मैदानी खेळ हे पुरुषांसाठी असतात हे गृहीतक बदलून आज अनेक स्त्रिया वेगवेगळ्या खेळांत यशस्वी होत आपल्या देशाचे नाव उंचावत आहेत. जिल्ह्यासाठी, राज्यासाठी आणि पुढे जाऊन देशासाठी खेळणार्‍या अनेक यांना आता सामान्य लोकांचा पर्यायाने कुटुंबीयांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. कारण खेळाने त्यांना नाव, प्रतिष्ठा आणि पैसाही दिला. काहींना तर नोकरीही दिली. याबरोबरीने खेळामुळे नेतृत्वगुण, संघभावना, स्वयंशिस्त असे अनेक गुण विकसित होत असतात. म्हणूनच मुलींना लहानपणापासूनच खेळाचे धडे द्यायला हवेत.

मणिपूरचा एक अशांत विभाग. कोवळ्या वयात वडिलांचे छत्र हरवलेली सरितादेवी अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकणार होती… तरुण वयानुसार तिच्या अंगभूत लढाऊवृत्तीला हेरून, भूलथापा देऊन सरितादेवीवर समाजकंटकांनी शस्त्रास्त्रे वाहून नेण्याचे नाजूक काम सोपवले, पण ते लक्षात आल्यावर सरितादेवीचा भाऊ ढालीसारखा तिच्यामागे उभा राहिला. ‘‘तुझी लढाऊवृत्ती समाजकंटकांसाठी वापरण्याऐवजी देशासाठी पदके मिळवण्यासाठी खेळाच्या मैदानात वापर.’’ असं म्हणत त्याने सरितादेवीला खेळासाठी प्रवृत्त केलं. असा फक्त सल्ला देऊन न थांबता सरितादेवीला ‘बॉक्सिंग’सारख्या आव्हानात्मक खेळाने झपाटून टाकेपर्यंत त्याने तिचं मन यशस्वीरीत्या वळवलं. पुढे जाऊन सरितादेवीने अथक परिश्रम घेतले आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत ‘अर्जुन’ पुरस्कार मिळवला. त्यानंतर तिने तिच्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाला आधार देणारी मणिपूर पोलीस खात्यातील नोकरीदेखील क्रीडानैपुण्यावर प्राप्त केली. कधीकाळी अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकू शकणारी एक स्त्री खेळावरील प्रेमामुळे पोलीस खात्यात गेली. खेळामुळे फक्त एका व्यक्तीला नाही, तर संपूर्ण समाजाला कसा फायदा होतो याचं हे एक ठळक उदाहरण!

अनेक भारतीय स्त्री खेळाडूंनी फक्त पदकेच जिंकली नाहीत, तर संपूर्ण भारतीय समाजाचा यांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करण्यास फार मोठा हातभार लावला आहे. बहुतांशी सर्वसामान्य घरांतून आलेल्या या स्त्री खेळाडूंनी आपली चिकाटी, शिस्त आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती या गुणांच्या जोरावर ‘लालफिती’चा कारभार आणि सामाजिक अडथळे कसे पार करावे याचा एक आदर्श घालून दिला आहे. २०१६ मध्ये हरियाणासारख्या पुरुषप्रधान संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍या राज्यात साक्षी मलिकने भारतासाठी ‘ऑलिम्पिक’मध्ये पदक मिळवणारी पहिली स्त्री कुस्तीपटू होण्याचा मान मिळवला. या घटनेमुळे हरियाणातील अनेक लहान मुली ‘मर्दानी’ समजल्या जाणार्‍या या खेळांकडे आकृष्ट झाल्या आणि तेथील समाजानेसुद्धा त्याचा स्वीकार केला. बॉक्सिंगसारखा शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक खेळ भारतात मेरी कोमने एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवला. मातृत्वानंतर अशा प्रकारचा खेळ खेळणं कठीण असतं ही सामाजिक दृष्टी मेरीने बदलून टाकली. आई झाल्यावर तिने ‘ऑलिम्पिक’मध्ये कांस्यपदक, ‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धे’त सुवर्णपदक, ‘आशियाई’ आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक अशी देदीप्यमान कामगिरी केली. मातृत्वानंतरसुद्धा कामगिरीत एवढं सातत्य राखता येऊ शकतं हे तिने स्त्री खेळाडूंना आणि समाजाला दाखवून दिलं.

दिव्यांग खेळाडूंच्या यशामुळे अपंगत्वावर धैर्याने, कौशल्याने विजय मिळवण्याचा एक नवा मार्ग समाजाला सापडला. दिव्यांग लोकांनी नुसती शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी नव्हे, तर जीवनात मानसिक उभारी घेण्यासाठीसुद्धा एक उपचार म्हणून खेळाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ‘पॅरालिंपिक गेम्स’मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवणारी स्त्री खेळाडू दीपा मलिक ही आपल्या आयुष्यातील घटनांवर प्रोत्साहनपर भाषणे देऊन सभा गाजवत असते. क्रीडाक्षेत्र आता ‘केवळ गंमत म्हणून खेळणं’ या पुरतं मर्यादित न राहता अनेक यांसाठी करिअर करण्याचं साधन झालं आहे. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये भारतीय संघात स्थान मिळवलेली शेफाली वर्मा या बदलाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. यांची ‘प्रीमियर लीग’सारखी साखळी स्पर्धा खेळाला व्यावसायिक स्वरूप देते. स्त्री खेळाडूंनी मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशामुळे त्यांच्याकडे बघण्याचा प्रसिद्धी माध्यमांचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला आहे. २००० मध्ये ‘वेटलिफ्टिंग’ मध्ये कर्णम मल्लेश्वरी ‘ऑलिम्पिक’ पदक जिंकणारी पहिली भारतीय स्त्री खेळाडू ठरली. आता आश्चर्य वाटेल, पण तेव्हा तिच्या त्या कांस्य पदक जिंकण्याच्या ऐतिहासिक कामगिरीचं ‘दूरदर्शन’वरून थेट प्रक्षेपणसुद्धा झालं नव्हतं. त्याऐवजी दाखवलं जात होतं, पुरुषांच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हॉकी सामन्याचे पुन:प्रक्षेपण! कदाचित, एक स्त्री खेळाडू भारतासाठी ‘ऑलिम्पिक’ पदक जिंकू शकते ही शक्यताच तेव्हा कोणाच्या लक्षात आली नसेल. आताच्या काळात यात बदल होऊन जवळपास सर्व प्रमुख स्त्री खेळाडूंचे महत्त्वाचे सामने थेट प्रक्षेपित केले जातात. यांच्या क्रिकेट सामन्यांना तर खूप मोठं प्रायोजकत्व आणि प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो.

व्यावसायिक पातळीपेक्षा प्रत्यक्ष खेळातील सहभाग हा यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरला आहे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती बरोबर आत्मविश्वास, सांघिक भावना, नेतृत्व गुण अशा अनेक गोष्टी आत्मसात करायला सोप्या ठरतात. भारतातील पहिल्या स्त्री पोलीस अधिकारी होण्याचा मान मिळवलेल्या किरण बेदी म्हणतात, ‘‘खेळाने मला मानसिक कणखरपणा आणि चिकाटी या दोन देणग्या दिल्या.’’ तिहार तुरुंगात धडाडीने काम करत सकारात्मक बदल घडवून आणणार्‍या किरण बेदी यांना या कामाबद्दल मानाचा ‘मॅगसेसे’ पुरस्कार मिळाला होता. पुद्दुचेरी (पूर्वीचं पॉन्डेचरी)च्या राज्यपाल राहिलेल्या किरण तरुण वयात उत्कृष्ट टेनिसपटू होत्या. त्यांनी राष्ट्रीय मानांकन ज्युनिअर टेनिस स्पर्धेत मुलींचे आणि यांचे अजिंक्यपद प्राप्त केले होते.

काही स्त्री खेळाडू खेळाबरोबरच शैक्षणिक अभ्यासालासुद्धा तितकेच महत्त्व देतात. भारतीय यांच्या क्रिकेट संघात चमकदार कामगिरी करणारी शिखा पांडे ही त्यापैकी एक गुणी खेळाडू आहे. भारतीय वायू सेनेत ‘स्क्वाड्रन लीडर’ या पदापर्यंत ती पोचली आहे. खेळासाठी कराव्या लागणार्‍या प्रवासाचा, विविध माणसं जवळून पाहण्याच्या अनुभवाचा फायदा खेळाडूंना अनेक प्रकारे घेता येतो. कवी मोरोपंत यांनी आपल्या प्रसिद्ध सुभाषितात म्हटलंच आहे, ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार.’ हे चातुर्य काही स्त्री खेळाडूंनी चक्क राजकारण प्रवेशासाठी वापरले आहे. पी.टी.उषा, मेरी कोम यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून काम केले आहे. फोगट भगिनी, कृष्णा पुनिया, दीपा मलिक, सायना नेहवाल, नफिसा अली अशा अनेक भारतीय स्त्री खेळाडूंनी विविध राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. जागतिक पटलावर पाहिले तर जुडी मार्ट्झ (स्केटिंग) ही अमेरिकेच्या मोन्टाना राज्याची पहिली स्त्री गव्हर्नर होती. नोव्हा पेरीस (हॉकी व ॲथलेटिक्स) ऑस्ट्रेलियाच्या ‘सिनेट’ची सदस्य होती. व्हिक्टोरिया स्मिलिट ही बुद्धिबळात ‘ग्रँडमास्टर’ किताबाची मानकरी आहे आणि अनेक वर्षे लिथुएनिया या देशाच्या राजकारणात तिने सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या ‘सीएमास’ (Seimas) म्हणून ओळखल्या जाणार्‍या संसदेची अध्यक्ष म्हणूनसुद्धा तिने काम केले आहे. पूर्वीची यांची बुद्धिबळ विश्वविजेती ॲन्टोनेटा स्टेफानोव्हा हिने बल्गेरियाच्या संसदेची सदस्य म्हणून काम केले आहे.

बुद्धिबळामुळे एकाग्रता, नियोजन, अभ्यासू वृत्ती, चिकाटी असे अनेक गुण विकसित होतात. त्याचा फायदा पूर्वीची यांची बुद्धिबळ विश्वविजेती चीनची हू यिफान हिला शैक्षणिक क्षेत्रात घेता आला. हू यिफानला अत्यंत प्रतिष्ठित अशी ‘र्‍होड्स’ शिष्यवृत्ती मिळाली होती. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी शेन्झेन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झालेली हू यिफान तिथली आतापर्यंतची सर्वात तरुण प्राध्यापक होती. प्रसिद्ध उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांनी आपल्या थोरल्या मुलीला लहानपणी बुद्धिबळाचे धडे गिरवायचा सल्ला दिला होता. बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवून, पुढे यशस्वी उद्योजक बनलेल्या अनन्या बिर्ला हिला हे धडे नक्कीच उपयोगी पडले. आघाडीच्या अनेक स्त्री टेनिस खेळाडू त्यांचे पैसे व्यवसायात गुंतवून त्याचे कुशल व्यवस्थापन करताना आढळतात. मारिया शारापोव्हा हिने चॉकलेट व गोळ्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याचे नावसुद्धा मोठे कल्पक ‘शुगरपोव्हा’ असं दिलं आहे. सेरेना व व्हीनस या विल्यम्स भगिनी टेनिस प्रमाणेच अनेक व्यवसायात लक्ष घालतात. दोघींचेही वेगवेगळे अत्याधुनिक फॅशनच्या कपड्यांचे ब्रँड आहेत.

खेळातून मिळालेले यश, पैसा आणि कौशल्य समाजासाठी वापरायचा अनेक स्त्री खेळाडूंचा प्रयत्न असतो. सेरेना व व्हीनस दोघी मिळून एक आगळावेगळा उपक्रम अमेरिकेतील कॉम्पटन येथे राबवीत असतात. तेथे या दोघींनी त्यांची सावत्र बहीण येटुंडा प्राईस हिच्या नावे एक सेवाभावी संस्था काढली आहे. येटुंडा प्राइस ही विल्यम्स भगिनींची खासगी सचिव म्हणून काम पाहत असे. तिघी बहिणींचे संबंध खूप जवळचे होते. कॉम्पटन येथे झालेल्या एका टोळीयुद्धातील गोळीबारात येटुंडाचा निष्कारण बळी गेला. मृत्यूसमयी केवळ ३१ वर्षाची असलेल्या येटुंडा प्राइसच्या स्मरणार्थ तिच्यासारख्या हिंसात्मक घटनांमध्ये भरडल्या गेलेल्या अभागी जिवांच्या मदतीसाठी ही सेवाभावी संस्था काम करते. ‘पॅरालिंपिक गेम्स’मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवणारी स्त्री खेळाडू दीपा मलिक हिने स्थापन केलेली ‘व्हीलिंग हॅपिनेस फाउंडेशन’ ही संस्था दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सहाय्य करते, तसेच क्रीडा क्षेत्रात यांना तांत्रिक मदत पुरवते. अनेक स्त्री खेळाडूंनी आपला अनुभव क्रीडा संघटना बळकट करण्यासाठी वापरला आहे. पी.टी.उषा, मीराबाई चानू , शुभांगी कुलकर्णी अशा अनेक माजी खेळाडूंचा समावेश या मोठ्या यादीत होईल. काही जणी आपल्या अनुभवाचा फायदा खेळाडूंच्या नवीन पिढीला मार्गदर्शक या नात्याने करून देत आहेत.

स्त्री खेळाडूंना खेळाने खूप काही दिलं आहे. स्वत:ची वेगळी ओळख, वैयक्तिक स्वातंत्र्याची अनुभूती आणि प्रचंड मानसिक समाधानदेखील! ही शिदोरी घेऊन आयुष्य जगताना बहुतेकींचे त्यांच्या खेळावरील प्रेम शेवटपर्यंत टिकते. इतके, की स्पर्धात्मक खेळ खेळण्याचे वय उलटून गेले तरी बर्‍याच स्त्री खेळाडू गंमत म्हणून, मानसिक गरज म्हणून तर कधी निव्वळ सवय सुटत नाही म्हणून आपल्या खेळाशी निगडित राहताना दिसतात. तरुण वयात व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग लावण्यापेक्षा मुलींना लहानपणापासून एखादा खेळ खेळण्यास उद्युक्त केले तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला खूप मदत होईल. पुढे आयुष्यभर त्यांना स्वत:चे असे खेळाशी निगडित जग निर्माण होईल. आधुनिक काळातील यांसाठी खेळ हे एक अनमोल लेणे ठरेल यात शंका नाही.

gokhale.anupama@gmail.com