‘‘अमोलला दिग्दर्शनासाठी मिळालेल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची -‘आगंतुकचीचित्तरकथा घडून वर्ष लोटलं होतं. या काळात जरी त्याला अनेक चित्रपटांत नायकाच्या भूमिका मिळाल्या तरी दिग्दर्शनाची संधी पुन्हा चालून आली नव्हती. आणि एके दिवशी अमोलने सांगितलं, ‘‘आज डॉ. राही मासूम रझासाहेब भेटले. त्यांच्या कथेवरफूटपाथनामक चित्रपट बनवायचं चाललंय. मी काम दिग्दर्शन दोन्ही करेन का, असं विचारत होते.’’ मी आनंदाने जोरात आरोळी ठोकणार एवढय़ात तो म्हणाला..  स्वप्न आणि वास्तव या लेखांचा उत्तरार्ध

माझ्या आयुष्यात अनेक छान छान गोष्टी घडल्या त्या १९७८ मध्ये. छोटय़ा शाल्मलीबरोबर मी व अमोल प्रथमच परदेशी भटकून आलो. स्वत:चं घर घेण्याचा निर्णय आम्ही पक्का केला. ज्येष्ठ नाटय़कर्मी दामू केंकरेंनी आमच्या ‘अनिकेत’ संस्थेसाठी दिलीप कुलकर्णी व आम्हा दोघांना घेऊन मनोहर काटदरे लिखित ‘आपलं बुवा असं आहे’ हे (तोवर आम्ही केलेल्या कट्टर प्रायोगिक नाटकांहून अतिशय वेगळं) नाटक बसवलं, जे साधंसुधं, गोड व विनोदी असल्याने खूप खूप लोकांनी पाहिलं. त्या नाटकाच्या निमित्ताने माझी दामूशी गट्टी जमली व अभिनयातले, त्यातूनही संवादफेकीतले अनेक बारकावे शिकायला मिळाले. शिवाय, लग्नात चित्रा मुर्डेश्वरमधून अनुया पालेकर असं नामांतर झालेली मी त्या वर्षी पुन्हा अधिकृतरीत्या चित्रा पालेकर झाले आणि ‘आपलं बुवा..’पासून याच नावाने ओळखली जाऊ  लागले.

त्याच वर्षी हृषीकेश मुखर्जीनी अमोलला घेऊन ‘गोलमाल’ चित्रपट केला. चित्रीकरणाच्या वेळी हृषिदांच्या आग्रहावरून मी व शाल्मलीने त्यांच्या बंगल्यावर मजेत वेळ घालवल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीविषयी माझ्या मनात वर्षांनुर्वष असलेली अढी बरीचशी कमी झाली. असे आनंदात दिवस जात असताना एक गोष्ट तेवढी मला खुपत राहिली. अमोलला दिग्दर्शनासाठी मिळालेल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची -‘आगंतुक’ची – चित्तरकथा घडून वर्ष लोटलं होतं. या काळात जरी त्याला अनेक चित्रपटांत नायकाच्या भूमिका मिळाल्या तरी दिग्दर्शनाची संधी पुन्हा चालून आली नव्हती.

मग एक दिवस ज्या गोष्टीची मी वर्षभर आतुरतेने वाट पाहात होते, ती घडली. कथा, कादंबरीकार डॉ. राही मासूम रझांचे संवाद असलेल्या कुठल्याशा चित्रपटाच्या चित्रीकरणावरून परतल्यावर अमोलनं सांगितलं, ‘‘आज राहीसाहेब भेटले. त्यांच्या कथेवर ‘फूटपाथ’ नामक चित्रपट बनवायचं चाललंय. मी काम व दिग्दर्शन दोन्ही करेन का, असं विचारत होते.’’ मी आनंदानं जोरात आरोळी ठोकणार एवढय़ात तो म्हणाला, ‘‘कथा झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांची आहे.. वास्तवदर्शी.. पण त्यात स्टार्स, गाणी वगैरे गोष्टी असाव्या लागतील. निर्मात्यांना लोकांपर्यंत पोचणारा चित्रपट पाहिजे..’’ ते शब्द ऐकल्यावर अमोलच्या सुरात आनंदाबरोबरच चिंता का डोकावत होती, याचा मला उलगडा झाला.

आपण कशा पद्धतीचा चित्रपट बनवावा, यावर आम्ही दोघांनी पूर्वीपासून आपसात अनेकदा चर्चा केली होती. कधी दोघांच्या कल्पना जुळत, कधी मतं वेगळी असल्यास स्वत:चे विचार दुसऱ्याला पटवण्यासाठी आम्ही हिरिरीने वाद घालत असू. पण धंदेवाईक, साचेबद्ध चित्रपट मुळीच बनवायचा नाही, आणि ‘वेगळे’ चित्रपट बनवणाऱ्या (सत्यजीत राय ते मणी कौलपर्यंत) कुठल्याही दिग्दर्शकाची नक्कल न करता चांगला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करायचा, याविषयी आमचं नेहमी एकमत असे. ‘आगंतुक’च्या वेळी, तो चित्रपट आमच्या विचारांशी मिळताजुळताच असल्यामुळे, तात्त्विक चर्चेची गरज भासली नव्हती. पण आता राहीसाहेबांच्या प्रस्तावाला होकार देण्यापूर्वी नीट विचार करणं आवश्यक होतं. दोन दिवस आम्ही सर्व बाजूंनी उलटसुलट विचार केला. बिमल रॉय, गुरुदत्त यांची उदाहरणं डोळ्यांसमोर ठेवून ‘निव्वळ गाणी नसण्याने अथवा स्टार्स न घेण्याने चांगला चित्रपट बनत नाही.. मूळ आशय, पटकथाकाराचा व दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, तसंच सर्व घटकांचा अनुरूप व उत्तम वापर यावर चित्रपटाचा दर्जा अवलंबून असतो’ हे एकमेकांना पुन:पुन्हा पटवलं. अखेर अमोलने होकार कळवला.

राहीसाहेबांच्या आग्रहावरून मी अमोलबरोबर वांद्रा येथील त्यांच्या घरी पोचले. त्या वेळी नजरेत भरलेलं दृश्य अजून आठवतं. हवेशीर, मोकळी खोली.. पूर्ण जमीनभर लाल गालीचा पसरलेला.. समोरच्या भिंतीजवळ भल्याथोरल्या लोडाला टेकून पांढऱ्याशुभ्र पेहरावात राहीसाहेब बसलेले.. सभोवार पुस्तकांचे गठ्ठे, वह्य़ा, कागद.. बाजूला लखनवी पद्धतीची तंबाखूची पिशवी, पानाचा डबा, पिंकदाणी.. दुसऱ्या बाजूला ट्रेवर चहाची किटली व इतर सरंजाम.. सर्व वस्तू चांदीच्या.. चकचकीत.. सुरेख नक्षीकाम असलेल्या.. आणि समोर नवाबी थाटाला साजणारा, बोलक्या राघूचा पिंजरा!! राहीसाहेबांनी स्वत: तयार करून आम्हाला चहा पाजला. मला चहा मुळीच आवडत नाही, हे सांगू न शकल्यामुळे मी तो सुरेख असल्याचा अभिनय करत कसाबसा प्यायले. पुढे एकदा ते जुहूला आमच्या घरी अचानक आले. तोवर आमची छान ओळख झाली असल्याने ‘‘मला चहा बरा बनवता येत नाही. कॉफी आणू का?’’ असं मी विचारल्यावर त्यांनी मला झापलं व चहाचं साहित्य आणायला सांगून तो चांगला कसा बनवावा, याचं प्रात्यक्षिकही दिलं (अर्थात मला अजून तो जमत नाही, ते सोडा!) .

राहीसाहेबांच्या साहित्याची मला ओळख नव्हती. पण त्यांच्याशी गप्पा-चर्चा झाल्यावर ‘फूटपाथ’ चित्रपट तडजोडीशिवाय बनेल, याची मला खात्री पटली. कथेत एक गरीब तरुण, त्याच्यावर प्रेम करणारी वेश्या आणि तिथला दादा ही मुख्य पात्रं होती. दादाच्या भूमिकेसाठी अमजद खानशी व वेश्येच्या भूमिकेसाठी रामेश्वरीशी करार झाले. अमोल स्वत: तरुणाच्या भूमिकेत होता. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे संगीत जयदेवजींचंच असावं, हा अमोलचा आग्रह निर्मात्यानं मान्य केला. जयदेवजींनी संगीतबद्ध केलेली ‘मोरे नैना..’ व ‘मेहलोमें आयी पेहली बार..’ अशी दोन गाणी आशाताईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली.. हिंदी चित्रपटाला साजेशा भल्या मोठय़ा वाद्यवृंदासह! वास्तविक त्याआधी मी बऱ्याच गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाला हजर राहिले होते, पण निव्वळ नायकाची पत्नी या नात्याने! आता मी केवळ दिग्दर्शकाची पत्नीच नाही, त्याची प्रमुख साहाय्यकदेखील होते.. चित्रपटनिर्मितीच्या प्रत्येक घटकात हक्काने सहभागी होऊ  शकणारी! पूर्वी नुसत्या लांबून दृष्टीस पडलेल्या अनेक गोष्टी जवळून निरखणं, तंत्रज्ञांच्या चर्चा ऐकणं, प्रश्न विचारणं, त्यातून निर्मितीप्रक्रियेविषयी जमेल तितकं शिकण्याचा प्रयत्न करणं हे सर्व आता शक्य होतं.

गोरेगावच्या चित्रनगरीत खुल्या जागी चित्रीकरणासाठी वस्ती उभारण्यात आली. तिथे अमजद आणि रामेश्वरीची काही दृश्यं, तसंच एक गाणं चित्रित करायचं ठरलं. चित्रीकरणापूर्वी दिग्दर्शन-साहाय्याचे बरेच धडे अमोलने मला दिले होते, तरीही मोठमोठे तंत्रज्ञ, स्टार्स यांच्याबरोबर काम करण्याच्या कल्पनेने छातीत धडकी भरली. मी ‘भाभीजी’ असल्यामुळे माझ्या हातून एखादी चूक घडल्यास इतर साहाय्यकांवर ओरडतात तसं माझ्यावर कोणी ओरडणार नाही, याची मला खात्री होती. पण त्याचबरोबर, माझ्या चुकीमुळे अमोलची लाज जाईल ही चिंताही होती. आपण अननुभवी, शिकाऊ  साहाय्यक आहोत, हे सतत ध्यानात ठेवून, आगाऊपणा न करता विनम्रपणे पडेल ते काम करून आपलं ‘भाभीजी’पण सर्वाना विसरायला लावायचं; सगळ्यांशी जवळीक साधायची, असं मनाशी पक्कं ठरवून मी कामाला लागले. अमजद, रामेश्वरीच्या उत्कृष्ट सहकार्यामुळे चित्रनगरीतलं काम व्यवस्थित पार पडलं. ‘मेहलोमें आयी..’ हे गाणं दोन टप्प्यांत रामेश्वरीवर चित्रित झालं. चित्रपट एकदाचा मार्गाला लागला आणि मुख्य म्हणजे, माझ्या हातून कामात (फारशा) चुका झाल्या नाहीत यामुळे माझा जीव भांडय़ात पडला. चित्रीकरणाच्या दरम्यान रामेश्वरीशी माझी चांगली मैत्री जमली; अमजदला जवळून भेटल्यावर तो किती हुशार, विनम्र माणूस व उत्तम अभिनेता आहे हे पाहिलं आणि मुख्य धारेतल्या सरसकट सर्व नट-नटय़ांविषयी सतत नाक वर करून ताशेरे मारल्याबद्दल मनातल्या मनात मी खूपच शरमले.

निर्माता तोवरच्या कामावर फार खूष होता. ‘फूटपाथ’ची दोन्ही गाणी अतिशय सुरेख बनली होती. आम्ही ती घरी आलेल्या प्रत्येकाला अभिमानाने ऐकवत होतो. ‘मोरे नैना..’ या लोरीची रचना तर आशाताईंना इतकी आवडली की त्यांनी त्या गाण्याची टेप मुद्दाम मागवून घेतली. अमजदने आपण दोन्ही गाणी सतत ऐकत असल्याचं सांगितलं. आणि अचानक एक दिवस निर्मात्याने ठरवलं की दोन्ही गाणी रद्द करायची व जयदेवजींना काढून टाकून त्यांच्याऐवजी दुसऱ्या संगीत दिग्दर्शकाला घ्यायचं! त्याच्या सल्लागारांना (व कुटुंबीयांना) गाणी पसंत नव्हती. त्यांना उडत्या चालीची गाणी हवी होती. अमोलला व मला फारच मोठा धक्का बसला. जयदेवजींसारख्या थोर संगीत दिग्दर्शकाचा असा अपमान करायचा? इतकी अप्रतिम गाणी, त्यांचं चित्रीकरण आपण स्वत:च नष्ट करायचं? संगीतकार अथवा गाणी बदलण्यास अमोलने सपशेल नकार दिला. निर्माता अडून बसल्यामुळे राहीसाहेबांचा समझोत्याचा प्रयत्नही फसला. अखेर अमोलने स्वत:हूनच चित्रपट सोडला. अमजदला हे कळल्यावर तो अतिशय वैतागला. ‘‘अमोल दिग्दर्शक होता, म्हणून मी होकार दिला. तो नसेल तर हा चित्रपट करण्यात मला रस नाही,’’ असं सांगून तोदेखील बाहेर पडला. ‘फूटपाथ’चं पुढे काय झालं, मला ठाऊक नाही. पण अजून वाटतं, जयदेवजींच्या त्या उत्कृष्ट रचना रसिकांपर्यंत पोचायल्या हव्या होत्या..

पहिल्या दोन चित्रपटांना जरी निरनिराळ्या प्रकारांनी वास्तवाची झळ लागली तरी स्वप्नाची कास आम्ही सोडली नाही. त्यातून, मी आता निव्वळ प्रेक्षक उरले नव्हते. चित्रपटनिर्मितीत प्रत्यक्ष सहभागी झाल्यामुळे मला त्या प्रक्रियेची चटक लागली होती. हे व्यसन सहजासहजी सुटण्याजोगं नव्हतं!!

चित्रा पालेकर

chaturang@expressindia.com