|| हरीश सदानी

सफाई कामगारांचं जगणं अनेक हालअपेष्टांचं. त्यातही स्त्री सफाई कामगारांच्या व्यथा आणखी गंभीर. या कामगारांच्या कष्टांची, त्यागाची किं मत सर्वसामान्यांना कळावी, यातील स्त्रियांचं दु:ख समोर यावं, यासाठी ४१ वर्षांचे सुनील यादव सातत्यानं प्रयत्न करत आहेत, तेही अभ्यासाच्या माध्यमातून. लग्नानंतर पत्नीला ‘एलएल.एम.’ पदवी मिळवण्यासाठी प्रोत्साहित के ल्यानंतर आता ते स्त्री सफाई कामगारांची संघटना बांधून त्यांचं राहणीमान सुधारण्यासाठी नियोजन करीत आहेत. त्याकरिता जर्मनी, इंग्लंड इथल्या कामगारांच्या युनियन्सचा तौलनिक अभ्यासही करीत आहेत. आयुष्यभर सफाई कामगाराचं जीवन पत्करावं लागलेल्या, त्यातही जिद्दीनं ५ पदव्या मिळवणाऱ्या आणि सफाई कामगारांना सन्मानानं जगण्याचा हक्क मिळण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सुनील यांची ही कहाणी.     

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Some results still pending post graduate law students regretting
मुंबई : काही निकाल अद्यापही रखडलेले, पदव्युत्तर विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप
Pm modi meeting at Yavatmal
यवतमाळ : पंतप्रधानांची सभा, रस्ते बंद, विद्यार्थ्यांची गैरसोय…

‘स्वच्छ भारत अभियान’ व तत्सम मोहिमांच्या घोषणा सातत्याने होत असल्याचे आपण पाहात आलो आहोत; पण देशातील प्रभाग, शहरं व गावं स्वच्छ ठेवण्यासाठी जे प्रतिकूल परिस्थितीत झटताहेत त्या सफाई कामगारांना आजही सन्मानानं जगण्याच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत  साधारण ४०,००० सफाई कामगार कामाला आहेत आणि त्यांचे प्रश्नही वर्षांनुवर्षं तेच आहेत.

डोक्यावरून माणसाच्या मैल्याची वाहतूक आज होत नसली, तरी घराघरांतून, बाजार, हॉटेल्स, दुकानं, रुग्णालयं, कत्तलखाने यांतून निघणाऱ्या हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट असो, की विविध उद्योगांमधून निघणाऱ्या प्रदूषण निर्माण करणाऱ्या कचऱ्याची सफाई, सार्वजनिक शौचालयं व मुताऱ्यांची सफाई, गल्लीतील लहानशा गटारांपासून महानगरातल्या ड्रेनेजपर्यंतची सफाई- ही सर्व सफाई नरकमय वातावरणात सफाई कामगार करत असतात. समाजातील इतरांकडून ते पूर्णपणे दुर्लक्षित असतात किंवा त्यांच्या कामाकडे तुच्छतेनं पाहिलं जातं. मुंबईतील अशाच सफाई कामगारांपैकी एक आहेत सुनील यादव. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या, घर, शिक्षण, काम या सर्व आघाड्यांवर सतत संघर्ष करून सफाई कामगारांचे- विशेषत: स्त्री कामगारांचे प्रश्न प्रकाशात आणून त्यांचं जगणं मानवी व्हावं यासाठी धडपडणाऱ्या ध्येयवेड्या सुनील यांच्याबद्दल जाणून घ्यायला हवं.

मुंबईतील धोबीघाट, महालक्ष्मी परिसरात वाढलेल्या सुनील यांना दोन बहिणी व एक लहान भाऊ. वडील बृहन्मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कामाला होते. २००० मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर मोठा मुलगा म्हणून घर चालवण्यासाठी सुनील यांना २००५ मध्ये पालिकेच्या ‘ड’ प्रभागात घनकचरा व्यवस्थापन विभागात सफाई कामगाराची नोकरी पत्करावी लागली. दहावी नापास असलेल्या सुनीलना वाचनाची मात्र आवड होती. उपलब्ध पुस्तकं, वृत्तपत्रं ते वाचून काढत असत. ज्येष्ठ कवी, साहित्यिक नामदेव ढसाळ यांचं साहित्य त्यांच्या ज्ञानात भर घालत होतं. ग्रँट रोड इथल्या हाऊस-गल्ल्यांमध्ये झाडलोट करण्याचं काम करत असताना त्यांच्या पालिकेतील मुख्य पर्यवेक्षक एकदा त्यांना म्हणाले, की तू शिकलास तर प्राप्त परिस्थितीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू शकतोस. या प्रसंगानं सुनील यांची उमेद वाढली. एके दिवशी ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा’कडून चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांविषयीचे फलक त्यांनी पाहिले आणि त्यांनी ‘बी.कॉम.’ पदवी अभ्यासासाठी प्रवेश घेतला. संध्याकाळी कामावरून सुटल्यावर लेक्चर्सना जाण्याचा त्यांचा दिनक्रम सुरूकेला.

 पदवीधर होऊन सुनील यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम व समाजकार्य या विषयात ‘कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन’ येथून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे २००८ मध्ये ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’अंतर्गत बेलापूर येथून समाजकार्य याच विषयात ‘एमएसडब्ल्यू’ ही पदव्युत्तर पदवी घेण्याचा निर्धार केला. दिवसा सफाई कामगार म्हणून काम करत संध्याकाळी उच्च शिक्षण घेणाऱ्या सुनील यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारू लागल्या. समाजकार्याच्या पद्धती व इतर बाबींवर दृष्टिकोन मिळवत असताना ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ (टीआयएसएस) या समाजकार्यातील शिक्षण व संशोधनाविषयीच्या अग्रगण्य संस्थेविषयी सुनील यांना भुरळ पडणं क्रमप्राप्तच होतं.

एके दिवशी बेलापूरहून देवनार येथे जाऊन या संस्थेच्या प्रांगणाला त्यांनी कु तूहलानं भेट दिली. तिथल्या ‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड लेबर स्टडीज’च्या डॉ. शरित भौमिक यांच्याशी मुक्त संवाद केल्यावर तिथे ‘ग्लोबलायझेशन अँड लेबर’ या विषयावर मास्टर्स करण्याचं पक्कं केलं. इंग्रजी संभाषणाचा अभ्यासक्रमही के ला. डॉ. भौमिक यांच्याकडून सतत उत्तेजन मिळाल्यानं ‘टीआयएसएस’मध्ये त्यांचं शिक्षण सुरळीत चालू राहिलं.

मास्टर्सच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून जोहान्सबर्ग या दक्षिण आफ्रिकेच्या शहरातील एका विद्यापीठात ३ महिने जाऊन सुरक्षारक्षकांवर अभ्यास करण्याची संधी सुनील यांना मिळाली. याविषयीचा एक किस्सा विशेष सांगण्यासारखा आहे. ‘टीआयएसएस’मध्ये मास्टर्स करता यावं यासाठी रजा मिळावी म्हणून त्यांनी ११ महिन्यांपूर्वी महानगरपालिकेकडे केलेला अर्ज प्रलंबित असताना सुनील यांनी दक्षिण आफ्रिकेला जाऊन अभ्यास करता यावा म्हणून वारंवार अर्ज व पाठपुरावा केला होता. महापालिकेच्या सेवा अधिनियमांनुसार उच्च शिक्षणासाठी २४ महिन्यांची भरपगारी रजेची तरतूद असताना सुनील यांच्या अर्जाचा विचार सकारात्मकतेनं करण्याऐवजी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी ‘तुम्ही शिकलात तर साफसफाईची कामं कोण करणार?’ असा थेट प्रश्न विचारून त्यांना नाउमेद केलं होतं, असं सुनील सांगतात.  सुनील  यांना अध्ययन रजा नाकारण्यात आल्याचं समजलं तेव्हा त्यांनी अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. ‘टीआयएसएस’च्या प्राध्यापकांकडून व थेट तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यालयातून हस्तक्षेप झाला. राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या शिष्टमंडळानं मुंबईत सुनील यांची भेट घेऊन ‘बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सुनील यांना सात दिवसांत विनाअट रजा मंजूर करावी, अन्यथा पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्यावर अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली कारवाई करण्यात येईल,’ असे आदेश दिले. त्यामुळे सुनील यांना रजा मिळाली. त्यानंतरच ते दक्षिण आफ्रिकेला जाऊन नियोजित अभ्यास करून परतले.

‘ग्लोबलायझेशन अँड लेबर’ विषयात २०१४ मध्ये मास्टर्स पदवी मिळाल्यानंतर सुनील  यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुलुंड येथील ‘टी’ प्रभागात विभागीय कामगार कल्याण अधिकाऱ्याची जागा असल्याचं समजलं. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून मिळवलेली ‘लेबर स्टडीज’ची पदवी महापालिकेच्या दृष्टीनं रिक्त पदासाठी अनुरूप नसल्याचं कारण देऊन ती संधी त्यांना नाकारण्यात आली आणि सफाई कामगार याच पदावर काम करायला सांगण्यात आलं. कालांतरानं सुनील  यांनी ‘टीआयएसएस’मधून ‘एम.फिल.’ व ‘पीएच.डी.’ करण्याचं ठरवलं.

चेंबूर परिसरात २०१४ पासून भाड्याच्या घरात राहून, दिवसा शिकून रात्रपाळीत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या सुनील यांनी ‘एम.फिल.’ करणं सुलभ व्हावं म्हणून घराजवळील ‘एम’ वॉर्डमध्ये बदली मिळावी असा अर्ज केला. तो मंजूर होण्यासाठीसुद्धा प्रशासनाची दिरंगाई अनुभवायला लागली. ‘सर्वसमावेशक विकास व सामाजिक न्याय’ विषयातील ‘एम.फिल.’ या पदवीकरिता ‘बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगार स्त्रियांचं वास्तव व त्यांच्या आकांक्षा’ यावर त्यांचा प्रबंध होता. जातीव्यवस्थेच्या उतरंडीत तळाशी असलेल्या सफाई कामगार स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय अशीच. मुंबईतील पाच वॉर्डांमधील ५५ स्त्री सफाई कामगारांना घेऊन सुनील यांनी सखोल अभ्यास केला. जेमतेम प्राथमिक शिक्षण झालेल्या यातील बहुसंख्य स्त्रियांना कुठल्याही सुविधा नसलेल्या कच्च्या घरात राहावं लागत असल्याचं अभ्यासात दिसून आलं. बऱ्याच जणींना वैधव्य आल्यानंतर सफाई कामगार म्हणून काम पत्करावं लागलं होतं. पालिकेकडून त्यांना कुठलाही आरोग्य विमा दिला जात नाही. बऱ्याचदा मोजे, बूट, साबण व इतर साहित्यही वेळेवर मिळत नसल्याची खंत काही स्त्रियांनी व्यक्त केली. कामाच्या ठिकाणी विश्रांतीसाठी, गणवेश बदलण्यासाठी कोणतीही सोय नसते.

  सध्या सुनील यांचा ‘पीएच.डी.’करिता ‘शहरी सफाई कामगारांविषयीची विविध धोरणे व प्रत्यक्षात अमलात आलेल्या योजना’ यावर अभ्यास सुरू आहे. सुनील यांनी  ‘पीएच.डी.’ साठी आतापर्यंत ३ वर्षं बिनपगारी रजा घेतलेली असतानाच्या कालावधीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (बार्टी) या संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळवली होती. व्यक्तिगत जीवनातील स्त्रियांना सक्षम करण्यासाठी सुनील यांनी वेळोवेळी ठोस पावलं उचलली आहेत. वारसा हक्कानं पनवेल परिसरात त्यांच्या आईला साडेचार एकर जमिनीचा भाग हिश्शानं मिळायला पाहिजे होता, पण तिच्या मामेभावानं ‘हक्कसोड पत्र’ लिहून घेऊन जमीन हस्तगत केली होती. ती मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊ भुस्कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, विभागीय अधिकारी यांच्याकडे २०१४ पासून सतत पाठपुरावा करून सुनील यांनी अलीकडेच ‘जिल्हा ट्रायब्युनल कोर्ट’कडून एक एकराचा कायदेशीर हिस्सा आईला मिळवून दिला आहे. लग्नापूर्वी बारावीपर्यंत शिकलेली त्यांची पत्नी संजना यांना ‘एलएल.एम.’पर्यंत शिकण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. वकिलीचं रीतसर शिक्षण झालेल्या पत्नीबरोबर स्त्री सफाई कामगारांची संघटना बांधून त्यांचं राहणीमान सुधारण्यासाठी सुनील नियोजन करत आहेत. त्याकरिता ते जर्मनी, इंग्लंड इथल्या कामगारांच्या युनियन्सचा तौलनिक अभ्यासही करत आहेत.

 स्त्री कामगारांवर त्यांनी स्वत: केलेला अभ्यास ते दोन वर्षांपासून शिमला, हैदराबाद, दिल्ली व मुंबईतील अनेक संस्था-संघटनांपुढे सादर करत आहेत. काही परिषदांमध्ये स्त्री सफाई कामगारांना सहभागी होऊन व्यक्त होण्यासाठीही त्यांनी प्रेरित केलं आहे. त्यांच्या दोन्ही मुली विधिना व अमूल्या या चेंबूर परिसरातील सेंट अँथनी कॉन्व्हेंट शाळेत शिकत आहेत.

     सुनीलसारख्या गुणवत्ता सिद्ध केलेल्या, नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेऊन पाच पदव्या मिळवलेल्या व्यक्तीस ‘चतुर्थ श्रेणी कामगार’ म्हणून हाती झाडू धरावा लागतो आहे, ही बाब प्रशासनाच्या व समाजाच्या दृष्टीनं लाजिरवाणी ठरावी अशीच.

 ‘आम्ही सफाई कामगार आपलं आयुष्य पणाला लावून महानगराचं व त्यातील नागरिकांचं आयुष्य सुसह्य करण्याचं काम करतो. दलितांच्या आरक्षणाबाबत बोलणारे लोक ‘सफाई कामात १०० टक्के  लोक दलितच कसे?’ हा प्रश्न विचारत नाहीत, चर्चेतही आणत नाहीत. हातानं मैला साफ करण्याची अपमानजनक पद्धत बंद व्हायला हवी, असे सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी राज्य सरकारांना निर्देश दिलेले आहेत. मानवी श्रमावर आधारित सफाईकामात शक्य त्या सर्व सुधारणा प्राधान्यानं कराव्यात, अशी शासनाची व एकंदर समाजाची मानसिकता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आमचा सन्मानानं जगण्याच्या हक्काकरिता संघर्ष चालूच राहील,’ हा सल ४१ वर्षीय सुनील यादव व्यक्त करतात. त्यांचं दुखणं वाचकांनाही अस्वस्थ करून सफाई कामगारांचे कष्ट कमी करण्यासाठी स्वपातळीवर प्रयत्न करायला प्रेरणा देईल.

saharsh267@gmail.com