आयुर्वेदामध्ये दीपावली या सणाचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार मोठे महत्त्व सांगितले आहे. दीपावलीच्या काळात कोणत्या पदार्थाचे सेवन करावे, कोणते पदार्थ टाळावेत, फराळाचे नेमके महत्त्व काय त्याचप्रमाणे अभ्यंग याची खास माहिती..

दीपावली हा दिव्यांचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि आपल्या स्नेहाच्या व्यक्तींना आठवण्याचा त्यांच्या सान्निध्यात राहण्याचा उत्सव! तसेच आपली आरोग्याची देवता धन्वंतरी, गाई-वासरे, आपले गुरू, लक्ष्मीदेवता यांचे स्मरण, पूजन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण! घरोघरी मातीच्या पणतीमध्ये वात व तेल घालून संध्याकाळी अंगणामध्ये दिवे लावले जातात व या ज्योतीच्या प्रकाशाने जीवनातील दुख, वेदना, यातना, रोग यांचा अंधार दूर होऊन सर्वाच्या जीवनामध्ये आरोग्य, आनंद व समाधान यावे यासाठी हा सण साजरा केला जातो.

 शास्त्रीय दृष्टिकोन : 

आयुर्वेदामध्ये दीपावली या सणाचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार मोठे महत्त्व सांगितले आहे. खरे तर आपले सर्व सण, उत्सव हे हवामान, ऋतूंमध्ये बाहेरच्या वातावरणामुळे शरीरात होत असणारे बदल याला अनुसरून सांगितले आहेत. ऋतूमध्ये बदल झाले की, अनेक वेळा रोगांची लागण होते. असे होऊ नये व आरोग्य टिकून राहावे या दृष्टिकोनातून त्या त्या ऋतूत तयार होणारे धान्य, फळ, फुले, वनस्पती व भाज्या यांचा आरोग्य टिकवण्यासाठी औषधी उपयोग लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी सण, उत्सव साजरे करण्यास सांगितले आहेत. या उत्सवांच्या माध्यमातून विशिष्ट ठरावीक पदार्थ तयार करून त्यांचे सेवन करून आरोग्य टिकून राहावे हाच त्यामागील उद्देश आहे.

दीपावलीच्या काळात साधारणत: अश्विन काíतक (ऑक्टोबर) महिन्यामध्ये शरद ऋतूचे प्राबल्य असल्यामुळे शरीरामध्ये पित्त प्रकोप झालेला असतो. या काळात नुकताच पाऊस संपून निरभ्र आकाशामध्ये दिवसा तळपणारा सूर्य हा वातावरणात चांगलीच उष्णता निर्माण करतो. तर रात्रीच्या वेळी हवा थंड असते. या काळात दिवस लहान व रात्र मोठी असल्याने संध्याकाळी अंधार व थंड हवा लवकर जाणवते. दिवसा वाढलेली उष्णता ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात साठवून राहिलेल्या पित्ताचा उद्रेक करायला मदत करते व त्याचाच परिणाम म्हणून या काळात पित्ताचे विविध आजार उद्भवताना दिसतात. निसर्गत:च  बलकारक काळामुळे व पित्तप्रकोपामुळे या ऋतूत शरीर वारंवार आहाराची मागणी करते. पोटातील जठर अग्नी आहाराने शांत व्हावा व उद्रेक झालेल्या पित्ताचे शमन व्हावे म्हणून या काळात मधुर, कडू व तुरट रसांच्या पदार्थाचा आहारात जास्त समावेश करतात. तर आंबट, खारट व तिखट हे पदार्थ अगदी कमी प्रमाणात खायला हवेत. म्हणूनच मधुर व तुरट रसाचे जड पदार्थही या काळात पचविण्याची शरीराची ताकद वाढलेली असल्यामुळे सहज पचतात व त्यामुळेच मधुर रसाच्या गूळ व गहू तसेच तुरट रसाच्या हरभरा डाळीपासून बनविलेली पुरणपोळी ही फक्त दीपावली या सणाच्या निमित्ताने खाण्याची वस्तू नसून ती या ऋतूत वारंवार खावी.  त्याचबरोबर मधुर रसाच्या नारळ, दूध, तूप, तांदूळ, ज्वारी, गहू, साखर, गूळ या सर्व पदार्थाचा आहारात  व फराळाच्या पदार्थामध्ये समावेश केल्यास पित्तप्रकोप होणार नाही व शरीराची शक्ती, उत्साह वाढण्यास मदत होते. यासोबतच हरभरा, मूग, मटकी, वाटाणा यांसारखा तुरट रसांच्या पदार्थाचाही वापर दीपावलीनिमित्ताने आपण आहारात व फराळामध्ये केल्यास आरोग्य उत्तम राहाते. कडू रसाची मेथीची व कारल्याची भाजी, मेथीचे दाणे, हळद, कढीिलब फोडणीसाठी आहारामध्ये उपयोग करतो. म्हणून पूर्वजांनी आरोग्य अबाधित राहावे व या सण-उत्सवाच्या माध्यमातून असे पदार्थ प्रत्येकाच्या आहारात असावेत म्हणून हे

सण-उत्सव सांगितले आहेत. त्यासोबतच नोकरी, व्यवसायाच्या ताणतणावातून दैनंदिन कामातून थोडासा विसावा मिळावा व नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी, सहकारी यांच्या सोबत एकत्र येऊन हास्यविनोदात, आनंदात वेळ जावा व त्यातून शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखले जाऊन एकूणच शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहावे या दृष्टिकोनातूनच दीपावली हा सण साजरा करण्यास सांगितले आहे.

दीपावली सणाचे महत्त्व

 वसुबारस : आपला भारत देश हा कृषिप्रधान असल्यामुळे शेतीच्या पिकावरच अनेक जणांचे जीवन अवलंबून असते व या कृषिप्रधान संस्कृतीत पशुधनाचे महत्त्व मोठे असल्याने या दिवशी वासरासोबत गाईची पूजा केली जाते. गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी ग्रामीण भागात पशुधनाला ओवाळून गोड पदार्थ खायला देतात व संध्याकाळी पणत्या लावून त्यांच्या समोर गाणी म्हटली जातात.

धनोत्रयोदशी : या दिवशी आयुर्वेद शास्त्राचा प्रवर्तक धन्वंतरीचा जन्म झाला. दीपावलीच्या या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करून कृतज्ञतापूर्वक धन्वंतरी या आरोग्यदेवतेची पूजा केली जाते. त्याचबरोबर धन-संपत्तीची पूजा केली जाऊन निरोगी दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते.

 नरक चतुर्दशी : या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, असे म्हटले जाते. भल्या पहाटे उठून अभ्यंग स्नान करावे. तसेच संपूर्ण घराची स्वच्छता करून सडा, रांगोळ्या काढून रोगरूपी राक्षस पळवून लावायचा असतो. पहाटे उठल्याने शरीरातील अपान वायूचे कार्य सुकर होऊन मलमूत्रादी वेग आपोआप वेळेत येतात व त्यामुळेच खरे आरोग्य लाभते. तसेच पहाटेची सुखद थंडी, वातावरणातील स्वच्छ हवा आरोग्य टिकविण्यास मदत करते. या दिवशी मनातील काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या नरकरूपी षड्रिपूंचा त्याग करून चांगले विचार, आपुलकीची भावना निर्माण करण्याचा संकल्प करायला हवा. तसेच दारू, तंबाखू, गुटका या नरकरूपी व्यसनांचा त्याग करून निरोगी दीर्घायुष्य लाभण्याचाही संकल्प करायला हवा.

 लक्ष्मीपूजन : आश्विन अमावस्येच्या दिवशी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मीचे पूजन करून हा दिवस साजरा करतात. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवत:’ घरातील गृहलक्ष्मीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या घरी स्त्रीला सन्मानाने व आदरपूर्वक वागवले जाते तेथेच आनंद, समाधान वास करते म्हणून या दिवशी घरातील लक्ष्मीला नवीन वस्त्र, अलंकार घेऊन तिच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्तकेली जाते. स्त्री हीच संपूर्ण कुटुंबाचा कणा असल्याने घरातील सर्वानीच तिच्या आरोग्याचा, सुख, समाधानाचा व सन्मानाने वागविण्याचा संकल्प या दिवशी करावा.

 बलिप्रतिपदा : पार्वतीने शंकराला द्युतात हरविले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हणतात. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळून पतीने तिला काही भेट द्यावी, अशी अपेक्षा असते. पती-पत्नीतील प्रेमाची आठवण करून देणारा हा दिवस. संसाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी पती आणि पत्नी ही दोनही चाके सुरळीत असणे आवश्यक आहे. या दिवशी दोघांनीही एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करावा.

भाऊबीज : काíतक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी यम त्याची बहीण यमी हिच्या घरी जेवायला आला. तेव्हा तिने त्याला तेल व उटणे प्रेमाने लावून आंघोळ घातली. त्याची स्मृती म्हणून व भावा-बहिणीचे नाते वृद्धिंगत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सासरी नांदणाऱ्या बहिणीला माहेरी आल्यानंतर सन्मानाने वागवले जावे व तिलाही भावाच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता वाटावी याकरिता हा दिवस साजरा करतात.

 अभ्यंग स्नान

 दीपावलीच्या दिवसामध्ये भल्या पहाटे उठून अंगाला तेल लावून घातलेले स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान होय. घरातील आई, आजी, बहीण अशा समस्त स्त्री वर्गाचा हा आवडीचा कार्यक्रम! अभ्यंग स्नानासाठी जे सुवासिक तेल वापरले जाते ते केवळ सुवासिक न वापरता त्यासोबत कोमट तीळ तेलाने अभ्यंग करावा. शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यंग करताना सर्वागाला तेल लावून हलकेसे मालिश करणे आवश्यक असते. अभ्यंग करताना तो हातापायांच्या ठिकाणी खालून वरच्या दिशेने करावा तर सांध्याच्या व पोटाच्या ठिकाणी घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने गोलाकार करावा. असा अभ्यंग खरे तर रोजच्या रोज करणे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक आहे. परंतु आपल्याकडे फक्त दीपावलीच्या दिवसांमध्येच केला जातो. अनेक कुटुंबातील स्त्रिया सर्व घरातील सदस्यांना अभ्यंग करून स्नान घालतात; परंतु स्वत:साठी वेळ काढून अभ्यंग करीत नाहीत. अनेक जणींचा बाळंतपणानंतर अंगाला तेल लावून स्नान करणे एवढाच काय तो अभ्यंगाशी संबंध आलेला असतो. परंतु त्यामुळेच बऱ्याच स्त्रियांमध्ये नियमित अभ्यंग न झाल्याने वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, गुडघेदुखी, अंगदुखी अशा अनेक तक्रारी दिसून येतात. धावपळीच्या युगात बऱ्याचशा स्त्रिया डोक्यालादेखील तेल लावण्यास वेळ काढत नाही. त्यामुळे केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केस व डोक्याची त्वचा रूक्ष होणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा तक्रारी अनेक जणींमध्ये आढळतात. या तक्रारी दूर करण्यासाठी पौष्टिक आहाराबरोबरच आठवडय़ातून २ वेळा डोक्याला तेल लावून हलकीशी मालिश करणे गरजेचे आहे.

नियमित अभ्यंग केल्याने रोजच्या रोज होणारे शारीरिक श्रम दूर होतात. शरीराला बल मिळते. शरीरातील वाढलेल्या वायूचे शमन होऊन दृढता प्राप्त होते. त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचा कांतियुक्त होते. अभ्यंगामुळे आजच्या आधुनिक काळात प्रवासामुळे व हवेतील प्रदूषणामुळे होणारा वात प्रकोप व त्वचेवरील दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात. नियमित अभ्यंग केल्याने भूक चांगली लागून मलबद्धतेचे विकार नाहीसे होतात. मानसिक थकवा दूर होऊन झोप चांगली लागते; मनाची एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वाढते. एवढेच काय तर वृद्धत्व उशिरा येऊन चिरतारुण्य प्राप्त होते. म्हणून सर्वानीच दीपावलीच्या काळात तळपायापासून ते डोक्यापर्यंत सर्व अवयवांना अभ्यंग करावे व नंतरही आठवडय़ातून एकदा तरी सुटीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे.

अभ्यंगानंतर स्नान करताना सुगंधी उटणे लावण्याची प्रथा आहे. शरीराला लावलेले तेल त्वचेमध्ये जिरून शिल्लक राहिलेले जास्तीचे तेल किंवा त्वचेचा तेलकटपणा जावा व शरीरातील रक्ताभिसरण सुधारून हालचालीमधला सहजपणा व चपळपणा कायम राहून शरीराला सुगंध यावा. हा यामागे उद्देश असतो. जसे अभ्यंग करताना आपण तेल लावतो अगदी त्याच दिशेने व पद्धतीने उटणेही शरीराला लावावे. जाहिरातीमध्ये आकर्षक वाटलेला परंतु रासायनिक प्रक्रियेने तयार केलेला साबण या अभ्यंगाच्या वेळी लावू नये. त्यामुळे त्वचा जास्तच रूक्ष होते. म्हणून कुठलाही साबण लावू नये. अशा पद्धतीने अभ्यंग करून उटणे लावून नंतर सोसवेल अशा गरम पाण्याने केलेले स्नान शरीर स्वच्छ करून मनाला तरतरीतपणा, प्रसन्नता आणते व एकूणच शरीराचे सर्व आजार बरे होऊन दीर्घायुष्य प्राप्त होते.

 अभ्यंग तेल :  अभ्यंग करण्यासाठी कोमट तीळ तेल वापरावे किंवा आपल्या प्रकृतीनुसार व एखादी व्याधी असेल तर त्या व्याधीनुसार वेगवेगळी तेले तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरता येतात. उदाहरणार्थ वातशामक तेल, चंदन बलालाक्षादी तेल, सहचर तेल आदी.

 उटणे : सहसा उटणे हे घरीच किंवा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार वापरावे. बाजारात मिळणाऱ्या उटण्यांमध्ये अनेक वेळा चूर्णाची भेसळ झालेली दिसून येते म्हणून घरगुती उटणे खालील पद्धतीने बनवावे.

उटणे बनविण्याची पद्धत : मसूर डाळ पावडर २५० गॅम, गुलाब पावडर ५० गॅ्रम, वाळा, तुळशी पावडर प्रत्येकी ५० ग्रॅम, चंदन पावडर ५० गॅ्रम, हळद पावडर ५० ग्रॅम, मंजिष्ठा पावडर ५० ग्रॅम घेऊन ते एकत्र करून उटणे बनवावे. हे उटणे लावल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारून त्वचा कांतियुक्त होते व त्वचेवरील लवही नाहीशी होते.

फराळाचे पदार्थ

आधुनिक काळानुसार दीपावलीच्या फराळांमध्ये वैविध्य आले आहे. बाजारातील तयार झालेले पदार्थ घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला असला तरी पारंपरिक लाडू, करंज्या, शेव, चिवडा, चकल्या, शंकरपाळे, अनारसे, चिरोटे हे फराळातील पदार्थ, तर खीर, बासुंदी, पुरणपोळी, नारळी भात व श्रीखंडासारखे भोजनातील मिष्टान्न हे पदार्थ बहुतेक कुटुंबांमध्ये आजही आवडीने खाल्ले जातात.

नारळ, तांदूळ, साखर, दूध व तूप घालून केलेली खीर ही पित्तशमन करत असल्यामुळे तिचाही वापर दीपावलीच्या दिवसांमध्ये करतात. गूळ वापरताना शक्यतो सेंद्रियच वापरावा.

 लाडू :  हल्ली आपण ज्याला बुंदीचा किंवा बेसनाचा लाडू म्हणतो त्याचे वर्णन आयुर्वेदिक ग्रंथात िबदूमोदक अथवा बेसनमोदक या नावाने केलेला आढळतो. हरभरा डाळ, तूप, साखर यापासून बनविलेला हा पदार्थ शरीरास बल देणारा आहे. परंतु जास्त प्रमाणात खाल्ल्यास मलावस्टंभाचा त्रास होऊ शकतो. पूर्वीच्या काळी हरभरा डाळीप्रमाणेच मुगाच्या डाळीपासून बुंदी करून लाडू करण्याची प्रथा होती. या लाडूंना ‘मुक्ता मोदक’ असे म्हणत. मूग डाळ ही त्रिदोषशामक असल्याने तिचा वापर लाडूसाठी करणे हे आरोग्यपूर्ण आहे. बेसनाच्या पीठाप्रमाणे मुगाच्या डाळीच्या पिठापासूनही लाडू बनविता येतात. हे लाडू त्रिदोषांना नियंत्रित करणारे शीत गुणधर्माचे डोळ्यांना हितकर, शक्ती व बल वाढवणारे असतात. गूळ घालून केलेला नाचणीचा लाडू, राजगिरा लाडू, शेंगदाणा, तिळगूळ लाडू हे सर्व शक्तीवर्धक पौष्टिक व शरीरातील लोह व कॅल्शिअम वाढविणारे आहेत.

 करंज्या :  मदा, रवा, खोबरे, पिठीसाखर, किसमिस, काजू, बदाम, वेलदोडे यांपासून बनविलेला हा पदार्थ वातशमन करणारा, शक्ती व उत्साहवर्धक आहे. करंज्या हा पदार्थ या ऋतूत वाढलेल्या पचनशक्तीला योग्य असे इंधन देऊन शांत करणारा असतो. परंतु यामधील मद्यामुळे अनेकवेळा पित्त वाढण्याची व मलावस्टंभ होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी बाजारातील मद्याऐवजी घरगुती गव्हापासून बनविलेला मदा वापरावा व पिठीसाखरेऐवजी गूळ घालावा. तसेच तळण्यासाठी वनस्पती तुपाऐवजी साजूक तुपाचा किंवा खाद्यतेलाचा वापर करणे आरोग्यासाठी हितकर राहील. यामुळे दूषित पित्ताचे आजार न उद्भवता शरीरातील रक्त व कॅल्शिअम वाढून आरोग्य प्राप्त होईल.

  शंकरपाळे : मदा, वनस्पती तूप, साखर यांपासून केलेला हा पदार्थ पचायला जड असल्याने उत्तम पचनशक्ती असणाऱ्यांनीच तो खावा. यामुळे वात व पित्त वाढू शकते. पचण्यास हलका होण्यासाठी गव्हाचे पीठ, साजूक तूप व गूळ घालून शंकरपाळ्याच्याच आकाराच्या कापण्या कराव्यात. या कापण्या साजूक तुपात किंवा खाद्य तेलामध्ये (शेगंदाणा, सूर्यफूल, सोयाबीन) तळाव्यात. या कापण्या खाल्ल्यास शरीरातील कॅल्शिअम वाढून बल प्राप्त होते.

सारणाच्या पुऱ्या/चिरोटे : रवा, मदा, पिठीसाखर व तुपापासून हा पदार्थ बनवितात. हा पदार्थ पचायला खूप जड असतो व शरीरातील पित्त वाढवितो. दीपावलीच्या काळात शरद ऋतुनुसार अधिकच पित्तप्रकोप झालेला असतो. चिरोटे मोठय़ा प्रमाणात खाल्ल्याने पित्तप्रकोप वाढू शकतो. हे टाळण्यासाठी रवा भाजून त्यात गुळाचा पाक घालून सारण तयार करावे व हे सारण गव्हाच्या पीठाच्या उंडय़ात भरून सारणाच्या छोटय़ा आकारातील पुऱ्या कराव्यात व सर्वात शेवटी या खाद्यतेलामध्ये तळाव्यात. या सारणाच्या पुऱ्या आरोग्यास हितकारक असतात.

 अनारसे : तांदळाचे पीठ, सेंद्रिय गूळ, खसखस, वेलची, तूप यांपासून बनविलेल्या या चवदार पदार्थास आयुर्वेदामध्ये ‘शालीपूप’ असे म्हणतात. हा पदार्थ रुची वाढविणारा असून शरीरास पौष्टिक व बल वाढविणारा आहे. अनारसे खाल्ल्याने पचनशक्ती वाढून जुलाब, अरुची, भूक न लागणे हे विकार कमी होतात.

 श्रीखंड : आंबट, गोड, चवीचे श्रीखंड सर्वानाच आवडते. दह्य़ापासून बनविलेला चक्का, साखर, वेलची, केशर यांपासून बनविलेल्या श्रीखंडास रसाला असे म्हणतात. श्रीखंड हे बलकारक, उत्साहवर्धक, भूक व तहान याने कमी होते. चव वाढविणारे, मधुर, शीत, सारक, गुणधर्माचे, वातपित्ताचे शमन करणारे आहे. श्रीखंड हे तृष्णाशामक, दाहनाशक असून प्रमाणात खाल्ल्यास व त्यात चिमूटभर सुंठ व मिरपूड मिसळल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास उद्भवत नाही.

 शेव : हरभरा डाळीच्या पिठापासून बनविलेला हा पदार्थ चविष्ट व रुचकर असतो. हा प्रमाणात खाल्ल्यास आरोग्य प्राप्त होते. परंतु अति प्रमाणात खाल्ल्यास पित्तप्रकोप होऊन आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. म्हणून बेतानेच शेव खावी किंवा हरभरा डाळीऐवजी मुगाच्या डाळीची शेव बनवून खावी.

 चिवडा : साळीच्या लाह्य़ा, तांदळाच्या लाह्य़ा व भाजके पोहे यांपासून चिवडा बनवितात. साळीच्या लाह्य़ा या शीत, पचायला हलक्या, भूक वाढविणाऱ्या, खाल्ल्यानंतर गोड चव निर्माण करण्याऱ्या, विकृत पित्त व कफ यांचे शमन करणाऱ्या असून त्या उलटी, जुलाब, अंगाचा दाह, रक्ताचे विकार, स्थूलता, वारंवार तहान लागणे या विकारांवर उपयोगी असतात. या लाह्य़ांपासून अगदी कमी तिखट, मीठ, दाणे, कढीपत्ता, खोबरे घालून तुपात भाजून चिवडा केल्यास तो आरोग्यास हितकर असतो व वरील सर्व गुण या चिवडय़ात असतात.

भाजक्या चपटय़ा पोह्य़ांना आयुर्वेदामध्ये ‘चिपिटा’ असे म्हणतात. त्या पचायला जड असून पित्तकर, वात व कफनाशक असतात. पचण्यास जड असल्यामुळे यापासून बनविलेला चिवडा योग्य प्रमाणातच खावा.

 चकल्या : भाजणीचे पीठ, तीळ, ओवा, मीठ, तुपाचे मोहन घालून केलेल्या या पदार्थास आयुर्वेदामध्ये ‘चक्रिका’ असे म्हणतात. हा पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीरास पोषक असतो. परंतु अति प्रमाणात खाल्ल्यास पित्तप्रकोप होऊन शरीरातील विकृत पित्त व उष्णता वाढते. त्यामुळे त्वचाविकार, आम्लपित्त असणाऱ्यांनी चकली हा पदार्थ अतिप्रमाणात खाऊ नय अशा प्रकारे दीपावली साजरी केली तर नक्कीच सर्वाना स्वास्थ्यपूर्ण जीवन लावून दीर्घायुष्य प्राप्त होईल अशी खात्री वाटते.

सावधानता

दीपावलीच्या  फराळांमध्ये साखर ही प्रमाणातच वापरावी. जिथे साखरेऐवजी सेंद्रिय गुळाचा वापर करणे शक्य आहे तिथे त्याचा वापर जरूर करावा.

वनस्पती तुपात आणि मैद्यात तयार केलेला फराळ टाळावा. बाहेरून तयार विकतचा फराळ घेताना तो वनस्पती तुपात व मैद्यात केला नसल्याची खात्री करून घ्यावी.

मधुमेह हा आजार असणाऱ्या रुग्णांनी साखरेपासून व सेंद्रिय गुळापासून बनविलेला कुठलाच पदार्थ खाऊ नये व खायचा असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा.

या ऋतूत निर्माण होणाऱ्या कवठ, आवळा, कोकम (आमसूल) हे पदार्थ चवीने आंबट जरी असले तरी त्याने पित्ताचा उद्रेक होत नाही. आंबट चवीसोबत ते तुरट चवीचे असल्यामुळे पित्ताचे शमन होऊन आरोग्य लाभते. म्हणून या दिवसांमध्ये या फळांचाही आहारात आवर्जून समावेश करावा.

दीपावलीच्या काळात शतावरी कल्प, मोरावळा, च्यवनप्राश, प्रवाळ पंचामृत, प्रवाळयुक्त गुलकंद, कामदुधावटी आदींचा वापर केल्यास पित्त आटोक्यात राहू शकते. त्याचबरोबर आपल्याकडे येणाऱ्या स्नेहीजनांच्या स्वागतासाठी आवळा कॅण्डी, सुकामेवा, आवळा सरबत, कवठ सरबत, कोकम सरबत, लिंबू सरबताचा वापर केल्यास त्यांचेही आरोग्य चांगले राहील.

– डॉ. शारदा महांडुळे
sharda.mahandule@gmail.com