ईशा वेलदे
ऊर्मिला, थकून-भागून घरी आली. तिचं हे आता रोजचंच झालं होतं. सकाळी लवकर उठून पटापट आटपायचं, मुलांचे डबे, त्यांचा नाश्ता, नंतर जेवणाची तयारी आणि मग दिवसभराची त्यांची काळजी मनात घेऊन बाहेर पडायचं. घरी येईपर्यंत ही काळजी सोबत असायचीच. आज अनुराग असता तर? तो जाऊन इतकी वर्ष झालीत, पण आजही, प्रत्येक क्षणी ही भावनाही तिच्या मनात असतेच! मुलंही आता मोठी होत आहेत, उदित आणि मनस्वी! त्यामुळे खाण्यापिण्या- व्यतिरिक्त आता त्यांच्याबद्दल वेगळीच काळजी तिच्या मनात निर्माण होत होती. विशेषत: उदितची! मनस्वी त्याच्यापेक्षा लहान असली तरी विशेष समजूतदार होती. पण उदित? त्याच्यामध्ये वेगळाच बदल होत चाललेला तिला दिसत होता. त्यामुळे त्याची अधिक काळजी होती ऊर्मिलाला.
लहान असताना ऊर्मिला त्यांच्याच तर भरवशावर मनस्वीला घरी ठेवून जायची. तोही छोट्या मनस्वीला खूप छान सांभाळायचा. तिचा तो आवडता दादा होता. तिला खाऊपिऊ घालणं, झोपवणं, गोष्टी सांगणं, बागेत नेणं, तिच्याबरोबर खेळणं… पण आता तो वयात आल्यापासून मात्र मनस्वीबाबत फारच कठोर होऊ लागला होता. संध्याकाळी, दिवेलागणी झाली रे झाली की ती खेळात कितीही मग्न असली तरी तो तिला तिच्या मनाविरुद्ध घरी बोलवू लागला. तिच्यावर अधिक बारकाईने लक्ष ठेवू लागला, तिने कपडे कोणते, कसे घालावेत, कोणाशी बोलावं, कोणाशी खेळावं, कोणाशी नाही, कसं बोलावं… यावर तो बंधनं घालू लागला. काही वेळा तर तिच्या नटण्यामुरडण्यावरही तो आक्षेप घेऊ लागला होता. त्याच्या अशा वागण्याने मनस्वीचीही आतल्याआत घुसमट होत होती. तिचा मोकळा स्वभाव, अल्लडपणा हरवत चालला होता. उदितबद्दल मनस्वीच्या मनात भीतीची भावना वाढू लागली होती, ही भीती होती त्याच्या नजरेची, त्याच्या धाकाची! आपल्या लाडक्या दादापेक्षा आता हा आपला ‘मोठा भाऊ’ आहे. ही भावनाच तिच्या मनात आताशा अधिक निर्माण होत होती. इतकी की, त्याला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट, स्वत:हून करण्याची तिला भीती वाटायला लागली होती.
सुरुवातीला ऊर्मिला ऊदितच्या अशा वागण्याबद्दल अनभिज्ञ होती. नंतरही तिला जाणवलं तरी मनस्वीबद्दल त्याला वाटणारं ते प्रेम किंवा काळजी असावी असं तिला वाटत होतं. तशीच ऊर्मिलाच्या मनाची समजूत होती. पण, एके दिवशी मात्र उदितची ‘ही’ नजर ऊर्मिलाकडे सुद्धा वळली… ऊर्मिलाच्या ऑफिसमध्ये पार्टी होती. त्यासाठी ऊर्मिलाने छान घडीची साडी नेसली होती. गजरा, हलकासा मेकअपही केला होता. छान दिसत होती ऊर्मिला!
ही तयारी करताना उदित समोरच बसला होता. ओठांवरून लिपस्टिक फिरवताना, अचानक आरशातून ऊर्मिलाचे लक्ष अगदी सहजपणे उदितकडे गेलं. उदित तिच्याकडे रागाने, रोखून बघत होता. त्याच्या नाकपुड्या फुलल्या होत्या. बापरे! ही पुरुषी वर्चस्वाची नजर. ऊर्मिलाच्या काळजात धस्स झालं. एकाएकी ऊर्मिलाला अनुरागची तीव्र आठवण झाली.. उदितऐवजी तिला आरशात अनुरागची प्रतिमा दिसू लागली. असं छान सजलेलं अनुरागला आवडायचं. कधी कधी अनुराग म्हणायचाही, ‘‘मनस्वीची आवड निवडही तुझ्यासारखीच आहे ना गं! आणि ती नावासारखीच ‘मनस्वी’ आहे बघ. अगदी कोणालाही जीव लावेल अशीच माझी पोर आहे ती. तिला अगदी मोकळं, तिच्या मनासारखं आयुष्य जगू देणार आहे मी. इतकं की कोणतीही उणीव तिच्या आयुष्यात राहता कामा नये.’’ उर्मिलाला आपल्या नवर्याचं नसणं तीव्रतेनं जाणवलं.
पुन्हा एकदा ऊर्मिलाचं लक्ष उदितच्या रोखलेल्या नजरकडे गेलं. अजूनही त्याची नजर ऊर्मिलावरून हटली नव्हती. आता मात्र ऊर्मिलाच्या मनातील अस्वस्थता वाढू लागली. तिला मनस्वीची खूप काळजी वाटू लागली. तिच्या दडपून वागण्याची, तिच्या कमी कमी होत गेलेल्या बोलण्याची, आणि विशेषत: तिच्या डोळ्यातील भयाची अचानक ऊर्मिलाला जाणीव झाली. थोडक्यात, सुरक्षेच्या / जबाबदारीच्या भावनेतून कुठेतरी स्त्रीवर पुरुषी हक्क, अधिकार गाजवण्याची वृत्ती/अहंकार उदितच्या मनात वयानुसार जागृत होऊ लागला होता. कदाचित अनुरागच्या म्हणजेच, त्याच्या बाबांच्या कायमचं निघून जाण्यामुळंही असेल, त्याच्यात ही वर्चस्वाची भावना आली असेल असं तिला प्रकर्षाने वाटलं.
ऊर्मिलाने कसंबसं स्वत:ला सावरलं. उदितकडे पाहून कसनुसं हसत घाईघाईने ती ऑफिसला निघाली. निघताना मात्र मनस्वीची काळजी घे, हे सांगायला ती विसरली नाही. संपूर्ण रस्ता… ट्रेन… रिक्षा प्रवास करताना ती खूप अस्वस्थ होती. उदितची ती नजर… त्याचा चेहरा सारखा तिच्या नजरेसमोर येत होता… हे कुठंतरी थांबलं पाहिजे, असं ऊर्मिलाला उत्कटतेनं वाटू लागलं. एकंदरीत त्याच्याही व आपल्या आणि मनस्वीच्याही भविष्याच्या दृष्टीनेही! उदितच्या मनात हा पुरुषी अहंकार वाढता कामा नये. त्याचा खूप नकारात्मक परिणाम मनस्वीवर, कुटुंबावर पडणार होता. माझी मनस्वी, तिनं छान फुलायला हवं. दबाव, दडपणं, हक्क-अधिकार गाजवण्याची वृत्ती माणसाला फुलू देत नाही. नात्यांत छान फुलणारा आणि फुलवणाराही स्वछंदीपणा हवाच. मग ते नाते कोणतंही असो. एकमेकांच्या सहवासात फुलणारी, फुलवणारी नाती जगणं आनंदी करतात म्हणून माझ्या उदितच्याही आनंदासाठी त्याला वेळेवर थांबवायलाच हवं. अवतीभवतीचं जग कसं का असेना. आयुष्यात हे असे, स्वत:ची वा दुसर्याची खरी ओळख करून देणारे ‘कवडसे’ असलेच पाहिजेत, नाही का?… तिचे विचार थांबत नव्हते.
ऑफिसमध्येही कामात, पार्टीत तिचं लक्ष लागत नव्हतंच. कधी एकदा घरी परतते असं तिला झालं. ती पार्टी अर्धवट टाकून एकटीच निघाली. पुन्हा तोच रस्ता.. रिक्षा… ट्रेन… किती तोच तोचपणा असतो ना आयुष्यात. पण आज आपल्याला आयुष्याने एक वेगळाच कवडसा दाखवला. आपल्याच उदरातून जन्म घेणार्या आपल्याच मुलाच्या मनाचा! परिस्थितीने केलेल्या त्याच्या मनाच्या नवीन जडणघडणीचा तो कवडसा होता. ऊर्मिला एकटीच असल्यामुळे, मनाशी उत्तम संवाद साधत होती. खूप दिवसांनी ती आपल्या मनात डोकावून पाहत होती. हळूहळू तिच्या चेहर्यावरच्या रेषा बदलू लागल्या. चिंतेची जागा एका ठाम निश्चयाने घेतली आणि ऊर्मिला एकदम निश्चिंत झाली. अगदी आत्मविश्वासाने!
घरी पोहोचायला नेहमीपेक्षा थोडा जास्तच उशीर झाला होता. घरात पाऊल ठेवताच दोघेही शांतपणे झोपलेले तिला दिसले. उदितचा चेहराही खूप शांत आणि निरागस दिसत होता. दोघांच्याही अंगावर तिने अगदी अलगदपणे पांघरूण ओढलं आणि तीही आपल्या खोलीत गेली.
ऊर्मिला सकाळी सावकाश उठली. आज तिला कसलीही घाई नव्हती. तिच्या पाठोपाठ उदित आणि मनस्वी देखील उठले. दोघांनाही आश्चर्य वाटलं. आईची आज घाईगडबड नव्हती. मनस्वी मनातल्या मनात आनंदून गेली होती. कदाचित आई आज घरीच असावी. दोघांचं आटपेपर्यंत टेबलावर तिने चहा-नाश्ता मांडून ठेवला होता. तिघेही एकमेकांकडे बघत शांतपणे गरम वाफाळलेला उपमा खात होते. एकमेकांची नजरानजर झाली तेव्हा मुलांच्या डोळ्यात आश्चर्य होते. ऊर्मिलाही हळूच हसली आणि मग काय. खूप दिवसांनी तिघांचा मिळून एकदम खळखळून हसण्याचा आवाज घरात घुमला. ऊर्मिला म्हणाली, ‘‘आश्चर्य वाटलं ना? पण मला तुम्हाला सरप्राइज द्यायचं होतं. म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही. आजपासून मी आठ दिवसांची रजा घेतली आहे आपल्या तिघांसाठी. तसंही आपण खूप महिने झाले गावी गेलोच नाही. कोकणात आता गणपती उत्सवही आहे. जाऊयात थोडे दिवस गावाला. आई-नानांना पण खूप आनंद होईल. जवळच आजीचेही घर आहे तिकडेही जाऊन येऊ. कोकणात या दिवसांत निसर्ग खूप छान असतो मनू, तुला नेता नाही आलं माझ्या नोकरीमुळे, पण आता आपण जाऊया तिघंही. बाबा होते तेव्हा दरवर्षी जात होतो. उदितही तसा खूप लहान होता तेव्हा आणि आता? मी नसताना तो किती छान तुला सांभाळतो घराला आणि तुलाही. त्यालाही थोडी मोकळीक हवी ना? की नको?
आपली संध्याकाळची गाडी आहे. लवकर लवकर आटपा, असं तिनं म्हणताच उदितचाही गंभीर चेहरा आनंदून गेला. त्याच्या चेहर्यावरचा ताण निवळला होता. आणि अगदी शीळ फुंकत गाणी गुणगुणत तो तयारीला लागला. ऊर्मिलालाही आनंद झाला. मनात म्हणाली, उदितलाही त्याचं आयुष्य आनंदाने जगायला लावणार आहे मी, ताण घेऊन नव्हे.
‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत तिघांचाही प्रवास सुरू झाला. प्रवासात ते कोकणातल्या जुन्या आठवणींमध्ये रमले होते. उदित सगळ्यांच्या आठवणी काढत होता. ‘‘आई, किती दिवसांनी जातो आहोत ना कोकणात, मला खूप भारी वाटतंय.’’
‘‘ हो ना. बाबा गेल्यापासून मी कामातच अडकले. तुम्हा दोघांना स्वतंत्र असा वेळ द्यायला जमलंच नाही. आता आई-नानांकडे गेल्यावर सगळं विसरून जायचं उदित.आपला मुंबईतला एकाकीपणा… वगैरे. आणि मनभरून आनंदाचा ऑक्सिजन घेऊन परत मुंबईला जायचं. आणि त्याचा दरवळ कायम मनात ठेवायचा. म्हणजे आपल्याला एकाकीपणा कधीच जाणवणार नाही.’’ हे म्हणताना ऊर्मिलाच्या डोळ्यात नकळतपणे पाणी तरळलं. इतक्यात मनस्वी ओरडली, आई मामाचं गाव आलं बरं का? पावसाळी वातावरण होतंच बाहेर. हिरव्या निसर्गानं मनाला ताजंतवानं केलंच होतं आणि आता तर मुलांना आजोळची ऊब मिळणार होती. ऊर्मिलासु्द्धा हरखून गेली होती… तिही जणू आपल्या हरवलेल्या बालपणाला शोधायला चालली होती. कोकणातली लालमाती, पायवाटा, सगळं सगळं तिला परिचयाचं होतं. लग्न होऊन मुंबईत आलो आणि हे सगळं सुख हरवून गेलं आपलं. तिला वाटून गेलं.
लाल मऊ ओलसर माती तुडवत ऊर्मिला झपाझप चालत होती. अवतीभवती भाताची हिरवीगार शेती. मध्येच पाणथळ. पायवाटांच्या बाजूला, सड्यावर फुललेला रंगीबेरंगी तेरडा, रानफळं, रानभाज्या गणपती गौरीच्या स्वागतासाठी उभी होती. लांबूनच तिला आई-नानांचं सुबक छान कौलारू घर दिसलं आणि तिची पावलं अधिकच झपाझप पडू लागली. वेशीवरल्या गणपतीचंं तिनं मुलांसह दर्शन घेतलं आणि सगळे घरी पोहोचले. आई-नाना वाट पाहतच होते. आईने भाकरी तुकडा तिघांवरून ओवाळून टाकला. मनस्वी आणि उदितच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसत होती. घरी सगळा गोतावळा जमला होता. संध्याकाळच्या भजनाची तयारी सुरू होती. गणपती गौरी सजले होते. पताका, टाळ-मृदंग… प्रसादाचा, फुलांचा, उदबत्तींचा घमघमाट घरात दरवळत होता. प्रसन्न आणि मंगल वातावरण.
ऊर्मिलाचं मनही नवनवीन आशांनी फुलू लागलं होतं. असंच छान फुललेलं आणि स्वच्छंदी वातावरण मला अगदी हवं असलेलं….
मनस्वी आणि उदितसुद्धा सगळ्यांमध्ये हसूनखेळून धमाल करत होते. मदतीचा हात पुढे करत होते. पडेल ती कामं करत होते. त्यांचंही मन आनंदानं फुलून गेलं होतं. नदीच्या मातीतून आकारलेला गणपती छान, तोरणांनी, फुलांनी सजला होता.. बाजूला आशीर्वाद देणारी तेरड्यांच्या फुलांनी सजलेली, नटलेली गौराई होतीच. सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं ऊर्मिलाचं, मुलांचं. इतक्या उशिरा का आलात म्हणून सगळे थोडे रागावले. पण ऊर्मिलाला जे हवं होतं, तिला जे साधायचं होतं ते साधलं जात होतं. छान मोकळ्या-ढाकळ्या नात्यांच्या प्रेमानं फुललेलं ते आईचं घर.. याच घरात तिने स्वत:लादेखील असंच फुलवलं होतं. मनात कोणतंही भय न ठेवता कसं जगायचं, हे तिनंच नाही, तर या भुईवर जागोजागी फुललेल्या रानफुलांनी, फुलांनी, फळांनी या हिरवाईनं, लाल मातीनं तिला शिकवलं होतं. ऊर्मिला विचारात दंग होती. हळूहळू सूर्यास्त होऊ लागला. भजनाचे स्वर कानी येऊ लागले. घरातदेखील तेच मंगलमय वातावरण होतं…
मनस्वी उदितबरोबर हसताना, बागडताना दिसत होती. उदितही तिला कोणतीही बंधनं घालत नव्हता, तिच्यावर जोरजबरदस्ती करत नव्हता की डोळे वटारत नव्हता. पुन्हा एकदा बहीण- भावांचं छान नातं फुललेलं ऊर्मिलाला दिसत होतं. तिला आता उदितमधला ‘वर्चस्वी पुरुष’ दिसत नव्हता. दिसत होतं ते त्याचं अवखळ तरुणपण… ती काळजी, ती चिंता तो आता विसरून गेला होता…
हे सर्व पाहून ऊर्मिलानं समाधानाचा एक नि:श्वास सोडला. ऊर्मिलाच्या लक्षात आलं की, आपण नोकरीमुळे मुलांवर किती लवकर जबाबदार्या दिल्या होत्या. विशेषत: उदितचा सगळा आनंदच मावळून गेला होता. पण आता तिला सुखाची परिभाषा गवसली होती. हा निसर्ग, ही नातीगोती त्यातून मिळणारा आनंदाचा झरा, सुरक्षेची ऊब आणि टाळ… मृदंगातील सुंदर भक्तिमय असा नात्यागोत्यांचे सण-उत्सव…
हळूहळू भजनाचे स्वर थांबले… सकाळ झाली… सर्वत्र नीरव शांतता पसरलेली होती, तीही सुस्वर होती… सुगंध होता मातीचा.. नात्यांचा… कौलाच्या एका झरोक्यातून छानसा कोवळा सोनेरी कवडसा ऊर्मिलाला मुलांच्या चेहर्यावर पडलेला दिसला… आणि ती अधिकच निश्चिंत झाली…
weldeisha@gmail.com
