वेळापत्रकाप्रमाणे चालणाऱ्या जगण्यात विरंगुळ्याचे क्षण मिळतात ते सहलींमधल्या धम्माल मस्तीत.. वर्षांतले काही दिवसच हातात असतात आणि नातेवाईकांना भेटण्याबरोबर स्वत:ला विश्रांती, आनंदही हवा असतो. मग अशा वेळी छोटय़ामोठय़ा सहलींचे नियोजन करून दोन्ही हेतू साध्य केले जातात. माहेरच्या माणसांबरोबर बालपण पुन्हा अनुभवता येतं आणि सासरच्या माणसांबरोबरची नाती घट्ट करता येतात.. असेच हे काही अनुभव..

रोजची तीच ती दगदग, घडय़ाळाकडे पाहून धावणारे जीवनचक्र, आरोग्याची परवड, कौटुंबिक स्वास्थ्याची हरवलेली वीण, सगळं काही असूनही काही तरी हरवलं असल्याची भावना, या सगळ्यातून मोकळा श्वास घेण्याची प्रत्येक स्त्रीची इच्छा असते; पण ही सारी धडपड करताना दोन-चार घटका उसंतही हवी असते. परंतु हाताशी असतात वर्षांतले काहीच दिवस, सगळ्यांच्या सोयीचे असे. मग त्या वेळी वर्षभरातली जवळच्या मंडळींना भेटण्याची इच्छाही पूर्ण करायची आणि स्वत:लाही ताजंतवानंही करायचं असेल तर सुवर्णमध्य गाठला जातो तो कुटुंबासोबत पर्यटन करण्याचा. नातीही जपली जातात आणि वर्षभर पुरणारी ऊर्जाही जमा होते. मित्रमंडळी असो की सासर, माहेरची माणसं. त्यांच्याबरोबरच्या नात्याचा आल्हाददायी अनुभव घेतला जातो आणि आत्तापर्यंत न गवसलेले क्षण तिलाच नव्हे तर साऱ्यांनाच येऊन बिलगतात. आईसोबत, बहिणीसोबत कित्येक वर्षांनी मारलेल्या मनमुराद गप्पा, जावेकडून वा नणंदेकडून अचानक समजलेलं एखादं गुपित, बंधुराजाकडून किंवा दिराकडून मिळालेली अनपेक्षित ट्रीट, तर कधी सासुसासऱ्यांकडून मिळालेली कौतुकाची थाप असे आनंददायी क्षण तिच्या वाटय़ाला येतात आणि हे विखुरलेले सूर पुन्हा नादावायला लागतात. एकूण काय, तर तिला हवा असणारा हा बदल केवळ आराम न राहता मौजमजा आणि मस्ती यामुळे बहरतोय आणि अशा विकल्पांमुळे तिच्या माहेरपणाची संकल्पनाही बदलतेय..
या बदलत्या संकल्पनेसाठी स्त्रीचा कमावता हातही कारणीभूत ठरतो आहे. आपला आनंद आपल्याला मिळवता येतो याचा ‘साक्षात्कार’ झाल्याने आयुष्याच्या धावपळीत निसटू पाहाणारे आनंदाचा क्षण पकडण्याचा प्रयत्न तिच्याकडून होताना दिसतो आहे. अर्थात तिच्या या आनंदात सोबतीला असतात तिच्या जिवाभावाची माणसंही! जे आपला सुखाचा विचार करतात त्यांच्या सुखाचा विचार करणं ही आपलीही जबाबदारी असल्याचं तिच्या लक्षात आलं असल्यानं आनंद आणि शारीरिक विश्रांती एकत्र घेण्याच्या कल्पनेतूनच एकत्रित पिकनिकला जाणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. संज्योत त्यापैकीच एक. नृत्यकलेत प्रावीण्य मिळवल्यानंतर त्याच क्षेत्रात करिअर करायचं संज्योतनं ठरवलं. लग्नानंतरही तिनं करिअर सुरू ठेवलं. उलट तिचं करिअर सर्वार्थानं बहरू लागलं. लग्नानंतर तिनं स्वत:ची नृत्य अकादमी सुरू केली. तिचे स्वत:चे शोदेखील होऊ लागले. दरम्यान, तिच्या मुलाचा जन्म झाला; पण त्याची पूर्ण जबाबदारी घेत संज्योतच्या सासू-सासऱ्यांनी तिच्या करिअरला प्रोत्साहन दिलं. मुलाचा सांभाळ करण्यात दोघांचाही १०० टक्के वाटा असतो. त्यामुळे त्यांना मुलाच्या वेळा सांभाळूनच बाहेर पडावं लागतं, तर नृत्य अकादमीसाठी जास्त वेळ देणं गरजेचं असल्यामुळे संज्योतलाही कुठे जाता येत नाही. माहेर जवळ असूनही अगदी उभ्या उभ्याच ती आईबाबांना भेटते. अनेकदा नात्यातील अनेक कार्यक्रमांना हजर राहता येत नाही. या सगळ्यातून स्वत:साठी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसाठी वेळ काढणं संज्योतला फार मुश्कील होतं. म्हणूनच काही दिवसांची सुट्टी घेऊन सासू-सासऱ्यांसह बाहेर जाण्याचा तिचा प्रयत्न असतो. तिच्या आजेसासूबाईही तिच्याचकडे असतात. अलीकडेच त्यांनाही घेऊन जायचं तिनं ठरवलं आणि हे करता करताच घरातील सगळ्या मंडळींसह ग्रुप टूर करायची ठरलं.

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
‘बचपन के दिन भी क्या दिन थे’ अनुभवणारे संज्योत मिरजकर यांचे कुटुंब.
‘बचपन के दिन भी क्या दिन थे’ अनुभवणारे संज्योत मिरजकर यांचे कुटुंब.

हल्लीच संज्योत आणि तिच्या कुटुंबातील १५ जण लोणावळ्यातील एका रिसॉर्टवर मस्त पिकनिक करून आले. संज्योतच्या आजेसासूबाईचं वय ८७ वर्षे असल्यानं त्यांच्या सोयीनुसार पिकनिकसाठी हे जवळचं ठिकाण ठरवण्यात आलं होतं. संज्योत सांगते की, केवळ तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या सासू-सासऱ्यांसाठीदेखील ही पिकनिक रिफ्रेशिंग ठरली. ‘‘रोजच्या रुटीनमधला बदल म्हणून जरी या पिकनिककडे पाहिलं तरी माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची होती. माझं शेडय़ूलच असं असतं की, मी घरासाठी तितकासा वेळ देऊ शकत नाही. शिवाय त्याच त्याच कामामुळे मनाला आणि शरीराला थकवा येतोच. यात बदल म्हणून आईबाबांकडे जावंसं वाटतं, पण मी तिथे गेल्यानंतर आई काही स्वस्थ बसत नाही. काही ना काही करून मला खायला घालण्याचा तिचा प्रयत्न असतो. माझ्यामुळे तिची उगीच दगदग होते. शिवाय मी फक्त स्वत:चाच विचार करतेय की काय, अशी बोचही मनाला राहते. मला जसा बदल हवा असतो, तसाच माझ्या सासू-सासऱ्यांनाही हवा असणार. त्यामुळेच आम्ही अशा प्रकारे टूर्स नेहमीच ठरवतो. सासू-सासरे आणि आम्ही तिघे असे तर आम्ही जातोच, पण या वेळची टूरही आमच्यासाठी वेगळी होती. या टूरमध्ये माझ्या नवऱ्याचे मामा-मामी, त्यांच्या तीनही मुलांचं कुटुंब, त्यांची मुलं असे आम्ही बरेच जण होतो. कौटुंबिक कार्यक्रमात वा इतर ठिकाणी भेटल्यानंतर एकमेकांशी बोलायला तितकीशी सवड मिळत नाही, परंतु या पिकनिकला गेल्यानंतर मात्र आम्ही मनमोकळेपणानं खूप गप्पा मारल्या, दंगामस्ती केली, खूप फोटो काढले. आमचं रूढार्थाने असणारं नातं मैत्रिणींसारखं झालं. खरं तर माहेरपण उपभोगल्याचा आनंद आणि ते विसाव्याचे क्षण मला या पिकनिकमध्ये मिळाले, असंच मला वाटतं. आता तर दरवर्षी अशा पिकनिक होणार हे नक्की, कारण बच्चेकंपनीचीच फर्माईश आहे ना!’’
शरीराचा थकवा हा थोडय़ाशा आरामानंतर निघून जातो, पण मनाचा थकवा हा कुठे तरी वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वातावरणात घालवल्याशिवाय कमी होत नाही. जुई खोपकर-लागू या मूकबधिरांसाठी एक संस्था चालवतात. या मुलांना प्रशिक्षण देण्यापासून त्यांच्यावर उपचार करण्यापर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या संस्थेकडून केल्या जातात. यात जुई यांचा सहभाग अनिवार्यच असतो. अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याने त्यांना स्वत:साठीदेखील वेळ काढणं अवघडच असतं. याशिवाय त्या निसर्ग अभ्यासक असल्याने जो काही मोकळा वेळ मिळतो तो यासाठी घालवण्यात त्यांना आनंद वाटतो, पण तरीही माहेरी जाऊन आईला भेटावं, काही वेळ तिच्यासोबत घालवावा, असं त्यांना मनोमन वाटत होतं. मात्र यासाठी आईकडे जाऊन राहणं काही शक्य होईना. तसंच जुई यांच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यानं आईला एकटेपण आलं होतं आणि मुख्यत: त्यांनाच या वातावरण बदलाची गरज होती. जुई बोलता बोलता त्या ट्रिपच्या दिवसांतच पोहोचल्या एकदम. म्हणाल्या, ‘‘बाबा गेल्यापासून आई उदास असायची. तिनं आमच्याशी खुलून बोलावं असं आम्हाला वाटायचं म्हणून मग मी आणि माझ्या बहिणीनं ट्रिपला जायचं ठरवलं. माझी ही बहीण अमेरिकेत असते. तीही होती. तिला वेगळा वेळ देता शक्य नसल्यानं मग मी, माझी बहीण, आई आणि आमच्या काकी अशा आम्ही चौघी जणी महाबळेश्वरला फिरायला गेलो. किती आनंदाचे दिवस होते ते. एक तर खूप दिवसांनी आम्ही अशा एकत्र आलो होतो. एरव्ही भेटणं होतं, पण पिकनिकचा माहोल वेगळाच असतो. मुख्य म्हणजे मनाने आपण मोकळे असतो. त्यामुळे लहानपणाच्या आठवणी जागवणं, त्या वेळी जरा त्रासाच्या, पण आता आठवल्या तरी हसू येतील अशा अनेक आठवणींना उजाळा मिळाला. आईसुद्धा खूप रमली त्या आठवणींमध्ये. आम्ही तर चक्क लहानपणी करायचो तसा फोटोसाठी आईकडे हट्टही केला. आईने वयाचा बाऊ न करता आमच्यासोबत मजा केली. कधी नव्हे ती चक्क सेल्फीसाठीही तयार झाली. आईकडून लाड करून घेण्याचं वयही आता निघून गेलं खरं, पण या पिकनिकला ते वय पुन्हा परतल्याचं जाणवलं. आमचं बालपण आम्हाला काही काळ का होईना परत मिळालं. त्याचा रिफ्रेशिंग आनंद खूपच होता. खरं तर आईच्या सोबतीमध्ये अशी मजा घेणं, आईचे लाड पुरवून तिला आनंद येणं हेच खरं माहेरपण आहे. माहेरी जायला जमो न जमो, असं बाहेर काही दिवसांसाठी भेटलो तरी माहेरपणाचं सुख मिळून जातं. आमचा तरी अनुभव तसाच होता. खरंच खूप धम्माल केली.’’
कामाच्या आणि संसाराच्या व्यापामुळे अनेकदा माहेरी जाणं कमीच होतं. आई-बाबा असेपर्यंत थोडं तरी जाणं होतं. नंतर तर अनेकींचं माहेरी जाणं कमी होऊन जातं, पण नाती घट्ट असतातच. मग त्यातून सुवर्णमध्य काढला जातो तो एकत्रित फिरायला जाण्याचा. दादरमधील श्रद्धा गोगवेकर त्या आणि त्यांच्या दोन्ही बहिणी कुटुंबासह पिकनिकला जातात, अगदी ठरवून. श्रद्धाताई नुकत्याच निवृत्त झाल्यात आणि सध्या त्यांचा मुलगा परदेशात असल्यानं त्यांच्याकडे भरपूर वेळही आहे. गेल्याच महिन्यात त्या बहिणींसोबत ताडोबा जंगल सफारीला गेल्या होत्या. म्हणाल्या, ‘‘नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी गेल्याचा आनंद तर होताच, शिवाय या टूरमध्ये त्यांना छान रिलॅक्सही होता आलं. त्या सांगतात, आम्ही तिघी बहिणी फोनवरून कायम संपर्कात असतो, पण एकत्र फिरायला जाण्यातला आनंद वेगळा असतो. शिवाय या वयात जवळच्या माणसांबरोबर गेल्याने भावनिक आणि मानसिकदृष्टय़ाही सुरक्षित वाटतं. आमचे आईबाबा होते तेव्हा त्यांना सोबत घेऊनही अनेक टूर आम्ही केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक टूरला त्यांची आठवण ओघाने येतेच.’’
नुकतीच निगडे आणि त्यांचे कुटुंब व मित्रपरिवार नैनिताल-मसुरी-कॉर्बेट अशी टूर करून आले. सतरा जणांच्या या एकत्र टूरची वेगळीच मजा होती. ‘‘या टूरमुळे आमचे पूर्वीचे दिवस परत आल्यासारखं वाटलं,’’ निगडेताई सांगतात. ‘‘रोज आपण एकमेकांच्या संपर्कात असलो तरी पिकनिकच्या ठिकाणी गेल्यानंतर हे भावनिक बंध अधिकच दृढ होतात. विसाव्यासाठी, विश्रांतीसाठी माहेरी जाणं हे ओघाने होतंच, पण आता वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे तितकंसं जाणं होत नाही. मग त्याऐवजी अशा पिकनिकद्वारे सर्वाची भेटही होते, मनाला दिलासा मिळतो आणि माहेरी गेल्याचं सुखही अनुभवता येतं.’’
‘वीणा वर्ल्ड’च्या संचालिका वीणा पाटील, याच संकल्पनेला बिझनेसचं रूप दिल्याचं सांगतात. ‘‘स्त्रियांनी बाहेर पडायला हवं, हा उद्देश तर आमचा असतोच. आता युरोप टूरसाठी १२५ जणी फक्त ‘वुमन स्पेशल’ टूरला आमच्याबरोबर आहेत, तर पुढच्या महिन्यात अजून १०० जणी याच टूरसाठी येत आहेत. संख्या वाढतेच आहे अजून. एका महिन्याच्या कालावधीत युरोपसारख्या ठिकाणी पंधरा दिवसांच्या टूरसाठी इतक्या संख्येने इतक्या जणी येत असतील, तर त्याचा अर्थ स्त्रियांच्या वैचारिक, मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनात मोठाच बदल आहे किंवा झाला आहे. खरं तर पूर्वी अशा पद्धतीच्या टूरचा विचार मीही केला नसता. स्त्रियांची ही भूमिका बदलणं हा सर्वागीण विकास आहे. समाजात तिच्याबद्दल सकारात्मक विचारप्रवाह रुजताहेत हे तिच्यासाठी व तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी लाभदायीच आहे. अशा स्वतंत्र टूर्सबरोबरच एकत्र कुटुंबानं वेळ घालवत एखाद्या टूरचं नियोजन करण्याकडेही लोकांचा कल वाढला आहे. अनेक जण तशा पद्धतीच्या टूर्स आमच्याकडून आखूनही घेतात. यात सासू-सासऱ्यांसमवेत, आईवडिलांसमवेत किंवा माहेर व सासरकडील अशा दोन्ही सदस्यांसमवेतही टूर नियोजित केली जाते. कधी कधी फक्त बहिणी-बहिणी किंवा फक्त भाऊ -बहीण, त्यांची कुटुंबं असंही असतं. काही कुटुंबामध्ये तर वयस्कर आजी-आजोबांचाही सहभाग दिसून येतो. पूर्वी दिवाळी वा इतर सण काकांच्या घरी, मामाच्या घरी जाऊन साजरे केले जायचे ते प्रमाण आता खूप कमी झालं आहे व त्याऐवजी एकत्रित भटकंतीचे असे पर्याय शोधले जात आहेत. आमच्याकडे दिवाळी वा उन्हाळ्याच्या सुट्टीत अशी कौटुंबिक पर्यटनासाठी खूपदा विचारणा होते. इतकंच नव्हे जी कुटुंबं परदेशात स्थायिक झाली आहेत ती भारतात आल्यानंतर केवळ इथे येऊन राहण्याऐवजी इथल्या नातेवाईकांसोबत पर्यटनाचा आनंद घेतात. अगदी कमी कालावधीसाठी आल्यामुळे सर्व नातेवाईकांना एकत्रित भेटता येतं आणि मनसोक्त भटकंतीही होते. अगदी आताचं एक उदाहरण आहे. अमेरिकेत स्थायिक झालेली मुलगी तिच्या आईबाबांसह श्रीलंका टूरला आली होती. भारतात येण्याआधीच तिने ही टूर ठरवली होती. तिचं म्हणणं होतं की, तिने जर घरी राहायचं ठरवलं असतं तर आईबाबा दोघेही तिला फार वेळ देऊ शकले नसते, कारण इतक्या दिवसांनी ती घरी आली आहे म्हटल्यावर सतत कोणी तरी भेटायला येणार. या सगळ्यांची व माझी ऊठबस करण्यातच त्यांचा वेळ जाणार आणि त्यांचा हवा तो वेळ तिला मिळणार नाही. हे लक्षात घेऊनच तिनं टूर ठरवली होती. या आठ दिवसांच्या कालावधीत तिला खूप आनंद मिळाला. आईबाबांशी मनमोकळेपणानं बोलता आलं जे घरी करता आलं नसतं. हा माहेरचा विसावा तिला या टूरमध्ये अनुभवता आला. त्यामुळे ती जातानाही खूप खूश होती. यात एक गोष्ट जाणवते की, स्त्रियांना मिळालेल्या आर्थिक व वैचारिक स्वातंत्र्याचा लाभ ती आपल्या कुटुंबासाठीच करताना दिसते आणि हे सगळं करताना तिला मिळणारं समाधान हे अमूल्य असतं. तिचं कुटुंबाप्रति असलेलं प्रेम व उत्साह दिसून येतो आणि एका वेगळ्या पर्यटनाचा आनंद तिला मिळतो. पर्यटन आणि गेटटुगेदर या दोन्हीचा मेळ साधता येईल, हाच आमचाही प्रयत्न असतो.’’
थोडक्यात, विस्तारित कुटुंबातली नातीही जपायची आणि स्वत:लाही विश्रांती, आनंद मिळवायचा आहे यासाठी पिकनिक्स, ट्रिप्सचा खूप सकारात्मक उपयोग होताना दिसतो आहे.. शेवटी ही आजची स्त्री आहे, स्वत:बरोबर कुटुंबीयांच्याही आनंदाचा विचार करताना रिफ्रेश होते.. रिलॅक्स होते आणि उद्या येणाऱ्या नव्या संधींना, आव्हानांना सामोरं जायला तयार होते..