा पर्याय त्यांनी समोर ठेवला. या सगळ्या चर्चेनंतर सहजीवनासाठी रमेशभाईंचा स्वीकार करायला हेतलबेन तयार झाल्या. मात्र बडोद्याजवळच्या छोटय़ा गावात राहाण्याची त्यांची तयारी नव्हती. गावात राहण्यापेक्षा शहरात राहणं रमेशभाईंनाही सोईचं वाटलं. असा सगळा विचार करून हेतलबेन आणि रमेशभाई यांनी सहजीवनाची सुरुवात केली. ‘ना उम्रकी सीमा हो, ना जन्मका हो बंधन’ या ओळींची आठवण यावी असा हा निर्णय होता.

सहजीवनाची सुरुवात करण्याआधी त्यांनी एक छोटा घरगुती समारंभ केला. रमेशभाईंचे मित्र, काही नातेवाईक हजर होते. हेतलबेनच्या माहेरचे, तसंच शेजारपाजारचे या समारंभाला हजर होते. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा त्यांनी लावलेला अर्थ लग्नाची नोंदणी न करणं एवढाच होता.

गेली आठ वर्ष हेतलबेन आणि रमेशभाई सुखासमाधानात संसार करतायत. त्यांचा संसार अगदी चारचौघांसारखाच आहे. आपल्या संसारातलं वेगळेपण कुणाला कळू नये अशीच त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. हेतलबेननी फक्त आपल्या सासरच्या नातेवाईकांना आपल्या संसारापासून लांब ठेवलं आहे. कदाचित त्यांनाही एव्हाना समजलं असेल, पण जाणूनबुजून त्याकडे त्यांनी डोळेझाक केली असेल.. पण एकदा हेतलबेनचे सासरचे काही नातेवाईक त्यांच्या घरी येणार होते. तेव्हा हेतल यांनी तेवढा वेळ रमेशभाईंना घराबाहेर जाण्याची विनंती केली. रमेशभाईंनी याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही. खेळासारखं या लपंडावात ते सामील झाले. एक मात्र खरं, की आपल्या मुलावर रमेशभाईंचा अतिशय जीव आहे. त्याचं शिक्षण, त्याचा व्यवसाय, या सगळ्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. त्यांच्या या अभिमानाच्या आणि आनंदाच्या प्रवाहात हेतलबेन सहर्ष आणि विनाशर्त सहभागी होतात.

 हेतल आणि रमेश यांची गोष्ट जाणून घेतल्यानंतर परत येताना नटुभाईंनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं. दर शनिवार-रविवारी  दुपारी ३ ते ६ त्यांचं ऑफिस सुरू असतं. मलाही त्यांचं कामकाज जवळून बघायचं होतं, त्यांचे अनुभव जाणून घ्यायचे होतेच. म्हणून हे आमंत्रण मी आनंदानं स्वीकारलं. संध्याकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून तिथली वर्दळ अनुभवली, त्यांच्याकडे आलेले अर्ज पाहिले, वर्तमानपत्रातली कात्रणं पाहिली आणि बघता बघता दिवस संपून गेला, खूप काही गाठीशी बांधून.. (संबंधित व्यक्तींच्या विनंतीवरून त्यांची नावे बदलली आहेत.)