डॉ.रवींद्र कोल्हे  ravikolhemelghat@gmail.com

इंटर्नशिपसाठी पारशिवणी गावी राहणे झाले. तेथे खेडय़ाचे प्रथम दर्शन झाले. रुग्णसेवा कशी करावी याचे धडे तेथे गिरवले. जेवढे शिक्षण वयाच्या २२ वर्षांत झाले तेवढे या १० दिवसांत झाले. खेडी, खेडय़ातील माणसे, प्रेमळ माता-भगिनी दिसल्या. त्यांच्यासाठी पुढील आयुष्य घालविण्याचा निर्धार पक्का झाला. बाबांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘समाजकार्याची आंबट कैरी खाताखाता दात आंबून गेले आहेत, पण सोडवत नाही म्हणजे नेमके काय ते कळले.’.. त्यातूनच पुढे बैरागडचा प्रवास सुरू झाला..

डॉ. रवींद्र कोल्हे हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्यावर महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव झाला होता. म्हणूनच त्यांनी भरभराट करून देणारी मेडिकल प्रॅक्टिस न करता गरजू लोकांची मदत करता येईल असे काम करण्याचे ठरवले. कर्मभूमी म्हणून त्यांनी बैरागड या गावाची निवड केली. हे मेळघाटातील एक छोटेसे गाव आहे. बैरागडला जाण्यासाठी ४० किमी इतके अंतर पायी चालावे लागते. बैरागड येथील कुपोषण समस्या त्यांनी खूप प्रयत्नांती सोडवली आहे, शिवाय इथल्या लोकांना शेती व पशुपालनाविषयीसुद्धा ते मदत करतात. कोल्हे दाम्पत्याच्या अगणित कष्टांचे फळ म्हणून आज मेळघाटात चांगले रस्ते, वीज, १२ प्राथमिक उपचार केंद्रे आहेत.

डॉ. कोल्हे आणि त्यांच्या पत्नी स्मिता कोल्हे यांनी वनसंवर्धनाचेही कार्य केले आहे. त्यामुळे मेळघाट हा शेतकरी आत्महत्यामुक्त झाला.

पाळण्यातील नाव जरी रवींद्र असले तरी शेगांवची सगळी रेल्वे कॉलनी कोल्हे बाबूंचा रवी याच नावाने मला ओळखत असे. मी सदैव आजारी राहत असल्यामुळे सर्वाचाच लाडका, त्यामुळे थोडा वाया गेलेला असा मी मला आठवतो.

मी सतत आजारी असल्याने मला रोज आग्रहाने दूध पाजले जात असे. एक दिवस मला गंजातील ग्लासभर दूध दिले. मी प्यायलो. ते पाहून आईने जोरजोरात रडायला सुरुवात केली कारण गंजात मेलेली पाल होती. सर्व कॉलनी जमा झाली. कोल्हे बाबूंना ताबडतोब बोलावण्यात आले. आजी तर मला धरून रडू लागली आणि माझ्या आईला शिव्या घालू लागली. सर्व जण आजीला समजावत होते. मला देवाचा प्रसाद देत होते, अंगारे लावत होते. वडील आल्यावर त्यांनी मला रेल्वे हॉस्पिटलला तडकाफडकी नेले. अनायासे डॉक्टरांचे नाव पण डॉ. पाल असे होते. त्यांनी विचारपूस केली. वडिलांना समजावले की, पाल बिनविषारी असते, पाल खाल्ली तरी काही फरक पडत नाही. सर्वानी प्रतिविचारणा केली की, तिची विष्ठा तर विषारी असते. पण डॉ. पाल या मताशी सहमत नव्हते. ते आग्रहाने सांगत होते की, काहीही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. शेवटी नाइलाजाने त्यांनी काही गोळ्या हातावर ठेवल्या आणि सकाळ-संध्याकाळ तीन दिवस घेण्यास सांगितले. (बहुधा जंतनाशक गोळ्या असाव्यात.)

मला सहाव्या वर्षी शाळेत नेले, सरकारी फैलातील नगर परिषद शेगाव प्राथमिक शाळा क्रमांक ३ मध्ये दाखल करण्यात आले. मुख्याध्यापक गोसावी यांनी वडिलांना जन्मतारीख न विचारता मला उजवा हात डोक्यावरून डाव्या कानाला पुरविण्यास सांगितले. माझा हात पुरला आणि त्यांनी माझी जन्मतारीख १/७/१९६० अशी दाखलापुस्तकात नमूद करून टाकली. माझा प्रवेश झाला. मात्र गोसावी गुरुजी फार कडक होते. मला छडी लागे छमछमचा नेहमी अनुभव घ्यावा लागे. मी शाळेतून पळून आलो हे जेव्हा भाऊंना (वडिलांना) समजायचे तेव्हा त्यांच्याही हातचा प्रसाद मला खावा लागायचा. हातात लिंबाची ओली काडी घेऊन माझी शाळेपर्यंत ते वरात काढत. शाळेत गेल्यावर पुन्हा गुरुजींचा महाप्रसाद मिळे.

मला जन्मत: हृदयरोग असल्याचे वयाच्या १० व्या वर्षी निदान झाले. मात्र उपचार पद्धतीवर मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये तीव्र मतभेद असावेत त्यामुळे सतत तपासण्या, डॉक्टरांचे चर्चासत्र, वेगवेगळा सल्ला, सतत हॉस्पिटलमध्ये भरती असणे अशा दोलायमान स्थितीत बालपण हिरावून गेले. पलंगावर बसणे, रक्त, लघवी तपासणी, एक्स रे, ई. सी. जी., कार्डियाक कॅथरायझेशन या सर्व गोष्टींना सामोरे जाण्यात आणि सक्तीची विश्रांती यातच वर्षांमागून वर्ष जात असल्याने कधी खेळायला मिळाले नाही. त्यामुळे शरीरयष्टी किरकोळ राहिली. मात्र पलगांवर बसून बसून भरपूर वाचन होऊ लागले. शालेय अभ्यास पटकन पूर्ण होत असे. मग चांदोबा, पराग, धार्मिक पुस्तके, पोथ्या, गूढकथा, इसापनीती, कबिरांचे दोहे असे एक ना अनेक वाचनात येऊ लागले.

चौथा वर्ग शाळेतून पहिला येऊन पास झालो आणि नगर परिषद हायस्कूलला प्रवेश मिळवला. मुख्याध्यापक व्ही. जी. एदलाबादकर मात्र प्रेमळ स्वभावाचे आणि कडक शिस्तीचे होते. त्यांच्यामुळे मला शाळेची गोडी लागली. मी कधीही शाळा चुकवली नाही. नियमित अभ्यास करीत असे. मला आजारपणामुळे शाळेतही विशेष दर्जा होता. मला सायकलवर बसवून वर्गाच्या खोलीपर्यंत माझा मित्र सुरेश दुधे रोज नेणे-आणणे करत असे. तो वयाने मोठा होता. त्याच्या बदल्यात त्याला माझी सायकल दिवसभर ताब्यात मिळत असे. आमचे सर विठ्ठल वाघ आम्हाला पाऊस पडला असला तर वर्ग खोलीतच देशभक्तांच्या कथा रंगवून रंगवून सांगत असत. मी सातवीत असताना बांगलादेशचा स्वातंत्र्य लढा झाला. त्या वेळी सर आम्हाला देशभक्तीपर गीतांना सिनेमाच्या गाण्यांच्या चाली लावून खडय़ा आवाजात म्हणून घेत असत. विजय दिवशी आम्ही गावभर ती गीते गात प्रभात फेरी काढल्याची आठवण अगदी कालची आठवण आहे असे आजही वाटते. देशासाठी देईन प्राण हे त्यांनीच मनात रुजवले.

ग्रामीण भागात श्रावण महिन्यात त्या काळात पोथी लावणे हा प्रकार रूढ होता. अशिक्षित आणि वृद्ध स्त्रियांना त्या पोथीची फोड करून सांगण्याचा प्रघात होता. माझी आई पोथी उत्तम वाचून त्यावर विवेचन करीत असे. वृद्ध स्त्रियांना समजावून सांगत असे. हळूहळू मलाही चार दिवस ते करता येऊ लागले. मी चांदोबाचा वाचक असल्याने मी पोथीच्या बाहेरीलही काही मजकूर जोडून सांगत असे, त्यामुळे माझे निरुपणही सगळ्यांना आवडू लागले. मलाही कधीकधी ती संधी मिळू लागली. त्यात एक भाग असा असे की, पोथी संपल्यावर वयाचा विचार न करता सगळे माझ्या पायावर डोके टेकवू इच्छित असत, पण मला त्यात फार लाजिरवाणे वाटत असे. संकोच वाटत असे.

हायस्कूलमध्ये प्रवेश झाला आणि आमचे मुख्याध्यापक एम. जी. एदलाबादकर बी.ए., बी.टी. (गोल्ड मेडलिस्ट) झाले. त्यांनी बालमनाला आकार दिला. सरांचा शाळेत खूपच दरारा होता. व्रात्य मुलांना ते त्यांच्या खोलीत बोलवून वठणीवर आणत असत. एक दिवस मलाही बोलावणे आले. मला घाम फुटला, तोंडाला कोरड पडली, एक शब्दही बाहेर पडेनासा झाला. काय झाले ते लक्षात येत नव्हते. विचारून त्यांच्या खोलीत तर गेलो पण डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली. सरांनी माझ्यापुढे वर्तमानपत्र पकडले, हे वाच. मला तर एक अक्षरही दिसत नव्हते. त्यांनीच उलगडा केला. ‘‘उद्या देवरावला (माझ्या वडिलांना) घेऊन ये, पेढे घेऊन ये,’’ म्हणाले. मी अपेक्षा करीत होतो की आता माझ्या पाठीचा तबला होणार, पण सरांनी परीक्षेत मी शिष्यवृत्ती पटकाविल्याची बातमी सांगितली. मला वर्तमानपत्र घरी नेण्यासाठी हातात दिले. त्यानंतर दर महिन्याला पोस्टमन शाळेत आला की, मला सरांचे बोलावणे येत असे. (वर्ग चौथीत असताना मी इंग्रजीत सही करणे शिकलो, तीच सही आजही कायम आहे.) मी मनी ऑर्डरवर सही करताना मूठभर मांस माझ्या अंगावर नकळत चढत असे. त्याच सरांनी स्वयंस्फूर्त भाषण, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, नाटक, चित्रकला अशी अनेक गुणांनी माझे माप भरले. त्यांनीच मला गणित विषयाची गोडी आणि गती शिकविली. त्यामुळे माझे १० वीच्या विशेष गुणवत्ता यादीत नाव दाखल झाले. (त्या ‘ओपन मेरिट स्कॉलरशिप’मुळे मी माझे वैद्यकीय शिक्षण घेऊ शकलो.) तरीही सर नाराज झाले, ते बरसले, सहा गुण कुठे गेले. मी सरांना शब्द दिला, सर आता नाही जाणार ११ वी १२ वीत मी गुण जाऊ दिले नाहीत. त्यांनीच माझ्यात सभाधीटपणा रुजविला. (त्यांच्याच सल्ल्याने मी ११वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.) १०वीत असताना व्ही.जी. सरांनी मला इंग्रजी आणि तर्खडकर पाठमाला भाग १, २, ३ चा परिचय करून दिला. इंग्रजीत गणिताप्रमाणे गुण कसे मिळू शकतात याचे तंत्र शिकविले. जे मला पुढे वैद्यकीय महाविद्यालयात कामी आले.

शेगावला ११ वी सायन्स नव्हते, त्यामुळे मला वध्र्याच्या जे. बी. सायन्स कॉलेजला घातले. तिथे माझी मावशी राहत असे. सुखीदु:खी पोर बहिणीच्या सावलीत घालून माझी आई सुखावली. माझे मौसाजी श्रीराम जवरे हे गांधी विचारसरणीनुसार प्रामाणिकपणे जीवन जगणारे गृहस्थ होते. गांधी-विनोबांसोबतचे त्यांचे अनुभव ऐकवून त्यांनी त्या विचारांशी माझी सांगड घालून दिली. माझ्या मावस बहिणीदेखील माझ्याशी अनेक विषयांवर चर्चा करत असत. मावशी अशिक्षित असल्या तरीही त्यांची नाळ गांधी विचारांशी जुळली होती. त्यामुळे संस्कारक्षम वयातच माझी जडणघडण झाली. जिल्हा वाचनालय, गांधी ज्ञानमंदिर वाचनालय यातील पुस्तके मला खुणावू लागली. गणित, विज्ञानासोबत मी गांधी-विनोबा, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, दादा धर्माधिकारी यांच्या ग्रंथांचे वाचन, चिंतन-मनन सुरू केले. खेडय़ात पुढील आयुष्य घालवायचे ही खूणगाठ पक्की झाली. भारंबे सरांनी फिजिक्स पार्टिकल थेअरी, गुरुत्वाकर्षण, क्ष-किरण शिकविता शिकविता न्यूटन, रुदरफोर्ड, मादाम क्युरी, मारी क्युरी अशा अनेक दिग्गजांशी वेगळी ओळख घडविली. कुठलीही गोष्ट मन लावून दीर्घकाळ केल्यास यश अनपेक्षितपणे पदरी पडते. बालपणी शिकलेल्या ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..’ या म्हणीचा प्रत्यय येत गेला. धनंजय समुद्रालवारसारखा सखा याच जे.बी. कॉलेजने मला दिला.

१२ वीचा निकाल आणि मेडिकलचा प्रवेश १९७८ मध्ये झाला. त्याचवेळी रामकृष्ण मिशन वाचनालय मला खुले झाले. जगभरातील विचारवंतांशी त्यामुळे जातकुळी जुळली. काय करावे? काय करू नये? हे ठरत गेले. अवांतर वाचनही सुरूच होते. वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या बाकावर बसणारा, लायब्ररीत दिसणारा रवी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे सतत पास होत गेला. शहरात चालणाऱ्या वेगवेगळ्या फोरमवरील चर्चामधील विचारांनी समृद्ध होऊ लागला. बाहेर राहण्याची सवय असल्याने वेगवेगळ्या घरांमध्ये भाडेकरू म्हणून प्रवेश करणारा आणि कालांतराने त्या कुटुंबातीलच सदस्य होऊन जाणारा मी त्यांच्या स्वत:च्या मुलांपेक्षाही अधिक जवळचा कधी झालो हे मलाही समजले नाही. मग शर्मा आंटी असो की शिंदे मावशी की देशकुलकर्णी ताई असो.

आनंदवनात जातायेता लक्ष्मीकांत वरणगावकर, चंद्रकांत रागीत, भूपेंद्र मुजुमदार, नृपेंद्र पोळ, संजीव गणोरकर, साधना कुलकर्णी, सुनीती देव, कल्पना भांबुरकर असे जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी मिळाल्या. जे आजही सारथ्याचे काम करत आहेत. तसेच बाबा आमटे, दाजीसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, माधवराव वैद्य, प्रकाशभाऊ आमटे, विकासभाऊ आमटे, मंदाताई आमटे, भारतीताई आमटे, ताराबेन, अनुताई या सर्वानीच जीवनामृत दिले. बाबुलखेडय़ाच्या झोपडपट्टीत जाणारे मेडिकल कॉलेजचे सहध्यायी अविनाश सावजी, दिलीप गहाणकरी, प्रेमचंद पंडित हे आजही सोबत आहेत. त्यांनीच जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन शिकविला.

गुजरातच्या महापुरात मदतकार्यासाठी तिरपुडे सामाजिक कार्य महाविद्यालय, नागपूर यांच्यासोबत डॉक्टर म्हणून जाण्याचा प्रसंग आला. त्यादरम्यान सामाजिक कार्य म्हणजे काय? याची प्रचीती आली. त्याचे ‘डू अ‍ॅण्ड डोन्टस्’ लक्षात आले. गुजरातमध्ये असतानाच द्वारका आणि बेट द्वारकेला गेलो तेथे ‘हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्माच्या अनुयायांना प्रवेश निषेध’ अशी सूचना होती. आम्ही सर्वधर्माचे अनुयायी स्वत:ला समजत होतो. त्यामुळे कळसदर्शन घेऊन परतावे लागले, मुखदर्शन घेता आले नाही. या प्रसंगाने मन उद्विग्न झाले.

इंटर्नशिपदरम्यान ग्रामीण रुग्णालय, पारशिवणी, जि. नागपूर या गावी राहणे झाले. तेथे खेडय़ाचे प्रथम दर्शन झाले. रुग्णसेवा कशी करावी याचे धडे तेथे गिरवले. तिथेच सवरेदय हायस्कूलचे वाचनालय मिळाले गो. नि. दांडेकरांना त्याच वेळी वाचले आणि मन सैरभैर होऊ लागले. नागपूर ते भोपाळ सायकलयात्रा पैसे न घेता पार पाडावयाची हे मित्रांसोबत ठरवले. जेवढे शिक्षण वयाच्या २२ वर्षांत झाले तेवढे या १० दिवसांत झाले. खेडी, खेडय़ातील माणसे, प्रेमळ माता-भगिनी दिसल्या. त्यांच्यासाठी पुढील आयुष्य घालविण्याचा निर्धार पक्का झाला. जीवनात जेवढे चढ तेवढेच उतार येतात. कठीण प्रसंगासोबत हळूवार क्षणही येतात. सुखदु:खाचे रहाटगाडे कालचक्रासोबत फिरत राहते. ते सतत कठीण परिस्थिती स्थिर ठेवत नाही, परिस्थिती बदलत जाते हे लक्षात आले. प्रत्येक क्षणात सुख असो वा दु:ख असो, वेगळा आनंद असतो. तो चाखता आला पाहिजे. त्यासाठी मन:स्थिती स्थिर ठेवता आली पाहिजे. बाबांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘समाजकार्याची आंबट कैरी खाताखाता दात आंबून गेले आहेत, पण सोडवत नाही म्हणजे नेमके काय ते कळले.’ निरपेक्षापणे, तटस्थपणे, त्रयस्थपणे जीवनाला पाहता आले पाहिजे, म्हणजे आपोआपच दु:खे दूर जातील आणि आनंद जवळ येईल हे लक्षात आले.

दुर्गुणांपासून वाचावे आणि सद्गुण अंगी वाढवावे. यासाठी जीवन खर्ची घालण्याचा निर्णय झाला.

इंटर्नशिप संपली, मुंबई गाठली. लहान मुलांचे विषय आणि बाळंतपण या दोन विषयांत प्रशिक्षण घेता आले. त्यामुळे पुढील प्रवास सोपा झाला. मुंबई सुटली, अडीच महिने भटकलो. अशा ठिकाणी जायचे होते जेथे डॉक्टर नसेल. बैरागड तालुका धारणी, जिल्हा अमरावतीला डेरेदाखल झालो..

chaturang@expressindia.com