सारिका कंदलगांवकर
एका स्त्रीला तिच्या कुटुंबाचा आधार मिळाला तर ती जग जिंकू शकते, असं म्हणतात… वर्षानुवर्षं सुरू असलेल्या रूढी-परंपरा डावलून भावकीच्या विरोधात आपल्या सुनेसाठी ठाम भूमिका घेणारी कुटुंबं म्हणूनच वेगळी ठरतात. आयुष्याच्या अत्यंत कठीण काळात मिळालेली सासरची साथ या स्त्रिया मनाच्या कप्प्यात जपून ठेवतात आणि या कुटुंबांचे बंध आयुष्यभरासाठी घट्ट होत जातात… सुमेधा आणि तिच्या कुटुंबाची कथा असाच आदर्श ठेवणारी…
‘‘हॅपी बर्थ डे टू यू…
हॅपी बर्थ डे टू डिअर अंश… हॅपी बर्थ डे टू यू.’’ सगळे एका सुरात गात होते. अचानक सगळ्यांचा मोठा आवाज ऐकून घाबरलेला अंश आपल्या आईला, सुमेधाला खेटून बसला. पण हळूहळू त्यातली गंमत अंशला समजत गेली आणि तो या सगळ्याची मजा घेऊ लागला. सुमेधानं आजूबाजूला बघितलं. तिच्या नवर्याने, अनयने खूपच मोठा घाट घातला होता लेकाच्या पहिल्या वाढदिवसाचा. तिच्या माहेरच्यांना आणि अनयच्याही सगळ्या कुटुंबीयांना त्याने आग्रहानं बोलावलं होतं. दोघांचा मित्रपरिवार तर होताच. खरं तर सुमेधा कुरकुरत होतीच, कशाला एवढं करायचं म्हणून? पण आज सगळे लांबलांबून तिच्या बाळासाठी आले आहेत म्हटल्यावर तिला त्याचं कौतुकच वाटलं. संध्याकाळ झाली तसा वाढदिवसाचा समारंभ रंगतच गेला. लहान मुलांच्या खेळात मोठेच जास्त उत्साहानं रमले. नंतर सुरू झालेल्या त्यांच्या गप्पा, धमाल आणि खूप सारे फोटो…या सगळ्याला कोणाची दृष्ट लागू नये… असं वाटून गेलं सुमेधाला.
पण… ती लागलीच बहुधा. रात्री झोपताना अनय थोडा थकल्यासारखा वाटत होता. छातीत जळजळ होतेय, असं म्हणत होता. सगळ्यांसमोर तिला त्याच्याशी जास्त बोलता येत नव्हतं. तिने ॲसिडिटी झाली असावी असं समजून अनयला दूध प्यायला दिलं. सकाळी तो उठला तोच छातीत दुखतंय सांगत…‘‘ब्रश करून घे. गोळी देते.’’ असं म्हणत ती वळली, तोच अनय कोसळला. गावावरून आलेल्या मोठ्या दिराने प्रसंगावधान दाखवून तातडीने डॉक्टरांना बोलावलं आणि ज्याची भीती होती तेच झालं होतं. ‘‘ही इज नो मोर…’’ हे डॉक्टरांचे शब्द सुमेधाच्या कानावर पडले आणि ती बेशुद्धच पडली.
शुद्धीवर आली तेव्हा समोर अनयचा निर्जीव देह पडला होता. तिचं जगच उलटंपालटं झालं होतं. घरात सगळे नातेवाईक होतेच. कोणासाठी थांबायची गरजच नव्हती. ती भानावर येईपर्यंत अनयच्या अंत्ययात्रेची सगळी तयारी झाली होती. सुमेधा सुन्न चेहर्यानं अनयकडे एकटक पाहत बसली होती. अनयच्या आईचा, बहिणीचा आक्रोश तिच्या कानापर्यंत जात होता, पण मनापर्यंत पोहोचत नव्हता. तितक्यात तिला 4पान २ वरून / अंशचा रडण्याचा आवाज आला. ती भानावर आली. आपलं रोज कौतुक करणारा बाबा असा का झोपलाय? हे न समजून तो रडत होता. इवल्याशा पोरालाही काहीतरी वेगळं आहे ते जाणवलं होतं. त्याला बाबांजवळ जायचं होतं, पण भीतीही वाटत होती. न राहवून त्यानं रडायला सुरुवात केली. ‘‘ कुठून आणून देऊ तुझा बाबा तुला…’’ सुमेधाने अंशला जवळ घेत हंबरडा फोडला. आणि तिच्या रडण्यानं आजूबाजूच्या बायकांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला.
सगळे विधी झाल्यानंतर नातेवाईकांची पांगापांग झाली. सुमेधाच्या आईला तिच्यासमोर यायचा धीर होत नव्हता. पण कुणाच्या तरी आधाराची तिला फार गरज होती. तेवढ्यात कोणीतरी पुटपुटलं… ‘‘तिच्या मंगळसूत्रातला मणी आणि जोडवं दिलं का त्याच्यासोबत? दागिने उतरवले नाहीत का तिचे?’’ त्यासरशी सुमेधाने स्वत:कडे बघितलं. अंगावर असलेले मोजकेच दागिने. तिचा हात गळ्याकडे गेला. तिचं छोटं मंगळसूत्र, जो तिच्या पसंतीचा पहिला दागिना होता. हातातल्या दोन नाजूक बांगड्या. ज्या अनयने स्वत:च्या पगारातून तिच्यासाठी केल्या होत्या. तिच्या जोडव्यांचा आणि पैजणांचा आवाज त्याला फार आवडायचा.
वर्षाला एक तरी नवीन डिझाईनचं जोडवं आणि पैंजण तिला भेट मिळायचंच. तिच्या कपाळावर नेहमीची छोटी टिकली असायची, पण जेव्हा कधी ती चंद्रकोर लावायची तेव्हा वेडा होऊन जायचा तो. पाचच वर्षांचं सहजीवन.. पण दुधातल्या साखरेसारखं मिसळून गेले होते ते एकमेकांच्यात. तो जाताच त्याला आवडणार्या या गोष्टी अंगावरून उतरवायच्या? तिच्या अंगावर शहारा आला. समोरच रडून रडून थकलेल्या सासूबाई बसल्या होत्या. त्या तिच्याकडेच बघत होत्या. या आपल्याला आपले सौभाग्य अलंकार काढायला लावतील की काय?, सुमेधाला भीती वाटली. तिने परत अंशचा आधार घ्यायचा प्रयत्न केला. पण कोणीतरी त्याला घेऊन गेलं होतं. ती तशीच थांबली.. आधार नसलेल्या वेलीसारखी.
रात्री नेहमीसारखा अंश तिच्याजवळ झोपायला आला. आईबाबांशेजारी झोपायची सवय असलेला तो ‘बाबा, बाबा’ हाक मारू लागला. आणि तिच्या नकळत तिला आठवली तिची आणि अनयची लागलेली पैज. अंश पालथा पडायला लागला होता. तोंडाने कसले कसले आवाज काढत होता. याचा पहिला शब्द काय असेल? अनय घरी नसताना ती अंशला ‘आई’ म्हणायला शिकवत होती. पण तो पठ्ठा, अचानक एकदा अनय घरी आल्यावर त्याला बघून ‘‘बाबा’’ म्हणत ओरडला होता. किती आनंद झाला होता त्याला. जिंकलेली पैज पुरेपूर वसूल केली होती त्याने. आठवूनही सुमेधाच्या चेहर्यावर हसू उमटलं. तेवढ्यात सासूबाई ती झोपली का ते बघायला आल्या आणि तिला वास्तवाचं भान आलं. तोंडातला हुंदका तिने उशीत लपवला.
गावी जाणारे सासूसासरे आणि दीर तिथंच राहिले होते. पुढचे विधी कुठे आणि कसे करायचे याची चर्चा सुरू असायची. ती मात्र अंशला घेऊन बेडरूममध्ये बसलेली असायची. थोडी भेदरलेली… थोडी धास्तावलेली. स्वत:चंच घर तिला अनोळखी वाटू लागलं होतं. अनेक माणसं भेटायला येत होती. पण ती आघाडी तिच्या सासरच्या माणसांनी सांभाळली होती. दहावा दिवस उगवला. ज्याच्यासोबत सात जन्म एकत्र राहायचं होतं, त्याच्याशिवाय दहा दिवस जगलो आपण? तिचा विश्वासच बसत नव्हता. ती स्वत:च्याच विचारात असताना थोरल्या जाऊबाई बोलवायला आल्या. विधीसाठी निघायचं होतं. जावंच लागणार होतं.
‘‘आता तरी ते दागिने काढून ठेव.’’ न राहवून जाऊबाई बोलल्याच.
‘‘मग काय? कसं दिसतंय ते?’’ नणंदबाईही बोलल्या. बहुतेक दोघींची आधीच चर्चा झाली असावी.
‘‘तिला जर वाटलं तरच ती काढेल. नाही तर राहू देत. तुम्ही काही सांगायची गरज नाही.’’ सासूबाई ठामपणे म्हणाल्या. तिनं कृतज्ञतेनं सासूबाईंकडे बघितलं. एकमेकींना आधार देत दोघीही विधीच्या ठिकाणी आल्या. कावळा शिवणार नाही, असं वाटत असतानाच कावळा पिंडाला चोच मारून गेला. त्याची कोणतीच इच्छा अपूर्ण राहिली नाही का? या विचारातच ‘दुखवट्या’ची सुरुवात झाली.
दोघांचाही गोतावळा मोठा. त्यामुळे बरीच माणसं जमली होती. सुमेधा अंशला घेऊन एका कोपर्यात बसली होती. दमलेला, रडलेला तो थकून तिच्या कुशीत झोपला होता. मुंडन केलेल्या त्याच्या डोक्यावरून ती हात फिरवत होती. दहा दिवसांपूर्वीच झालेल्या वाढदिवसाच्या दिवशी किती गोंडस दिसत होता तो. या दहा दिवसांत अगदी सुकून गेला होता. आपल्याला आता अंशकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याची सगळी जबाबदारी आता आपली आहे, सुमेधा स्वत:ला समजावत होती.
‘‘दुखवट्याला सुरुवात करायची का?’’ कोणीतरी विचारलं. त्याबरोबरच तिने आजूबाजूला बघितलं. सगळ्यांच्या हातात तिला साड्या दिसल्या. पांढर्या किंवा फिकट रंगाच्या. तिच्या डोळ्यासमोर तिचं लग्न, डोहाळजेवण, अंशचं बारसं… असे सगळे समारंभ उभे राहिले. त्यात लाल, हिरव्या, पिवळ्या अशा गडद, रंगीत साड्या होत्या. आणि आता? सुमेधाला तिची आजी आठवली. सुमेधाचे आजोबा वारले तेव्हा सुमेधा खूप लहान होती. सगळे एका मागोमाग येऊन आजीच्या अंगावर दुखवट्याच्या साड्या घालत होते आणि आजी खूप रडत होती. एवढे कपडे मिळत असताना आजी का रडतेय, हे सुमेधाच्या बालमनाला तेव्हा कळलं नव्हतं. त्याचा अर्थ तिला आज उमगला आणि तिच्या अंगावर शहारा आला. अंशला उचलून इथून कुठेतरी दूर पळून जावं असं तिला वाटलं. तिने आधारासाठी आईला शोधलं.
आई बायकांच्या घोळक्यात रडत बसली होती. तिची नजर तिच्या भावावर पडली. तिचे दीर तिच्या भावाच्या कानात काहीतरी सांगत होते. भाऊ गंभीरपणे मान हलवत होता. ‘पुढे काय?’ हा विचार मान खाली घालून करत असतानाच तिच्या कानावर दिरांचे शब्द पडले. ‘‘आम्ही कोणत्याही प्रकारचा ‘दुखवटा’ स्वीकारणार नाही. तरीही ज्यांना द्यायचाच असेल त्यांनी तो एका बाजूला ठेवावा. हे सगळं महिलाश्रमात देण्यात येईल.’’ हे ऐकून सुमेधाच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली. समोर तिचे वडील, सासरे, दीर, भाऊ सगळेच होते. तिला तिच्या खांद्यावर हात जाणवला. तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या सासूबाई तिला धीर देत होत्या. त्या प्रत्येकांच्या डोळ्यात तिला एकच विश्वास दिसत होता, तो गेला तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत…
usarikakandalgaonkar@gmail.com
