ज्येष्ठांचे लिव्ह इन : अनपेक्षितपणे गवसलेलं सहजीवन | Loksatta

ज्येष्ठांचे लिव्ह इन : अनपेक्षितपणे गवसलेलं सहजीवन

लग्न झाल्यावर मात्र शुभाला आपल्यासमोर काय ताट वाढून ठेवलं आहे याची जाणीव झाली. ‘हम करे सो कायदा’ अशा स्वभावाच्या सासूशी जमवून घेणं कठीण होतं.

ज्येष्ठांचे लिव्ह इन : अनपेक्षितपणे गवसलेलं सहजीवन

सरिता आवाड sarita.awad1@gmail.com

आपापल्या वैवाहिक आयुष्यात ठेच लागण्याचा अनुभव घेतलेले स्त्री आणि पुरुष उतारवयात अगदी अनपेक्षितरीत्या एकत्र आले. आपण सहजीवनात वगैरे राहू, असा विचारही या दोघांनी के ला नव्हता. विशेषत: यातील स्त्रीनं तर  ‘लिव्ह इन’ची कधी कल्पनाच के ली नव्हती. तरीही मनं जुळली होती आणि त्यांनी सहजीवनाला सुरुवात के ली. काय होता त्यानंतरचा त्यांचा अनुभव?, हे सांगणाऱ्या वास्तव कहाणीचा हा भाग पहिला.

सकाळी उठल्याबरोबर शुभाचा ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर मेसेज दिसला, ‘आज आमच्या सहजीवनाला सहा वर्ष पूर्ण झाली. थोडय़ा खाचाखोचा, तीव्र उतार, किंचित चढाव. पण आयुष्याला पूर्णत्व आलंय. रिकाम्या, विखुरलेल्या कणाकणांत भरून राहिलं संसाराचं, जबाबदाऱ्यांचं, देवधर्माचं अधिक भान. ही सारी तुमच्या सर्वाच्या शुभकामनांची फळं आहेत. आम्ही आपल्या नित्य ऋणात.. धन्यवाद. शुभा आणि वेंकी.’ ते वाचून माझी सकाळ खरोखरच प्रसन्न झाली..  शुभाचा इतिहास उगवत्या सूर्याच्या प्रकाशात मला स्वच्छ दिसायला लागला..

शुभा- बडबडी, गोष्टीवेल्हाळ, हुशार मुलगी. तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना तिच्या मोठय़ा बहिणीचं लग्न जमवण्यासाठीचे आईवडिलांचे खटाटोप तिनं पाहिले होते. ताईचं दाखवायच्या कार्यक्रमासाठी तयार होणं, नंतर येणाऱ्या नकारामुळे निराश होणं, तिनं जवळून पाहिलं आणि ठरवलं, की या चक्रात आपण कधी पडायचं नाही. समाजमान्य निकषांप्रमाणे आपण काही सुंदर वगैरे नाही. तेव्हा हे नकार पचवत पचवत कधी तरी लग्न, सासुरवास, मुलंबाळं होणं.. बापरे! नकोच ते.

पण चूक अशी झाली, की काय नको हे नक्की झालं तरी काय हवं हे मात्र नक्की नव्हतं. त्यामुळे पदवीधर झाल्यावर दूरच्या नात्यातल्या एका मुलाचं स्थळ तिच्यासाठी सांगून आलं, तेव्हा ठामपणे ‘मला लग्न करायचं नाही,’ असं तिला म्हणता आलं नाही. मुलगा शिकलेला, नोकरी करणारा, एकुलता एक होता. दाखवायचा जुजबी कार्यक्रम झाला, होकार आला, लग्न जमलं आणि झालंसुद्धा. शुभाची सासरी रवानगी झाली. लग्न झाल्यावर मात्र शुभाला आपल्यासमोर काय ताट वाढून ठेवलं आहे याची जाणीव झाली. ‘हम करे सो कायदा’ अशा स्वभावाच्या सासूशी जमवून घेणं कठीण होतं. मुख्य म्हणजे नवऱ्याशी काहीच संवाद होत नव्हता. हळूहळू तिच्या लक्षात आलं, की त्याची लैंगिक ओढ निराळ्या प्रकारची होती. मैत्रिणींच्या गराडय़ात आयुष्य गेलेल्या शुभाला इतकं वैराण आयुष्य नकोसं झालं आणि ती माहेरी निघून आली. माहेरी तिचं स्वागत झालं नाही, पण घराचा आधार मिळाला. तिचं विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण सुरू झालं. अभ्यासात पूर्ण लक्ष लागलं. तेव्हाच विद्यापीठात शिक्षण विकास केंद्राची स्थापना झाली. नोकरी-व्यवसायात अडकलेल्या किंवा अर्धवट शिक्षण झाल्यावर संसारात अडकलेल्या गृहिणींना या केंद्रातून शिक्षण पूर्ण करता येणार होतं. शुभाला या केंद्रात नोकरी मिळाली. छोटे अभ्यासक्रम तयार करणं, शिक्षणासाठी येणाऱ्या मुलामुलींना मार्गदर्शन करणं, यात शुभा रमून गेली. सुरुवातीला कामाचा बोजा हलकाच होता. त्या तीन-चार वर्षांत शुभानं विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रातून ‘स्थलांतरित कामगारांचं पोषण आणि आरोग्य’ या विषयात ‘पीएच.डी.’ही मिळवली. आता शुभाच्या करिअरला एक दिशा मिळाली. निरनिराळे प्रकल्प तिच्या हातात आले. त्यात ती लक्ष घालायला लागली. आहार आणि पोषण हा तिच्या खास अभ्यासाचा विषय होता. या संबंधीच्या चर्चासत्रांना ती जायला लागली.

अशाच एका चर्चासत्राच्या निमित्तानं वेंकी आणि शुभाची ओळख झाली. त्याचं झालं असं की, ती भाग घेत असलेल्या चर्चासत्राबरोबरच लष्करातल्या काही निवृत्त अधिकाऱ्यांचं एक सेमिनारसुद्धा त्याच आवारात चाललं होतं. साहजिकच संध्याकाळी दोन्ही कार्यक्रमांमधली मंडळी भेटायची. जान-पहचान व्हायची. एकमेकांच्या कामाची माहिती व्हायची. शुभाच्या कामाचं स्वरूप वेंकीला आवडलं. वेंकी, सदाशिव आणि कामत हे तिघे घट्ट मित्र होते. हे तिघे आणि शुभा, शुभाच्या दोन मैत्रिणी यांचा एक अनौपचारिक गटच तयार झाला. वेंकी शुभासारखा बोलघेवडा नव्हता, पण त्याची माहिती गप्पांमधून तिला समजली. वेंकीची बायको सैन्यातल्या अतिशय वरिष्ठ अधिकाऱ्याची डॉक्टर झालेली एकुलती एक मुलगी होती. वेंकीचं शिक्षण ‘आय.आय.टी.- मद्रास’ला झालं होतं. तो ‘आय.आय.टी.’च्या तिसऱ्या वर्षांत असताना बांगलादेशचं युद्ध सुरू झालं. शालेय शिक्षण सैनिकी शाळेत घेतलेल्या वेंकीला युद्धात भाग घ्यावा लागला. यादरम्यान त्याच्या प्रमुख अधिकाऱ्याच्या नजरेत हा हुशार, चुणचुणीत तरुण विशेष भरला. युद्धानंतर वेंकीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि पुन्हा तो सैन्यात भरती झाला. दरम्यान, त्याच्या त्या अधिकाऱ्यानं त्याचा माग काढला आणि आपल्या डॉक्टर झालेल्या एकुलत्या एक लेकीचा प्रस्ताव वेंकीला दिला. इतके मोठे अधिकारी आपल्याला जावई करून घेतायत हे पाहून वेंकी खूश झाला. त्याच्या आईला मात्र इथे जरा नाकापेक्षा मोती जड होणार, अशी शंका आली.

वेंकीच्या दुर्दैवानं आईची शंका खरी ठरली. त्याच्या कुटुंबाच्या मध्यमवर्गीय जीवनमानाशी बायकोला जमवून घेता आलं नाही. असं साधंसुधं आयुष्य जगणाऱ्या मुलाला जावई करून घेणाऱ्या वडिलांचा तिला मनस्वी राग आला. त्यांना एक मुलगी झाली. ही गिरिजा, पाच वर्षांची असताना गिरिजाची आई आपल्या वडिलांकडे परत गेली. नंतर इंडोनेशियामध्ये एका रुग्णालयात काम करायची संधी तिला मिळाली. ती परदेशी गेल्यावर वेंकीनं आपल्या आईच्या मदतीनं मुलीला लहानाचं मोठं केलं. गिरिजा मोठी झाली, नोकरीच्या निमित्तानं तीदेखील परदेशी- अमेरिकेला रवाना झाल्यावर वेंकीला खूपच एकटेपण आलं. त्याच्यासाठी जोडीदार शोधण्याची खटपट त्याचे मित्र करत होते.

सेमिनार संपला तरी या सर्वाचा एकमेकांशी फोन किंवा पत्र यातून संपर्क होता. या संपर्कामुळे शुभाला समजलं, की दिल्लीच्या एका लष्करातल्या अधिकाऱ्याच्या मुलीशी, बेलाशी वेंकीचं जमलंय. बेला एका खासगी कंपनीत अधिकारी आहे आणि वेंकी आता दिल्लीला राहायला गेलाय. हे समजल्यावर शुभाला आनंद झाला. तिनं बेलाचं अभिनंदन करण्यासाठी फोनही केला. पण बेला फारच औपचारिकपणे शुभाशी बोलली. त्यामुळे हे संभाषण वाढलं नाही. त्यानंतर दोन-तीन वर्ष गेली. अचानक एका सेमिनारमध्ये कामत शुभाला भेटला. त्यांच्या गप्पांमधून शुभाला समजलं की, वेंकी आणि बेलाचे सूर काही जुळले नाहीत. त्यामुळे लग्न करायच्या उद्देशानं दिल्लीला गेलेला वेंकी लग्न न करताच परत बेंगळूरुला स्वत:च्या घरी आलाय. नंतर मात्र कामतनं शुभाला धक्काच दिला. तो सरळ म्हणाला की, ‘तू आणि वेंकी का नाही एकत्र येत? तुमच्या दोघांचे स्वभाव, आवडीनिवडी खूप जुळणाऱ्या आहेत.’ हे ऐकून शुभा उडालीच! नुकतीच पन्नाशी ओलांडलेल्या शुभानं सहजीवनाचा विचारच केला नव्हता. हे दालन आपल्यासाठी नाही, असंच मनोमन ठरवून टाकलं होतं. तिच्या मनाची घालमेल झाली. त्यानंतर काही दिवसांनी शुभाला बेंगळूरुला कामासाठी जावं लागलं. तेव्हा तिची आणि वेंकीची भेट झाली. या भेटीत स्पष्ट शब्दात बेलाचे आणि माझे आता काही संबंध नाहीत, असं वेंकीनं शुभाला सांगितलं.

घरी परत आल्यावर वेंकी आणि शुभाचा फोनवर संवाद व्हायला लागला, पण नुकत्याच प्रेमात पडलेल्या नवथर मुलीसारखं शुभाचं वागणं नव्हतं. पन्नाशी ओलांडलेल्या शुभाचं करिअर ऐन भरात आलं होती. शिक्षण विकास केंद्राची ती प्रमुख झाली होती. आहारातून समाजातल्या सत्तासंबंधांचं कसं दर्शन होतं, यासंबंधीचा तिचा लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर खूप प्रतिक्रिया आल्या. या सगळ्या घडामोडी चालू असतानाच वेंकीनं तिला जेव्हा विचारलं, की पुढचं आयुष्य आपण एकत्र घालवू या का? तेव्हा शुभा हुरळून गेली नाही. पण मनात खोलवर कुठे तरी आनंदाचा निर्मळ झरा वाहाता झाला खरा.

शुभा आणि वेंकीनं एकत्र येण्याच्या शक्यता आजमावायला सुरुवात केली. शुभाचे वडील आता खूपच वयस्क झाले होते. पण त्यांना वेंकी भेटला. वेंकीचं नम्र आणि आदबशीर बोलणं, चटकन समोरच्या व्यक्तीला आपलंसं करणं त्यांना आवडलं. आईचं मतसुद्धा अनुकूल झालं. वेंकी आणि शुभाच्या सहजीवनाच्या शक्यतेमुळे त्यांना मनापासून आनंद झाला. आपल्या धडपडय़ा, हुशार मुलीच्या उतारवयात तिला चांगला आधार मिळेल, या भावनेनं त्यांना आश्वस्त केलं. वेंकीच्या मुलीची- म्हणजे गिरिजाची प्रतिक्रिया मात्र वेगळी होती. वडिलांच्या आणि आपल्यात तिसरं कोणी नसावं, अशी तिची पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. थोडय़ाफार विचारानंतर, चर्चेनंतर तिच्या विरोधाची धार बोथट झाली. मात्र वेंकी आणि शुभाच्या सहजीवनात तिचा सहभाग नसेल, असं तिनं स्पष्ट केलं. शुभाची आणि गिरिजाची प्रत्यक्ष भेट वेंकीनं घडवून आणली. या भेटीनंतर गिरिजाचं मत जरासं बदललं. ‘तुमच्या मागे मी शुभाची काळजी घेईन’ असंसुद्धा ती म्हणाली. वेंकीच्या मोठय़ा बहिणीचा मात्र पाठिंबा मिळाला नाही. तिच्या मते आता गिरिजाचं लग्न करणं आवश्यक होतं आणि अशा वेळी वेंकीनं

दुसऱ्या कोणाबरोबर सहजीवन सुरू करणं हा गिरिजाचं लग्न ठरवण्यात अडथळा ठरण्याची दाट शक्यता होती.

अशा सगळ्या चर्चानंतर वेंकी आणि शुभानं एकत्र येण्याचा निर्णय घेतला, पण लग्न करायचं का, या प्रश्नाला मात्र त्यांचं नकारार्थी उत्तर होतं. वेंकी आणि शुभा गेली अनेक वर्ष जरी एकटेच राहात असले तरी त्यांनी आपापल्या पूर्व-जोडीदारांशी अद्याप औपचारिक घटस्फोट घेतलेला नव्हता. काही वर्षांपूर्वी एकदा शुभाच्या मनात घटस्फोट घेण्याचा विचार आला होता. ती वकिलांना भेटूनही आली. पण तिच्याकडे लग्नाचं प्रमाणपत्रसुद्धा नव्हतं. ते मिळवायची खटपट करायची तिला अजिबातच इच्छा नव्हती आणि सवडही नव्हती. वेंकी आणि त्याच्या पत्नीनंही घटस्फोट घेतला नव्हता. पण अनेक वर्षांत तिची काही खबरबातही नव्हती. म्हणून प्राप्त परिस्थितीत छोटासा समारंभ करून आपलं सहजीवन सुरू झाल्याचं जाहीर करावं, असं ठरलं. अनेक वर्षांनंतर का होईना, शुभाला

सहचर मिळतो आहे, याचा तिच्या घरच्यांना, मित्र-मैत्रिणींना, सगळ्या सुहृदांना मनापासून आनंद झाला.

एका छोटय़ाशा हॉलमध्ये हा समारंभ पार पडला. शुभाचे विद्यापीठातले सगळे सहकारी उपस्थित होते. अगदी एकमुखानं ‘नांदा सौख्य भरे’ या शुभेच्छा मिळाल्या. एकच गोष्ट शुभाला खटकत होती, ती म्हणजे समारंभाला वेंकीकडून कोणीही आलं नव्हतं. या अनुपस्थितीमुळे

तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. या चुकचुकीचे पडसाद भविष्यात खूपदा तिच्या कानावर पडणार होते..

(या लेखाचा पुढील भाग १९ जूनच्या अंकात)

(लेखातील नावं विनंतीवरून बदललेली आहेत)

 

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2021 at 01:08 IST
Next Story
व्यर्थ चिंता नको रे : विंचू चावला!