समाजात एकेकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढते आहे. ज्यांना पुरेशा वैद्यकीय सोयी-सुविधा मिळतात ते ज्येष्ठ सहजगत्या नव्वदी गाठतात. अशा वेळी पन्नाशी ते नव्वदी हे चाळीस वर्षांचं ज्येष्ठत्व- तेही जोडीदार निवर्तल्यास एकटय़ाने सांभाळणं अवघड जातं. अशा ज्येष्ठांसाठी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची संकल्पना माधव दामले यांनी मांडली व त्या दृष्टीने पावलं उचलली. त्यांची आता ठाण्यातही शाखा सुरू झाली आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या ज्येष्ठांसमोरील नव्या पर्यायाविषयी..

समाजसेवेच्या आवडीतून माधव दामले यांनी पुण्यात वधूवर सूचक मंडळ सुरू केलं. त्यानंतर वाई येथे वृद्धाश्रम सुरू केला. या वृद्धाश्रमांत सुखवस्तू, पण एकटी राहणारी अनेक ज्येष्ठ स्त्री-पुरुष मंडळी होती. दामलेंनी पुढाकार घेऊन तिथे राहणाऱ्या एका माजी प्राचार्याचं तिथल्याच एका ज्येष्ठ भगिनीशी लग्न ठरवलं. वारंवार सांगूनही प्राचार्यानी मुलांना विश्वासात घेतलं नाही व ऐन लग्नात मुलांनी खूप गोंधळ घातला. घाबरून प्राचार्यानी तिथून पळ काढला व त्या ज्येष्ठ स्त्रीला ‘वाऱ्यावर’ सोडलं. दामलेंना याचा फार मोठा धक्का बसला, पण त्या ज्येष्ठ स्त्रीनेच त्यांना समजावलं, ‘हे बघा, तुमचा हेतू व कार्य खूप चांगलं आहे, ते सोडू नका. पण एक लक्षात ठेवा, वेळ आली तर पुरुष असे पाठ फिरवून निघून जातात. माझं सोडा. मी सांभाळेन स्वत:ला, पण इथून पुढे अशी लग्नं जमवताना सर्वार्थाने पुरुष सक्षम व ठाम आहे का, ते तपासा व त्यानंतरच पुढची पावलं उचला.’
त्या एका प्रसंगाने ज्येष्ठांच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या संकल्पनेवर आधारित कार्याची सुरुवात झाली. पुण्यात जम बसवल्यावर आता ठाण्यात त्याची शाखा सुरू झाली आहे. आज समाजात वृद्धांची संख्या वाढती आहे. ज्यांना पुरेशा वैद्यकीय सोयी-सुविधा मिळत आहेत ते सहजगत्या नव्वदी गाठतात. अशा वेळी पन्नाशी ते नव्वदी हे चाळीस वर्षांचं ज्येष्ठत्व- तेही जोडीदार निवर्तल्यास एकटय़ाने सांभाळणं अवघड जातं. वाढत्या वयात एक एक नाती संपत चालली असताना नव्या नात्याचा ज्येष्ठांनी विचार केला तर कुठे बिघडलं, या विचारधारेतून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची संकल्पना आकाराला आली.
माधव दामलेंनी पुण्यात हे काम सुरू करताना अनेक चर्चासत्रांचं आयोजन केलं. त्यांत तीनशे लोकांनी भाग घेतला व सत्तर टक्के लोकांनी या संकल्पनेचा स्वीकार केला. ठाण्याचे संस्थाचालक संतोष बुटाला यांनी सांगितलं, ‘ज्येष्ठांनी आधी ‘लिव्हिंग इन’मध्ये एकत्र एका घरात वा स्वतंत्र राहावं. एकमेकांचे विचार, मतं, आवडीनिवडी जाणून घ्याव्या. एकत्र फिरावं. नाटक-सिनेमा, सहलीला जावं. जर त्यांना जाणवलं की आपले सूर छान जुळतायत व आपलं सहजीवन सुखाचं होईल तरच वर्ष-सहा महिन्यांनी त्यांनी विवाहाचा निर्णय घ्यावा. अर्थात ज्येष्ठांनी हा निर्णय फार चिकित्सा न करता, जोडीदाराचा गुणदोषांसकट स्वीकार केला व योग्य वेळी घेतला तर त्यांचं उत्तर आयुष्य सुखासमाधानात व्यतीत होईल हे निश्चित!’
ज्येष्ठांच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मंडळाची कार्यपद्धती समजावून देताना माधव दामले सांगतात, ‘ज्येष्ठांची एकमेकांशी प्राथमिक ओळख व्हावी यासाठी आम्ही महिन्यातून एकदा एक सभा घेतो. त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाची विश्वासार्हता तपासून पाहण्यासाठी त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेतो. त्यानंतर त्यांना मुलाखतीला बोलवलं जातं. त्यातून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक क्षमतेची पूर्ण माहिती घेतली जाते. त्यातून त्यांना जोडीदाराची खरंच गरज आहे की अन्य काही, ते कळतं. या मुलाखतीतून दिलेल्या माहितीची गोपनीयता राखली जाते. तसेच त्यांच्याकडून एक वैद्यकीय फॉर्म भरून घेतला जातो. त्यात त्यांच्या व्याधी व त्यावरील उपचारांची नोंद असते. त्यानंतरच त्यांना संस्थेचा सभासद करून घेतलं जातं. एकटेपणाचा बाऊ न करता ज्यांचा प्रवाहाविरुद्ध जाण्याचा विचार पक्का आहे, अशा ज्येष्ठ स्त्री-पुरुषांना मदत करण्यास संस्था कटिबद्ध आहे.’ अर्थात सुरुवातीच्या गटांच्या संमेलनात कोणीही एकमेकांना आपला पत्ता व फोन नंबर देऊ नये. दिल्यास संस्था जबाबदार नाही अशी स्पष्ट सूचना दामले देतात. कारण एकटय़ा राहणाऱ्या स्त्रियांचे फोन नंबर मिळवून पुढे त्यांना दिवसरात्र फोन करून हैराण करण्याचे प्रकार घडलेले आहेत. अशा एका ज्येष्ठाला नातवंडांसोबत खेळत असताना पोलिसांनी चतुर्भुज करून नेलं. असं झाल्यास समाजात व कुटुंबात आपल्यावर किती नामुष्की ओढवेल याचा ज्येष्ठांनी अवश्य विचार करावा. दामले सांगतात, ‘इच्छुक स्त्री-पुरुषांची यादी करून एकमेकांना अनुरूप असे पंधरा ज्येष्ठ पुरुष व पंधरा स्त्रियांचा आम्ही गट करतो. आम्ही सगळे मिळून नाटक-सिनेमाला व सहलींना जातो. त्यांतून त्यांची ओळख वाढते व काही दिवसांनी आम्हाला फोन येतो, आमचं उभयतांचं जमलंय. पेढे घेऊन कधी येऊ?’
‘लिव्हिंग इन’मध्ये राहायला सुरुवात करण्यापूर्वी एक करारपत्र केलं जातं. त्यात अनेक तरतुदी व अटी घालता येतात. उदा. आम्ही शारीरिक संबंध ठेवू/ ठेवणार नाही, वगैरे. या अटींचं उल्लंघन झाल्यास कोणीही एकजण हा करार मोडू शकतो. त्या संकल्पनेला आता कायद्याने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ‘लिव्हिंग इन’मध्ये राहताना व पुढेही त्याचं विवाहात रूपांतर करताना सर्व संभाव्य धोके टाळून अनुभवी नजरेने सर्व शक्यता तपासून शांतपणे निर्णय घेतला तर ज्येष्ठांना पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाही. या मार्गाने जाऊन सुखी सहजीवन कसं व्यतीत करता येतं याचं एक बोलकं उदाहरण म्हणजे, कुलकर्णी व शिंदे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असलेलं हे आनंदी जोडपं. कुलकर्णी सांगतात, ‘माझी पत्नी गेली आणि मी सैरभैर झालो. चार महिने मला जेवणखाणं सुचत नव्हतं. घरात बसवत नव्हतं. काही सुचत नव्हतं. शेवटी मी या संस्थेच्या चालकांना भेटलो. दोन महिन्यांनी त्यांनी मला शिंदेंचा फोन नंबर दिला व त्यांना भेटण्यास सांगितलं. त्यांचेही यजमान गेले होते व त्या एकटय़ाच राहत होत्या. दोन महिन्यांनंतर आम्ही हा नातेसंबंध स्वीकारला. संसार म्हटला की, भांडय़ाला भांडं लागतंच, पण जमवून घ्यायची मनाची तयारी असेल तर काहीच अडचण येत नाही. शिंदेंनी त्यांची बाजू मांडली. मी सरकारी नोकरीत होते. यजमान गेले आणि एकटेपणाने मला गिळून टाकलं. अहो, किती वेळ टी.व्ही. बघणार आणि पुस्तकं वाचणार? शेजारणी, मैत्रिणींना त्यांचे संसार असतात. वेळ घालवायला कुठं जाणार? शेवटी आठवणी जपून ठेवायच्या असतात, पण त्यावर जगता नाही येत. भूतकाळात आपण जगू शकत नाही. वर्तमानाचा विचार करावाच लागतो ना! मी हा निर्णय घेतला आणि दोन्ही मुले, सुना, भाऊ-वहिनी यांच्याबरोबर एक बैठक घेतली, पण दुर्दैवाने मला कोणीही पाठिंबा दिला नाही. उलट मुलं म्हणाली, तुला लग्नाची काय गरज? वेळ पडली तर आम्ही धावत येऊ.. अगदी अध्र्या रात्री! मला मान्य आहे की, आपल्या जन्मदात्यांच्या जागी मुलं दुसऱ्यांना नाही स्वीकारू शकत, पण मला खात्री आहे की हळूहळू मुलांचं मतपरिवर्तन होईल. मात्र आम्ही मनात असूनही लग्नाचा निर्णय घेऊ शकत नाही. तसं केल्यास माझी पेन्शन बंद होईल. आमचं आर्थिक स्थैर्य हिरावून घेण्याचा सरकारला काय अधिकार?
या नातेसंबंधांना सर्वात मोठा विरोध मुलांकडून होतो. ते साथ देत नाहीत. याचं प्रमुख कारण आपल्या माता-पित्यांच्या स्थावरजंगम मालमत्तेपासून आपण वंचित होऊ ही त्यांच्या मनातील भीती; परंतु ही भीती अनाठायी आहे. ज्येष्ठांनी मुलांचा विरोध गृहीत धरून त्यांच्याशी संयमाने विचार-विनिमय करावा, पण तरीही त्यांचा विरोध मावळला नाही तर संस्थाचालक मुलांचं मन वळविण्याचा अवश्य प्रयत्न करतात.
‘लिव्हिंग इन रिलेशनशिप’ या संकल्पनेला स्त्रियांचा प्रतिसाद तुलनेने कमी आहे. त्याबद्दल बोलताना ठाणे शाखेच्या प्रमुख शुभांगी धबडगाव म्हणतात, ‘स्त्रियांच्या मते, पुरुष अहंकारी असतात. या वयातही तडजोडीची अपेक्षा स्त्रीकडूनच केली जाते. त्यामुळे आयुष्यभर पती, मुलं, सासू-सासरे यांचं करून थकलेल्या स्त्रीला उत्तर आयुष्यात मिळालेलं स्वातंत्र्य पुन्हा गमावून टाकण्यात स्वारस्य नसतं. पुरुषांना मुळातच घरकामाची सवय व आवड नसते. त्यामुळे या वयात नव्या जोडीदाराकडून त्यांनी तशीच अपेक्षा ठेवली तर आतासुद्धा आम्ही ‘रांधा वाढा उष्टी काढा’ यात आयुष्य घालवायचं का, असा बिनतोड सवाल स्त्रिया करतात. शिवाय आजवर सेक्सचा उपभोग घेतलाय. या वयात नवीन जोडीदाराने पुन्हा तीच मागणी केली तर? हीसुद्धा भीती स्त्रियांच्या मनात असते. विशेषत: गृहिणींना भय वाटतं की, मुला-बाळांचा, समाजाचा विरोध पत्करून हे नातं स्वीकारण्याचं धाडस दाखवलं आणि नंतर ज्येष्ठ जोडीदाराने दुर्लक्ष केलं अथवा अध्र्यावर माघार घेतली तर आम्ही कुठं जायचं?’
माधव दामले म्हणतात, ‘आर्थिक पाठबळ नसलेल्या गृहिणीला सुरक्षिततेची हमी मिळावी यासाठी ज्येष्ठ पुरुषांनी त्या स्त्रीची अन्न, वस्त्र, निवारा याची तहहयात सोय करणं व तिच्या नावावर बँकेत काही रक्कम ठेव स्वरूपात ठेवणं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे हळूहळू स्त्रियांचा प्रतिसाद वाढत आहे. बऱ्याच वेळा खुल्या चर्चासत्रांत स्त्रिया नावनोंदणी करीत नाहीत, पण नंतर आमची भेट घेऊन तुम्हीच आमच्यासाठी सुयोग्य जोडीदार शोधा, अशी आम्हाला विनंती करतात. स्त्रियांनी आपल्या नात्यातल्या, ओळखीतल्या इच्छुक स्त्रियांना संस्थेत आणून त्यांच्या मनात ही संकल्पना रुजविण्याचं काम केल्यास समाजातील एकेकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठांना त्याचा फायदाच होईल. शेवटी लिव्हिंग इन रिलेशनशिप या संकल्पनेत निखळ विशुद्ध मैत्री अपेक्षित आहे. ती मित्र-मित्र अथवा मैत्रिणींमध्ये किंवा विरुद्ध लिंगी व्यक्तींमध्येही होऊ शकते.
राधा-कृष्णातील विशुद्ध मैत्रभावाला आपण देवत्व बहाल करतो, तर मग दोन मानवी व्यक्तींमधील अशा निखळ विशुद्ध मैत्रीचा खुल्या मनाने स्वीकार करायला काय हरकत आहे? ल्ल

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
Barty, Sarathi
बार्टी, सारथी, महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात! प्रशिक्षणासाठी आठ खासगी संस्थांची निवड होणार

ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशन मंडळ
पुणे कार्यालय- पहिला मजला, रवी बिल्डिंग, अलका टॉकीजशेजारी, नवी पेठ, पुणे-४११०३०.
ठाणे कार्यालय : न्यू सिद्धिविनायक सोसायटी, मॉडेल बँकेच्या समोर, दगडी शाळेजवळ, चरई, ठाणे.

ईमेल- jeshthliveinrelation@gmail.com
वेबसाइट- http://www.jeshthalivein.com

ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशन मंडळ
१) माधव दामले ८००७१९३३९७
२) संतोष बुटाला ९८२०७७५८७०
३) शुभांगी धबडगाव ९८६९०४४६९६