मातृत्वाचा मनोज्ञ आविष्कार!

भर मध्यरात्रीची वेळ! एक स्त्री हातात तान्हं बाळ घेऊन घरांतल्या गाऊनवरच गल्लीतून पळत पळत येते.

‘आयएपीए’मध्ये तत्कालिन माता म्हणून काम करणाऱ्या (डावीकडून उभ्या) उषा कांबळे, सामाजिक कार्यकर्त्यां पूजा परब, सविता नागपूरकर, तत्कालिन माता मनिषा देवरे तर (बसलेल्या डावीकडून) भारती घोडेस्वार, सुचेता मोरे, हिल्डा गोम्स आणि अक्षया रेडकर.
|| माधुरी ताम्हणे

अनाथ मुलांना जन्मदात्या आईप्रमाणे जीव लावायचा, काही काळ त्यांची मनापासून काळजी घ्यायची आणि नंतर त्यांना दत्तक पालकांकडे सोपवायचं.. मोहाचे, मायेचे रेशीमबंध असे तुटणे हे यशोदेचं प्राक्तन स्वीकारणं प्रत्येक तत्कालीन वा पर्यायी मातेला जडच जातं. ‘इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अ‍ॅडॉप्शन अ‍ॅण्ड चाईल्ड वेल्फेअर’ या संस्थेने गेली कित्येक वर्षे अनाथ मूल संस्थेत आल्यापासून ते मुलं दत्तक जाईपर्यंतच्या काळात या मुलांना मायेची ऊब, मानसिक स्थैर्य आणि कौटुंबिक नातेसंबंध मिळावेत म्हणून ‘फॉस्टर फॅमिली’ वा ‘फॉस्टर मदर’ अर्थात ‘तत्कालीन माता’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. अशाच काही तत्कालीन वा पर्यायी मातांची तळमळ श्रावणातल्या मातृदिनानिमित्तानं…

भर मध्यरात्रीची वेळ! एक स्त्री हातात तान्हं बाळ घेऊन घरांतल्या गाऊनवरच गल्लीतून पळत पळत येते. नाक्यावर गस्त घालणारे पोलीस तिला पाहतात. ही मुलं पळवणाऱ्या टोळीतील बाई असावी, असं समजून ते तिच्यामागे धावतात. तेवढय़ात तिच्या पाठीमागून एक पुरुष धावत येतो. पोलीस त्याच्याकडे चौकशी करतात तेव्हा कळतं की त्या बाळाला आकडी आली आहे. दम्याच्या अ‍ॅटॅकमुळे ते घुसमटलंय. म्हणून त्याला घेऊन ती स्त्री हॉस्पिटलला निघालीय. पोलीस तातडीने त्या तिघांना व्हॅनमध्ये बसवतात. रुग्णालयात सोडतात. त्या जोडप्याशी व्हॅनमध्ये बोलताना पोलीस त्यांची माहिती ऐकून अचंबितच होतात. ज्या बाळाच्या काळजीने ते जोडपं सैरभैर झालेलं होतं, त्या जोडप्याचं मुळी ते बाळ नसतंच. ते दोघेही त्या बाळाचे ‘अभिभावक पालक’ अर्थात ‘फॉस्टर पेरेंट’ असतात. महाभारताचं उदाहरण द्यायचं तर यशोदा आणि नंद!

‘इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अ‍ॅडॉप्शन अ‍ॅण्ड चाईल्ड वेल्फेअर’ (कअढअ) या संस्थेतून मिळालेल्या या बाळाची दत्तक प्रक्रिया पूर्णत्वास येण्यापूर्वीच्या काळातले हे तत्कालीन पालक! १९७० मध्ये मुलं दत्तक देणारी संस्था म्हणून ‘आयएपीए’ची स्थापना झाली. पण संस्थेचं तेवढंच उद्दिष्ट नव्हतं. संस्थेला अनाथ, परित्यक्त मुलांसाठी कुटुंब कल्याण केंद्र उभं करायचं होतं. मात्र अशा मुलांसाठी निवासी केंद्र उभं केल्यास या मुलांना पगारी आयांकडून कोरडी माया मिळेल. निवासी संस्थेत शिफ्टप्रमाणे सेवकवर्ग बदलेल. त्याचा मानसिक परिणाम मुलांच्या निकोप वाढीवर होईल या विचारांतून ‘फोस्टर मदर’ अर्थात ‘पर्यायी वा तत्कालीन माते’ची संकल्पना पुढे आली. मूल संस्थेत आल्यापासून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होऊन मुलं दत्तक जाईपर्यंत कदाचित काही महिने वा काही वर्षांचाही काळ जाऊ शकतो. तो काळ त्या बाळाने एखाद्या कुटुंबात व्यतीत केला तर अशा मुलांना कुटुंबातील सर्व सदस्यांकडून मायेची ऊब, मानसिक स्थैर्य आणि कौटुंबिक नातेसंबंध लाभतील, अशी संस्थाचालकांची ठाम धारणा होती. प्रेम लाभणं हा प्रत्येक मुलाचा प्राथमिक अधिकार आहे. या हेतूने ‘फॉस्टर फॅमिली’ची संकल्पना आकाराला आली. परंतु ही संकल्पना सरकारी पातळीवर स्वीकारणं काहीसं कठीण गेलं. दोन वर्षांच्या कठीण संघर्षांनंतर संस्थेला ‘फॉस्टर मदर’ संकल्पनेसाठी परवानगी मिळाली. त्यानंतर मात्र ही संकल्पना एवढी यशस्वी झाली की भारतभर तिचा पुरस्कार करण्यात आला.

अर्थात या संकल्पनेच्या यशाचं संपूर्ण श्रेय पर्यायी मातांना, त्यांच्यातल्या मातृत्वाच्या आदिम प्रेरणेलाच जातं हे निर्विवाद!

हे तत्कालीन मातृत्व निभावणं किती कठीण आहे ते या पर्यायी वा तत्कालीन मातांशी बोलल्यावर कळतं. श्रद्धा चव्हाण सांगतात, ‘‘ज्या बाळाला घेऊन मी मध्यरात्री धावले त्या अमृताची तब्येत त्या रात्री खूपच गंभीर झाली होती. प्रार्थना करण्याशिवाय माझ्या हातात काही नव्हतंच, पण ती बरी झाली. अमृता तीन दिवसांची असल्यापासून मी तिला सांभाळलं आहे. अमृता मतिमंद असून तिला असाध्य व्याधी आहे हे कळल्यावर तिला दत्तक घेतलेल्या पालकांनी आपला निर्णय बदलला. पुढेही तिला कोणी दत्तक घेईना. त्यामुळे ती माझीच मुलगी झाली. मला डॉक्टरांनी हे स्पष्ट सांगितलं होतं, ती पूर्णपणे परावलंबी असेल. ती जेमतेम दीड वर्ष जगेल. मी अक्षरश: जिद्दीने तिला कडेवर उचलून घेऊन स्पीच थेरपी, फिजिओ थेरपीसाठी नेत असे. ती महिन्यातून पंधरा दिवस हॉस्पिटलला असे. मी तिच्यासोबत राही आणि माझ्या मुलाला माझे पती घरी सांभाळत. आज अमृता चौदा वर्षांची झाली आहे! मला तिचा खूप अभिमान वाटतो!’’ ‘‘अमृताची जगण्याची ऊर्मी वाढवण्याचं काम या कुटुंबानं केलं आहे’’, दत्तकप्रक्रियेच्या प्रमुख सविता नागपूरकर सांगतात. ‘‘या संपूर्ण कुटुंबाने अनेक मुलांना जिवापाड सांभाळलं, पण श्रद्धा अमृतामध्ये मनाने इतकी गुंतली की तिने पुढे संस्थेतून मुलं घेणं बंद केलं.’’

हे मातृत्व मनात कसं उमलतं? अक्षया रेडेकर म्हणतात, ‘‘संस्थेच्या सेविकेकडून पहिल्यांदा आम्ही बाळाला कुशीत घेतो. त्या क्षणाला आतून ममत्व जागृत होतं. ते मूल ज्या विश्वासानं आमच्या खांद्यावर मान टाकतं त्याक्षणी आम्ही त्यांचे आईबाप होतो. बाळ माझ्या पोटी जन्माला आलं नसलं तरी त्यानं काय फरक पडतो? आपण हा व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे हेच मुळी आम्ही विसरून जातो आणि एकच प्रेरणा उसळून येते. या लेकरावरचा अनाथपणाचा डाग पुसून टाकायचा आहे आणि त्याला मला जिवापाड सांभाळायचं आहे.’’

संस्थेतून तत्कालीन मातेकडे येणारी अनेक मुलं अशक्त, कुपोषित, अपंग अथवा व्याधिग्रस्त असतात. अशा मुलांसाठी संस्था अनुभवी, जाणत्या पर्यायी मातांचा विचार करते. अशा वेळी ही मुलं सुदृढ, निरोगी दिसावी जेणेकरून ती चांगल्या घरात दत्तक दिली जातील यासाठी पर्यायी माता जीवाचं रान करते. पोटच्या पोरांपेक्षा त्यांच्यावर काकणभर जास्तच माया करते. ‘‘ही मुलं इतकी निष्पाप, निरागस असतात की वाटतं जणू कृष्णच आपल्या घरात आलाय!’’ साबरमती बरुआ उत्स्फूर्तपणे उद्गारतात. ‘‘आम्ही देवकी नसलो तरी यशोदा नक्कीच होऊ शकतो. असं वाटतं, बाळ नुसतं विव्हळलं तरी त्याचं काही दुखत खुपत असेल का या विचारांनी अस्वस्थ होऊन आमची झोप उडते. अगदी जन्मदात्या आईप्रमाणे!’’

यशोदेचं वाण घेतलेल्या सुलभा सुर्वे नऊ भावंडांतील थोरल्या. भावंडांना सांभाळणं अंगवळणी पडलेलं. त्यामुळे हे काम जोखमीचं आहे हे ठाऊक असूनही त्यांनी ते स्वीकारलं. त्यांना मिळालेलं पहिलंच मूल कातडी सोलवटलेल्या अवस्थेत हॉस्पिटलमधून थेट आलं. त्या मुलाला लघवीसुद्धा झोंबायची. ते एवढं अशक्त होतं की, त्याला नरम कपडय़ांत गुंडाळून रात्ररात्र मांडीवर घेऊन बसावं लागायचं. तीन महिने नियमित त्याला आयुर्वेदिक तेलाने मालिश केली तेव्हा ते अंग धरायला लागलं. सुलभाताई सांगतात, ‘‘एक वर्षांची निशा खरंतर दत्तक गेलेली, पण त्या स्त्रीला ते मंजूर नव्हतं. त्या बाईने बहुधा तिचे खूप हाल केले असावेत. त्यामुळे आल्या दिवसापासून मला बघून खूप घाबरायची. मात्र माझ्या पतीकडे खुशीने जायची. रात्रीसुद्धा माझ्या कुशीतून त्यांच्या कुशीत जाऊन झोपायची. खूप जीव लावला तिने मला. पुढे तिला एका ऑस्ट्रेलियातील कुटुंबाने दत्तक घेतलं, पण त्या जोडप्याने कधीही तिचा साधा फोटोसुद्धा मला पाठवला नाही.’’

‘‘पर्यायी मातांचे हे आंतरिक बंध त्या मुलाला कांचणार नाहीत, ते बाळ दत्तक जाईल तेव्हा त्याची अडवणूक होणार नाही, हे आम्ही त्या कुटुंबाच्या मनावर बिंबवलेलं असतं तरी अनेकदा शारीरिक वा मानसिक अपंगत्वामुळे जी मुलं दत्तक जाऊ शकत नाहीत त्यांच्यात या माता मनाने इतक्या गुंततात की पुढे त्या मुलांना त्या स्वत:च दत्तक घेतात. उषा कांबळे, सुलभा सुर्वे या अशाच काही माता!’’ नजमा गोरियावाला आपला अनुभव सांगतात. सुलभाताईंनी मतिमंद निनादला अक्षरश: बोळ्याने दूध पाजत वाढवलं. त्याला नीट चालता येत नसे. तर त्या त्याला उचलून घेऊन उपचारांसाठी स्पास्टीक सोसायटीत नेत असत. त्यांच्या भूषण आणि प्रशांत या दोन्ही मुलांनी संस्थेला लेखी हमी दिली की, आम्ही निदानची आयुष्यभर पूर्ण जबाबदारी घेत आहोत. सुलभाताईंची मुलं, सुना सगळेच निनादला जिवापाड सांभाळतात.

आपल्या हातात संस्थेनं विश्वासानं सोपवलेलं मूल कधी ना कधी दत्तक जाणार आणि त्याचा वियोग सहन करावा लागणार हे त्या मातांना ठाऊक असतं. मुलं मात्र त्यांना आपले खरे आईबाप समजू लागतात. म्हणूनच सीमा गोम्ससारखी अत्यंत अनुभवी तत्कालीन माता म्हणते, ‘‘जेव्हा आम्ही दत्तक देण्यासाठी या बाळांना संस्थेकडे परत सोपवतो तेव्हा क्षणभर असं वाटतं, आपण आईबाप बनून काही काळासाठी का होईना या निष्पाप बाळाची फसवणूक केली आहे. तान्हुल्या बाळांना स्पर्श कळतो. आमच्या शरीराची ऊब कळते. एक वेळ बाळ तान्हं असेल तर ठीक! पण कळत्या वयात त्यांना हे स्थित्यंतर किती जड जात असेल? त्यांतून कित्येक वेळा ही मुलं परदेशांत, वेगळ्या वातावरणात, वेगळ्या संस्कृतीत, वेगळ्या भाषेतल्या पालकांना दत्तक दिली जातात. अशा वेळी या मुलांना त्या पालकांसोबत जमवून घेताना किती त्रास होत असेल!’’

‘आयएपीए’च्या स्पॉन्सरशिप प्रकल्पाच्या संचालिका कौमुदी तेलंग म्हणतात, ‘‘आम्हाला या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच मुलाची दत्तक विधानाची प्रक्रिया पूर्णत्वास येऊ लागली की आम्ही पर्यायी मातांकडे त्या मुलांना दाखवायला दत्तक घेतलेल्या जोडप्यांचे, त्यांच्या कुटुंबाचे, घराचे फोटो पाठवतो. पर्यायी माता मग त्याला सतत फोटो दाखवून ही तुझी आई वा मम्मी हे तुझे बाबा वा डॅडी, हे तुझं घर असं म्हणत त्या मुलाच्या मनाची हळूहळू तयारी करते.’’

त्या बाळाच्या मनाची अशी कितीही तयारी केली तरी तत्कालीन मातेच्या मनाची मात्र पटकन तयारी होत नाही. ती नकळत डोळे टिपू लागते. दर्शना कुणकेरकर आपला हृदयस्पर्शी अनुभव सांगतात. ‘‘मला डोळे टिपताना पाहून पाच र्वष माझ्याकडे राहिलेला केदार मला म्हणायचा, ‘आई, तू कशासाठी रडतेस? तू पण नंतर येणार ना माझ्या घरी. मी तिथे जाऊन तुझ्यासाठी खास खोली तयार करेन!’ सहा महिन्यांचा केदार माझ्याकडे आला तेव्हा नुसता मांसाचा गोळा होता. पाच वर्षांचा झाला तेव्हा तो अमेरिकेत दत्तक गेला. त्याला सोडायला मी विमानतळापर्यंत येते, असं मी खूप विनवलं. पण तो कदाचित मला सोडणार नाही या भीतीपोटी मला त्याच्यासोबत जाऊ दिलं गेलं नाही. त्याला नेणाऱ्या समाजसेविकेवर तो एवढा चिडला! मला अजूनही त्याचे माझ्या दिशेने पसरलेले दोन चिमुकले हात दिसतात. रिक्षातून त्याने फोडलेला, ‘आईऽ आईऽ’ असा टाहो अजूनही कानांत घुमतो आणि मी वेडीपिशी होते!’’

मानवी मनोव्यापाऱ्यांना व्यावहारिक बंधनं आवश्यक असली तरी किती कांचणारी ठरू शकतात हे दर्शना कुणकेरकरांच्या डोळ्यांतून झरणारे अश्रू सांगत राहतात. प्रत्येक मातेची या तत्कालीन मातृत्वानंतरची घालमेल अगदी सारखी आहे. केवळ कुटुंबाला हातभार लावावा या उद्देशाने हे काम स्वीकारणाऱ्या पर्यायी माता आणि मुलांसाठी वियोगाचे हे क्षण अत्यंत अवघड आणि कटू ठरतात. एक मुलगी परदेशस्थ पालकांकडे दत्तक गेली. ती रात्रभर इतकी रडली की शेवटी त्यांनी मध्यरात्री या मातेला हॉटेलवर बोलावून घेतलं. त्यांना पाहताच ती त्यांच्याकडे आवेगाने झेपावली आणि काही क्षणांत त्यांच्या कुशीत गाढ झोपून गेली. त्या मन घट्ट करून तिथून निघाल्या, मात्र रात्रभर इमारतीखाली बसूनच राहिल्या..

मोहाचं, मायेचं रेशीमबंध तुटणं हे यशोदेचं प्राक्तन स्वीकारणं प्रत्येक पर्यायी मातेला जड जातं. सीमा गोम्स यांनी पस्तीस र्वष हे काम केलं आहे, पण प्रत्येक वेळी मूल संस्थेत परत देताना त्या अतिशय व्याकूळ होतात. त्या म्हणतात, ‘‘संस्थेतून मूल आणताना अख्खं कुटुंब माझ्यासोबत असतं, पण त्याला सोडायला जाताना माझ्यासोबत कुणीच येत नाही. मूल दत्तक घेतलेल्या पालकांच्या हाती सोपवलं की मी मंदिरात जाऊन बसते, रडरड रडते. आणि मग घरी येते. घरात सर्वत्र त्या बाळाच्या आठवणी असतात.’’ सीमा गोम्स श्रेयाला विसरू शकत नाहीत. ती जन्मत: आंधळी होती. ती चालायला लागली आणि त्यांची झोप पार उडाली. श्रेयाला दिवस काय रात्र काय सारखीच! ती दिवसा झोपायची आणि रात्री घरभर फिरायची. हिला लागलं, ही पडली, धडपडली, भाजली तर! या कल्पनेने सीमाताई सतत धास्तावलेल्या असायच्या. रात्रभर जागलेल्या सीमाताई दिवसा तिला घेऊन उपचारांसाठी हॉस्पिटलच्या वाऱ्या करायच्या, पण त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी कधी तक्रारीचा शब्दसुद्धा काढला नाही, असं कौमुदीताई कौतुकाने सांगतात.

पर्यायी मातेसोबत संपूर्ण कुटुंब या मुलांमध्ये रमून जातं. कधी उषा कांबळेचे पती सगळ्या मुलांना गाडीत घालून चौपाटीला फिरायला नेतात, तर कधी सुचेता मोरेची महाविद्यालयीन कन्यका त्या गावाला गेल्या तरी छोटीला स्वत: मजेत सांभाळते. कधी कधी मात्र गमतीदार प्रसंग घडतात. एखाद्या पन्नाशीच्या पर्यायी मातेच्या हातात नवजात शिशू पाहून लोक तिच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहतात. तर एखाद्या विधवा पर्यायी मातेच्या हातांतील बाळाकडे पाहून लोकांची नजर गढुळते.

पण लोकांच्या नजरांची भीती ना मातेला असते ना त्या बाळाला! म्हणूनच अवचित ही मुलं शब्दांऐवजी कृतीतून आपल्या भावना व्यक्त करतात. एकदा एका मुलीच्या दत्तक पालकांचा मथुरा कांबळेंना फोन आला मध्यरात्री. ही रात्रभर झोपत नाही आणि सारखी जाऊन बॅगेत काही तरी शोधते आहे. वर्षांची ती मुलगी काय शोधते त्यांना कळेना. मथुराबाई हसल्या. म्हणाल्या, ‘‘ती रात्रभर माझा पदर हातांत घट्ट धरून झोपायची. तिच्या हातात एखादी पातळ साडी द्या. ती पटकन झोपेल.’’ सविता नागपूरकर सांगतात, ‘‘पर्यायी मातांनी लावलेल्या सवयींची दत्तक जोडप्यांना पूर्ण कल्पना दिली जाते.’’

पर्यायी मातांच्या निवडीचे निकष आणि नियम ‘आयएपीए’च्या उपाध्यक्षा हंसा आपाराव विस्ताराने सांगतात, ‘‘तत्कालीन मातांना स्वत:चं मूल असणं अत्यंत आवश्यक असतं. अन्यथा भावनिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या माता निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्या तरी तिचे घर स्वच्छ असावं. घरात पुरेसा उजेड, पाणी असावं. घराजवळ तात्काळ उपलब्ध होऊ शकेल अशा वैद्यकीय सुविधा असाव्यात. संस्थेतर्फे पर्यायी मातेच्या संपूर्ण कुटुंबाची द्वैवार्षिक वैद्यकीय तपासणी केली जाते. ६०च्या वर वय असलेल्या स्त्रियांना संगोपनासाठी बाळ दिलं जात नाही. तसंच पर्यायी मातांची वर्तणूक वेळोवेळी अचानक गृहभेटींतून तपासली जाते. आम्हाला काही वावगं आढळल्यास आम्ही त्यांना मुलं देणं बंद करतो. दुर्दैवाने आम्हाला पुरेशा देणग्या मिळत नसल्याने इच्छा असूनही या मातांना आम्ही पुरेसे पैसे देऊ शकत नाही. तरीही त्या वेळेला स्वखर्चाने या मुलांचं कोडकौतुक करतात. त्यांचे हट्ट पुरवतात.

उषा कांबळे तळमळीने सांगतात, ‘‘आम्ही जे काम करतो त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. कधी कधी जीव दमून जातो. कंटाळा येतो. रात्रभर जागरण होतं. तरीही सकाळ झाली की आम्ही त्यांच्या बिछान्याजवळ दुधाची बाटली घेऊन उभ्या राहतोच. मुलांनी कितीही त्रास दिला तरी आम्ही त्यांना कधी चार बोटं लावत नाही. आमचं घर आता गोकुळ झालंय. काही दिवस जरी संस्थेतून मुलं मिळाली नाही तर घर सुनं सुनं वाटतं.’’

हे हरवलेपण साठीनंतर अधिकच तीव्र होतं. अनेक तत्कालीन मातांनी आयुष्यभर मुलांचं संगोपन केलेलं असतं. अचानक नियमाप्रमाणे साठीनंतर मुलं मिळणं बंद होतं आणि मग दर्शना, सीमा, मथुरासारख्या पर्यायी मातांच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते. अशा वेळी व्याकूळ होऊन सगळ्या जणी मुलांचे फोटो टेबलावर पसरून त्यांच्या आठवणीत रमून जातात. त्या बाळांच्या बाललीला.. बोबडे बोल.. दंगामस्ती त्यांत एखादी आठवण कातर करून टाकणारी असते. दर्शनाताई सांगतात, ‘‘एक तान्ही बेबी माझ्याकडे आली. तिचे आतडे एकमेकांत गुंतलेले होते. तिची शस्त्रक्रिया शक्य नव्हती. तीन महिने मी तिला जिवापाड सांभाळली. तिला हॉस्पिटलला ठेवलं. ती गंभीर झाली तेव्हा फक्त मला ओळखत होती. ती आचके देऊ लागली तेव्हा मी तिच्या तोंडात शेवटचा पाण्याचा थेंब घातला. तिने प्राण सोडला तेव्हा तिची नजर माझ्याकडे होती. मला हुंदका आवरेना. तिचं माझं रक्ताचं नातं नव्हतं. पण हे कोणते अज्ञात ऋणानुबंध होते?’’

साबरमती बरुआ भरल्या कंठाने म्हणतात, ‘‘ही बाळं येताना सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात, या मुलांकडे आम्ही आमच्या व्यथा, वेदना, काळज्या पार विसरून जातो. आम्ही आयुष्य वेचतो ते या मुलांच्या संगोपनात. ते पुण्य वाया जात नाही. त्यांच्या आशीर्वादाने आमच्या मुलांचं खूप भलं झालं आहे!’’ हिल्डा गोम्स कृतज्ञतेने सांगतात, ‘‘आज आयएपीए हे आमचं विस्तारित कुटुंब झालं आहे आणि संस्था वेळोवेळी मदतीला उभी राहते. म्हणून आम्ही अशी अशक्त, व्याधिग्रस्त मुलं सांभाळू शकतो. ‘आयएपीए’ आमच्या मुलांची, त्यांच्या शिक्षणाची काळजी घेते. त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवते. संस्थेतर्फे दरवर्षी पर्यायी माता, दत्तक पालक आणि मुलं यांचं स्नेहसंमेलन भरवलं जातं. आम्हाला त्या दिवशी आमची मुलं भेटतात. आम्ही त्यांना प्रेमाने कवटाळतो. ती मुलं एकवेळ आम्हाला विसरतात. पण आम्ही मात्र त्या मोठय़ा झालेल्या मुलांना अचूक ओळखतो. शेवटी या ऋ णानुबंधाच्या जुळलेल्या रेशीमगाठी असतात ना!’’

मुलाला दत्तक पालकांच्या हाती देताना या जुळलेल्या रेशीमगाठी तुटतात, पण त्या वियोगाच्या क्षणांचासुद्धा तत्कालीन माता सोहळा साजरा करतात. दिवस कोणताही असो. त्या दिवशी घरात दिवाळी असते. फराळ, फटाके, केक, बाळाला नवीन कपडे, त्यांचा आवडता खाऊ.. घर कंदील, पणत्यांनी उजळतं. शेजारची, नात्याची शेपन्नास माणसं बाळाला निरोप द्यायला जमतात. सोहळा संपतो आणि अखेर भरल्या डोळ्यांनी ती माता आपल्या तान्हुल्याला घेऊन घराबाहेर पडते. एकटी.. त्याक्षणी तिच्या मातृत्वाचं तात्कालिकपण गळून पडतं. ती असते माता.. चिरंतन मातृत्वाचं लेणं ल्यायलेली माता.. फक्त माता!

madhuri.m.tamhane@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: International mothers day 018