|| हरीश सदानी

मुलींच्या योनिशुचितेबाबत जगात ठिकठिकाणी विविध प्रथा पाळल्या जातात. भारतात  कंजारभाट समाजात असलेली लग्नाच्या रात्री कौमार्य परीक्षण करण्याची पद्धत त्यातलीच एक. या प्रथेमुळे मुलींच्या आयुष्यावर कसे अनिष्ट परिणाम होतात, हे लहानपणापासून पाहिलेल्या विवेक तमायचिकर या तरुणानं आपल्या समाजातील विवेकी तरुणांना एकत्र केलं आणि या कुप्रथेविरोधात मोहीम सुरू के ली. त्यास बऱ्याच अंशी यश मिळत आहे…     

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

परंपरा व रूढींच्या नावाखाली भारतीय समाजात स्त्रियांवर निरनिराळी बंधनं घातली जातात. सती प्रथेपासून हुंडा पद्धत ते बालविवाह, मासिक पाळीदरम्यान पाळल्या जाणाऱ्या धारणा असोत, की दाऊदी बोहरा समुदायातील मुलींची खतना पद्धत असो… वेगवेगळ्या तऱ्हेनं स्त्रीच्या शरीरावर, तिच्या लैंगिकतेवर पुरुषी नियंत्रण ठेवलं जातं. मानवी हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या या बऱ्याच प्रथांना देशात बेकायदेशीर ठरवलं गेलं असलं, तरी आजही समाजात अशा अनेक रूढी-प्रथा सर्रास चालू असताना आपण पाहतो.

 भटक्या-विमुक्त जातीतील कंजारभाट समाजात चारशे वर्षं चालत असलेली  कौमार्य परीक्षण पद्धत ही अशाच रूढी-परंपरांच्या नावानं स्त्रियांचं शोषण, अपमान करणारी पद्धत. याविरोधात आवाज उठवत, आपल्या समाजातीलच सुशिक्षित तरुण-तरुणींना एकत्र करत, बेकायदेशीरपणे चाललेल्या जातपंचायतींना मूठमाती देण्यासाठी लढणाऱ्या विवेक तमायचिकर या ३२ वर्षीय तरुणाची ही कहाणी. मुंबईजवळच्या अंबरनाथ उपनगरात जन्मलेला विवेक आपल्या लहानपणातील एक मनाला चुटपुट लावून गेलेली आठवण सांगतो. इयत्ता चौथीनंतर उन्हाळ्याच्या सुटीत चुलत बहिणीच्या लग्नासाठी विवेक कुटुंबीयांसह पुण्यात गेला होता. लग्नाची धूमधाम संपली आणि पुढच्या दिवशी सकाळीच त्या बहिणीला तिचे आईवडील आणि नातेवाईक एका बंद खोलीत शिवीगाळ, मारहाणही करत असल्याचं विवेकनं पाहिलं. तो सांगतो, ‘‘तो क्षण माझ्या मनात संभ्रम निर्माण करून गेला, की लग्नानंतर ताईला मारहाण का? सगळे जण हेही म्हणत होते की, ‘मुलगी खराब निघाली.’ ‘खराब निघणं’ म्हणजे काय, हे मला कळत नव्हतं; पण काही तरी चुकीचं होतं आहे हे कळलं होतं. ’’

कालांतरानं समज वाढत गेली तसं विवेकला हे कळू लागलं, की आपल्या कंजारभाट समुदायातील लहानपणी पाहिलेला तो लग्नप्रसंग होता कौमार्य परीक्षणाबाबतचा. विवेक सांगतो, ‘‘लग्नाच्या दिवशी रात्री नवदाम्पत्यास लॉजमध्ये एका खोलीत नेलं जातं. बाहेर पंच व दोन्ही कुटुंबीयांचे आईवडील थांबतात. मुलीच्या अंगावरील दागिने, केसांच्या पिना काढून घेतल्या जातात. ठरवून दिलेल्या वेळेमध्ये या जोडप्यानं शरीरसंबंध प्रस्थापित के ल्यावर बिछान्यावरील पांढऱ्या बेडशीटवर रक्ताचा डाग पडणं आवश्यक असतं. तरच ती कु मारी. जर तो नसेल, तर ‘माल खोटा’ असं तीनदा म्हणत त्या मुलीची जाहीर नालस्ती केली जाते. ‘ हे कुणामुळे, कुठे  व कधी झालं? तो मुलगा कुठल्या जातीतला होता?’ असं सर्वांसमोर  विचारून नववधूला अपमानास्पद वागणूक दिली जाते. खेळामुळे, व्यायामामुळे, सायकल चालवत असताना व इतर कोणत्याही कारणांमुळे योनीपटलाचा पातळ पडदा फाटू शकतो आणि एकदा का तो तेव्हा फाटला की नंतर शरीरसंबंधाच्या वेळी रक्त येत नाही, हा विज्ञानाला धरून असलेला विचार पंच करताना दिसत नाहीत. आता संसार मोडणार, मार पडणार, या भीतीनं मग या मुली अनेकदा ‘बाहेरचा मुलगा’ असं सांगून मोकळ्या होतात. समाजातल्या कुणा मुलाचं नाव घेतलं, तर त्याला पंचांच्या पुढे आणून उभं केलं जातं, मोठ्या रकमेचा दंड भरावा लागतो. ‘शुद्धीकरणा’च्या अघोरी शिक्षेला तोंड द्यावं लागतं. शिवाय मुलाला मारहाणही केली जाते. मुलीला मारल्यानंतर जर नवऱ्यानं नांदवायला नकार दिला, तर त्या मुलीचं आयुष्य पणाला लागतं. मुलगी नांदली, तरी लग्नापूर्वी कुणाशी तरी तिचे शरीरसंबंध होते, ही बोच त्या मुलाच्या मनात कायम राहते. वर्षानुवर्षं त्यावरून वाद झडत राहतात.’’ या अनिष्ट रूढीबद्दल विवेकचा संताप होत होता. त्याचे चुलतमामा असलेले कृष्णा इंद्रेकर यांनी १९९६ मध्ये कौमार्य परीक्षण न करता व नोंदणीकृत पद्धतीनं विवाह करून जातपंचायतीविरुद्ध जाऊन मोठं पाऊल उचललं होतं. हे विवेकनं पाहिलं होतं. वरिष्ठ  शासकीय अधिकारी असलेल्या मामांना त्यासाठी अनेक वर्षं समाजातून बहिष्कृत केलं गेलं आहे, हेसुद्धा त्याला समजलं होतं. या कुरीतीविरुद्ध आपल्यालाही पुढे ठोस भूमिका घ्यावीच लागेल,  याबद्दल त्याचा विचार चालू होता.

 कायदा या विषयात पदवी घेऊन विवेकनं २०१६ मध्ये ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’तून पदव्युत्तर शिक्षण घेण्याचं ठरवलं. प्रथम वर्षीच ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे कृष्णा चांदगुडे व इतर कार्यकर्त्यांच्या आणि ‘शिवसेना’च्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नांनी ‘सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा’ अधिनियमाचा मसुदा विधानमंडळात चर्चिला जात होता. ३ जुलै २०१७ रोजी तो कायदा म्हणून राज्यभर लागू झाला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्डविषयक प्रकरणात खासगीपणाच्या/ गोपनीयतेच्या अधिकाराविषयी (राइट टू प्रायव्हसी) निकाल दिला होता. संविधानाच्या कलम २१ नुसार खासगीपणाचा मुद्दा हा ‘सन्मानानं जगण्याचा अधिकार’ या अनुषंगानं विवेक बघू लागला. त्यानं तो धागा पकडून कंजारभाट समुदायातील कौमार्य परीक्षणाविरुद्ध आपल्या भावना खुलेपणानं व्यक्त करणारी एक फेसबुक पोस्ट २०१७ मध्ये टाकली होती. अक्षय या विवेकच्या थोरल्या भावानं ती पोस्ट       ‘इंस्टाग्राम’वरही शेअर केली आणि त्यानं समुदायातील अनेक तरुणांचं लक्ष वेधलं गेलं.

अनेकांना व्यक्तिश: जी चीड, संताप या अनिष्ट प्रथेविरुद्ध होती, ती इतरही अनेक जणांना असल्याचं प्रथम समजलं. ‘महाराष्ट्र अंनिस’च्या नंदिनी जाधव यांच्या सहकार्यानं  विवेकनं राज्यभरातील ५०-५२ मुलामुलींना एकत्र आणण्याचं ठरवलं. पुणे येथील ‘साधना’ या पुरोगामी साप्ताहिकाच्या एका हॉलमध्ये या मुलांची बैठक झाली. आणि ‘# स्टॉप दि व्ही रिच्युअल’ (अर्थात कौमार्य-परीक्षण विधीला तिलांजली) हा व्हॉट्सअ‍ॅप गट तयार केला. गटातील तरुण-तरुणी आपले अनुभव, दडपण, खुलेपणानं व्यक्त करू लागले. जी जात पंचायत या प्रथेला प्रतिष्ठेची व पवित्र प्रथा मानते, त्या जातिव्यवस्थेला, समांतर कायदेव्यवस्थेला टक्कर देणाऱ्या या तरुणांच्या उपक्रमाला प्रसारमाध्यमांनी उचलून धरलं. समाजमाध्यमांमार्फत निषेध केल्यामुळे राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या वेगवेगळ्या भागांतून पाठिंबा देणारे संदेश विवेकच्या या आगळ्या गटाला  मिळू लागले; पण या गटानं आपली व कंजारभाट समुदायाची प्रतिमा मलिन केली, असं मानून जातपंचायतीनं मात्र रोष व्यक्त केला. कोल्हापूर येथे राज्याच्या विविध भागांतील पंचायतींच्या पंचांना पाचारण करून विवेक व त्याच्या चमूविरुद्ध रणनीती ठरवण्यासाठी तीन दिवसांची बैठकही बोलावली. विवेक व त्याचे मामा कृष्णा इंद्रेकर यांना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करीत असल्याचं सांगणाऱ्या धमक्या येऊ लागल्या. व्हॉट्सअ‍ॅप गटातील अनेक तरुणांचे वडील पंच असल्यामुळे काही मुलांना धमक्या, दबावतंत्राचा वापर करून गट सोडण्यासाठी भाग पाडण्यात आलं; पण या मोहिमेत सुरुवातीपासूनच सक्रिय असलेले प्रियांका भाट,  सिद्धांत इंद्रेकर, आदित्य इंद्रेकर हे तरुण, तशीच कृष्णा इंद्रेकरांसारखी वरिष्ठ मंडळीही सांघिक लढ्याविषयी ठाम राहून निर्धारानं पुढील उपक्रम न डगमगता नियोजित करत आहेत.

 आपल्या गेल्या पाच वर्षांच्या गटाच्या प्रवासाबद्दल प्रियांका सांगते,‘‘स्त्रीच्या योनीमध्ये कुटुंबाची इभ्रत बघणाऱ्या पंचांना आमच्या आयुष्याशी खेळण्याचा काय हक्क मिळतो?   विवेकच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील पोस्टमुळे मला व्यक्त व्हायला एक मंच मिळाला. मात्र मी राहात असलेल्या पिंपरी-चिंचवड भाटनगर वस्तीत, जिथे जात पंचायतीचं प्राबल्य आहे, तिथेच मी निषेधाचे उपक्रम करत असल्यामुळे, त्या वेळेस येताजाताना मला जिवे मारण्याच्या धमक्या, निनावी फोन, शिवीगाळ यांचा सामना करावा लागला. समाजातून बहिष्कृत तर पंचांनी के लंच होतं; पण आमच्या गटाबद्दल प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या नोंदीचा चांगला परिणाम हा झाला, की खुलेपणानं पूर्वी जे किळसवाणे प्रकार लग्न झाल्याच्या रात्री व्हायचे व दुसऱ्या दिवशी डंका वाजवून नववधूची नालस्ती केली जायची, ते प्रकार कमी होऊ लागले. अर्थात लपूनछपून, बंद दाराआड हे प्रकार चालूच आहेत. राजस्थानमध्ये खूप ठिकाणी असलेल्या आमच्या समुदायातील पंचांनी ही प्रथा बंद करतो, अशी लिखित पत्रं आम्हाला पाठवली. समुदायातील खून व इतर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये आधी लोक पंचायतीकडे निवाड्याकरिता जात होते, ती नंतर पोलीस ठाण्यात, न्यायालयात जाऊन प्रकरणं कशी हाताळावीत यासाठी आम्हाला फोन करू लागली. हे छोटे बदल आम्हाला उभारी देणारे होते.’’

 आपल्या लग्नानंतर कौमार्य परीक्षा घेऊ देणार नाही, हे विवेकनं पत्नी ऐश्वर्याबरोबर फार आधीच ठरवलं होतं. १२ मे २०१८ रोजी त्यांचं लग्न होत असताना व त्यानंतरही प्रखर विरोध विवेक व त्याच्या कुटुंबीयांना सहन करावा लागला. ऐश्वर्याचे आजोबा कंजारभाट समाजाचे प्रमुख पंच आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी आमदार नीलम गोऱ्हे व बच्चू कडू यांच्या सहकार्यानं मिळालेल्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात लग्न व्यवस्थित पार पडलं. दिग्दर्शक नागराज मंजुळेही या लग्नास उपस्थित होते. लग्न होऊन एकदा माहेरी आलेल्या ऐश्वर्यानं नवरात्र उत्सवात दांडिया खेळल्याचं कळल्यावर जात पंचायतीनं ‘या मुलीनं समाजाला कलंकित केलं,’ असं सांगून तिला वाळीत टाकलं. विवेकनं पंचांच्या विरोधात सामाजिक बहिष्कारासंबंधी कायद्याचा आधार घेत पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. २०१९ मध्ये त्याची आजी वारली तेव्हादेखील पंचांनी तिच्या अंत्यविधीला समाजातील कुणीही जाऊ नये, असं घोषित केलं. त्याही वेळेस विवेकनं पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल केला गेला. मागच्या वर्षी विवेकचा लहान भाऊ धनंजय याचं लग्नही कौमार्य परीक्षण वगळून पार पडलं.

 विवेक व प्रचंड ऊर्जा असलेला त्याचा चमू आपल्या आगामी कार्यासाठी सज्ज आहे. तो सांगतो, ‘‘आमच्या समुदायात असलेल्या कौमार्य परीक्षणाविषयी इतरही बोलू लागले आहेत. stopthevritual@gmail.com  या मेल आयडीवर  ई-मेल पाठवून ते पाठिंबा देतात. योनिशुचितेच्या कल्पना जगात इतरत्रही दिसून येतात. शुद्ध-अशुद्धतेच्या चुकीच्या कल्पनांचा पगडा असलेल्या पुरुषसत्ताक समाजात मुलींचं चारित्र्यहनन केल्याच्या घटना आपण वाचत असतोच. कोरेगाव पार्कसारख्या ठिकाणी पुण्यातील उच्चभ्रू समुदायात लग्नाआधी आपल्या मुलींचं योनीपटल अबाधित राहावं यासाठी ‘हायमेनोप्लास्टी’सारख्या शस्त्रक्रिया करण्यास जाणाऱ्या पालकांच्या मनोवृत्तीबद्दलही बोललं पाहिजे.

 एकंदर लैंगिकतेबद्दल असलेलं मौन सोडायला हवं. कुठलीही भीती, लाज, संकोच न बाळगता, मोकळेपणानं, स्वच्छ नजरेनं या सर्व निषिद्ध विषयांबद्दल बोलायला हवं.’’ विवेकचे हे विचार नवीन विचारांच्या प्रत्येकास आश्वासक वाटतील असेच आहेत.

saharsh267@gmail.com