ज्येष्ठांचे लिव्ह इन : मैत्रभावाचा अवकाश

अनेकांच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा नातीसुद्धा जिव्हारी काचायला लागतात.

सरिता आवाड

अनेकांच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा नातीसुद्धा जिव्हारी काचायला लागतात. प्रेमात पडून के लेल्या विवाहबंधनातही प्रेम शिल्लक न राहता फक्त कर्तव्य राहतं. अशा वेळी मला नेमकं  काय हवंय, मला काय करायचं आहे, या प्रश्नांनी शक्यतांचा शोध सुरू होतो.. नंदिनीच्या आयुष्यात तथाकथित चौकोनी कु टुंबही आलं आणि लग्नाशिवायचं सहजीवनही. या सहजीवनातल्या मैत्रभावाच्या अवकाशाने तिला आयुष्यात मला नेमकं काय करायचं आहे, याचं उत्तर मिळालं..

‘मला काय हवं आहे’ आणि ‘मी काय करू शकते/शकतो’ हे दोन प्रश्न सतत जागे ठेवले तर जगण्याची दिशा बदलते. नंदिनीचं उदाहरण याचीच साक्ष देतं. सुशिक्षित, भरपूर कमावणारा नवरा, लग्न झालेली मुलगी, नोकरी करणारा मुलगा, अशी तथाकथित सुखी आयुष्याची चौकट पंचावन्न वर्षांच्या नंदिनीनं मोडली. कारण वर नमूद केलेत ते दोन प्रश्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते. गेली पाच वर्ष नंदिनी ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये तर आहेच, शिवाय ती महत्त्वाचं सामाजिक कामही करते आहे. गेल्या पाच वर्षांनी तुला काय दिलं, असं मी तिला विचारलं. माझ्या प्रश्नाला तिचं उत्तर होतं, निखळ आत्मविश्वास आणि मैत्रभावाचा नव्यानं गवसलेला अवकाश.

काळ्यासावळ्या, मध्यम उंचीच्या, बारीक चणीच्या नंदिनीला मी पहिल्यांदा भेटले, तेव्हा तिच्या विलक्षण बोलक्या डोळ्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं होतं. १९७५ च्या नव्या ‘एस.एस.सी.’च्या पहिल्या बॅचची ही विद्यार्थिनी. अकरावीला वाणिज्य शाखा निवडली. कॉलेजमध्ये अभ्यासेतर उपक्रमांमध्ये ती भरपूर भाग घ्यायची. विशेषत: नाटक हा तिचा खास आवडीचा प्रांत होता. याच दरम्यान तिची आणि कॉलेजमधल्या सुमेधची ओळख झाली. विज्ञान शाखेत शिकणारा, उंचापुरा, काहीसा आत्ममग्न वाटणारा सुमेध नंदिनीला पाहताक्षणीच आपलासा वाटला. मग ओळख, गप्पा, प्रेम असे सगळे टप्पे रीतसर तिनं पार केले. ‘एफ.वाय.’ला असतानाच दोघांनी एकमेकांना आपापल्या घरी बोलावून घरच्यांशी ओळख करून दिली. नंदिनीच्या घरातलं वातावरण मोकळंढाकळं होतं. सुमेधचं तिच्या घरी स्वागतच झालं. सुमेधच्या घरी नंदिनीचं स्वागत मात्र काहीसं कोमट आणि सावध होतं. हा फरक नंदिनीच्या हळूहळू लक्षात यायला लागला. उदाहरणार्थ- जीन्स घालून सुमेधच्या घरी गेलेलं सुमेधच्या घरच्यांनाच नाही, तर स्वत: सुमेधलाही रुचत नव्हतं. अशा तपशिलांत भर पडत गेली. आपण सुमेधशी जी जन्माची गाठ बांधायला निघालो आहोत, ती पुढे जाऊन जिव्हारी काचणार तर नाही, अशी शंका तिला यायला लागली. धीर करून नंदिनी या ठसठसणाऱ्या शंकेबद्दल आपल्या वडिलांशी बोलली; पण वडिलांना ही शंका अगदीच फिजूल वाटली. सासर म्हटलं की अशा तडजोडी कराव्याच लागतात, अशी तिची समजूत काढली गेली. पदवीची परीक्षा झाल्याबरोबर तिच्या आणि सुमेधच्या लग्नाचा बार उडवण्यात आला. आईवडिलांच्या लेखी नंदिनीचा प्रश्न सुटला होता; पण वास्तवात अनेक प्रश्नांचे टोकदार भाले नंदिनीच्या वाटेवर डोकं वर काढायला लागले होते.

लग्नानंतर सासरी सुमेधचे आई-वडील, सुमेधची बहीण, बहिणीचे यजमान, या सर्वाशी नंदिनीला जमवून घ्यावं लागलं. या जमवून घेण्याच्या बाबतीत सुमेध अगदी तटस्थ होता. आपला भूतकाळ मागे टाकून कसोशीनं सुनेची भूमिका निभावण्याची जबाबदारी एकटय़ा नंदिनीची होती. त्यातच एकेका वर्षांच्या फरकानं तिला एक मुलगी आणि मुलगा झाला. तिच्या नणंदेलाही बाळ झालं. नोकरी करणाऱ्या नणंदेचं बाळसुद्धा त्यांच्याच घरी आलं. आयुष्यभर नोकरी करून निवृत्त झालेल्या सासूबाईंना तीन-तीन मुलांचं संगोपन करण्यात आनंद होता; पण नंदिनीच्या दृष्टीनं मात्र या संगोपन प्रकल्पाचा अर्थ नोकरीच्या संधी गमावणं असा होता. तिच्या मनाचा कोंडमारा व्हायला लागला. तिला वाईट याचं वाटायचं, की सुमेधला या कोंडमाऱ्याची काहीच जाणीव नव्हती. त्यातच त्याला ऑस्ट्रेलियाला कामानिमित्त जायची संधी मिळाली. त्याच्या मागोमाग मुलांना घेऊन तिलाही परदेशात जावं लागलं. आपल्याला परदेशात जावंसं वाटतंय का?, हा प्रश्न स्वत:ला विचारायची तिला उसंतसुद्धा मिळाली नाही. मुलं शाळेत जाण्याच्या वयाची झाल्याबरोबर मुलांना घेऊन नंदिनीनं भारतात जावं, असा निर्णय सुमेधनं घेऊन टाकला आणि नंदिनीची रवानगी भारतात झाली. भारतात परत आल्यावर नंदिनीला प्रश्न पडला, की आपलं काय चाललं आहे? सासूबाईंच्या म्हणण्याप्रमाणे संसार करणं आणि अधूनमधून दूरस्थ नवऱ्याशी फोनवर बोलणं, हेच आयुष्य आहे का आपलं? आपल्याला स्वत:च्या विकासाच्या संधी आजमावून बघायला नकोत का?  या प्रश्नाची बोच लागून नंदिनी पैसे मिळवण्यासाठी छोटी-मोठी कामं करायला लागली. कॉलेजमध्ये असतानाचे नाटकामधले मित्रमैत्रिणी तिच्या पुन्हा संपर्कात आले. या संपर्कामुळे राज्य नाटय़ स्पर्धेच्या नाटकात काम करायची तिला संधी मिळाली. नेहमी होणाऱ्या भेटीगाठींमुळे तिची नाटय़ क्षेत्राची आवड पुन्हा जागी झाली. तिनं स्वत:सुद्धा उलूपी या महाभारतकालीन व्यक्तिरेखेवर एकांकिका लिहिली. ती एकांकिका बसवण्याचे तिचे प्रयत्न सुरू झाले. कळत-नकळत तिच्या अनुभवाचं क्षितिज विस्तारायला लागलं.

दरम्यान सुमेध पुन्हा भारतात परतला. तेव्हा नंदिनीला जाणीव झाली, की आता सुमेधचं जग आणि तिचं जग पूर्ण निराळं झालं आहे. सुमेधच्या तांत्रिक कामात नंदिनीला काहीच रस नव्हता, तर नंदिनीच्या आवडीचं नाटय़क्षेत्र सुमेधच्या गावीही नव्हतं. कामानिमित्त त्याला झारखंडला जावं लागलं. अधूनमधून नंदिनी त्याच्या कामाच्या ठिकाणी- गावाला जायची; पण अशा भेटीत सुमेधपासूनचा दुरावा तिला आणखीनच जाणवायचा अन् जाचायचा. एकमेकांना सामायिक असे विषयच त्यांच्यात राहिले नव्हते. दिवसांमागून दिवस उलटत होते; पण त्या उलटणाऱ्या दिवसांच्या पाऊलखुणा तनामनावर उमटतच नव्हत्या. नात्यामधल्या अशा पोकळीच्या काळात नंदिनीची आणि अविनाशची भेट झाली.

 अविनाश पत्रकार होता. नंदिनीच्या नाटकातल्या मित्रांमुळे तो ओळखीचा झाला. तो एक संवेदनाक्षम कवी होता. खरं तर नंदिनी आता पंचावन्न वर्षांची होती, तर अवी जेमतेम पस्तिशीतला; पण नंदिनीच्या आणि अविनाशच्या मैत्रीच्या आड हा वयातला फरक मुळीच आला नाही. विवाहाला अत्यंत पवित्र बंधन मानून दोन दशकांपूर्वी विवाहित झालेल्या आणि आता अनुभवांचे टक्केटोणपे खाऊन वैवाहिक नात्याबद्दल पूर्ण भ्रमनिरास झालेल्या नंदिनीच्या व्यक्तिमत्त्वात अविनाश गुरफटून गेला. नंदिनी काही त्याच्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री नव्हती; पण तिच्या सहवासात जी समृद्धी होती, ती त्यानं आधी कधीच अनुभवली नव्हती. धारदार परखडपणा आणि मखमली ऋजुता याचं अनोखं मिश्रण त्याला नंदिनीत गवसलं. अवीच्या सहवासात नंदिनीच्या मनावरचं निराशेचं मळभ विरून जायला लागलं. जणू काही निसटून चाललेलं तारुण्य तिच्यासाठी दाराशी थबकलं. ‘आपण लग्न करू या का?’ या अवीच्या प्रश्नानं ती भानावर आली. वयातलं, परिस्थितीतलं अंतर ते दोघं शांतपणे आजमावू लागले. आपल्या दोघांतले भावबंध हे अंतर पार करतील, असा विश्वास त्यांना वाटायला लागला.

या नव्या नात्यात पुढचं पाऊल उचलण्याच्या आधी सुमेधबरोबरचं शुष्क आणि निर्जीव झालेलं नातं संपवण्याचं नंदिनीनं ठरवलं. धीर करून सुमेधला फोन करून तिनं आयुष्यातली घडामोड सांगितली आणि घटस्फोट घेण्याची इच्छा व्यक्त केली. सुमेधनं ‘ठीक आहे’ असं म्हणून फोन ठेवून दिला अन् तो तातडीनं घरी आला. त्याच्या सगळ्या गुंतवणुकीमधून, बँकेच्या खात्यामधून नंदिनीचं नाव वगळण्याचा त्यानं प्रस्ताव मांडला. सत्तावीस वर्षांच्या वैवाहिक नात्याचा हा सारांश होता. नंदिनीनं शांतपणे या प्रस्तावाला मान्यता दिली. पुढच्या सहा महिन्यांत परस्पर सहमतीनं घटस्फोटाची प्रक्रिया पार पडली. सहीच्या एका फटकाऱ्यानिशी ढासळणाऱ्या विवाहबंधनानं तिचं मन विझून गेलं. अवीला ती म्हणाली, की आपण लग्नाच्या कायदेशीर बंधनात अडकणं फिजूल आहे. या बंधनापलीकडे जाऊन भावबंध प्रत्यक्षात जगणं महत्त्वाचं आहे. आपल्या प्रेमाची मनोमन साक्ष घेऊन नंदिनी आणि अवी शहराबाहेरच्या उपनगरात राहायला लागले. आपल्या लग्न झालेल्या मुलीला आणि नोकरीनिमित्त दुसऱ्या गावात राहणाऱ्या मुलाला विश्वासात घेऊन नंदिनीनं आपली बाजू सांगितली. मुलगी आईची बाजू समजू शकली, पण मुलगा नाराज झाला. तरीही मुलाशी असलेला संवाद तिनं बंद केला नाही. (या सततच्या संवादामुळे नंदिनी तिच्या मुलाची आता फक्त आईच नाही, तर मैत्रीण झाली आहे; पण ही नंतरची गोष्ट.) 

नंदिनी आणि अवीचं सहजीवन सुरू झालं. या संबंधातून आपल्याला आपल्या रक्ताचं अपत्य मिळणार नाही, या वास्तवाचा स्वीकार अवीनं तर केलाच, पण विशेष म्हणजे त्याच्या आईनंसुद्धा केला. नंदिनीच्या निमित्तानं का होईना, आपल्या मुलाचं आयुष्य सुस्थिर होईल, अशी आशा त्या माऊलीला वाटली. नंदिनी आणि अवीच्या संसारातली नव्याची नवलाई संपल्यावर नंदिनीला वाटलं, की हे तर नेहमीचं नवरा-बायकोचं नातं झालं. स्वत:च्या आयुष्यातल्या ‘बायको’पणाच्या अवकाशा-पलीकडचा अवकाश धुंडाळायची ऊर्मी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. चारी ठाव स्वयंपाकात वेळ घालवण्याऐवजी जेवणाचा डबा लावायचा तिनं प्रस्ताव ठेवला, जो अवीनं झटकन मान्य केला. अवीच्या ओळखीनं दूरचित्रवाणीवरील एका वाहिनीसाठी ‘टॉक शो’ घेण्याचं काम तिला मिळालं. निरनिराळ्या लोकांना भेटून, एखाद्या सामाजिक समस्येच्या मुळाशी जाण्याचं काम तिला अतिशय आवडलं. त्यातला विशेषत: ग्रामीण मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तिला चांगलाच भिडला. नुसता ‘टॉक शो’ घेऊन प्रश्नाची मांडणी करणं तिला पुरेसं वाटेना. या मुलाखतीमधल्या एका कार्यकर्त्यांला प्रत्यक्ष काम करायची इच्छा असल्याचं तिनं सांगितलं. तेव्हा अगदी सहजपणे ‘या आमच्या गावाला’ असं तो म्हणून गेला. ‘वर्षभर तुमच्या राहण्याखाण्याची व्यवस्था करतो. बघा, तुम्हाला काही करता येतं का.’ असा प्रस्ताव त्यानं नंदिनीसमोर ठेवला. नंदिनी आता साठीच्या उंबरठय़ावर होती. काही तरी भरीव समाजोपयोगी काम करून दाखवायची ही अखेरची संधी आहे, असं तिला प्रकर्षांनं वाटलं. याबद्दल अवीशी तिनं चर्चा केली. तिची काम करण्याची प्रामाणिक इच्छा पाहून अवीनं तिला पाठिंबा दिला.

आणि खरंच नंदिनी तेलंगणाच्या सीमेवरच्या छोटय़ा गावात गेली. वर्षभर तिनं मुलांचे शैक्षणिक उपक्रम घेतले. तिथल्या स्त्रियांचं महिला मंडळ तयार केलं. त्यांच्याशी चर्चा करून संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांना काय उद्योग-व्यवसाय करता येतील अशी चाचपणी केली. याला सहाय्यभूत ठरतील अशा सरकारी योजनांचा अभ्यास केला, पत्रव्यवहार केला. स्त्रियांचा बचत गट तयार केला. बघता बघता वर्ष उलटलं. नंदिनीची परत जाण्याची वेळ झाली. तेव्हा तिथल्या स्त्रियांनी तिला आग्रहानं तिथेच ठेवून घेतलं. अवी अधूनमधून नंदिनीकडे जात होता. तिची कामातली गुंतवणूक त्याला दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून नंदिनीला गावात राहायला त्यानं प्रोत्साहन दिलं. एकमेकांच्या कामाला पाठिंबा देणारं, एकमेकांच्या कामाचा अभिमान जोपासणारं दूरस्थ सहजीवन दोघांनी स्वीकारलं.

या स्वीकारालासुद्धा तीन वर्ष झाली. नंदिनीनं गावात आता आपलं छोटं घर बांधलं आहे. तिथल्या स्त्रियांना गोधडय़ा चांगल्या शिवता येतात, असं तिच्या लक्षात आलं, तेव्हा गोधडय़ा बनवायच्या तंत्रात आणि त्यांच्या डिझाइनमध्ये तिनं सुधारणा घडवून आणल्या. नंतर सरकारी योजनांचा उपयोग करून या गोधडय़ांची शहरात विक्री करण्याची व्यवस्था ती बसवते आहे.

नंदिनीचं आयुष्य पाहाताना ‘मज काय शक्य आहे, अशक्य काय.. माझे मला कळाया दे बुद्धी देवराया’ या ओळी मला आठवतात. शक्यतांचा निरंतर शोध घेणारं नंदिनीचं आयुष्य मला अंतर्मुख करतं.

(लेखातील व्यक्तींची नावे बदललेली आहेत.) sarita.awad1@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jyesthanche live in author sarita awad friendship leisure ysh

ताज्या बातम्या