हरीश सदानीsaharsh267@gmail.com

गेली १० वर्ष ‘ग्रुप स्टडी’च्या माध्यमातून तरुण पिढीशी जोडल्या गेलेल्या रवींद्र केसकर यांचा ‘पुरुषभान ते समाजभान’ सांगणारा हा प्रवास. कुटुंबांतर्गत कलह व त्यातून होणारे स्त्रियांवरील अत्याचार, हिंसा ही आपल्या पुरुषप्रधान समाजात आढळणाऱ्या लिंगभेदाची निष्पत्ती आहे. ही हिंसा नेहमी शारीरिक असेलच असं नाही. तर वर्चस्व गाजवण्यासाठी असंख्य पुरुष मानसिकरीत्या आपल्या आयुष्यातील स्त्रियांवर ‘हिंसा’ करतच असतात. बहुसंख्य पुरुषांना आपलं हे वागणं चुकीचं आहे हे मान्य नसतं, तर काहींनी ते गृहीतच धरलेलं असतं. मात्र त्याच वेळी हे मान्य करायला हवं, की काही पुरुष मात्र आपलं जोडीदाराशी असलेलं नातं निकोप, सुदृढ होण्यासाठी प्रामाणिकपणे, सातत्यपूर्ण प्रयत्न करताना दिसतात. मुंबईतील, सध्या सत्तरीत असलेले रवींद्र केसकर हे अशा तुरळक पुरुषांमध्ये मोडतात. निरामय सहजीवनासाठी ‘पुरुषभान ते व्यापक समाजभान’ असा प्रवास करणाऱ्या रवींद्र यांची ही कहाणी.

मुंबईतील गोरेगाव इथल्या ‘नागरी निवारा परिषद’ या लोकचळवळीतून उभ्या राहिलेल्या गृहनिर्माण संकुलात रवींद्र केसकर पत्नी भारती व मुलगा आभास यांच्याबरोबर राहतात. रवींद्र यांची यापूर्वी दोन लग्नं झाली होती. आपल्या पूर्वायुष्याबद्दल बोलताना ते सांगतात. ‘‘तीसेक वर्षांपूर्वी तात्त्विकदृष्टय़ा मी स्वत:ला प्रगतीशील, स्त्री-पुरुष समानता मानणारा आहे, असं समजत होतो. पण प्रत्यक्ष व्यवहारात, वागण्यात, पारंपरिक पुरुषच होतो. ‘झेवियर्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग’ येथे प्राध्यापक म्हणून मी करत असलेली नोकरी चांगली होती. पूर्व पत्नींच्या प्रत्येक वागण्यावर माझ्या पसंती-नापसंतीची मोहोर उमटवण्याचा अधिकार मी स्वत:कडे घेतला होता. त्यांनी घरात एखादं सामान आणल्यावर ते कसं निरुपयोगी आहे, त्याच्यापेक्षा ते दुसरं किती चांगलं आहे, हे मी ‘तर्कशुद्ध’रीत्या त्यांना समजावून देत असे. मी त्यांच्याबरोबर हसणारा-रडणारा सांगाती, सोबती नव्हतो. मला एकाच दमात एखाद्या हिरोप्रमाणे खूप काही करून मोठं व्हायचं होतं.’’ याच पुरुषी वृत्तीमुळे त्यांचा दोन वेळा घटस्फोट झाला.

 त्यानंतर १९८५-८६ मध्ये रवींद्र यांना भोपाळमध्ये कामासाठीच्या प्रशिक्षणासाठी जावं लागलं. संध्याकाळी लेक्चर्सनंतर ‘युनियन कार्बाइड’ कंपनीच्या आसपास असलेल्या झोपडपट्टय़ांतील मुलांबरोबर त्यांचा संवाद सुरू झाला. अधिक ओळख झाल्यानंतर ते त्यांना गणित शिकवू लागले. क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीनं समजावण्यासाठी त्यांनी कागदी वस्तू बनवण्याची ओरिगामी कला वापरली आणि त्यांना मुलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. कालांतरानं ते आपली नोकरी सांभाळत गणित विषय रंजकतेनं शिकवण्यासाठी ओरिगामीच्या कार्यशाळा देशभर स्वेच्छेनं विविध वंचित समूहांच्या गटांसाठी, गणिताच्या शिक्षकांसाठी घेऊ लागले. भोपाळमध्ये असतानाच भारती दिवाण या सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कार्यकर्तीशी त्यांची ओळख झाली. राजकीय-सामाजिकदृष्टय़ा सजग, आधुनिक विचारांच्या, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेल्या भारती यांना रवींद्र यांच्या सामाजिक कार्यामागील तळमळ जाणवली. फुटपाथवर बसून मुलांना गणित विषय शिकवणारा प्रयोगशील शिक्षक त्यांना भावला. अनेक महिने दोघांच्या भेटीगाठी वाढल्या, पत्रमैत्रीही चालली होती. १९९४ मध्ये मुंबईत नोंदणी पद्धतीनं दोघांचं लग्न झालं. उमद्या स्वभावाच्या, हसतमुख भारतींबरोबर रवींद्र यांचा संसार चांगला सुरू झाला. मुंबईतील माहीम परिसरात ते राहत होते. पुढे मुलगा आभास जन्मला. पत्नीची भूमिका विचारात न घेता बऱ्याचदा परस्पर निर्णय घेतल्यामुळे, कधी पत्नीला आपल्यासारखं चांगलं इंग्रजी न बोलता आल्यानं आलेल्या अहंगंडामुळे, आभासच्या खेळण्या-खाण्यासंबंधात काही गोष्टींत मतभेद झाल्यामुळे उभयतांमध्ये कुरबुरी होत होत्या. पण रवींद्र यांच्या स्वभावात आता मोठा फरक पडला होता. भारती जेव्हा जेव्हा रवींद्र यांच्या झालेल्या चुका दाखवू लागल्या, तेव्हा रवींद्र त्याबद्दल विचार-मनन करून चुका सुधारण्याचा सातत्यानं प्रयत्न करू लागले होते, सुसंवादासाठी ते सतत तयार असायचे. त्याविषयी रवींद्र सांगतात, ‘‘बदलासाठी भारती मला प्रोत्साहित करत असताना पहिल्यांदाच प्रकर्षांनं मला जाणवू लागलं, की कॉलेजमध्ये शिकवण्यात आणि इतर तांत्रिक क्षेत्रात मी ‘यशस्वी’ होतो याचा अर्थ मला स्त्री-पुरुष नातं नीट कळलं होतं, माझ्यातला पुरुषीपणा कळला होता, असा नव्हे. भारतीच्या आग्रहाखातर मी साधारण ऑक्टोबर २००२ मध्ये एका सामाजिक संस्थेनं आयोजित के लेल्या नातेसंबंध, मर्दानगी यावरच्या संपूर्ण ६ दिवसांच्या निवासी कार्यशाळेत सहभागी झालो. तिथून माझ्या स्त्री-पुरुष समानतेच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. त्या कार्यशाळेनंतर स्त्री-पुरुष नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला, शिवाय एकूणच यश-अपयश, करिअर, आनंद, समाज, प्रगती, जीवनाच्या सर्वच बाबींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात झाली. आजही साध्या साध्या गोष्टी नव्यानं शिकण्याचा प्रवास चालू आहे.’’

 माहीम येथील नावाजलेल्या, गर्दीच्या परिसरातील शाळेमध्ये आपल्या मुलानं जाण्याऐवजी उपनगरात स्थलांतरित होऊन तुलनेनं कमी दाटीवाटीच्या, निकोप वाढीसाठी अधिक पोषक वातावरण असलेल्या शाळेत आभासनं जावं, यासाठी रवींद्र आणि भारती यांचे प्रयत्न होते. गोरेगाव येथे भाडय़ाच्या घरात राहायला लागल्यानंतर ‘यशोधाम’ मराठी शाळेत आभास शिकू लागला. आभासचे शेजारपाजारचे मित्र त्याच्या घरी खेळण्यासाठी, गप्पांसाठी यायचे. शरीर-साक्षरतेविषयी या मुलांच्याच वयाच्या त्यांच्या मैत्रिणींना फारसं ज्ञान नसल्याचं भारती यांना समजलं. त्यांनी मग या मुलींसाठी शरीर, प्रजनन यांविषयी जाणीव-जागृतीच्या कार्यशाळा घेतल्या. पुढे परिसरातील मुलांच्या आई वर्गासाठीही त्या आयोजित केल्या. विवाहित स्त्रियांच्या सांस्कृतिक विकासाकरिता ‘प्रेरणा महिला संघ’ या नावाचा गट भारती यांनी सुरु केला. रवींद्र यांची साथ या सर्व सामाजिक उपक्रमांना होती. त्यांच्या घराशेजारी राहणारी अनुराधा अभ्यास करण्यासाठी रवींद्र यांच्या घरी जाऊ लागली. पुढे परिसरातील आणखी काही मुले जोडली गेली. ‘ग्रुप स्टडी’ या नावानं सुरू झालेल्या या उपक्रमात आणखी काही मुलं सामील झाली, तेव्हा रवींद्र यांनी त्यांच्या घरासमोर आणखी एक रिकामा फ्लॅट खास या मुलांच्या अभ्यासासाठी भाडय़ानं घेतला. साधारण ७ मुलगे व २ मुली नियमितपणे येऊ लागल्या. अभ्यासाबरोबरच एकत्रितपणे खेळ, गप्पा, गिटार वाजवणं किंवा इतर कुठलं नवं कौशल्य शिकणं, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलावून ‘करिअर मार्गदर्शन’पर उद्बोधक कार्यक्रम, हे सारं रवींद्र-भारती हे जोडपं हळूहळू करू लागलं. या गटाबद्दल जसजसं परिसरातील पालकांना, मुलांना कळू लागलं, तसं पंचवीसएक मुलंमुली दुपारी शाळेत जाऊन सकाळी वा संध्याकाळी या गटातील वेगवेगळ्या उपक्रमांत, कार्यशाळांत सहभागी होऊ लागली.

  ६ वर्ष सातत्यानं चालणाऱ्या या गटाचं आगळेपण जसजसं ती मुलं पदवीपर्यंत शिकून पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांत जाऊन नोकरी-व्यवसाय करू लागली तसतसं कळू लागलं. पौगंडावस्थेतील मुलांच्या निकोप वाढीसाठी केसकर दाम्पत्यानं घेतलेल्या कष्टांचं महत्त्व तेथील लोकांना उमजू लागलं. या गटातील अनुराधा आपला अनुभव सांगते, ‘‘गटात आल्यानंतर अभ्यास करण्याबरोबरच मयूर, सुमित, सोनाली, प्रथमेश, आभास व इतर सवंगडी या सगळ्यांनी आपापल्या घरातून आणलेला नाश्ता एकत्र बसून खाल्ल्यामुळे एक वेगळी मजा यायची. गटातील मुलं-मुली खोलीची साफसफाई, आवरणं हे सर्व आळीपाळीनं, नियमितपणे करू लागली व आम्हाला स्वयंशिस्तीचे धडे रवीकाकांकडून मिळाले. व्यायाम, इंग्रजी संभाषणकौशल्य, राजकीय-सामाजिक घडामोडींबद्दल चर्चा करून रवीकाका आमची वैचारिक मशागत करायचे. मैत्री, आकर्षण, प्रेम, सशक्त नातेसंबंध, अनुरूप जोडीदाराची विवेकी निवड, या सर्व विषयांबद्दल मोकळेपणानं चर्चा करून ते संबंधित विषयातील अनुभवी, तज्ज्ञ व्यक्तींची संवादसत्रं नियमितपणे आयोजित करायचे. आम्हा मुलांच्या डोक्यात अनेक प्रश्न तुंबून असायचे, जे परस्पर संवादात आम्ही व्यक्त करायचो. हा संवाद तेव्हाच शक्य होतो, जेव्हा संवादाच्या जागा सुरक्षित असतील आणि जिथे तुम्हाला तुमच्या भाषेत हवं तसं व्यक्त होता येईल. जिथे कोणी तुम्हाला नावं ठेवणार नाही, जिथे ठरावीक गोपनीयतेची पातळी ओलांडली जाणार नाही. अशा प्रकारचा अवकाश रवीकाका व भारतीताई यांनी तळमळीनं आमच्यासाठी उपलब्ध केला. मुलांना कुठलाही उपदेश न करता, त्यांना अभिव्यक्त व्हायला, स्वत:बद्दल विचार करायला, आकलन करायला शिकवलं. त्यांच्याकडून जगण्यासाठी ऊर्जा, सतत प्रोत्साहन मिळत आलं आहे.’’

रवींद्र-भारती यांच्या या अनौपचारिक संवादी अवकाशाचं काम आजही चालू आहे. दशकाहून अधिक काळ जोडले गेलेले सर्व विशीतील तरुण-तरुणी व्यक्तिगत वा सामूहिक पातळीवर त्यांना अधूनमधून भेटत असतात. रवींद्र सांगतात, ‘‘भारतीला जानेवारी २०२१ मध्ये स्तनांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. तिच्या उपचारांसाठी धावपळ, खर्च, जागरणं, अतिरिक्त कामं  करणं, हे मी व माझा मुलगा करतच आहोत. पण तिला बिनशर्त भावनिक आधार देण्यात मी जरा कमी पडलो असं मला वाटतं. बऱ्याच भावनिक राग-रुसव्यातून, थोडंबहुत कळायला लागलं. पुरुषांमधील भावनिक बुद्धय़ांक वाढीस लागण्याकरिता किती प्रयत्न करणं जरुरीचं आहे ते मला समजू लागलं.’’

 पुरुष ( म्हणजेच त्यांची मानसिकता) जर समस्येचा भाग आहेत, असं आपण मान्य केलं, तर समस्या निवारणाचा भागसुद्धा ते असायला हवेत. रवींद्र यांनी त्यांच्या ‘व्यक्तिगत (पुरुष) भान ते समाजभान’ या प्रवासानं हेच दाखवून दिलं आहे. पण जिथे बहुसंख्य पुरुषांना ते समस्येचा भाग आहेत, हे मान्यच नसेल, किंवा मान्य असलं तरी बदलासाठी अवतीभवतीच्या लोकांकडून ‘सपोर्ट-सिस्टीम’ नसेल, तिथे सुदृढ सहजीवन शक्य आहे का?