वास्तवाचे बेबाक चित्रण

‘कागजी है पहरन’ या आपल्या आत्मचरित्रामध्ये इस्मतने या खटल्याचे सविस्तर वर्णन केले आहे.

प्रभा गणोरकर prganorkar45@gmail.com

इस्मत चुगताई या उर्दूतील नवसाहित्याच्या एक आधारस्तंभ मानल्या जातात. साहित्यक्षेत्रात पूर्वी कधीही न आढळलेल्या मुक्तपणाने व दुर्मीळ अशा निर्भयपणाने आणि धीटपणाने इस्मत यांचे लेखन होत राहिले. त्यातूनच त्यांनी समाजातील दुटप्पी मूल्यव्यवस्थेवर बोचरी टीका करीत आपल्या बिनधास्त आणि बेबाक लेखनाने  समाजमन ढवळून काढले. मानवी करुणा आणि त्यातूनच येणारा कृतिशील विरोध, विद्रोह कमालीच्या ताकदीने व्यक्त करणारी ही लेखिका  म्हणूनच आजही समकालीन वाटते.

संध्याकाळचे चार-साडेचार वाजले असतील, मी माझ्या दोन महिन्यांच्या मुलीसाठी बाटलीत दूध भरून ते थंड होण्याची वाट पाहत होते. तेवढय़ात दाराची घंटा जोरजोराने वाजली. नोकराने दार उघडले तर दारात पोलीस उभे होते. ‘इस्मत चुगताईंना बोलवा, त्यांच्यासाठी लाहोर कोर्टाकडून समन्स आले आहे.’ ‘कशासाठी?’ मी बाहेर येत विचारले. ‘वाचा तुम्हीच’, पोलीस उद्धटपणे गुरकावले. माझ्या ‘लिहाफ’ या कथेवर अश्लीलतेचा आरोप होता आणि त्याबद्दल माझ्यावर खटला भरण्यात आला होता.

जानेवारीत मला लाहोर कोर्टासमोर हजर व्हायचे होते. मी समन्स घ्यायला नकार दिला, पण शाहीदने ते मला घ्यायला लावले. मला कोर्टाची भीती नव्हती. माझे वडील जज होते. तेव्हा कोर्ट आमच्या घरात, पुरुषांच्या बठकीत भरत असे. डाकू आणि चोर लोकांना हातापायात बेडय़ा घालून समोर आणले जात असे. ते आम्ही खिडकीतून बघत असू! ही बातमी वर्तमानपत्रात आल्यावर माझ्या सासऱ्यांचे एक हृदयस्पर्शी पत्र आले. शाहीदला त्यांनी लिहिले होते, ‘सूनबाईला नीट समजावून सांग, खटला ही काही चांगली गोष्ट नसते. तिला म्हणावे, रोज देवाचे आणि प्रेषिताचे नामस्मरण करीत जा. आम्ही फार काळजीत आहोत.’

‘कागजी है पहरन’ या आपल्या आत्मचरित्रामध्ये इस्मतने या खटल्याचे सविस्तर वर्णन केले आहे. सादत हसन मंटोवरही ‘धुवाँ’, ‘काली शलवार’ या कथांसाठी असाच खटला भरण्यात आला होता. एका रात्रीत ही कथा लिहून झाल्यावर सकाळी त्यांनी आपल्या भावजयीला वाचून दाखवली होती. तिला ती काही अश्लील वाटली नव्हती. ती कथा ‘अदब ए लतीफ’ या मासिकात लगेच छापूनही आली होती. ही १९४२ ची घटना.

इस्मत हे नुसरत खानम आणि मिर्जा कसीम बेग चुगताई यांच्या दहा अपत्यांपैकी नववे अपत्य. घराणे प्रतिष्ठित आणि सुसंस्कारित, सुशिक्षित. इस्मत यांनी १९३० पासून लेखन सुरू केले. ज्या मुस्लीम समाजजीवनात ती वाढली आणि वावरली, जे वास्तव तिने पाहिले आणि अनुभवले, त्याचे प्रतििबब त्यांच्या लेखनात आढळते. केवळ उर्दूतीलच नव्हे तर भारतीय साहित्यातील एक जहाल स्त्रीवादी लेखिका अशी त्यांची ख्याती झाली. भाषणस्वातंत्र्य, सामाजिक मुक्ती, स्त्री-पुरुष-समानता या तत्त्वांना प्रमाण मानून त्या स्वत: जगल्या आणि आपल्या लेखनातून त्यांनी या तत्त्वांचा उद्घोष केला.

इस्मत चुगताईंनी मुख्यत: कथालेखन केले. ‘चोटें’, ‘छुईमुई’, ‘एक बात’, ‘कलियाँ’, ‘एक रात’, ‘दोजखी’, ‘शैतान’, इत्यादी संग्रह, तसेच ‘जिद्दी’, ‘टेढी लकीर’, ‘एक कतरा एक खून’, ‘दिल की दुनिया’, ‘सौदाई’, ‘जंगली कबूतर’, ‘अजीब आदमी’, ‘बांदी’ इत्यादी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. याशिवाय नाटके, आत्मकथा, आकाशवाणीसाठी लेखन अशी प्रचंड निर्मिती त्यांच्या नावावर आहे. ‘गालिब पुरस्कार’, ‘इकबाल सन्मान’, ‘मखदूम अवॉर्ड’, ‘नेहरू अवॉर्ड’, ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार इत्यादी सन्मान त्यांना मिळाले तर १९७६ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले गेले.

सादत हसन मंटो, कृश्नचंदर, राजेंदरसिंह बेदी आणि इस्मत चुगताई हे उर्दूतील नवसाहित्याचे चार आधारस्तंभ मानले जातात. भाषाशैली, पात्रचित्रण, अनोखे विषय आणि वास्तवाचे भेदक चित्रण या संदर्भात उर्दूला नवी सामथ्य्रे देणाऱ्या लेखकांमध्ये इस्मत चुगताईंचा समावेश केला जातो. समाजातील दुटप्पी मूल्यव्यवस्थेवर बोचरी टीका करीत आपल्या बिनधास्त आणि बेबाक (धीट,धाडसी) लेखनाने इस्मत यांनी समाजमन ढवळून काढले.

निम्नमध्यमवर्गीय मुस्लीम जमातीतील तरुण, दडपलेल्या, कोमेजलेल्या स्त्रियांच्या जीवनाचे आणि त्यांच्या मनोवस्थांचे, तसेच वृद्ध, असहाय स्त्रियांच्या दुर्दशेचे चित्रण इस्मत यांनी आपल्या कथांमधून केले. ‘जनाजे’, ‘लिहाफ’, ‘गेंदा’, ‘छोटी आपा’, ‘जोडा’, ‘बिच्चूफूफी’, ‘दोजखी’, ‘एक शौहर की खातिर’, ‘भेडिम्ये’ इत्यादी त्यांच्या गाजलेल्या कथा आहेत. परवाझ’ हा स्त्रियांच्या लैंगिकतेसंबंधीच्या कथांचा संग्रह आहे.

पुढच्या काळात अनेक उर्दू अभ्यासकांनी सुरुवातीच्या काळातील महत्त्वाची स्त्रीवादी लेखिका या दृष्टिकोनातून इस्मत यांच्या कथांचा अभ्यास केलेला आहे. भोवतीचे जग समजून घ्यायचे असेल तर ‘परवाझ’मधील कथांचे सहाय्य घ्यावे लागेल असे म्हटले गेले आहे.

पितृप्रधान व्यवस्थेतील उपेक्षित, दडपलेल्या स्त्रियांचे, त्यांच्यावर घालण्यात आलेल्या बंधनांचे, त्यांच्या मनात कोंडून असलेल्या सुप्त इच्छांचे, साहित्यात पूर्वी कधीही न शोधले गेलेले विश्व इस्मत यांनी खुले केले. पण त्याबरोबरच त्यांच्या लेखनाला सामाजिक आणि अस्तित्वाशी निगडित अशा वास्तवाची इतर परिमाणेही आहेत. त्यांच्या ‘चोटें’ (१९४६) या संग्रहाच्या प्रस्तावनेत कृश्नचंदर यांनी म्हटले आहे, ‘इस्मत यांच्या कथा स्त्रीच्या अंत:करणाइतक्याच गुंतागुंतीच्या आणि जाणून घेण्यास कठीण असतात. इस्मत यांच्या कथेत स्त्रीच्या जीवनातील सौंदर्य आणि विरूपता, गहनता आणि उथळपणा, तिरस्कार आणि समर्पण, हास्य आणि अश्रू एकाच वेळी एकवटलेले आढळतात.’

‘दिल की दुनिया’ या कादंबरीत ‘कुदसिया खाला’ आणि ‘बुआ’ या दोन स्त्रियांचे अप्रतिम चित्रण आहे. कुदसियाचे पंधराव्या वर्षीच लग्न होते आणि लग्नात घातलेल्या अटीप्रमाणे नवरा विलायतेला जातो. तो तिकडून एक मेम घेऊन येतो. कुदसिया आई-वडिलांच्या घरीच राहते. तिला फेफरे येऊ लागते. तिचे केस पांढरे होऊन जातात आणि कोणत्याही निमित्ताने, भरलेले अंत:करण डोळ्यांतून वाहू लागते. तिचा दीर शब्बीर तिच्यावर मूक प्रेम करीत असतो. पण ती दुसऱ्याची अमानत म्हणून तिला स्पर्शही करीत नाही. बुआच्या लग्नाची वरात नदीत वाहून जाते. एकटीच वाचलेली बुआ भ्रमिष्ट होऊन गावात फिरू लागते. तिच्याविषयी गावात सहानुभूती आणि करुणा असते. ती दिवस-रात्र आपल्या न दिसणाऱ्या नवऱ्याशी लाडाचे, प्रेमाचे बोलणे व हावभाव करत हिंडत असते. तिच्याकडून त्या दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकणे हे कुदसियाचे रंजनाचे साधन असते. काळ जातो, तशी बुआ वृद्ध, जर्जर होत जाते. कुदसियाला मात्र नव्याने मोहोर फुटू लागतो. कादंबरीच्या शेवटी कुदसियाची मुलगी निवेदिकेला भेटते. आपली आई आणि वडील शब्बीर यांनी घरातून पळून जाऊन केलेल्या लग्नाचा तिला अभिमान असतो.

नेहमीच्या अर्थाने रोमँटिक कथा इस्मत चुगताई यांनी लिहिलेल्या नाहीत. ‘जंगली कबूतर’ या कादंबरीत पती-पत्नीच्या नात्याचे विलक्षण रूप त्यांनी उभे केले आहे. तर ‘सौदाई’ या कादंबरीत नबाबाचा दिमाख दाखविणाऱ्या पुरुषांच्या मनातील वासनेचे थमान व्यक्त केले आहे. साहित्यक्षेत्रात पूर्वी कधीही न आढळलेल्या मुक्तपणाने व दुर्मीळ अशा निर्भयपणाने आणि धीटपणाने इस्मत यांचे लेखन होत राहिले. इस्मत चुगताई ओळखल्या गेल्या त्या ‘लिहाफ’ या कथेची लेखिका म्हणून. ‘लिहाफ’ ही वाइट नशीब असलेली कथा होती असे इस्मत यांनी म्हटले आहे. या कथेमुळे त्यांना खूप सोसावेही लागले आणि नंतर अनपेक्षित सन्मानही लाभले. ‘लिहाफ’ कथेतील पात्रे खऱ्याखुऱ्या व्यक्तींवर आधारलेली होती हेही त्यांनी सांगितलेले आहे. ‘लिहाफ’ची केंद्रवर्ती व्यक्तिरेखा ‘बेगम जान’ ही एका नबाबाची बायको. गरीब घरातली, नाजूक बांध्याची बेगम नवऱ्याकडे येते. पण त्याचे तिच्याकडे ‘लक्ष’ नसते. कोवळ्या, गोऱ्यापान, बारीक कमरेच्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या घराचे दार उघडे असते आणि त्यांची तो ‘उत्तम व्यवस्था’ करीत असतो. बेगमचा मुक्काम कायम छपरी पलंगावर असतो. नवससायास, प्रार्थना, ताईत, मंतरलेले दोरे असे उपाय बेगम करून पाहते. पण नवऱ्याची नजर तिच्याकडे वळत नाही. शृंगारिक कादंबऱ्या आणि चटोर पुस्तके वाचून बेगमचे चित्त विचलित होऊ लागते. घराबाहेर पडण्याची मनाई असलेली बेगम निराशेने घेरली जाते. पण शेवटी तिचा ती मार्ग शोधून काढते. त्यासाठी तिच्या सेवेत असणाऱ्या रब्बोला ती साथीला घेते. ही कथा तिच्याकडे काही दिवस राहायला आलेल्या मुलीने निवेदिलेली आहे. ही मुलगी बेगमकडे जाते तेव्हा चाळीस-बेचाळीसची रसरशीत गोरीपान नितळ कांतीची, पलंगावर आरामात पहुडलेली बेगम तिला खूप आवडते. रब्बोकडून बेगम कंबर चेपून घेते, पाठ खाजवून घेते. सुगंधी उटणे लावून मालीश करून शाही नहाण चालू असते. आणि रब्बोचे सराईत हात बेगमच्या शरीरावरून फिरत असतात. ही मुलगी बेगमच्या खोलीत घुसते, रात्री अचानक तिला जाग येते तेव्हा बेगमच्या अंगावरील गोधडीचे पांघरुण (लिहाफ) आत एखादा हत्ती घुसावा तसे हलत असते आणि त्याच्या सावल्या िभतीवर नाचत असतात. रब्बो एक दिवस रजेवर जाते. तर बेगम या मुलीला स्वत:जवळ झोपवते. तिच्या अंगावरून हात फिरवू लागते. बेगमचे डोळे चढलेले असतात. शरीर तापलेले असते. मुलीला बेगमची भीती, दहशत वाटू लागते. एकदा बेगम अनावर होते, हिस्टेरिक होते. रात्रीच्या वेळी गोधडी हलू लागते. इतकेच नव्हे तर जणू कुणी तरी मजेदार चटणी खाते आहे असा आवाज मुलीला ऐकू येऊ लागतो.

दडपून ठेवलेल्या वासनेचे शमन करण्यासाठी बेगम रब्बोला आपली गुलाम बनवते. या मुलीचेही कोवळे वय ती ध्यानात घेत नाही. त्या काळात नाइलाजाने समलैंगिक संबंधाकडे वळणाऱ्या स्त्रियांच्या असहाय स्थितीचे चित्रण करणारी ही कथा अतिशय सूचक आहे. तिच्यात एकही शब्द अश्लील नाही. ‘लिहाफ’ला अश्लील ठरवणे विरोधकांना शक्य झाले नाही. ती केस इस्मत जिंकल्या.

इस्मत यांच्या बहुतांश कथा स्त्रीकेंद्री आहे. ‘सौदाई’, ‘मासुमा’ या कादंबऱ्याही पुरुषप्रधान व्यवस्थेने केलेल्या स्त्रियांच्या शोषणाच्या चित्रणाच्या कादंबऱ्या आहेत. इस्मत यांची भाषा दैनंदिन जीवनात वापरली जाणारी, सहज आहे. पण तरीही उर्दू भाषेचा डौल आणि वैभव, नेमके शब्द आणि वाक्प्रचार यांची फेक, यांमुळे इस्मत यांचे लेखन नुसते वाचनीयच नव्हे तर वाचकाला अभिमंत्रित करणारे बनते. ‘तनहा तनहा’ या कथेतली शहजाद ही दिलशाद मिर्जाचे प्रेम मनात कोंडून ठेवून जगत असते. ‘दिल की टीस को ही उसने रंगोंमें डूबो दिया था। वह टीसें जब उसने डस्टबिन से सेब के छिलके खाते बच्चे को देखा था, और चौपाटीपर चाट के जूठे पत्ते चाटते नन्हे बच्चों की आँखों में भूख देखी थी, फारस रोडपर सलाखों के पीछे ग्यारह बरस की बच्ची को ग्राहक को लुभानेके लिए जाली का कुर्ता पहने, पावडर लिपस्टिक थोपे देखा था। चाली के कुत्रेमें से उस की मटरबराबर छातियाँ झलक रही थी। उसने उस माँ को भी देखा था, जो अपने बच्चों को नाकाफी भीख माँगकर लाने पर कोसपीट रही थी।’

इस्मत यांनी जवळजवळ तेरा-चौदा चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या आहेत. त्यांपैकी ‘गर्म हवा’च्या कथेला अनेक पुरस्कार लाभले. चित्रपटक्षेत्राच्या जगाचेही एक अंडरवर्ल्ड असते. त्याचे तपशीलवार आणि बारकाईने केलेले चित्रण ‘मासूमा’ कादंबरीत आढळते. नाइलाजाने, मुलांचे पोट भरण्यासाठी आपल्या वयात येऊ लागलेल्या मुलीला शरीरविक्रयाकडे ढकलणाऱ्या आईचे हळूहळू एका बेमुर्वत व्यवहारी बाईत रूपांतर होत जाते. आणि तिच्या निरागस मुलीला आपल्या देहाचे मोल कळत जाते, व्यवसायात ती मुरत जाते हे रंगवणारी ही कथा चित्रपटव्यवसायाशी गुंफलेली आहे.

इस्मत यांच्या विशाल, व्यापक, मानवतावादी दृष्टीतून कुठलेही दु:ख सुटत नाही. जगण्याविषयी अथाह  वा अथांग प्रेम आणि माणसांबद्दलची संवेदनशील ओढ हे इस्मत यांच्या लेखनाचे मर्म आहे. मानवी करुणा आणि त्यातूनच येणारा कृतिशील विरोध, विद्रोह कमालीच्या ताकदीने व्यक्त करणारी ही लेखिका म्हणूनच आजही समकालीन वाटते.

निवडक पुस्तके

कादंबरी

जिद्दी, टेढी लकीर, दिल की दुनिया, सौदाई, जंगली कबुतर, अजीब  आदमी, बांही, मासूमा

कथा संग्रह

चोटें, छुईमुई, कलियाँ, एक रात, शैतान, लिहाफ

आत्मकथा

कागजी है पैहरन

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian women authors ismat chughtai chaturang anniversary issue

ताज्या बातम्या