पोलंडमध्ये जर्मन गेस्टापोंची (नाझी जर्मनीची गुप्त पोलीस संघटना) गस्त सुरू होती. ‘तिच्या’कडे त्यांच्याविरुद्धची अति महत्त्वाची कागदपत्रं होती. जराशी जरी चूक झाली असती तर फक्त तीच नाही तर तिचे सगळे साथीदार पकडले गेले असते. ती लपतछपत ठरलेल्या ठिकाणी पोहोचली आणि सांकेतिक भाषेतील मजकूर तिच्यापर्यंत पोहोचला. ‘तीन दिवसांत ‘कार्पेथियन’ पर्वत रांगांमधून शस्त्रसाठा पोचवण्यात येईल.’

निरोप मिळाला आणि तिचं विचारचक्र जोरात सुरू झालं, ‘‘तीन दिवसांत? नाही! ही वेळ चुकीची ठरेल. अचानक इकडे खूप जर्मन सैनिक जमले आहेत. पोलंडमध्ये नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याचं काम सुरू आहे. इथं मोठ्या संख्येने गेस्टापो आहेत. सगळीकडे अति सावधतेचे इशारे दिलेले असताना आपली माणसं बर्फाळ प्रदेश पार करूच शकणार नाहीत. मला काही तरी करायला हवं. त्यांना थोपवून धरायला हवं…’’ क्षणार्धात या सर्व शक्यतांचा विचार करून तिनं स्वत:ची पूर्ण तयारी केली.

‘स्कीइंग’मध्ये अत्यंत तरबेज असणारी ती टेट्रा पर्वताच्या टोकावरून निघाली. तिनं तिच्या कपड्यात नकाशे, कागदपत्र आणि मायक्रोफोन लपवले. तापमान शून्याच्या खाली, वादळी बर्फवृष्टी, एका बाजूला दरी आणि समोरचं काही दिसत नाही अशी गत, पण तिनं हातातल्या काठीनं पायाखालच्या बर्फाला जोरदार हिसका दिला आणि वेगानं स्कीइंग करत निघाली. तिला ‘पोलंड हंगेरी’ सीमारेषा ओलांडायची होती.

सीमेवरील तपास छावणी चुकवून दुसर्या खडतर मार्गावरून पुढे जायचं होतं. शिवाय मधल्या टप्प्यात स्वत:ला एक ‘साधी खेळाडू’ असल्याचं भासवत जायचं होतं. प्रचंड वादळी वातावरणात तिनं ते अंतर विक्रमी वेळेत कापून आपल्या गुप्तहेरांना सावध केलं आणि भरपूर माहिती पुरवली. तिनं ही हंगेरी आणि पोलंडची सीमारेषा अशा अवघड मार्गानं एकदाच नाही तर अनेक वेळा पार केली होती.

एकदा अशीच वेळ आली. १९४१मध्ये पोलंड पूर्ण जर्मनीच्या नियंत्रणाखाली होता. पोलंडमध्ये ‘प्रतिकार’ चळवळीनं जोर पकडलेला होता. अशा वेळी जर्मन गेस्टापोंनी एका नवीन ठिकाणी मोठा तळ उभारायचं ठरवलं. तेव्हा त्यांचे अड्डे, शस्त्र साठा आणि पुढील संभाव्य योजनांची माहिती घेऊन तिला त्याच बर्फाळ पर्वतराजीतून सीमा ओलांडायची होती. ती आणि तिचा एक साथीदार स्कीइंग करत निघाले, पण यावेळी त्यांचा अंदाज चुकला. ती गेस्टापोंच्या तावडीत सापडली.

क्रूर गेस्टापोंच्या तावडीत सापडणे म्हणजे साक्षात मृत्यू! पण ती होती, तीक्ष्ण बुद्धीची निडर गुप्तहेर. पकडल्या क्षणापासून तिनं पूर्ण ताकदीनं खोकायला सुरुवात केली. त्या काळात क्षय हा जीवघेणा संसर्गजन्य आजार होता. डॉक्टरांना बोलावण्यात आलं. तोपर्यंत तिनं आपली जीभ कचकचून चावून तोंडात रक्त जमा केलं आणि डॉक्टरांसमोर खोकून खोकून तोंडातून रक्त काढलं. त्याबरोबर सगळे घाबरले. वरिष्ठांकडून आदेश आला – तिला सोडून द्या. त्यानुसार तिला सोडण्यात आलं. काय जबरदस्त धाडस असेल ते! अविश्वसनीय धैर्य! कोण होती ती तरुणी? त्या होत्या, ब्रिटनच्या गुप्त संस्थेतील म्हणजे एस.ओ.ई.च्या

(Special Operations Executive) प्रथम महिला गुप्तहेर- क्रिस्टिना स्कारबेक. त्यांना क्रिस्टिना ग्रॅनविल या नावानेही ओळखलं जातं.

क्रिस्टिना यांचा जन्म १ मे १९०८ ला पोलंडमधील वॉर्सा इथं सधन आणि पुरोगामी कुटुंबात झाला. बालपणीच त्या घोडेस्वारी आणि स्कीइंगमध्ये तरबेज झाल्या होत्या. त्या काळाच्या गरजेनुसार त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट झाली. त्यांनी आईच्या मदतीसाठी छोट्यामोठ्या नोकर्या केल्या. १९३० मध्ये त्या ‘मिस पोलोनिया’ सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, कारण त्या अत्यंत देखण्या, रुपवती होत्या. त्याच वर्षी ‘पोलिश’ व्यावसायिक गुस्ताव गेटलीच यांच्याशी त्यांची मैत्री झाली आणि ते विवाहबद्ध झाले. त्यामुळे पोलंडमधील उच्चस्तरीय वर्तुळात त्यांचा वावर सुरू झाला. मोठ्या अधिकार्यांशी ओळख झाली, ज्याचा त्यांना पुढे फायदा झाला.

जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि पोलंड जर्मनांच्या ताब्यात जाऊ लागलं त्याकाळात त्या त्यांच्या पतीसमवेत इंग्लंडला होत्या. त्यांना स्वस्थ बसणं शक्य नव्हतं. एक ‘निर्वासित’ म्हणून जगणं अजिबात मान्य नव्हतं. त्यांनी ब्रिटिश गुप्तहेर संस्थेशी (एस.ओ. ई) संपर्क केला. त्यांना येणार्या पोलिश, फ्रेंच, इंग्रजी भाषा आणि तिथल्या पर्वतराजीबद्दल असणारी सखोल माहिती यामुळं त्यांची एस.ओ.ईमध्ये एक ‘पोलिश गुप्तहेर’ म्हणून निवड करण्यात आली. ‘चर्चिल स्कूल ऑफ स्पाइज’मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं. त्यावेळी अचानक हल्ला करून शत्रूचा गळा चिरण्यात त्या पारंगत झाल्या होत्या. असं म्हणतात की, त्यांच्यावर खुद्द विन्स्टन चर्चिल यांचा फार विश्वास होता.

त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजनांमध्ये सहभाग घेतला. एक कुशल निरोप्या म्हणून त्यांनी अनेकदा धोका पत्करला. ‘पोलंड प्रतिकार चळवळी’ला वैमानिकांची गरज होती. युद्धात भाग घेतल्यानंतर जे वाचले अशा अनेक प्रशिक्षित वैमानिकांना क्रिस्टिना यांनी भूमिगत होण्यास मदत केली. कालांतराने अत्यंत गुप्तपणे त्यांना पोलंडमध्ये शिरकाव करण्यास मदत केली.

१९४४ मध्ये दुसरं महायुद्ध अंतिम चरणात होतं. शत्रू आणि मित्र राष्ट्र अशा दोन्हीही बाजूंचे बरेच सैनिक आणि गुप्तहेर हे विरुद्ध बाजूच्या राष्ट्रांच्या तावडीत सापडण्याचा तो काळ. क्रिस्टिना या पॅराशूटद्वारे इंग्लंडवरून फ्रान्समधील जंगली भागात उतरल्या होत्या. लवकरच त्यांनी एका छोट्या सदनिकेत स्वत:ची सोय करवून घेतली. (त्यांचे एक एक कारनामे वाचले की अचंबित व्हायला होतं… खरंच! )

मध्यरात्रीच्या सुमारास क्रिस्टिना यांच्या घराच्या खिडकीवर ओळखीची सांकेतिक टकटक झाली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी खिडकीच्या फटीतून येणारी अत्यंत बारीक चिठ्ठी ताब्यात घेतली आणि त्वरित वाचली.

निरोप होता, ‘दोन अति महत्त्वाच्या इंग्रज गुप्तहेरांना फाशीच्या शिक्षेपासून वाचवायचे आहे.’ क्रिस्टिना यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या मदतीला येतील असे कुणी सहकारी उरले नव्हते. सकाळी त्या दक्षिण फ्रान्समधील डिग्ने भागात पोहचल्या. गेस्टापोंनी तिथल्या कारागृहात तीनही ब्रिटिश हेरांना ठेवलं होतं. क्रिस्टिना यांचे धाडस इतके की त्या सरळ जर्मन कमांडरकडे गेल्या. ‘‘मी क्रिस्टिना, इंग्रजी राजवटीसाठी हेरगिरी करते. युद्ध संपत आलंय आणि मित्र राष्ट्रांची सरशी होतेय. लवकरच ती सेना या भागात शिरेल. बघा, युद्धानंतर तुमच्या खास कामगिरीसाठी मी तुमची पूर्ण शिफारस करू शकते. तुमच्या बाजूने साक्षसुद्धा देईन, माझ्या मोठ्या अधिकार्यांशी ओळखी आहेत.’’ त्यांनी कमालीच्या आत्मविश्वासानं तीन-चार नावं सांगितली.

‘‘इतकी मेहरबानी कशासाठी?’’ कमांडरने विचारलं.

‘‘माझ्या सहकार्यांची सुखरूप सुटका,’’ त्या ठामपणे म्हणाल्या. हे एक भयंकर धाडस होतं. त्यांनाही ताब्यात घेतलं जाऊ शकत होतं, पण तो जर्मन कमांडर त्याच्या स्वत:च्या बढतीसाठी चक्क तयार झाला आणि दोन्ही गुप्तहेरांची सुटका झाली. तेव्हा या निधड्या छातीच्या वीरांगनेवर त्यांच्या देशाला केवढा गर्व वाटला होता. त्यासाठी त्यांना १९४७ मध्ये ‘युनायटेड किंगडम’तर्फे ‘जॉर्ज मेडल’ ने सन्मानित करण्यात आलं.

‘फ्रेंच प्रतिरोध चळवळी’त अनेकदा जिवाची बाजी लावल्याबद्दल त्यांना फ्रान्सचा ‘क्रॉइक्स डी ग्युरे’ (croix de Guerre) हा सन्मान देण्यात आला. पोलंड सरकारतर्फे अत्यंत मानाचा ‘पोलिश क्रॉस ऑफ वेल्लोर’ हा बहुमान मिळाला. याव्यतिरिक्त मित्र राष्ट्रांचे अनेक सन्मान त्यांना लाभले. ब्रिटिश दूरचित्रवाणीवर दुसर्या महायुद्धातील सत्य घटना आणि व्यक्तिरेखांवर एक मालिका प्रसारित झाली होती. ‘विश मी लक’ या इंग्रजी मालिकेत क्रिस्टिना यांच्यावर एक खास भाग प्रसारित करण्यात आला होता.

आपल्या देशासाठी आयुष्य धोक्यात घातलेल्या या बेधडक गुप्तहेरास नंतर मात्र वाईट काळ बघावा लागावा, ही अत्यंत दुर्दैवाची बाब. १९४५मध्ये त्या कैरो इथे असताना त्यांना सुरक्षेच्या कारणांसाठी स्थानबद्ध करण्यात आलं होतं, पण त्यानंतर त्या पुन्हा सक्रिय हेरगिरीकडे वळल्या नाही. तोपर्यंत त्यांचं पंधरा वर्षांचं वैवाहिक आयुष्यही संपुष्टात आलं होतं आणि त्या एकट्या पडल्या होत्या. त्यावेळी त्यांना अर्थार्जनासाठी जे मिळेल ते काम करावं लागलं.

युद्ध समाप्तीनंतर क्रिस्टिना एका जहाजावर परिचारिका म्हणून काम करत असताना त्यांची ओळख डेनिस मेल्डोनी यांच्याशी झाली. मेल्डोनी यांच्या एकतर्फी प्रेमाला त्यांनी नकार दिला, पण माथेफिरू मेल्डोनीनं त्यांचा सगळीकडं पाठलाग सुरू केला. १५ जून १९५२ रोजी क्रिस्टिना लंडन इथल्या शेलबॉर्न हॉटेलमध्ये मुक्कामी असताना हॉटेलच्या लॉबी परिसरात मेल्डोनीनं हल्ला करून त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यात क्रिस्टिना यांचा मृत्यू झाला.

संपूर्ण युद्धात धुमश्चक्रीत स्वत:ला आपल्या चातुर्य आणि हुशारीनं वाचवणार्या क्रिस्टिना यांचा युद्धानंतर शांत वातावरणात असा मृत्यू झाला. डेनिस मेल्डोनीला फाशीची शिक्षा झाली, पण जगानं मात्र एक असामान्य बुद्धिमान व्यक्तिमत्त्व कायमचं गमावलं.

गुप्तहेर क्रिस्टिना स्कारबेक यांंना १९४७ मध्ये ‘युनायटेड किंगडम’तर्फे ‘जॉर्ज मेडल’ ने सन्मानित करण्यात आलं.तर ‘फ्रेंच प्रतिरोध चळवळी’त अनेकदा जिवाची बाजी लावल्याबद्दल त्यांना फ्रान्सचा ‘क्रॉइक्स डी ग्युरे’(croix de Guerre) हा सन्मान देण्यात आला. पोलंड सरकारतर्फे अत्यंत मानाचा ‘पोलिश क्रॉस ऑफ वेल्लोर’ हा बहुमानही त्यांना मिळाला. याव्यतिरिक्त मित्र राष्ट्रांचे अनेक सन्मान त्यांना लाभले. ब्रिटिश दूरचित्रवाणीवर दुसर्या महायुद्धातील सत्य घटना आणि व्यक्तिरेखांवर एक मालिका प्रसारित झाली होती. ‘विश मी लक’ या इंग्रजी मालिकेत क्रिस्टिना यांच्यावर एक खास भाग प्रसारित करण्यात आला होता. त्यातून क्रिस्टिना यांच्या अविश्वसनीय आयुष्याचा परिचय लोकांना झाला.

‘वाचक पत्र’ तुमच्यासाठी

‘चतुरंग’ ने यंदाही तुमच्यासाठी वाचनाचा भरघोस ठेवा आणला आहे. विविध कंगोरे मांडणारे वेगवेगळे विषय, नामवंतांचे अनुभव, त्यांच्या मुलाखती या सगळ्यांमुळे तुमच्याही विचारांत, अनुभवांत नक्कीच भर पडत असेलच. काय आहे तुमचा अनुभव या सदरांविषयी आणि पान १ वरच्या लेखांविषयी. आम्हाला नक्की कळवत राहा. ‘पडसाद’ हे सदर याचसाठी आहे.

तुम्ही मोकळेपणाने आम्हाला कळवू शकता तुमची मते. अगदी मतभेदही मुक्तपणे नोंदवा. ठोस विचार मांडणारी पत्रे नक्कीच प्रसिद्ध केली जातील. फक्त आणि फक्त मराठीमध्ये पाठवलेलीच पत्रे प्रसिद्ध केली जातील. ई-मेल करताना सब्जेक्टमध्ये ‘चतुरंग वाचक पत्र’ असा उल्लेख करावा.

आमचा पत्ता – ई एल १३८, टीटीसी इंड्ट्रिरयल एरिया, महापे, नवी मुंबई – ४००७१० किंवा chaturang@expressindia.com अथवा chaturang.loksatta@gmail.com यापैकी फक्त एकाच ई-मेलवर पाठवावीत.

uadaparnadeshpande@gmail.com