शर्मिला पुराणिक
केतन अगरवालच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र, देश हादरला. २६ वर्षांच्या केतनला त्याची २० वर्षांची होणारी बायको सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने, चेतन चौधरीने लोहगडावरून ढकलून मारल्याची घटना समोर आली आणि त्याबरोबरीने अनेक प्रश्नही समोर उभे ठाकले. पोलीस चौकशीत सिया म्हणाली, ‘‘ Killing Ketan seemed easier than calling off the wedding’’ एखाद्याची हत्या ही टोकाची, अंतिम गोष्ट. एकदा जीव गेला की परत येत नाही. मग ती ‘सोपी’ कशी वाटली असेल? तर हे एक वाक्य आपल्या समाजाच्या तीन मोठ्या मानसिक आजारांवर बोट ठेवतं १) ‘नाही’ म्हणण्याची भीती, २) ‘काय आवडत नाही’ हेच न कळल्यानं येणारं दडपण आणि मनातला गोंधळ आणि ३) हत्येला ‘सोपं’ बनवणारी मानसिकता.
‘नाही’ म्हणणं युद्ध का ठरतं?
लग्नाला नकार हा फक्त दोन अक्षरी शब्द नसतो. त्याच्या मागे एक अख्खी युद्धभूमी असते. ‘इज्जतीची भिंत’-‘‘लोक काय म्हणतील?’’ हा प्रश्न गोळीसारखा लागतो. साखरपुडा मोडला की कुटुंबाची ‘इज्जत’ गेली असंच समजलं जातं. सियाला वाटलं असावं, लग्न मोडलं तर दोन्ही कुटुंबांची बदनामी होईल.
- कुटुंबाचा दबाव – ‘आम्ही समाजाला तोंड कसं दाखवणार?’ आई-वडिलांच्या या एका वाक्यात मुलगा/मुलगी कोलमडते. सियाच्या भावाने नंतर सांगितलं की, ‘‘तिने चिंता बोलून दाखवली असती तर घरच्यांनी लग्न रद्द केलं असतं.’’ पण ती बोललीच नाही. इथे सियाने गृहीत धरलं का की ते ‘नाही’ म्हणणार?
- भावनांना शब्द देता येत नाहीत ? ‘असुरक्षित वाटणं’, ‘भावनिक नातं न जुळणं’ या भावनांना नावच नसतं आपल्याकडे. सियाला केतनचा विग आवडत नव्हता, पण फक्त तेवढंच कारण नसावं. आणखी काहीतरी खटकत होतं, जे तिला शब्दात मांडता आलं नाही. अशा वेळी स्वत:लाच वाटतं, ‘‘मी उगाच नखरे करतेय का? मग अशावेळी ती गप्प बसते का़?’’
हत्या ‘सोपी’ कशी वाटली असावी?
- काय असेल त्यामागची मानसिकता? खून एका दिवसात होत नाही. त्याला ‘सोपा’ बनवलं जातं. हळूहळू, टप्प्याटप्प्याने माणूस स्वत:ला तयार करतो. त्यासाठी स्वत:ला त्याची सवय लावावी लागते. सिया-चेतनने ३ वेळा लोहगडची रेकी केली असल्याचं कळतं. समाजमाध्यमावर ‘खून कसा करायचा’ याची माहिती ढुंढाळली. २००० पेक्षा जास्त वेळा हा खून फोनवर रचला. पहिल्यांदा १४ जूनला प्रयत्न फसला तेव्हा ‘साप दिसला’ अशी थाप मारली. प्रत्येक वेळी तो ठरवताना अपराधीपणा कमी होत गेला. मेंदूला सवय झाली.
मेंदूचा चुकीचा हिशेब :
सियाला वाटलं असावं- लग्न मोडलं तर? – रोज घरच्यांचे टोमणे, समाजात बदनामी, २-३- वर्षं त्रास. हा ‘रोजचा त्रास’ वाटला. खून केला तर – एकदाच ‘अपघात’ होईल. सगळं संपेल. ‘एकदाच’ सोसावं लागेल. मेंदूने ‘रोजचा मानसिक त्रास’ आणि ‘एकदाच गुन्हा’ यात ‘एकदाच’ हा सोपा मार्ग निवडला. हा हिशेबच चुकला.
माणूस न समजणं : सियासाठी केतन ‘केतन’ राहिलाच नाही. तो लग्न नावाची ‘समस्या’ झाला. ‘टकलू आहे, विग घालतो’ वाला झाला. ‘चेतनशी लग्नातला अडथळा’ झाला. एकदा का समोरच्याला ‘वस्तू’ समजलं की त्याला संपवणं सोपं होतं.
‘आम्ही पकडले जाणारच नाही’ – हा त्यांचा भ्रम असावा. ३ वेळा रेकी केली, हत्येची उत्तम योजना आखली, खोटं बोलायला जमलं. त्यांना वाटलं, ‘आपला ‘प्लान फूलप्रूफ’ आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळेल, आपले कॉल रेकॉर्ड्स मिळतील याचा त्यांनी विचारच बहुधा केला नसावा. हे अविचारी पाऊल आहे, हेच बहुधा त्यांच्या मनात आलं नसावं.
‘काय आवडत नाही’ हेच कळत नसेल तर? मदत घ्यायला दडपण का येतं?- कारण ‘मलाच कळत नाही तर मी दुसर्याला काय सांगू?’ आपली फक्त ‘घुसमट’ होते, पण नेमकं कारण सापडत नाही. मग वाटतं ‘लोक मला ‘गोंधळलेली’ म्हणतील. समोरचा चांगला आहे, घरचे खूश आहेत, मग माझंच काहीतरी चुकतंय का? ही अपराध भावना अधिक गोंधळवू शकते.
अशा वेळी करायचं काय? –
- ‘माहीत नाही’ हे उत्तर देऊ शकतो. ‘मला नेमकं काय होतंय तेच कळत नाहीये,’ असं सांगणं, आणि शांत राहावं.
- ‘तर्कशुद्ध, लॉजिकल कारण’ लागतंच असं नाही. ‘मन न लागणं’ हेसुद्धा पुरेसं कारण आहे नकार देण्यासाठी.
- वेळ मागा – ‘मला विचार करायला वेळ हवा,’ असं सांगण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. किमान ६ महिने थांबा, पण आयुष्यभराचा निर्णय घाईत घेऊ नका.
- व्यावसायिक मदत घ्या – घरात नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याबरोबर बोलून नीट उत्तर मिळत नसेल तर समुपदेशकांची मदत घेता येते. काय चुकतंय? कुठे चुकतंय शोधता तरी येते. एकदम येणारा अविचार आणि त्यामुळे होणारी कृती थांबवण्याची शक्यता निर्माण होते.
निष्कर्ष –
केतन-सिया प्रकरणाने तीन गोष्टी शिकवल्या –
‘काय आवडत नाही’ हे न कळणं हा गुन्हा नाही.
‘नाही’ म्हणणं कठीण असेल, पण हत्या करणे हा पर्याय कधीच असू शकत नाही.
हत्या सोपी नसतेच. तिला सोपी ‘बनवावी’ लागते. अपराधीपणा मारावा लागतो, सहानुभूती मारावी लागते, आणि स्वत:च्या आतला ‘माणूस’ मारावा लागतो. सियाला ‘नाही’ म्हणणं अवघड गेलं कारण तिला शब्द सापडत नव्हते. पण खून करणं ‘सोपं’ वाटलं कारण तिने ३ महिने त्याची तयारी केली होती. म्हणूनच ‘नाही’ म्हणायला शिकणं, नकार पचवायला शिकणं, आणि अडचण आली तर ओरडून मदत मागणं – हे लहानपणापासून शिकवायला हवं. कारण एक लग्न मोडलं तर २ कुटुंबं दुखावतात. मात्र अशा प्रकरणात एक खून झाला तर किमान ३ आयुष्यं संपतात – केतन गेला, सीया-चेतन तुरुंगामध्ये राहणार आणि एकदा का खून केला, की मग ‘सॉरी’ म्हणायलाही वाव उरत नाही. इथून माघारी फिरता येत नाही.आणि कदाचित सर्वात महत्त्वाची ठरू शकेल ती तरुणपणाची खोटी धुंदी. ‘एकदा ठरवलंय तर करून टाकू, जो होगा देखा जाएगा.’ ही खोटी समजूत. किंवा थोडा कठोर शब्द, माज. तो असेल तर सगळं सोपं वाटतं, परंतु ते सोपं नसतं. या सर्वांचा अंतिम परिणाम वाईटच असतो. म्हणूनच, कोणाच्याही जिवापेक्षा
मोठं काही नाही.
स्पष्ट बोला. मदत मागा. नाही म्हणा.
25.sharmila@gmail.com
