मंगला नारळीकर
माझ्या माहेरी, म्हणजे राजवाडय़ांच्या घरी बऱ्यापैकी धार्मिक नियम पाळले जात. रोज देवांच्या आंघोळीसह देवपूजा, मुलांनी रोज खेळून आल्यावर हातपाय धुऊन देवाला आणि मोठय़ा माणसांना नमस्कार करणं, काही स्तोत्रं, परवचा म्हणणं, मोठय़ा एकादश्या, महाशिवरात्र यांचे उपास, मंदिरात जाणं इत्यादी. या गोष्टींची सर्वात जाणकार म्हणजे आमची आजी. तिनं सांगितलेलं आम्ही ऐकायचं. मोठय़ा एकादशीला उपास केला, तर विष्णू प्रसन्न होतो, महाशिवरात्रीला उपास केला की शंकर प्रसन्न होतो, पुण्य मिळतं.. उपास मोडला, तर ते पुण्य गेलं वाहून, उलट पाप लागायची भीती! एकदा काका अशाच एका महाशिवरात्रीच्या किंवा एकादशीच्या उपासाला म्हणाले,‘‘आज माझी लंच मीटिंग आहे, मला डबा नको. मी इतरांच्या बरोबर खाईन.’’ आजी म्हणाली,‘‘पण मग उपास मोडणार का?’’

काका उत्तरले,‘‘हे पाहा, मी घरात उपवास करतोय ना, बाहेर पडल्यावर जरूर असेल त्याप्रमाणे करीन. संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा उपवास चालू!’’ आजी तिच्या लेकापुढे गप्प बसली. आम्हा मुलांना काकांचं म्हणणं आवडलं. घरात मस्त उपवासाची खिचडी, वडे, खीर खायचं आणि शिवाय बाहेर गेल्यावर तिथले चवदार पदार्थही!

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Holi 2024: Five Zodiac Signs Lucky On Rang panchami
होळीला चंद्र ग्रहण व ४ दुर्मिळ योग बनल्याने ‘या’ राशींच्या नशीबाचं टाळं उघडणार; ‘अशा’ रूपात दारी येईल लक्ष्मी?
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

काका म्हणत, ‘‘माझा जन्म ब्राह्मणाच्या घरात झालाय, पण मी कर्मानं शूद्र आहे. कारण मी पैसे मिळवण्यासाठी इंग्रजी कंपनीत नोकरी करतो.’’
ते लेबर ऑफिसर होते. आपलं काम मनापासून करत आणि त्यांच्या क्षेत्रात नाव कमावून होते. पापपुण्याच्या कल्पना जरुरीप्रमाणे बदलता येतात, हे मी तिथे शिकले. हरतालिकेचा कडक उपवास केला, तर मनासारखा, चांगला नवरा मिळतो, संसार सुखाचा होतो, हे ऐकलेलं. आम्ही उपवास करायचो, पण खिचडी वगैरे खाऊन. माहितीतली एक जरा मोठी मुलगी अगदी कडक उपवास करायची, तिचं सर्वाना कौतुक. पण तिचं लग्न झाल्यावर वर्षभरानं तिचा नवरा वारला. हळू हळू उपवास प्रकरण निर्थक वाटत गेलं. उपवासाच्या फराळात सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे साबुदाणा, शेंगदाणे, बटाटे, मिरची. हे पदार्थ पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात भारतात आणले हे समजलं, तेव्हा त्यापूर्वी उपवासाच्या फराळातले चवदार पदार्थ कोणते असतील हा प्रश्न पडला! पुढे लग्न झाल्यावर जयंत नारळीकरांच्या घरात पाहिलं, तर थोडे देव होते, पण रोज पूजा होत नसे. सासूबाई रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावत. त्यांना सवड होई त्या दिवशी देवांना धुवून पुसून ठेवलं जाई. घरात अनेक ग्रंथ होते, ते वाचले जात. माझे सासरे, तात्यासाहेब, यांचा सर्व धर्माचा अभ्यास होता. एकदा त्यांच्याकडून ऐकलेली गोष्ट- ते १९३२ मध्ये इंग्लंडहून उच्च शिक्षण घेऊन कोल्हापूरला परत आले. त्यांचे मोठे बंधू त्या वेळी घराचे प्रमुख होते. रँगलर होऊन परत आलेल्या धाकटय़ा भावाचं भरपूर कौतुक त्यांना होतं. तात्यासाहेबांनी आपल्या दोन-तीन मित्रांना घरी जेवायला बोलावण्याचा प्रस्ताव ठेवला. पण त्यात एक मित्र मराठा आहे हे समजल्यावर थोरल्या बंधूंनी नकार दिला.

तात्यासाहेब मित्रांना बाहेर जेवायला घेऊन गेले. नंतर २००० च्या आसपासची गोष्ट. जयंत आणि मी ‘आयुका’च्या गाडीनं कोल्हापूरला दोन दिवसांसाठी गेलो होतो. नारळीकरांच्या जुन्या घरात जयंतचे काका-काकू हयात नव्हते. त्याची अविवाहित चुलत बहीण आपल्या भाच्याच्या कुटुंबासह जुनं घर सांभाळत होती. तिनं मोठय़ा प्रेमानं आम्हाला जेवायला बोलावलं. आम्ही गेलो. जेवणानंतर गाडीनं लगेच विद्यापीठात जायचं होतं, म्हणजे आमच्या ड्रायव्हरचंही जेवण लवकर व्हायला हवं होतं. पाट मांडून सात-आठ लोकांची पंगत केली होती. त्या वेळी ड्रायव्हरचा पाट जयंतच्या पाटाशेजारी मांडला होता. आमचे ड्रायव्हर जातीनं मागासवर्गीय होते. आमच्या परिवारात १९४० च्या दशकात आंतरजातीय लग्नास परवानगी दिली नाही म्हणून अविवाहित राहणारी युवती होती, तर त्याच परिवारात आता आंतरजातीय आणि आंतरधर्मीय सुना आणि जावई स्वीकारले जातात, त्यांचे संसार सुखाचे होतात.
आमचं लग्न झालं, त्या वर्षी जयंतचे आई-वडील पुण्यात राहायला आले. त्यानंतर दोन वर्षांनी तात्यासाहेबांच्या वडील बंधूंचं निधन झालं. त्यांच्या मागे पत्नी आणि एक अविवाहित कन्या होती. तात्यासाहेब कोल्हापूरला गेले, रीतीप्रमाणे आणि थोरल्या वहिनींच्या इच्छेला मान देत ते नदीवर गेले आणि थोरल्या बंधूंच्या मृत्यूनंतर करायची सगळी कर्मकांडं गुरुजी सांगतील तशी केली. २-३ वर्षांनी तात्यासाहेबांनी त्यांच्या मुलांना सांगून ठेवलं, ‘‘माझ्या मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी करायचे नाहीत. विद्युतदाहिनीत देह जाळावा. शक्य तर समाजकार्य करणाऱ्या संस्थेला दान करावं.’’
ते खरोखर बुद्धिवादी होते. त्यांच्याकडून मी दोन गोष्टी शिकले.दुसऱ्यांच्या श्रद्धेची चेष्टा करू नये. त्यांच्या समाधानासाठी थोडं काम करायला हरकत नाही. आपल्याला पटणाऱ्या, योग्य वाटणाऱ्याच गोष्टी कराव्यात. लोकांचं अंधानुकरण करू नये.

ताई-तात्यासाहेब रोज सकाळी भागवत ग्रंथाचं थोडं वाचन करत. ताई वाचत आणि तात्यासाहेब ऐकत. मूळ संस्कृत ग्रंथ आणि त्याचं हिंदूी भाषांतर वाचलं जाई. त्यांनी या ग्रंथाची २-३ पारायणं केली होती. एकदा त्यांचं असं वाचन चालू असताना एकदम तात्याहेबांच्या जोरात हसण्याचा आवाज ऐकू आला. ते बराच वेळ हसत होते. मी जाऊन चौकशी केली, तर समजलं, की त्या ग्रंथात विलक्षण भयंकर घटनेचं वर्णन करताना, ‘सूर्य चंद्रासह नवग्रह एकमेकांवर आदळून महाउत्पात करत होते’ असा काहीसा मजकूर होता. तात्यासाहेब होते खगोलशास्त्रज्ञ! त्यामुळे असं नवग्रहांचं आदळणं किती असंभव आणि म्हणून विनोदी आहे हे त्यांना कळत होतं. आपल्या पुराणग्रंथांतली सगळीच विधानं सत्य आणि ग्राह्य नसतात. अतिशयोक्तीचा भरपूर वापर केलेला असतो. आपण नीरक्षीरविवेक करून चांगलं, हितकारक तेवढं उचलावं, हे मी शिकले. धर्म-अधर्म, पाप-पुण्य अशा विविध संकल्पनांबद्दल आपल्या ज्या पारंपरिक धारणा असतात, त्या काळानुसार आणि तर्क-विवेकानुसार बदलायला हव्यात, याची शिकवण मला लहानपणापासून अशा कित्येक अनुभवांमधून मिळत गेली. त्यानुसार माझंही आयुष्य बदलत गेलं. या शिकवणीनेच मला आयुष्याचा खरा अर्थ समजत गेला.
mjnarlikar@gmail.com