एकाच व्यक्तीने किती भूमिका बजावाव्यात? आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, अस्तित्वाचा समाजासाठी कसा सदुपयोग व्हावा याची प्रचीती येते ती दुसर्या महायुद्धाच्या काळात फ्रेंच प्रतिरोध चळवळीत गुप्तहेर म्हणून सामील झालेल्या जोसेफिन बेकर यांच्या कार्याने. लोकप्रिय गायिका आणि नृत्यांगना अशी त्यांची खरी ओळख, पण या गायिकेमागे दडलेली होती फ्रेंच क्रांतिकार्यांना माहिती पुरवणारी गुप्तहेर. अन्य देशात कार्यक्रमासाठी जात कधी गीतांच्या नोटेशन्समध्ये तर कधी वाद्य ठेवण्याच्या पेट्यांमधून तिथल्या युद्ध परिस्थितीची माहिती ब्रिटिशांना त्या पुरवत राहिल्या. कसं केलं त्यांनी हे धाडस?
दुसर्या महायुद्धात संयुक्त अमेरिका, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, चीन यांच्यासोबतच कॅनडा, ऑस्ट्रेलिया, भारत, पोलंडसारखे अनेक देशही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या रिंगणात उतरले होते. पोर्तुगाल हा देश मात्र तटस्थ होता. पोर्तुगालने त्यांचे अझोरेस बेट मित्रराष्ट्र म्हणजे अमेरिका आणि ग्रेट ब्रिटन यांना वापरायला दिले होते. ऐन युद्धकाळात सैन्यतळ वापरायला मिळणं ही फारच मोठी मदत होती. अशी मदत करून पोर्तुगालने त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा मित्रराष्ट्रांना दिला. लिस्बन हे शहर युरोपमधील मित्रराष्ट्रांच्या ‘एजंट्स’चे आणि निर्वासित नागरिकांचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. प्रत्यक्ष युद्ध नसल्याने तिथं इतर देशांतील कलाकार येऊन संगीत समारंभ भरवत असत. त्यातील एक प्रसिद्ध कलाकार म्हणजे जोसेफिन बेकर.
१९४० मध्ये फ्रान्सवर जर्मनांनी कब्जा मिळवला होता. त्यांच्या राजनैतिक मेजवान्यांमध्ये अनेक अधिकारी उपस्थित असत. अशा मेजवानी समारंभात जर्मन आणि इटलीचे अधिकारी उपस्थित असताना एक सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि गायिका जोसेफिन नेहमी सामील होत होत्या. एक वलयांकित कलाकार म्हणून सगळीकडे त्यांचं स्वागतच होत असे. त्यांचं अशा मेजवानीमध्ये सामील होणं मात्र विशिष्ट उद्देशाने होतं. त्या सहजपणे अधिकार्यांशी बोलत आणि खुबीनं त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती मिळवत. सैनिकांच्या हालचाली, त्यांच्या निवासाची माहिती, त्यांना मिळणारी रसद आणि बंदरांची माहिती मिळवून मित्रराष्ट्रांना पुरवत. सुरुवातीला त्यांनी भरपूर माहिती ब्रिटिश गुप्तहेर संघटनेस पुरवली. त्यांच्या हालचाली बघून काही जर्मन अधिकार्यांना त्यांचा संशय आला होता. तेव्हा ‘फ्रेंच प्रतिरोध चळवळ’ सुरू होती. अशाच एका मेजवानीच्या कार्यक्रमानंतर त्या घरी जात असताना जर्मन अधिकारी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे गेले. काही अंतरावरच जोसेफिन यांनी ते ओळखलं. जोसेफिन यांनी त्यांच्या घरातील कलाकेंद्रात फ्रेंच कार्यकर्ते आणि गुप्तहेर यांना आश्रय दिला होता. आपल्यामागे येणार्या जर्मन अधिकार्यांना न घाबरता त्यांनी सहजपणे घरात प्रवेश केला. आत गेल्याबरोबर इतरांना सावध करणारा एक सांकेतिक आवाज केला. घरात आधीपासूनच असलेले फ्रेंच कार्यकर्ते आणि गुप्तहेर मंडळी त्यामुळे एकदम सावध झाली. पाठीमागून काही सेकंदात जर्मन सैनिक घरात घुसले. जोसेफिन यांनी अंगभूत अभिनय कौशल्याचा वापर करून चौकशीसाठी आलेल्या सैनिकांशी संवाद साधत आपण कला सादर करणार्या एक कलाकार असून जर्मनीशी इमान राखून असल्याचं पटवून दिलं. घराचा इतर भाग दाखवून तिथं कधीच कुणी राहात नसल्याची खात्री पटवून दिली. ते सैनिक तर निघून गेले; पण तो प्रसंग म्हणजे धोक्याची घंटा होती. संशयाची सुई पुन्हा त्यांच्याकडे येण्याआधीच फ्रान्स सोडणं आवश्यक होतं. त्यांनी तिथून निघून पोर्तुगाल आणि इतर देशात संगीत दौरे करण्याचं ठरवलं.
जोसेफिन बेकर यांना त्यांचा एक चमू घेऊन फ्रान्समधून लिस्बन (पोर्तुगाल) इथं जायचं होतं. त्यांच्यासोबत साथीदार झॅक ॲब्टे (Jacques Abtey) होते. सगळ्याच प्रवाशांची कसून तपासणी सुरू होती. नाझी अधिकार्यांना जराही संशय आला असता तर मोठा घात झाला असता. कारण त्यांच्या पेटीमध्ये काही अतिमहत्त्वाची कागदपत्रे होती ती ते जर्मनव्याप्त फ्रान्समधून बाहेर नेत होते. त्यांची तपासणी झाली असती तर संपूर्ण योजना अपयशी ठरली असती. पण जोसेफिन यांची लोकप्रियताच अशी होती की, जोसेफिन आणि झॅक फ्रान्समधून बाहेर पडताना जर्मन सैनिकांनी त्यांची इतरांसारखी कसून तपासणी केली नाही. उलट पेटी उघडायला सांगण्याऐवजी तपास अधिकार्याने चक्क त्यांची सही मागितली. त्यामुळे त्या तिथून सहीसलामत सुटल्या. झॅक हे त्यांचे साथीदार म्हणून त्यांनाही सीमाशुक्ल अधिकार्यांनी फार त्रास न देता तिथून जाऊ दिलं हे विशेष. सगळी वाद्यं आणि सामग्री घेऊन ते पोर्तुगाल आणि दक्षिण अमेरिकेच्या दौर्यावर गेले. तिथं कार्यक्रम सादर होत होते. गीतांचे नोटेशन लिहिलेले अनेक कागद होते. पण मोठ्या प्रमाणात असेही कागद होते, ज्यात गीतांच्या नोटेशनऐवजी गुप्त माहिती असे. ती माहिती अशा शाईनं लिहिली जाई की, बघताना कागद कोरा वाटे. त्यांच्या इतर पेट्यांमध्येही फक्त वाद्यं नव्हती. त्यात होती कागदपत्रं, छायाचित्रं, नकाशे, गायब होणार्या शाईमध्ये लिहिलेले संदेश आणि बरंच काही. मंचावर नृत्य सादर करताना त्या विविध नवीनतम पद्धतीनं सजवलेले पोशाख वापरत. त्यांचे आकर्षक पोशाख हा नेहमी चर्चेचा विषय असे. अशा पोशाखात त्या अत्यंत गुप्त माहिती असलेली कागदपत्रं लपवत असत. अशा पद्धतीने संगीत दौर्याच्या आड युद्धाची गुपिते मिळवून आपल्या देशात पाठवण्याची त्यांची योजना होती.
जोसेफिन यांचे साथीदार झॅक आब्ते म्हणजे फ्रेंच गुप्त अधिकारी आणि खुद्द जोसेफिन या फ्रान्स आणि मित्रराष्ट्रांसाठी काम करणार्या हेर! एक सुप्रसिद्ध नर्तकी आणि गायिका या वलयामागे त्यांची गुप्तहेरगिरी लपली जात होती. इतर देशात जाऊन कलेच्या आड तिथल्या युद्ध परिस्थितीची प्रचंड माहिती ब्रिटिशांना पुरवणं हे नक्कीच अत्यंत धोकादायक होतं. एका वृत्तांतात नमूद केलं आहे की, फ्रेंच गुप्तहेर अधिकारी झॅक यांनी जोसेफिन यांच्या जवळ ‘साईनाईड’च्या गोळ्या देऊन ठेवल्या होत्या. अटीतटीची वेळ आली तर नाझींच्या ताब्यात जाण्याऐवजी स्वत:ला संपवावं यासाठी. हेरगिरीसाठी नाझींची शिक्षा म्हणजे अतोनात हाल आणि मृत्युदंड!
जोसेफिन यांचा जन्म ३ जून १९०६ रोजी अमेरिकेतील मिसुरीमधील सेंट लुईस इथं झाला. त्यांचं नाव होतं, फ्रीडा जोसेफिन मॅकडोनाल्ड. गरीब मातापित्यांच्या पोटी जन्मलेल्या जोसेफिन यांचं बालपण हलाखीतच गेलं. घरात पैशांची चणचण बघून अवघ्या तेराव्या वर्षी छोट्या जोसेफिन एका नृत्यसमूहात सहभागी झाल्या. शरीरातील लय, लवचीकता आणि गोड गळा यामुळे त्या लवकरच समूहातील महत्त्वाच्या कलाकार बनल्या. असं असूनही त्या काळात अमेरिकेतील वर्णद्वेषामुळे त्यांना पदोपदी अपमान, दुय्यम वागणूक आणि तिरस्काराला समोरं जावं लागलं. (तेव्हा अमेरिकेतील मिसिसिपी, अलाबामा, जॉर्जियासारख्या अनेक राज्यांत वर्णद्वेषाचं विष पसरलेलं होतं.) मोठं होऊन आपण या वर्णद्वेषाविरुद्ध लढा द्यायचा हा निर्धारही त्यांनी लहान वयातच केला. १९२५ मध्ये त्या फ्रान्समध्ये पॅरिस इथं गेल्या. तिथं मात्र मोकळं वातावरण होतं. तिथं त्यांच्यातील कलाकाराला खूप वाव मिळाला. प्रसिद्धीच्या झोतात असताना त्यांनी १९३७ मध्ये जीन लिओन यांच्याशी लग्न करून फ्रेंच नागरिकत्व पत्करलं. त्यानंतर लवकरच त्या फ्रेंच प्रतिरोध चळवळीत सामील झाल्या. फ्रेंच गुप्तहेर त्यांचे साथीदार बनले. तत्पूर्वी अत्यंत कोवळ्या वयात त्यांचं विली वेल्स यांच्याशी एक लग्न झालं होतं, जे लवकरच संपुष्टात आलं. त्यानंतर १९२१ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचा विवाह विल्यम बेकर यांच्याशी झाला होता. तेव्हापासून त्या जोसेफिन बेकर म्हणवल्या गेल्या.
मोरोक्कोमधील कॅसाब्लँका इथं एका कार्यक्रमानंतर जोसेफिन गंभीररीत्या आजारी पडल्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यांना भेटायला तिथले राजदूत, प्रतिष्ठित अधिकारी आणि इतर मंडळी येत असत. त्या आजारपणातही त्यांच्यातील गुप्तहेर जागाच होता. तिथं येणार्या अधिकार्यांकडून त्यांनी युरोपच्या अटलांटिक किनार्यावरील जर्मन तटबंदी, तिथली रचना याची माहिती मिळवली. जर्मन जहाजं कोणत्या बंदरावर किती दिवस मुक्कामी आहेत, विमानतळावर काय काय हालचाली आहेत हे विचारून घेत. मध्यरात्री ती माहिती लिहून त्या त्यांच्या प्रतिनिधीकडे पोचवत असत. मित्रराष्ट्रांच्या सैन्याला, गुप्तहेरांना किंवा फ्रेंच क्रांतिकारी यांना अगदी अल्प माहितीदेखील फार कामाची असे.
‘जोसेफिन बेकर्स सिक्रेट वॉर’ या हॅना डायमंड लिखित पुस्तकात त्यांच्या फ्रान्स, आफ्रिका आणि पोर्तुगालमधील हेर म्हणून केलेल्या कामगिरीवर विस्तृत लेखन आहे. त्यांच्या जीवनावर अनेक पुस्तकं लिहिली गेली. १९४९ मध्ये ‘फायरलेस अँड फ्री’ हा त्यांच्या स्वलिखित आठवणींचा संग्रह त्यांनी फ्रेंच भाषेत लिहिला होता. गेल्या वर्षी त्याची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यांच्या जीवनावर आधारित ‘जोसेफिन बेकर स्टोरी १९९१’ या नावाचा चरित्रपट एच.बी.ओ. या वाहिनीवर आणि त्यांच्या गाजलेल्या नृत्याच्या काही फिती समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. युद्धकाळातील त्यांच्या सैनिकी सेवेसाठी आणि हेरगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. अनेक पदकं मिळालीच, पण फ्रान्सने त्यांना सर्वोच्च राष्ट्रीय गौरव प्रदान करत ‘पॅन्थियन’ स्मारकामध्ये स्थान दिले, असा गौरव प्राप्त करणार्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय स्त्री ठरल्या. (फ्रान्ससाठी असामान्य योगदान देणार्या व्यक्तीस या स्मारकात स्थान देऊन गौरव केला जातो.)
एक मनस्वी कलाकार आणि गुप्तहेर असलेल्या जोसेफिनसारख्या व्यक्तीचं वैयक्तिक आयुष्य बर्याचदा अस्थिर असतं हे आपण बघत आलो आहोत. तिसर्या विवाहातील जीन लिओन यांच्याशी संबंध संपुष्टात आल्यानंतर जून १९४७ मध्ये त्यांनी जो बुलियन यांच्याशी चौथा विवाह केला, ज्यामुळे त्यांचं आयुष्य एकदम बदललं.
दुसर्या महायुद्धानंतर त्यांनी जगातील वंशभेदासाठी अद्भुत पद्धतीने संदेश दिला. त्यांनी वेगवेगळ्या देशांतील, वेगवेगळ्या वंशाची एक-दोन नाही तर तब्बल बारा अपत्यं दत्तक घेतली. त्यांना त्या प्रेमाने ‘रेनबो ट्राईब’ म्हणत. त्यांचे पती जो बुलियन यांनी मुलांची सोय एका मोठ्या घरात केली होती. रंग, त्वचा, धर्म, भाषा आणि संस्कृती यापेक्षाही माणूस आणि मानवता जास्त मोठी आहे हा विचार त्यांनी त्यांच्या कृतीतून जगाला दाखवून दिला. इतक्या मुलांना वाढवताना त्यांना फार मोठी आर्थिक ओढाताण सहन करावी लागली. त्यांचा संघर्ष संपला नव्हता. १९६० मध्ये त्यांना त्याचं मोठं घर गहाण ठेवावं लागलं. त्या हलाखीतही त्यांनी सगळ्या मुलांना सांभाळलं.
कलाकार म्हणून रंगमंच गाजवून हेरगिरी करण्याव्यतिरिक्त त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांच्या हक्कासाठी मार्टिन ल्यूथर किंग यांच्यासोबत त्यांनी एक ‘नागरी योद्धा’ म्हणून बर्याच चळवळीत सहभाग घेतला. १९६३ मधील सुप्रसिद्ध ‘वॉशिंग्टन मार्च’मध्ये त्या सक्रिय होत्या. १९७५ मध्ये त्यांच्या कारकीर्दीची ५० वर्षं पूर्ण झाली म्हणून पॅरिसमध्ये त्यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी रंगमंचावर गायन आणि नृत्य सादर केलं. तो कार्यक्रम प्रचंड गाजला. त्यानंतर आर्थिक तडजोड म्हणून असे आणखी कार्यक्रम करण्याची त्यांची इच्छा होती, पण १२ एप्रिल १९७५ रोजी प्रकृतिअस्वास्थ्याने त्यांचं निधन झालं. जगभरात नाव कमावणार्या या अनेक पदरी बहुआयामी धाडसी कलाकाराचं आयुष्य विसावलं.
खरं तर इतिहास निर्माण करणार्या व्यक्तींचं जीवन संपत नसतं, ते पिढ्यानपिढ्या चेतना बनून कालातीत होतं. जोसेफिन यादेखील चिरकालीन चेतना बनून राहिलेल्या आहेत.
uadaparnadeshpande@gmail.com
