रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि तेथे जाणे आता तसे नवे राहिलेले नाहीये. दररोज कुठले ना कुठले नवे ठिकाण प्रसिद्धीस येत राहते. आपले वेगळेपण सांगते, लोकप्रिय होते. गर्दी वाढते.. चर्चा होते.. सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळतो, सगळे सवयीचे झाले आहे. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जाऊन ऑर्डर देणे फार काही वेगळे वाटत नाही. मग ते कोपऱ्यावरचे उडपी असो, जेथे एका श्वासात इडली, वडा, सांबार, डोसा, उपमा यांची यादी सांगितली जाते अथवा भरभक्कम मेन्यू असलेले अति उच्चभ्रू ठिकाण असो. दोन्ही ठिकाणी आपण ऐकतो, विचारतो म्हणजे संवाद साधतो. पण कल्पना करा, एखाद्या ठिकाणी कोणाशीही न बोलता, आपल्याला हव्या असलेल्या पदार्थाची व्यवस्थित ऑर्डर घेतली गेलेली आहे आणि उत्कृष्ट सव्‍‌र्हिस मिळालेली आहे. ‘ए सुनो वो शेजवान चिकन जरा पतला करना और जादा तिखा’ किंवा ‘आय वूड लाइक विदाऊट मशरुम प्लीज’ या सूचनांची गरजही पडलेली नाही.

येस.., पवईमधील ‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम रेस्टॉरंट’ मध्ये संवाद न साधता ग्राहकाची ऑर्डर व्यवस्थित घेऊन ती पार पाडली जाते. येथील कर्मचारी श्रवण आणि वाचा या दोन्हीही बाबतीत दिव्यांग आहेत. प्रशांत इसार यांच्या कल्पनेतून हे रेस्टॉरंट उदयाला आले. टोरांटोमधील एका जागेवरून त्यांना ही स्फूर्ती मिळाली. अर्थात नुसते मनात येणे आणि अशी कल्पना प्रत्यक्षात उतरवणे सोपे नव्हते. एक तर हॉटेल व्यवसाय.. जेथे रोज शेकडो ग्राहक येणार. मेन्यू जरी असला तरी त्यात काहीतरी बदल सुचवणार.. क्वचित पदार्थ त्यांच्या अपेक्षेला उतरला नाही तर वाद होणार. हॉटेलच्या व्यवसायात हे रोजचेच असते. तरीही प्रशांत इसारने ही जोखीम पत्करून फक्त दिव्यांगांनाच कामावर रुजू करून घेतले.

या कर्मचाऱ्यांना डॉक्टर रेड्डी यांच्या संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले गेले आणि ‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम’ सुरू झाले. आणि बघता बघता इतके लोकप्रिय झाले की आज तेथे आगाऊ नोंदणी केल्याशिवाय जाता येत नाही. मग नक्की याचे काम चालते कसे? अनेकदा एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर ‘हमको चाय मे चीनी नको’ हे ठणाणा करून सांगितले तरीही साखरेचा चहा आदळला जातो. मात्र इथे कुठलाही गोंधळ, वाद न होता व्यवस्थित ऑर्डर घेतली जाते आणि आणली जाते. यात ‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम’च्या मेन्यू कार्डने फार मोठी भूमिका बजावलेली आहे. मेन्यू कार्ड अत्यंत व्यवस्थित आखलं गेल आहे. प्रत्येक डिश/ पदार्थ हात आणि बोटांनी (खुणांनी) कसा ऑर्डर करावा हे तपशिलवार दिले आहे.. म्हणजे कोणताही ग्राहक आपल्याला पनीर तंदूर हवे की तवा फ्राय हे पटकन सांगू शकतो.. कोणताही गोंधळ न होता. ‘मदिरा आणि माईम’ येथे कॉकटेल्स, मॉकटेल्स आणि अल्कोहोलिक पेयं दिली जातात. येथेही मेन्यू अत्यंत चोख आहे आणि कर्मचारी कुशल. व्हिस्कीत सोडा हवा की बर्फ, वोडकामध्ये लिम्का हवा की लिंबू हे सुद्धा सांगता येते. इथली व्यवस्था पाहिली की, आपण गरज नसताना किती बडबड करतो याची जाणीव प्रकर्षांने होते हे मात्र सत्य!

‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम’ तसे मोठे रेस्टॉरंट, पण त्याच्या तुलनेने छोटेसे कँटीन चालवणारी आदिती वर्मासुद्धा तोडीस तोड आहे. ‘डाऊन स्रिडोम’ असलेल्या आदितीला स्वयंपूर्ण करण्याच्या ध्यासातून तिच्या पालकांनी ‘आदिती कॅफे’ हा उद्योग काढून दिला आणि आज आदिती तो अत्यंत यशस्वी तऱ्हेने सांभाळतेय. फोनवरून ऑर्डर घेणे, ती पूर्ण करणे, स्वयंपाकघरात चोख नजर ठेवणे, स्टॉक चेक करणे, हिशोब ठेवणे, ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, दुसऱ्या दिवशीची तयारी करणे, सगळे काम आदिती व्यवस्थित करते. भूमी मॉल, बेलापूर येथील आदितीचा हा छोटेखानी कॅफे आजूबाजूच्या परिसरात आणि ऑफिसात भरपूर लोकप्रिय झालेला आहे. सुरुवातीला लोक साशंक होते की ऑर्डर व्यवस्थित घेतली जाईल की नाही. हिशेब मिळेल का? पण आदितीने सर्व कसोटय़ा पार केल्या. तिची आई रिना वर्मा म्हणाल्या की, ‘‘आधी हिशेब ठेवायला, देखरेख करायला आम्ही यायचो. पण आदितीने हळूहळू सगळे आत्मसात केले आणि आता ती एकटी हा व्यवसाय सांभाळतेय. स्वयंपाकघरात दोन मदतनीस आहेत. पण व्यवस्थापन पूर्णपणे आदितीचे. तिच्याशी बोलताना एक यशस्वी उद्योजिका पूर्णपणे जाणवत होती.

असाच आत्मविश्वास यश चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’च्या दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये जाणवला. डॉ. सुषमा नगरकर अमेरिकेमधून आपल्या लेकीसोबत भारतात परत आल्या त्याच दिव्यांगाच्या क्षेत्रात काही काम करावे या ऊर्जेने. दिव्यांग आरतीची पालक म्हणून त्यांना तिला एक सर्वसामान्य आयुष्य द्यायचे होते. कोणाचीही दया अथवा सहानुभूती न घेता. त्या दृष्टीने विचार करता करता, टिफीन देण्याची कल्पना सुचली आणि त्यातून  ‘अर्पण डबा सेवा’ वा टिफीन सव्‍‌र्हिस सुरू झाली. अशहिता महाजन या ‘यश ट्रस्ट ’आणि ‘अर्पण’सोबत सुरुवातीपासून जोडल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘सुषमा नगरकर यांनी या टिफीन सव्‍‌र्हिसबद्दल फक्त वॉटस्अ‍ॅपवर मॅसेज पाठवला आणि बघता बघता भरभरून प्रतिसाद मिळाला.

जवळपास १० दिव्यांग कर्मचारी येथे आहेत. साधारण नऊ-साडेनऊला त्यांचा दिवस सुरू होतो. भाज्या धुणे, चिरणे, मसाले काढून ठेवणे, तयारी करणे आणि शेवटी डबे व्यवस्थित भरणे ही कामे ते करतात. शाकाहारी आणि मांसाहारी असे स्वतंत्र डबे जवळपास ५० लोकांना रोज पुरवले जातात.

दिव्यांगांना योग्य प्रशिक्षण दिले गेले आणि ही मुले आता सर्व व्यवसाय व्यवस्थित सांभाळत आहेत. जुहू आणि आसपासच्या परिसरात ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’ लोकप्रिय झालेली आहे. आणि पुढे वाढवण्याचाही विचार आहे,’’ असे अशहिताने आवर्जून नमूद केले. सध्या ‘यश ट्रस्ट’ मोठय़ा जागेच्या शोधात आहे आणि ती मिळाली की हेल्थ फूड, ज्यूस, स्मूदी, फास्ट फूड सेंटर सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्याची छोटी जागा  असल्यामुळे मागणी असूनही व्यवसाय वाढवता येत नाही.

चर्नी रोड येथील गजबजलेल्या परिसरात असणाऱ्या ‘बॉम्बे हवेली’च्या मर्झी पारेख यांच्या मते दिव्यांग कर्मचारी हे कुठल्याही बाबतीत कमी नसतात. मर्झी पारेख, पार्थ दलाल आणि सार्थक ओझा या तिघांच्या कल्पनेतून साकारलेले हे रेस्टॉरंट खवय्यांना संतुष्ट करतानाच दिव्यांगांना स्वाभिमानाने जगण्याची संधी देत आहे.

मर्झी पारेखना दिव्यांगाच्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव होता त्यामुळे यात उडी घेतली गेली. त्यांच्या मते योग्य व्यावसायिक प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असते. आज ‘बॉम्बे हवेली’त जवळपास पूर्ण कार्यभार मूकबधिर आणि अपंग असणारे दिव्यांग कर्मचारी सांभाळत आहेत आणि कोठेही कसलाही गोंधळ होत नाही. किंबहुना मर्झीच्या मते दिव्यांगांना प्रशिक्षण देणे अधिक सोपे असते आणि त्यांची काम करण्याची ऊर्जा तेवढीच प्रबळ. ‘बॉम्बे हवेली’त फक्त फोनवरून बुकिंग घेण्यासाठी असलेला कर्मचारी वगळता स्वंयपाकघरातील सर्व जबाबदारी, ऑर्डर घेणे, ती पूर्ण करणे आणि बाकीची जी कामे पडतील ती दिव्यांग कर्मचारी अत्यंत कार्यक्षम पद्धतीने सांभाळताना आढळतील. ‘बॉम्बे हवेली’त पारशी आणि गुजराती प्रकारचे जेवण दिले जाते. खरं सांगायचे तर सुरुवातीला काही सेकंद अवघडलेला ग्राहक कायमचा इथला ग्राहक होतो. हे मर्झीचे निरीक्षण आहे.

दिल्ली, मुंबई, चंदिगड, चेन्नई अशा ठिकाणी अनेक रेस्टॉरंट, फास्ट फूड सेंटर अनेक दिव्यांग कर्मचारी समर्थपणे सांभाळताना आढळतील. मग ती पास्त्याची ऑर्डर असो वा कॅफे लॅटेची.. भाजी-चपातीचा डबा असो अथवा व्हिस्की सोअरची फर्माईश.. ही ठिकाणे चवदार खाणे-पिणे पुरवतातच पण त्याहून अधिक म्हणजे समाजामधील एका घटकाला आर्थिकदृष्टय़ा  स्वावलंबी करतात. अरेरे, बिचारे अशा नजरेने बघितले जाणारे दिव्यांग ऑर्डर घेणे, डबे भरणे, हिशोब ठेवणे यांसारखी कामे सहजपणे आणि चोख पार पाडतात. अन्य रेस्टॉरंट इतकीच किंबहुना अधिक गर्दी अशा ठिकाणी असते. ‘मिर्ची आणि माईम’मध्ये तर वेटिंग लिस्ट असते. गंमत म्हणजे येणाऱ्या ग्राहकांचे फेव्हरेट कर्मचारीसुद्धा आहेत. ज्यांना ग्राहकाला काय हवे हे पूर्ण माहीत असते. मस्त जेवल्यानंतर भरघोस टिपसुद्धा दिली जाते. जी अत्यंत प्रामाणिकपणे सर्वाच्यात समान विभागली जाते. ‘आदिती कॅफे’मध्ये ठरावीक डबे असतातच पण माऊथ पब्लिसिटीमुळे ग्राहक वाढतात. आदितीला हळूहळू छोटय़ा पाटर्य़ा, घरगुती समारंभ अशा तऱ्हेने व्यवसायाचा विस्तार करायचा आहे आणि तिला दिव्यांगांनाच या व्यवसायात सामावून घ्यायचे आहे.

अर्थात क्वचित काही विचित्र ग्राहक येतात, पण त्यांना कशा तऱ्हेने हाताळायचे हे मर्झीला आणि प्रशांतला पूर्ण माहिती झालेले आहे. असे अपवाद वगळता आतापर्यंत ग्राहकांचे उत्तम पाठबळ मिळालेले आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. महत्त्वाचे हे होते की दिव्यांग कर्मचाऱ्यांबद्दल त्यांना असलेला विश्वास. ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’मध्ये या मुलांना एक दोनदा डबे कसे भरायचे हे दाखवले गेल्यावर त्यांच्याकडून चुका अपवादानेच झाल्या. टिफिन सव्‍‌र्हिसमध्ये महत्त्वाचे असते ते वेळेचे गणित. डिलिव्हरी देणारा माणूस यायच्या आत डबे व्यवस्थित भरून तयार ठेवणे हे इथे बिनबोभाट पार पाडले जाते. कुठलाही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, सर्व काम अत्यंत शांतपणे एका लयीत चाललेले आढळेल. ‘बॉम्बे हवेली’चं स्वंयपाकघर असो अथवा ‘मिर्ची आणि माईम’चा गजबजलेला हॉल, ‘अर्पण टिफीन सेवा’ असो किंवा आदितीचा कॅफे. ठरवूनही शोधले तरी काहीही चूक आढळत नाही.

दिव्यांग कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या व्यवसायात सामावून घेण्याची कल्पना ही जगभरात अनेक ठिकाणी रुजली आहे. दिल्ली, चंदिगड, हैदराबाद, चेन्नई येथे अनेक कॅफे यशस्वी झालेले आहेत. दिव्यांग कर्मचारी हा फक्त हॉटेलला लोकप्रिय करण्याची क्लृप्ती नसून दिव्यांगांवर दाखविल्या गेलेल्या विश्वासाचे एक गमक आहे. हळूहळू ही संकल्पना भारतभर रुजत आहे. अशा ठिकाणी गेल्यावर खाण्यापिण्यासोबत एक वेगळे समाधान ग्राहकाला नक्की मिळते हे सत्य!

शुभा प्रभू साटम

shubhaprabhusatam@gmail.com