वेगवेगळे प्रयोग, विविध संशोधन यात स्त्रियांची संख्या अद्यापही कमीच आहे. कारण अर्थातच सामाजिक आणि मानसिकही. अनेक जबाबदाऱ्यांमध्ये स्त्रिया स्वत:ला इतकं अडकवून घेतात की काही नवा विचार करायला सवड नसते. शिवाय संशोधन वगैरे आपला प्रांत नाही असला विचारही त्यामागे असतो. परंतु हे चित्र बदलत चाललं आहे. आज वैद्यक क्षेत्र असो किंवा संगणकविषयक तंत्रज्ञान अनेक गोष्टींवर संशोधन सुरू असून त्याचा वापर प्रत्यक्षात होतो आहे. त्यासाठी अनेकींना पेटंट मिळालेली आहेत. अशाच काही पेटंट मिळवलेल्या आणि समाजोपयोगी संशोधन केलेल्या प्रातिनिधिक स्त्रियांविषयी..

‘स्त्री सक्षमीकरण’ हा सध्या एक परवलीचा शब्द बनला आहे. कुठल्याही क्षेत्रात काही वेगळं करून दाखविणाऱ्या स्त्रियांचं तितकंच काम करणाऱ्या पुरुषांपेक्षा काकणभर जास्तच कौतुक होतं, ही अनेक पुरुषांची पोटदुखी असते. पण जगभरात, विशेषत: भारतासारख्या देशात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एखाद्या पुरुषाला जे काही कष्ट करावे लागतात त्यापेक्षा एखाद्या स्त्रीला करावे लागणारे कष्ट निश्चितच बरेच जास्त असतात. तिच्यापुढील आव्हानं नक्कीच मोठी असतात आणि म्हणूनच तिला थोडय़ा अधिक प्रोत्साहनाची निश्चितच गरज असते म्हणा.. किंवा तो तिचा हक्कच आहे म्हणा!

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने

कुठल्याही देशाची प्रगती मोजण्याचे जे अनेक मापदंड आहेत, त्यातला एक महत्त्वाचा मापदंड आहे तिथली संशोधकता आणि संशोधकता मोजण्याचा एक महत्त्वाचा मापदंड आहे त्या देशाने मिळवलेली पेटंट्स. अर्थात संशोधकता मोजण्याचं पेटंट्स हे काही एकमेव प्रमाण नव्हे. पण ते एक महत्त्वाचं मानक आहे हे मान्य करायलाच हवं! देशाची संशोधकता मोजण्यासाठी आणि जगातल्या सगळ्या देशांची त्यानुसार क्रमवारी लावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जागतिक संशोधकता अनुक्रम (ग्लोबल इनोवेशन इंडेक्स) दिला जाऊ  लागला आहे. २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या १२८ देशांच्या जागतिक क्रमवारीत भारताचा क्रमांक आहे ६६ वा! म्हणजे अर्थातच विशेष काही बरा नव्हे आणि भारतात स्त्रियांना एकुणातच करिअरसाठी मिळणारं स्वातंत्र्य, त्यांना मिळणाऱ्या उच्चशिक्षणाच्या संधी, लग्नानंतर करिअर चालू ठेवण्यात येणाऱ्या अडचणी, बाळंतपण, मुलांचं संगोपन यामुळे कामात येणारे अडथळे हे सगळं लक्षात घेता भारतीय स्त्रियांमध्ये संशोधन क्षेत्रातील प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे आणि त्यातही पेटंट मिळविणाऱ्या स्त्री संशोधकांचं प्रमाण तर त्याहून कमी आणि ज्यांच्या पेटंट्सचं व्यापारीकरण झालं आहे म्हणजे ज्यांच्या पेटंट्समधील संशोधन मोठय़ा स्तरावर औद्योगिक स्तरावर बनविलं जात आहे आणि त्यातून त्यांना पैसे मिळत आहेत अशा स्त्रिया तर अगदी बोटांवर मोजण्याइतक्या असाव्यात!

काही दिवसांपूर्वी ‘व्हाय विमेन डोन्ट पेटंट’ अशा नावाचा अमेरिकेत केलेल्या संशोधांनावरील एक शोधनिबंध वाचण्यात आला. १९९८ च्या वर्षांत अमेरिकेत ‘फाइल’ करण्यात आलेल्यापैकी केवळ १०.३ टक्के पेटंट्समध्ये किमान एक स्त्री संशोधक होती. २००५ मध्ये अमेरिकी लोकांनी युरोपात ‘फाइल’ केलेल्या पेटंट्समधील फक्त ८.२ टक्के पेटंट्स स्त्री संशोधकांनी दाखल केलेलं होतं. तंत्रज्ञानातील प्रगतीचं, उत्पादकतेचं आणि म्हणून अर्थात आर्थिक प्रगतीचं पेटंट हे एक महत्त्वाचा निदर्शक आहे. अर्थात मुळात स्त्रिया आणि पुरुषांचे कल आणि रुची वेगवेगळ्या असतात हे याचं एक कारण असूच शकेल. पण तरीही ती लक्षात घेताही अशा प्रकारच्या या महत्त्वाचा निदर्शक असलेली पेटंट्स मिळवण्यात जगभरात स्त्रिया आणि पुरुषांमध्ये मोठी तफावत आहे आणि ही तफावत इतकी मोठी आहे की मग स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत मिळणाऱ्या कमी संधी हेच याचे कारण असावं असं खेदाने म्हणावं लागतं आणि स्त्रियांमधल्या संशोधकतेला पुरेसा वाव मिळत नाही असंही मान्य करावं लागतं. या संशोधनाचा निष्कर्ष असा होता की केवळ पेटंट मिळविणाऱ्यांत केवळ ७.५ टक्के स्त्रिया होत्या आणि ज्यांच्या पेटंट्सचं व्यापारीकरण झालं आहे अशा स्त्रियांचं प्रमाण तर केवळ ५.५ टक्के होतं. मुळात एखाद्या संशोधनावर पेटंट मिळवणं ही महत्त्वाची गोष्ट आहेच. पण पेटंट मिळालेल्या संशोधनाचं, मग ते प्रक्रिया असेल किंवा उत्पादन, मोठय़ा औद्योगिक स्तरावर उत्पादन सुरू होणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. कारण तरच ते संशोधन सामान्य जनतेपर्यंत पोचलं आणि त्याचा उपयोग समाजाला झाला असं म्हणता येतं. प्रत्येक संशोधकाकडे त्याचं संशोधन औद्योगिक स्तरावर निर्मित करण्याइतकी साधनं असतातच असं नाही. अशा वेळी संशोधकाच्या संशोधनाचं महत्त्व एखाद्या उद्योगाला समजायला लागतं. मग ती इंडस्ट्री ते पेटंट संशोधकाला मोबदला देऊन मोठय़ा प्रमाणावर बनवायला लागतं. याला म्हणतात पेटंटचं व्यापारीकरण होणं किंवा व्यावसायीकरण होणं. अशा पद्धतीने ज्यांच्या पेटंटचं व्यापारीकरण झालं आहे अशा संशोधकांत स्त्रियांचं प्रमाण अमेरिकेसारख्या देशातही नगण्य आहे असा या संशोधांनाचा निष्कर्ष आहे. आता या सगळ्या पाश्र्वभूमीवर भारता सारख्या देशात पेटंट्स मिळविणाऱ्या आणि त्यांना औद्योगिक स्तरापर्यंत नेणाऱ्या स्त्रीचं काम हे निश्चितच कौतुकास्पद आहे असं म्हटलं पाहिजे. अर्थात सगळ्यांचाच उल्लेख इथे करता येणे शक्य नसल्याने काही प्रातिनिधिक स्त्री संशोधकांचाच उल्लेख इथे करतो आहोत.

‘नेटअ‍ॅप’ नावाच्या कंपनीत सीनियर इंजिनीयर म्हणून काम करणारी वाणी वुल्ली मूळची वरंगळची. ७० जणांच्या तिच्या अभियांत्रिकीच्या वर्गात फक्त २ मुली होत्या. शिक्षण झाल्यावर वाणीला ‘विप्रो’मध्ये नोकरी मिळाली. पण नंतर लग्न, बाळंतपण यामुळे कामात खंड पडणं चालूच राहिलं. पण २००४ च्या सुमारास वाणीने तिच्या करिअरकडे जरा गांभीर्याने बघायला सुरुवात केली. तिने पिट्सबर्ग विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतलं आणि मग ‘नेटअ‍ॅप’मधली नोकरी सुरू झाली. ‘नेटअ‍ॅप’मधल्या नोकरीमध्ये ती करत असलेल्या संशोधनावर एक पेटंट मिळालं. ज्यात वाणी एक संशोधक होती. शिवाय तिच्या नावावर अजूनही काही पेटंट्स ‘फाइल’ केली गेली आहेत. संगणकावरील एखाद्या क्लस्टरवर जो डेटा संग्रहीत केलेला असतो तो अखंडपणे उपलब्ध व्हावा म्हणून केलेल्या एका प्रणालीवर हे संशोधन आधारलेलं होतं. वाणीच्या या संशोधांनावरील तंत्रज्ञान आज अमेरिकेतील अनेक इस्पितळांत वापरलं जात आहे. तिथल्या इस्पितळातील सगळ्या रुग्णांच्या नोंदी आता ‘डिजिटाइझ’ झाल्या आहेत आणि डॉक्टरांना कुठल्याही रुग्णाची कुठलीही माहिती म्हणजे त्याच्या रक्त तपासणीचे किंवा क्ष-किरण तपासणीचे निकाल, त्याला असलेल्या अ‍ॅलर्जीच्या नोंदी, त्याचं सीटी आणि एमआरआय स्कॅन कधीही लागू शकतं आणि डॉक्टर किंवा रुग्णांना कुठलीही अडचण न येता विनाविलंब ही माहिती मिळावी म्हणून हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरलं आहे.

बंगळुरू येथील रॉबर्ट बॉश इंजिनीअिरग अँड बिझनेस सोल्यूशन्स (आरबीईआय) मध्ये काम करणाऱ्या श्रीजा अरुणकुमारच्या नावावर तब्बल १९ पेटंट्स ‘फाइल’ केली गेलेली आहेत. ‘इन्वेंटर ऑफ द इयर’ हा मानाचा सन्मानही तिला दोनदा देण्यात आला आहे. श्रीजाचे आई-वडील दोघंही शिक्षक आहेत. त्यांनी श्रीजामधल्या जिज्ञासेला कायम खतपाणी घातलं. श्रीजा एक इंजिनीअर आहे आणि जीओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम्समधली तज्ज्ञ. रोजच्या जगण्यात संगणक कसे वापरता येतील याचा श्रीजाला सतत ध्यास लागलेला असतो. श्रीजा स्वप्न बघते तीही संगणकीय सॉफ्टवेअर्सचीच. तिच्या नावावर असलेल्या अनेक पेटंट्सपैकी एका पेटंटमधलं संशोधन वापरून कारच्या स्क्रीनमध्ये ऑफलाइन सेव्ह झालेले नकाशे वापरता येतात आणि एका ठरावीक भागातून प्रवास करत असताना त्या चालकाला त्या भागातील त्याच्या आवडीची ठिकाणं शोधून काढता येतात. ‘पेटंट्स फाइल करता येण्यासाठी संशोधकता तर हवीच. पण त्याशिवाय ते कुठलंही संशोधन पेटंट मिळण्यायोग्य कसं बनवावं याबद्दलचं मार्गदर्शनही हवं असतं.’-असं श्रीजा सांगते.

‘अमागी मीडिया लॅब’ची चीफ टेक्निकल ऑफिसर श्रीविद्या भास्कर ही अशीच आणखी एक धडाडीची संशोधक. राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर जो ‘सॅटलाइट फीड’ मिळत असतो त्याला मधेच रोखून तिथे त्या त्या राज्यातील किंवा जिल्ह्य़ातील विशिष्ट जाहिराती दाखवता येतील का यावर तिचं संशोधन चाललेलं. पण हे करताना राष्ट्रीय टीव्ही चॅनलवरचा कार्यक्रम मात्र जसंच्या तसं दिसलं पाहिजे ही अट होती व त्यासाठी सेट टॉप बॉक्समधील हार्डवेअर न बदलता या सॉफ्टवेअरने काम करणं अपेक्षित होतं. आज श्रीविद्याच्या नावावर या आणि या संबंधित तंत्रज्ञानावरील पेटंट्स आहेत. त्यासाठी सतत नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यायला लागते आणि अभ्यास करत राहावा लागतो. कुटुंबीयांच्या मदतीशिवाय हे अशक्य आहे हे नमूद करायला श्रीविद्या विसरत नाही.

या तिघी स्त्री संशोधक नुसत्या स्वत: पेटंट्स फाइल करून थांबलेल्या नाहीत. तर होतकरू अभियंत्यांना स्वतंत्रपणे विचार करायला किंवा त्यांच्या तंत्रज्ञानाच्या शाखेतल्या अडचणींवर मार्ग शोधून काढणारी संशोधनं करायला त्या शिकवतात. त्यांच्या मार्गदर्शक म्हणून काम करतात.

‘आयबीएम इंडिया’च्या शालिनी कपूरच्या नावावर दहा पेटंट्स तर आहेतच. पण ती शाळेतल्या मुलांसाठी एस्केप व्हेलोसिटी नावाचं विज्ञान प्रदर्शन भरवते. तंत्रज्ञानातील नवनव्या संशोधनांची ओळख या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांना करून दिली जाते. या प्रदर्शनाला ‘डेल’, ‘सिस्को’सारख्या कंपन्या आर्थिक मदत करतात. ‘आयबीएम’च्या ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ विभागाची प्रमुख म्हणून शालिनी काम करते. मोबाइल फोनमधून माहिती चोरता येऊ  नये म्हणून बनवलेल्या तंत्रज्ञानावर शालिनीची सगळी पेटंट्स आधारित आहेत.

कला संपतकुमार ही ‘डेल’ इंडियामध्ये काम करणारी सिस्टम इंजिनीअर. विज्ञान हे तिला माणसाच्या उत्क्रांतीचं लक्षण वाटतं. तिच्या या क्षेत्रातल्या रुचीचं श्रेय ती पूर्णत: तिच्या शाळेतल्या विज्ञानाच्या शिक्षकांना देते. तिची पेटंट्स ही पूर्णपणे सिस्टम्स इंजिनीअिरगच्या संदर्भातली आहेत.

वैद्यकीय किंवा औषध संशोधन क्षेत्रातही खूप मोठं संशोधन सुरू असतंच. कारण प्रत्येक रोगावर औषधं यावीत हा प्रयत्न असतो. त्यातल्याच एक डॉ. कल्पना जोशी. यंदाचा ‘लोकसत्ता नवदुर्गा पुरस्कार’ही ज्यांना मिळाला त्या डॉ. कल्पना जोशी यांनी आतापर्यंत कर्करोग व सांधेदुखीवरच्या औषधांची १० आंतरराष्ट्रीय पेटंटस् मिळवली असून कर्करोग, अल्झायमर, एड्स, हिपॅटायटीस सी व हृद्रोग यावरच्या २५ औषधांच्या पेटंटस्साठी अर्ज केला आहे आणि ती लवकरच त्यांच्या नावावर होतील अशी आशा आहे.

‘महिंद्र कोमविवा’च्या अमृता बॅनर्जीने दोन पेटंट्स फाइल केली आहेत. गुन्ह्य़ाचा शोध लावायला उपयुक्त ठरतील अशा आवाज ओळखणाऱ्या सॉफ्टवेअर्सवरचं हे संशोधन आहे. ‘कशावर पेटंट फाइल करता येईल आणि कशावर नाही याबाबत आपल्या मनात फारच संभ्रम असतो आणि म्हणून आपण उत्तमोत्तम कल्पनांवर पेटंट्स घेत नाही. खरं तर अगदी किरकोळ कल्पनेवरही पेटंट मिळवता येतं हे मला ‘गूगल’ आणि ‘अ‍ॅपल’ची पेटंट्स पाहून समजलं’- असं अमृता म्हणते! तिथलीच तिची सहकारी पूनम थरडच्या नावावरही दोन पेटंट्स आहेत. ‘एका वेळी दहा गोष्टींवर काम करणं, घर आणि काम यामुळे सतत अपराधी भावनेने त्रस्त असणं अशा गोष्टीतून स्वत:ला मुक्त केलं तर प्रत्येक स्त्री संशोधक पेटंट फाइल करू शकते’- असं पूनम म्हणते.

अनेक जबाबदाऱ्यांमध्ये स्त्रिया स्वत:ला इतकं अडकवून घेतात की काही नवा विचार करायला त्यांचं डोकं रिकामंच राहात नाही. शिवाय बऱ्याच स्त्रिया सतत कुठल्या तरी न्यूनगंडाने ग्रासलेल्या असतात. संशोधन वगैरे आपला प्रांत नाही असला विचार करणाऱ्या स्त्रियांनी हे कधीही विसरता कामा नये की स्वयंपाकघर ही सुद्धा त्यांना मिळालेली सगळ्यात मोठी प्रयोगशाळा आहे आणि भारतात नुसतं उत्तम शिक्षण स्त्रियांना देऊन उपयोगाचं नाही. तर त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक पाश्र्वभूमीतून त्यांना ही प्रेरणा मिळाली तरच पेटंट्स मिळवणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अजून फार लांबचा पल्ला गाठायचा आहे!

तुम्ही आहात सर्वार्थाने जोडीदार आपल्या पत्नीचे?

आज अनेक घरांतली स्त्री ही नोकरी- करिअर वा व्यवसाय करणारी, वेगळं काही करू पाहाणारी आणि म्हणूनच खूपच व्यग्र झाली आहे. खूप मेहनत घेऊनही अनेकदा तिला घर आणि नोकरी याच्यातला समतोल साधणं शक्य होतोच असं नाही. मग असमाधान, निराशा, दु:ख, त्यातून होणारी चिडचिड, या गोष्टी येतात. अशा वेळी तिचा पती तिच्या मदतीला आला, त्याने तिच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर तिचा प्रत्येक दिवस आनंदाचा,  समाधानाचा असेल यात शंका नाही. आज अनेक पुरुष अशी मदत करत असतात. म्हणूनच समस्त नवरे मंडळींना (निवृत्त नव्हे)आम्ही आवाहन करतो आहोत, तुम्ही करता असं सहकार्य? अर्थात हे सहकार्य फक्त मदतीपुरतं मर्यादित न राहता एखाद्या कामाची संपूर्ण जबाबदारी, तीही नियमितपणे घेणं अपेक्षित आहे. आपल्या बायकोचा सर्वार्थाने जोडीदार असणाऱ्या पुरुषांकडून आम्ही त्यांचे अनुभव मागवत आहोत. आम्हाला कळवा ३०० शब्दांमध्ये. अनुभव प्रामाणिक हवेत, हे तर खरंच. मात्र पूर्वापार ‘तिच्या’ समजल्या जाणाऱ्या नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या तुम्ही घेता? पारंपरिक पुरुषी मानसिकतेपलीकडे जाऊन तुमच्या पत्नीला तुम्ही नेमकी कशी साथ देता ते आम्हाला कळवा. योग्य अनुभवांना ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. तुमचे हे अनुभव ३० नोव्हेंबपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवा.

  • पत्रावर ‘जोडीदार सर्वार्थाने’ असा उल्लेख असणे आवश्यक आहे.
  • आमचा पत्ता – लोकसत्ता, चतुरंग, ईएल – १३८,
  • टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.
  • ई-मेल – chaturang@expressindia.com

 

मृदुला बेळे

mrudulabele@gmail.com