रुचिता गुरव
हे पत्र माझ्या त्या मित्रमैत्रिणींना समर्पित आहे, ज्यांनी या ना त्या कारणाने आपली नोकरी गमावली आहे आणि आज नव्या संधीच्या शोधात आहेत.
हे मी सांगायचं कारण, कधीकाळी मीही त्या स्थित्यंतरातून, त्या अनुभवातून गेले आहे. २०१९च्या ऑक्टोबरमध्ये म्हणजे करोना टाळेबंदीच्या ५-६ महिने आधी मी एका नामवंत टीव्ही चॅनलच्या वरिष्ठ कार्यकारी निर्माती पदाची नोकरी सोडून ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. काही शासनाचे तर काही खासगी उद्योगांचे कार्यक्रमदेखील केले. सगळं कसं मस्त, व्यवस्थित चालू होतं नि तेव्हाच करोनाने दगाफटका केला. टाळेबंदी लागली आणि सगळंच काम ठप्प झालं. कार्यक्रम बंद, नोकरी नाही, एका पैशाची कमाई नाही. घरी शिक्षण घेणारी मुलं, नवर्याचं आजारपण, या परिस्थितीत दीड वर्ष कसंबसं काढलं. दरम्यान, टुकूर टुकूर करत काही फ्रीलान्सिंग नोकर्या करत राहिले. कधी काम मिळालं, तर कधी चक्क नकार मिळाला… पण आयुष्यातले सर्वात जास्त धडे मला या काळाने शिकवले.
आपण ज्या ‘कॉर्पोरेट’ जगात काम करतो, तिथं खुर्चीला किंमत असते, माणसांना नाही. एकदा का तुम्ही तिथून बाहेर पडलात की समाज तुमची किंमत शून्य करतो. अधिकारी पदावर बसलेल्या त्या माणसाकडे प्रतिष्ठेने बघण्याचा समाजाचा चष्मा त्यानंतर गळून पडतो आणि सामान्य माणसांच्या नोकरीच्या स्पर्धेत त्याची गणती केली जाते. म्हणूनच मी हक्काने सांगू शकते, तुम्ही नाकारले जाणं वा तुम्हाला नकार मिळणं ही भावना किती वाईट असते, ती मनावर काय प्रहार करू शकते, हे मी समजू शकते. कारण मित्रांनो, इथं एक संधी आपल्या हातून जाताना तिच्याबरोबर नकळत आपला आत्मविश्वास, आपली ओळख आणि स्वत:विषयीचा आदरही घेऊन जाते.
आपल्या समाजात ‘‘सध्या तू काय करतेस वा करतोस?’’ या प्रश्नातच माणसाची किंमत मोजली जाते, त्यामुळे आपली नोकरी जाणं आपल्याला आतून-बाहेरून हादरवून टाकतं. नोकरी जाण्याचं पत्र मिळाल्यानंतरच्या तीन महिन्यांच्या ‘नोटीस पीरियड’मध्ये ती व्यक्ती बाहेरून जरी शांत दिसत असली, तरी मनातून मात्र ती अनेक प्रश्नांनी तुटत असते. महिन्याअखेर बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार्या पगाराची आणि त्याला जोडून असणार्या जमा-खर्चांची चिंता तिला असतेच, पण त्यासोबतच काही प्रश्न तिच्या मनाला आणि मेंदूला सतत पोखरत असतात,
‘‘माझ्यातच काही कमी आहे का?’’
‘‘मी खरंच इतकी वाईट नोकरी करत होते का?’’
‘‘आता लोक माझ्याबद्दल काय बोलत असतील?’’
‘‘काय विचार करत असतील?’’
‘‘पुन्हा मला नोकरीची संधी मिळेल का?’’ ‘‘तोपर्यंत मी काय करू?’’
या प्रश्नाला त्या व्यक्तीकडे उत्तर असतंही आणि नसतंही. कधी नोकरकपात, कधी खर्चकपात, कधी व्यवस्थापन बदललं म्हणून, तर कधी कार्यालयातील राजकारणाचा बळी म्हणून, तर कधी या सगळ्यात आत्मविश्वास ढासळला म्हणून एखाद्याला नोकरी गमवावी लागते. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही व्यवस्थापनातून बाहेर पडताना त्या व्यक्तीच्या कपाळावर नकळत काही शिक्के मारले जातात… ‘‘काही येतच नसेल ’’, ‘‘कामचुकार असेल’’, ‘‘आळशी असेल’’, ‘‘सर्जकताच नसेल… म्हणूनच काढलं असेल.’’ आणि बहुतेकदा हे सगळं चुकीचं आहे हे माहिती असूनदेखील समाज ते सहज मान्य करून टाकतो. त्यातही सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे, कधी कधी त्या व्यक्तीलाही हे खरं वाटायला लागतं. ती व्यक्ती मग स्वत:भोवतीच एक अदृश्य तुरुंग बांधून घेते. त्या एका घटनेभोवती आयुष्यभर घुटमळत राहते. स्वत:ची किंमत विसरून जाते.
अशा वेळी डोकं, मन स्थिर ठेवून एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, नोकरी जाणं म्हणजे माणूस संपणं नाही. एखाद्या व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय हा नेहमीच तुमच्या कुवतीचा, गुणवत्तेचा निकाल नसतो. अनेकदा तो त्यांचे उद्योगातील फायद्यातोट्यातील आकडे, अंदाजपत्रक, उद्योगाची पुनर्बांधणी, अंतर्गत राजकारण आणि बदलत्या प्राधान्यक्रमाचाही भाग असतो. नोकरकपात ही काही तुमच्या कामगिरीचं वा कार्यक्षमतेचं प्रमाणपत्र नसतं. एखादी कंपनी खर्चकपात करते, कर्मचारी बदलते, व्यवस्थापक बदलते, त्यांचे प्राधान्यक्रम बदलते, त्यात बर्याचदा चांगले लोकही बाहेर जातात. त्यामुळे मिळालेला नकार म्हणजे कायमचं निकालपत्र वा फैसला नाही.
एखाद्या चांगल्या खेळाडूला व्यवस्थापनाने किंवा टीमनं काही दिवस सामने न खेळवता बाहेर बसवलं म्हणून तो वाईट खेळाडू ठरत नाही… तसंच एखाद्या कंपनीने तुम्हाला सोडलं म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही म्हणाल की, हे लिहिणं सोपं आहे, दुसर्यांना सांगणं सोपं आहे, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. हो, अगदी बरोबर आहे तुमचं दु:ख, अपमान होणं, आत्मसन्मानाला ठेच पोहोचणं हे तुमचं तुम्हालाच सहन करावं लागतं… पण हाच तो क्षण असतो स्वत:ला खंबीर ठेवण्याचा. त्या क्षणी स्वत:ला निरुपयोगी घोषित करू नका. विसरू नका.. तुमचं कौशल्य अजूनही तुमचंच आहे… तुमच्या ‘रिझ्युमे’वरचा अनुभव अजूनही तुमचाच आहे. तुमची मेहनत, तुमची प्रामाणिकता, तुमची क्षमता व्यवस्थापनाकडून आलेल्या एक निर्णयाच्या ई-मेलने संपत नाही.
अशा वेळी स्वत:ला सावरणं खूप गरजेचं असतं. दु:ख, राग, अपमान हे सगळं नैसर्गिक आहे. ‘मला काही फरक पडत नाही,’ असं दाखवण्यापेक्षा ते स्वीकारणं जास्त प्रामाणिक असतं. थोडा वेळ घ्या… मन मोकळं करा… विश्वासू लोकांशी बोला, पण स्वत:ला जगापासून तोडू नका… स्वत:ला एकटं पाडू नका, दैनंदिन व्यवहार बंद करू नका… दररोज थोडं वेगळं काही शिका… स्वत:ला अद्ययावत ठेवा… लोकांच्या संपर्कात राहा… नवीन संधींच्या शोधात राहा…
आणि सर्वात महत्त्वाचं. एका नकाराला आयुष्याचा अंतिम निकाल समजू नका. नोकरी-व्यवसायामध्ये मागे पडणं लाजिरवाणं नाही; मात्र तसं झाल्यावर स्वत:ला कायम तिथंच अडकवून ठेवणंही धोकादायक आहे. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ते प्रसिद्ध वाक्य कायम लक्षात ठेवा, ‘मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा’. कदाचित आणखी चांगल्या जागी पोहोचण्यासाठी तुम्ही निघालेले असाल. आज कदाचित परिस्थिती कठीण असेल, पण याच काळात माणूस स्वत:ला नव्याने ओळखायला शिकतो. म्हणूनच… जर तुम्ही आज या टप्प्यातून जात असाल, तर स्वत:वरचा विश्वास पूर्णपणे हरवू देऊ नका.
कारण नोकरी गमावलेला प्रत्येक माणूस हरलेला नसतो… कधी कधी तो फक्त नव्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभा असतो…
तुमचीच मैत्रीण
रुचिता
uruchita.gurav@gmail.com
