मग पुरुषांच्या मंदिर प्रवेशाचं काय?

भारतीय संस्कृतीतील स्त्रीची कहाणी म्हणजे एक दीर्घकालीन ‘दुर्दैवाचा फेराच’ म्हणावा लागेल.

Women in Temple Shani Shingnapur,भारतातील स्त्रियां
भारतातील स्त्रियांचा ‘स्वतंत्र विचार’ कित्येक शतके मारून टाकण्यात आलेला आहे.

ज्या मासिक स्रावाला अपवित्र मानलं गेलं, ते स्त्रीचं बीजस्खलन दर महिन्यास होत असतं. तोच नियम लावायचा तर पुरुषाचं बीजस्खलन बारा महिने-चोवीस तास केव्हाही होत असतं. स्त्रीच्या बीजस्खलनाला अपवित्र मानून महिन्यातून चार दिवस तिला मंदिर प्रवेशास बंदी आणायची असेल, तर मग त्याच विचाराने पुरुषाला मंदिर प्रवेशास कायम बारा महिने बंदी घालावी का? शनिशिंगणापूरच्या मंदिरात येत्या मंगळवारी, २६ जानेवारीला काही महिला संघटनांनी मंदिर प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे. त्यानिमित्ताने..

‘देवळात स्त्रियांचा प्रवेश असावा की नसावा’ हा वाद तसा जुनाच आहे. तो चूक की बरोबर हा मुद्दा लढविण्याच्या भानगडीत स्त्रिया पूर्वीपासून कधी पडलेल्या नाहीत. आजही काही अपवादात्मक स्त्री वर्ग सोडला तर बहुसंख्य स्त्रिया याबाबत काही बोलू इच्छित नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. यामागे, बरीच कारणे असू शकतात. पुरुषांनी काहीही म्हणावं आणि स्त्रियांनी त्यास ‘मम’ म्हणत राहावं, हे त्यापैकी एक महत्त्वाचं कारण.

भारतातील स्त्रियांचा ‘स्वतंत्र विचार’ कित्येक शतके मारून टाकण्यात आलेला आहे. तिचे जगण्याचे प्रश्नच इतके परावलंबी आणि म्हणून मुश्कील करून ठेवले आहेत की, आपला मान-सन्मान ही त्यांना तर नेहमीच लांबची गोष्ट वाटत राहिलेली आहे. आधी आपल्या जिवंत राहण्याचे, सुरक्षित असण्याचे उपाय आपण पाहू या, देवळातील प्रवेशाचा मुद्दा नंतर सावकाश पाहता येईल, अशा मनाच्या समजुतीत त्या अजूनही आहेत. सतत अपमान आणि मानहानी, पुरुषांनी गुन्हा केला तरी अपराध आपलाच, अशा खच्ची केलेल्या मानसिकतेत घडलेली ही स्त्री! पुरुषांनीच भीती निर्माण करायची आणि तिला संरक्षण देण्यासाठी पुन्हा पुरुषच नेमायचं, अशा दुधारी अवस्थेत वाढणारी स्त्री पुरुष म्हणतील ते मान्य करण्याशिवाय करणार तरी काय? आणि याचा फायदा सत्तेवरच्या पुरुषांनाच पुन्हा पुन्हा मिळत राहिला आणि अखेरीस स्त्री ही तिच्यात वरवरचे ‘पोशाखी’ बदल आले, बहुसंख्येने तरी मूळ तिथेच राहिली.

भारतीय संस्कृतीतील स्त्रीची कहाणी म्हणजे एक दीर्घकालीन ‘दुर्दैवाचा फेराच’ म्हणावा लागेल. या संस्कृतीत अतिप्राचीन काळी, स्त्री ही सृष्टीतत्त्व, मानवाची निर्माती म्हणून तिच्या जननेंद्रियांचे पूजन होत होते. तिचा मासिक स्राव हा ‘जननक्षम’ म्हणून पवित्र मानला जात होता. आज भारतात त्रावणकोर येथे होणाऱ्या ‘त्रिपुरवत्तू’ या मातृदेवतेच्या उत्सवात देवीच्या मासिक पाळीच्या वस्त्राचे दर्शन घेण्यास झुंबड उडते. त्या वस्त्राच्या स्पर्शासाठी भाविक धडपडतात. तामिळनाडूमध्ये असाच उत्सव आहे आणि ईशान्य भारतातही आहे, जे स्त्रीविषयी प्राचीन भारतात आदर असल्याचे पुरावे आहेत. असा आदर करणाऱ्यांत पुरुषांची संख्याही मोठी आहे. मातृदेवतांची (अविवाहित मातांची) मंदिरेही भारतात जागोजागी आहेत. मग भारतात हे स्त्रीविरोधी वातावरण निर्माण कसं काय झालं, आणि केव्हापासून? बाहेरून जे आक्रमक सुमारे १० हजार वर्षांपासून भारतात घुसू लागले, ते आपल्याबरोबर पुरुष-श्रेष्ठता वाद घेऊन आले. त्यांना या संस्कृतीतील स्त्रीप्रधान कुटुंबव्यवस्था आणि रीतिरिवाजांतून ओसंडणारा स्त्रीचा आदर-सन्मान मान्य होण्यासारखा नव्हता. मातृसंस्कृतीतील मुक्त शरीरसंबंध आणि अविवाहित मातामहांची त्यांच्या उत्पादनासह मोठी कूळ रचना, याला जेत्या आक्रमकांचा आणि पुरुषप्रधान राज्यकर्त्यांचा विरोध होत राहिला. या मातृसंस्कृतीच्या पाडावासाठी, देव-दानवांसारखे मोठमोठे संघर्ष भारतात झाले. ही व्यवस्था पुरुषांहाती आणण्यासाठी आणि त्याकरिता पुरुषांचा प्रभाव निर्माण करण्यासाठी, म्हणून प्रत्यक्षात हल्ले करून स्त्री-कुळे नष्ट करणे, मातृकुळांच्या उत्पन्नांवर बहिष्कार टाकणे, मातृमंदिरे गावाबाहेर करणे (जी आजही असलेली दिसतात.) अशा उपाययोजना आक्रमकांकडून पुढील अनेक शतके केल्या गेल्या. परंतु माता म्हणून मानवीवंश निर्माण करण्याचं, स्त्रीचं योगदान पिता-पुरुषापेक्षा अधिक स्पष्ट असल्याने, तत्कालीन भारतीय समाजाच्या मनात मातेविषयीच्या आदराला धक्का लावणं आक्रमकांना शक्य झालं नसावं. त्यामुळे स्त्रीविषयी तिरस्काराची, घृणेची भावना निर्माण करून अपेक्षित परिणाम साधण्याचा प्रयत्न म्हणजे, ती ज्या शरीरधर्मामुळे माता बनते, त्यालाच अपवित्र, अमंगल ठरवणं, इथे ती सुरुवात असावी, असं वाटतं. नाहीतर योनिशिल्पाची पूजा असणाऱ्या आणि तिच्या मासिक स्रावाला महत्त्व देणाऱ्या भारतीय संस्कृतीत इतका उरफाटा, टोकाचा बदल येण्याचा दुसरा कोणताही अर्थ लागत नाही.

अशा रीतीने स्त्री-माहात्म्य कमी करत आणि स्त्रीचे चरितार्थाचे मार्ग हिरावत नेत भारतीय स्त्रीवर लाचारीची आणि अगतिकतेची परिस्थिती आणविली गेली. छळकर्ता किंवा रक्षणकर्ता पुरुषच झाल्यामुळे, तसेच पुरुष कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक सत्तेवर राहिल्यामुळे ते म्हणतील ते आणि देतील ते स्थान स्त्रीला मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. चुकीच्या समजुती पसरविण्याच्या पुरुषांच्या प्रयत्नांना ठामपणे विरोध करून आपलं स्वतंत्र मत मांडत राहणं, हे स्त्रीच्या अस्तित्वाला धोक्याचं झालं. आज मंदिर प्रवेशाबाबतचा अपमान आणि अन्याय इतक्या मोठय़ा संख्येने स्त्रिया का सोशीत आहेत, त्याचं कारण हे, आजही न बदललेल्या या वास्तवात आहे. स्त्रियांना मंदिरात प्रवेश नेहमीच नसावा किंवा ‘त्या’ चार दिवसात नसावा, या दोन्हीमागे कारण एकच आहे आणि ते म्हणजे, तिला मातृत्व देणाऱ्या तिच्या शरीरधर्माचा उपहास, तिरस्कार! यामागे आपल्याच धर्माचे नेते, समर्थक, प्रवक्ते पुरुष, स्त्री विरोधात भूमिका घेऊन ठाम उभे आहेत, हासुद्धा एक मातृसंस्कृती विरोधातला प्राचीन संघर्षांचा पुरावाच ठरतो. या धार्मिक पुरुष नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांना अपवित्र ठरवणाऱ्या समजुतींचे समर्थन करण्यामध्ये काही स्त्रियासुद्धा आहेत, हे इथं आवर्जून सांगावं लागेल. पण हा त्यांचा स्वत:चा स्त्री-विचार नाही. स्वत:च्याच शरीरधर्माचा तिरस्कार वाटणाऱ्या या स्त्रिया म्हणजे, कित्येक शतके पुरुष सत्ताधीशांनी स्त्रियांचे वैचारिक वशीकरण किती यशस्वीपणे केलेलं आहे, याचा तो जिवंत पुरावा म्हणावा लागतो.

गंमत अशी आहे की, स्त्रियांना का प्रवेश द्यायचा नाही, त्याबद्दल आजच्या या धर्मप्रवक्त्या स्त्री-पुरुषांना, ना त्यामागील तर्कशुद्ध कारण सांगता येत, ना त्यामागील इतिहास त्यांना माहीत. आणि आज माहीत असलेल्या विज्ञानाचासुद्धा ते सोयीप्रमाणे आधार घेताना दिसतात. अर्थात, स्वत:चा बचाव करावा, त्याप्रमाणे त्यांची भूमिका पुढे येते. टी.व्ही. वाहिन्यांवरून बोलताना हे प्रवक्ते म्हणतात, ‘‘देवळात जाताना आंघोळ करून स्वच्छ होऊन, शुचिर्भूत होऊन जावं, असं ज्याप्रमाणे आपण मानतो, त्यानुसार स्त्रियांवर त्या चार दिवसांत स्वच्छतेसाठी बंदी आहे.’’ आज आपल्या देशात अनेक ठिकाणी दर चार दिवसांनी पाणी लोकांना मिळते, मग सर्वच लोकांना देवळात येताना स्नान करून येणे शक्य होत असेल का? एका दक्षिण भारतातील मंदिराशी संबंधित पुजाऱ्याने तर स्त्रियांची मासिक पाळी समजण्यासाठी स्कॅनर बसवावेत, अशा एका नव्या विज्ञानाची भरारीसुद्धा घेतली. खरंच आपण स्वच्छता, शुचिर्भूतता याबाबत इतके प्रामाणिक असू, तर स्नानाबाबत सर्वच स्त्री-पुरुषांसाठी स्कॅनर लावावा, असं आपण म्हणणार आहोत का? खरं तर, स्त्रीची मासिक पाळी हा ‘मूल जन्माला घालू शकण्याचा’ एक महत्त्वाचा शारीरिक पुरावा आहे. जे मूल खुद्द पुरुषाला त्याचं आणि त्याच्या कुळाचं नाव चालविण्यासाठी फार प्रिय आहे आणि लोकसंख्या वाढविण्यासाठी ‘दहा मुले जन्माला घाला’ म्हणणारे धर्मनेते आहेत. किंबहुना मासिक पाळी न येणाऱ्या स्त्रियांचा तो शारीरिक दोष समजून पुरुष अशा स्त्रीशी विवाह करणं नाकारतात. इतकी समाज संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी ही मासिक पाळी, लगेच दुसरीकडे अपवित्र, अशुद्ध आहे असं मानून स्त्रीला दूर लोटण्याची दुटप्पी भूमिका आपण सहजपणे कशी घेतो? हे कमीच झालं, म्हणून की काय स्त्रीच्या मासिक पाळीची तुलना ही, मल-मूत्र विसर्जनाशी करण्यापर्यंत मजल या धर्मनेत्यांची गेली. मग या विसर्जनाबाबतसुद्धा सर्वच स्त्री-पुरुषांची देवालयात प्रवेश करताना स्कॅनर लावून तपासणी करायची का?

‘‘ज्या स्त्री-पुरुषांना स्त्रीची मासिक पाळी अशुद्ध, अपवित्र वाटते, त्यांना देवतेच्या मंदिराची पायरी चढण्यास, आपण स्त्रियांनी अटकाव केला पाहिजे. कारण देवतासुद्धा पाळी येणारी स्त्री आहे.’’ असं एक धाडसी विधान स्त्रियांच्या गटामधून कानावर पडलं. पण सर्वच स्त्रिया अशा वादात पडायला उत्सुक नसतात. शेवटी स्त्री ही मानवाची निर्माती आहे, आणि कोणत्याही निर्मात्याला सामाजिक शांततेची सर्वाधिक आणि सर्वप्रथम गरज असते. त्यामुळे सर्व सामान्य स्त्री-समाजाकडून अशा विधानांना पाठिंबा मिळणार नाही, हे तर खरंच. पण याचा अर्थ स्त्रियांनी मनात आणलं तर त्या ते करू शकणार नाहीत असा नाही. स्त्रियांनी एकजुटीने हे ठरवल्यास, ते अजिबात अशक्य नाही. त्यामुळे, स्त्रिया सामाजिक अशांती करू पाहात नाहीत, म्हणजे त्या दुर्बल आहेत, त्या आमचं काही वाकडं करू शकत नाहीत, असा कुणा स्त्री-पुरुष उपद्रवी गटाचा भ्रम असेल तर तो त्यांनी लवकर सोडलेला बरा. कारण सामाजिक सौहार्द राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

वास्तविक, ‘मासिक पाळी’ हा स्त्रियांना स्वत:चा खासगी वाटणारा विषय आहे. तिच्या या शरीरधर्माचा, तिच्या तिरस्कारासाठी आयुध म्हणून केला जाणारा उपयोग तिला वेदनादायक असतो आणि तो विषय असा नि:संकोचपणे सार्वजनिकरीत्या सर्व माध्यमांतून चर्चिला जावा, हे त्यांना अपमानकारक वाटत असतं. पण त्यांचा, मान-अपमान, पाहतो कोण? म्हणजेच अशातशा प्रयत्नाने हे थांबणारे नाही आणि असं जर स्त्रीला कमीपणा देणारं वर्तन समाज खपवून घेतो आहे, तर मग विज्ञानाच्या आधाराने स्त्री-पुरुष दोघांचंही शरीरस्कॅन करण्यात तरी अपमान कसला? म्हणजे असं की, स्त्रीची मासिक पाळी म्हणजे तिचे फलित न झालेलं बीज शरीरानं दर महिन्यास बाहेर टाकणं, असा त्याचा सोपा शास्त्रीय अर्थ आहे. शरीरास जे उपयुक्त नाही किंवा अतिरिक्त आहे, ते शरीरात ठेवले जात नाही. त्यामुळे स्त्रीचे हे बीजस्खलन दर महिन्यास होत असते. त्याप्रमाणे पुरुषाचेही अतिरिक्त पुरुषबीज निसर्गत: वीर्याव्दारे शरीराबाहेर टाकलं जात असतं. पुरुषाचे हे बीजस्खलन बारा महिने-चोवीस तास केव्हाही होत असतं. स्त्रीच्या बीजस्खलनाला अपवित्र मानून महिन्यातून चार दिवस तिला मंदिर प्रवेशास बंदी आणायची असेल, तर मग त्याच विचाराने पुरुषाला मंदिर प्रवेशास कायम बारा महिने बंदी घालावी काय? असा स्पष्ट आणि शास्त्रीय दृष्टिकोन स्त्रियांनीसुद्धा संकोच न करता ठामपणे पुढे आणल्यास, गेली कित्येक शतके मागे लागलेल्या या शनीपिडेतून त्यांची कायमची मुक्तता होईल.

– मंगला सामंत
mangalasamant20@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Artical on ban of entry to women in temple shani shingnapur

Next Story
(अंध) नेत्रज्योतींचा लखलखता प्रकाश
ताज्या बातम्या