शहापूरच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हजारभर विद्यार्थ्यांचा धीरज आधार बनला आहे. पत्नी नीलम हिच्या अबोल, अव्यक्त साथीने अवघ्या ३१व्या वर्षीच त्याने हे शिवधनुष्य पेललंय. त्यासाठी बढतीही नाकारली असून आता शाळा डिजिटलही केलीय. तालुक्यातील उर्वरित ३६८ शाळांपर्यंतही ही ज्ञानगंगा न्यायचा मानस असणाऱ्या धीरज डोंगरे यांच्याविषयी..
प्रसंग १३-१४ वर्षांपूर्वीचा. ठाण्याच्या ‘ज्ञानसाधना’ कॉलेजमधील बारावीच्या वर्गात कुठल्याशा परीक्षेच्या गुणपत्रिका वाटताना शिक्षकांनी एका मुलाला उभं केलं आणि हेटाळणीच्या सुरात म्हणाले, ‘ज्ञानसाधना विद्यालयात शिकतोस आणि तुझी अवस्था मात्र ज्ञान साधेना अशी आहे..’ त्याच्या या उनाडटप्पूपणामुळे घरादारासकट सगळ्यांनी ओवाळून टाकलेलं, पण आज त्याच मुलाची आरती तेच जग करतंय. हा चमत्कार गेल्या ८-१० वर्षांतला. शहापूरच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हजारभर विद्यार्थ्यांचा आधार बनलेल्या या मुलाचं नाव धीरज दत्तात्रय डोंगरे. पत्नी नीलम हिच्या अबोल, अव्यक्त साथीने अवघ्या ३१व्या वर्षीच त्याने हे शिवधनुष्य पेललंय आणि पाठराखीणीच्या या भरवशावर तालुक्यातील उर्वरित ३६८ शाळांपर्यंत पोहोचण्याचा त्याचा निर्धार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या, राष्ट्रपतीपदक (जनगणना) विजेत्या त्याच्या आईच्या (लतिका डोंगरे) आग्रहावरून जेव्हा त्याने १२वी नंतर डी.एड.ला प्रवेश घेतला तेव्हाच आयुष्याच्या नव्या वळणावर त्याचं पहिलं पाऊल पडलं. ठाणे महानगरपालिकेच्या शाळांतील मुलांसमोर डी.एड.चे पाठ घेताना या ‘नाही रे’ वर्गातील मुलांशी त्याची प्रथम ओळख झाली. पदविका मिळाल्यानंतर धीरजची नेमणूक शहापूर तालुक्यातील सह्य़ाद्रीच्या डोंगरकपारीत वसलेल्या दुर्गम अशा बेलवली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली. ही शाळा शहापूरपासून ३६ कि.मी. दूर. नव्या आयुष्याची सुरुवात करायला निघालेला हा २१ वर्षांचा मुलगा प्रथम ट्रेन मग बस आणि पुढे अडीच किलो मीटर जंगलाचा रस्ता तुडवत चुकत-माकत ३ तासांनी शाळेत पोहोचला तेव्हा तिथली परिस्थिती आल्या पावली परत जावं अशी. मोडकळीला आलेली एकुलती एक वर्गखोली आणि शिक्षणाचं देणं-घेणं नसलेली १ ते ४थी पर्यंतची ४०/४५ मुलं. घूमजावच्या बेतात असणाऱ्या धीरजला गावकीने अडवलं. अशिक्षित पण मुलाबाळांनी शिकलं पाहिजे अशी आस्था बाळगणाऱ्या त्या गावकऱ्यांच्या आग्रहापोटी तो थांबला आणि मग तिथलाच झाला.
मार्ग खडतर होता. अभ्यासाचं वातावरण तर सोडाच, कुठलीच शैक्षणिक साधनंही हाताशी नव्हती. धीरजने मुलांशी बोलून त्यांचे प्रश्न समजून घ्यायला सुरुवात केली. जाण्यायेण्यात वेळ जायला नको म्हणून गावातच राहू लागला. हळूहळू त्याचं काम आणि त्यातील त्याची तळमळ गावकऱ्यांपर्यंत पोहोचायला लागली आणि त्यांचं सहकार्य मिळायला सुरुवात झाली. याच धडपडीच्या काळात ‘दुर्गसखा’ हा त्याचा ट्रेकिंगचा ग्रुप आपल्या या मित्राचं काय चाललंय ते बघण्यासाटी बेलवलीला आला. या दहा जणांनी नंतर शंभर माणसं आणली. त्यानंतर काम पाहून मदतीचे हात पुढे येत राहिले. आज धीरजचा परिवार चार ते पाच हजार माणसांपर्यंत पोहोचलाय, त्यात सर्वसामान्यांपासून चित्रपट उद्योगातील हस्तींपर्यंत विविध क्षेत्रांतील व्यक्ती त्यात आहेत. तो म्हणतो, ‘मी आधी लोकांचा विश्वास- ‘ट्रस्ट’ मिळवला व दहा वर्षांनी अलीकडेच (जानेवारी २०१६) ट्रस्ट स्थापन केला. ‘विंग्ज फॉर ड्रीम्स’ या त्याच्या संस्थेच्या स्थापनेपूर्वी तो सर्व मदत शक्यतोवर वस्तू रूपाने घेत होता हे विशेष.
कामाचा कैफ इतका होता की लग्नाचा विचारही त्याच्या मनात येत नव्हता. पण दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या मुलाला हक्काची सोबत हवी हा आईचा हट्ट. यावर तोडगा म्हणून त्याने आपल्या अपेक्षांची लांबलचक यादी आईला पढवली. परंतु आईच्या सुदैवाने त्याच्या सर्व अटी म्हणजे.. मी आधी माझ्या कामाचा मग कुटुंबाचा.. प्रत्येक शनिवार-रविवार मी एक तर भेटायला येणाऱ्या माणसांबरोबर असेन किंवा माणसांच्या शोधात.. कमीत कमी गरजा हे माझ्यासह जगण्याचं सूत्र राहील.. इत्यादी इत्यादी. हे सगळं आनंदानं स्वीकारणारी सहचरी त्याला नीलमच्या रूपाने मिळाली. एवढंच नव्हे तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ती त्याच्या कार्याची ऊर्जा बनली.
खांद्याला खांदा भिडवून काम म्हणजेच सेवाकार्यात साथ असं थोडंच आहे? काही गुण प्रथमदर्शनी लक्षात नाही येत पण म्हणून त्यांचं मोल काही कमी होत नाही. शाळेला भेट देण्यासाठी कोणी पाहुणे आले की त्यांच्या जेवणाचं ठिकाण ठरलेलं. ते असतं अर्थातच यांचं शहापूरमधलं घर. मग ते पाहुणे पाच असोत वा पंचवीस, सर्वाच्या ताटात तांदळाची भाकरी, भाजी व डाळ-भात असे किमान चार पदार्थ तरी पडणारच. तेही हसतमुखाने, छोटय़ा ईश्वरीला सांभाळून. झालंच तर इथल्या गरीब विद्यार्थ्यांना, त्यांच्या कुटुंबाला भेट दिलेल्या वस्तूंची गाठोडीही यांच्याच घरी येऊन पडतात. त्यात मेडिकल किट्सपासून खेळण्यापर्यंत आणि कपडय़ांपासून भांडय़ाकुंडय़ांपर्यंत अनेक गोष्टी असतात. या सामानाची वर्गवारी करून ते गठ्ठे धीरजच्या गाडीच्या डिकीत ठेवण्याची जबाबदारीही तिने घेतलीय. एम.ए.बी.एड. असल्याने (धीरजनेही नंतर एम.ए. केलंय) संस्थेचे हिशेब ठेवण्याचं कामंही तिने अंगावर घेतलंय.
ईश्वरीच्या जन्माची कथाही डोळ्यात पाणी आणणारी. तीनदा गर्भपात झाल्यानंतर या मुलीच्या जन्माच्या प्रसंगी जेव्हा नीलमला वेणा सुरू झाल्या तेव्हा धीरजची स्वारी नेमकी शाळेच्या कोणत्या तरी अती महत्त्वाच्या कामात गुंतलेली. सासऱ्यांना बरोबर घेऊन तिने हॉस्पिटल गाठलं. त्याबद्दल एवढीशी देखील तक्रार नाही. उलट बातमी समजल्यावर तो धावत भेटायला आला तेव्हा हिचे शब्द होते, ‘‘मला एक वचन द्याल? यापुढे आपल्या बाळाचा प्रत्येक वाढदिवस आपण तुमच्या कोणत्या ना कोणत्या शाळेत साजरा करायचा. ज्या मुलांनी कधीही केक बघितला नाही, त्यांना तो देण्यातंच खरं अप्रूप.’’
नीलमच्या या इच्छेपासून प्रेरणा घेत दर ३ महिन्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी ५० मुलांना पुरेल एवढा केक एखाद्या शाळेत वाटायचा नवा नेम सुरू झाला. सध्या ‘विंग्ज् फॉर ड्रीम्स’ संस्थेचे एकूण १६ उपक्रम सुरू आहेत. दर वर्षी जून महिन्यात हजारएक मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. त्यासाठी दाते, शिक्षक, ग्रामस्थ व मुलं यांचं नेटवर्क अचूक काम करतं. दिवाळी फराळ वाटप ही योजना गेली १० र्वष सुरू आहे. १०-१५ कुटुंबांपासून सुरुवात होऊन आता त्याचा विस्तार ५०० कुटुंबांपर्यंत पोहोचलाय. हा फराळदेखील गावातले बचत गट तयार करतात. त्यासोबत उटणं, तेल व सुवासिक साबणाचा संचही भेट दिला जातो. याशिवाय दहावीच्या पुढे शिकणाऱ्या मुलांसाठी दत्तक पालक योजना, कुटुंबाला रोजगार मिळवून देण्यासाठी स्वयंसिद्धा प्रकल्प, सर्वासाठी वाचनालय, असे उपक्रमही आता मूळ धरत आहेत. दत्तक पालक योजनेतील शारदा हेमंत भोईर या मुलीला तर धीरज-नीलमनेच आपली मानलीय. ११वी, १२वीची २ र्वष ती यांच्या घरीच राहून शिकतेय.
शहापूरच्या दुर्गम भागातली डोंगरे गुरुजींची शाळा आता ‘डिजिटल’ बनलीय. चार संगणक, एक टी.व्ही., प्रोजेक्टर, पडदा, संस्कारक्षम गोष्टींच्या काही सी.डी., गोष्टींची हजारएक पुस्तकं अशा खजिन्याने ती समृद्ध आहे. शाळेतील छोटी-छोटी मुलं सहजतेनं संगणक हाताळतात. पेंट ब्रश हा पर्याय निवडून चित्रं रंगवतात. आम्ही जंगलाच्या वाटेने शाळेकडे जात असताना सायकलवरून जाणाऱ्या एका ९-१० वर्षांच्या मुलीने गुरुजींना थांबवून पेनड्राइव्ह आणलात का विचारलं.. का तर तिला गाणी डाऊनलोड करून डान्स बसवायचा होता.. गावातल्या त्या चिमुरडीला पेनड्राईव्ह हाताळता येत होता. हे कौतुकास्पद आहे. फक्त आपल्याच शाळेसाठी नव्हे तर आजूबाजूच्या २५ शाळांना डोंगरे गुरुजींनी संगणक मिळवून दिलेत. मुंबईच्या पोद्दार शाळेच्या ग्रुपने दिलेला प्रोजेक्टर गरजेनुसार शाळाशाळांमधून फिरत असतो. परंतु या तंत्रज्ञानापेक्षाही मुलांशी होणारा संवाद गुरुजींना (धीरजला) जास्त महत्त्वाचा वाटतो. आपुलकीच्या या उबेमुळेच ही बुजरी मुलं आता बोलायला लागलीत.
बेलवलीमधील डोंगरे गुरुजींच्या शाळेच्या इमारतीचा कायापालट होण्यापाठीही एक हृद्य कथा आहे. २०१४ मध्ये जेव्हा नियमानुसार गुरुजींची वरच्या पदासाठी बदली झाली तेव्हा गावकऱ्यांनी गुरुजींना आगळीवेगळी भेट देण्यासाठी स्वत:च्या हिमतीवर नवी इमारत बांधायचं ठरवलं. त्यानुसार ६० उंबऱ्यांच्या त्या गावाने वर्गणी काढून सिमेंट, बांबू, पत्रे असा लाख-दीड लाखांचं सामान आणलं व श्रमदानाने आधीच्या वर्गखोलीला लागून एक नवी खोली व व्हरांडा उभा केला. उद्घाटनासाठी शहापूरचे आमदार आले होते. त्यांना ग्रामस्थांनी गळ घातली.. गुरुजींना इथंच राहू द्या.. हे प्रेम बघून गुरुजीच विरघळले आणि त्यांनी बढती नाकारून इथेच थांबायचं ठरवलं. डोंगरे गुरुजींच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे उपशिक्षक पुंडलिक घुडे यांनीही बदलीसाठी नकार कळवला. आणि हीच कर्मभूमी आपली मानली.
वाटेवरच्या कातकरी वाडी (टेंबुर्ली) या शाळेतही आम्ही डोकावलो. इथली सर्व मुलं वीटभट्टी मजुरांची. आईवडील कामासाठी स्थलांतरित झाले की शिक्षण ठप्प. तरीही नेटाने गेली १४ र्वष केवळ ५०० रुपये मानधनावर शाळा चालू ठेवणाऱ्या ‘दामू हिलम’ यांचं डोंगरे गुरुजींना कोण कौतुक! आता ही शाळाही जिल्हा परिषदेच्या पंखाखाली आलीय. आता हिलम गुरुजींना नव्या दमाच्या नितीन हरणे गुरुजींचीही साथ लाभलीय. इथेही संगणक व टी.व्ही. आहे. शिवाय धो धो गळणारी शाळाही पोद्दार ग्रुपने नवी कौलं दिल्याने हसू लगलीय.
शहापूरच्या आदिवासी व दुर्गम भागात फुलत असलेलं शिक्षण घरचं नंदनवन पाहून परतताना मी नि:शब्द झाले होते. बाहेरच्या माळरानाकडे बघत धीरजने आपलं स्वप्न सांगितलं, ‘‘आम्हा दोघांचं एक स्वप्न आहे. सह्य़ाद्रीच्या कुशीत राहणाऱ्या या मुलांसाठी इथेच एक गुरुकुल उभारायचं. ज्यात मुलांना जे जे शिकण्याची इच्छा आहे ते ते शिकायला मिळेल.. मुलं वेगवेगळे प्रयोग करतील.. वाद्यं वाजवण्यात निपुण होतील.. खेळात प्रावीण्य मिळवतील.. आणि मुख्य म्हणजे आमच्याभोवती सतत बागडत राहतील.’’ मी म्हणाले, ‘तथास्तु’. तुम्हालाही तसंच वाटतंय ना?
धीरज डोंगरे- ९८६०२९६९१९
dhirjdongare@gmail.com
waglesampada@gmail.com