दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वयंप्रेरणेतून समाजमन प्रकाशित करणाऱ्या नवदुर्गाचासन्मान रसिक प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत आणि नामवंतांच्या हस्ते पार पडला तेव्हा सगळ्यांच्याच मनात या नऊ दुर्गानी समाजासाठी दिलेल्या योगदानाविषयीची अमीट छाप उमटली होती. असे आदर्श सातत्याने समोर यायला हवेत, अशी इच्छा व्यक्त होत हा सत्कार सोहळा त्यातील विविध कार्यक्रमांमुळे उत्तरोत्तर रंगत गेला.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

गरज ही शोधाची जननी असते. समाजात अशा अनेकांच्या अनेक अपूर्ण गरजांच्या जाणिवेतून मोठमोठी समाजकरय उभी राहिलेली याआधीही अनेकदा आपण पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत. स्त्री-शक्तीने तर कित्येकदा एकत्र येऊन आपल्याच माताभगिनींच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांपासून-शिक्षण-नोकरी, व्यवसाय देत त्यांना स्वयंसिद्ध केले आहे. ‘दुर्गा’ सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत ‘लोकसत्ता’ने अशा जिद्दी, कर्तृत्ववान दुर्गाची ओळख समाजाला करून दिली आहे. काळ जसा वेगाने बदलतो तशी समाजाची विचारधाराही तितक्याच वेगाने बदलत असते, याचं प्रतिबिंब या सोहळ्याच्या यंदाच्या तिसऱ्या पर्वात ठळकपणे उमटलं. स्वयंप्रेरणेतून एका ध्यासाने मोठं कार्य उभारणाऱ्या, आपल्या स्वत:च्या आवडत्या कार्यातून समाजाला काय द्यायचं आहे हे समजून-उमजून त्याच पद्धतीने वाटचाल करणाऱ्या आणि या कार्यातून नेटाने समाजमन प्रकाशित करणाऱ्या, समाजाला पुढे नेणाऱ्या ‘नव’जिद्दीच्या दुर्गाशक्तीचा जागर उपस्थितांनी अनुभवला.

एका ध्येयाने प्रेरित होऊन पुढे जात राहणं, आपल्याबरोबर सगळ्यांना पुढे घेऊन जाणं, व्यक्ती ते समष्टी हे तत्त्व आपल्या कृतीतून पूर्णत्वाला नेणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मुळात आपली क्षमता ओळखणं हे महत्त्वाचं ठरतं. आपली दूरदृष्टी आपल्या मनाला ध्येयाप्रति प्रज्ज्वलित करते. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं हे म्हणणं सार्थ ठरवणाऱ्या ‘लोकसत्ता दुर्गा सन्मान २०१६’ च्या मंचावरच्या या दुर्गानी अक्षरश: नानाविध क्षेत्रात आपल्या ध्येयधोरणांनी अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. समाजसेवेचा वसा हा असा काळाची पुढची पावलं ओळखून त्या दृष्टीने कार्य उभारण्याचा असला पाहिजे हे या दुर्गानी जाणलं आणि ‘आपणास ठावे ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकळजनां’ या वृत्तीने आपले कार्य पुढे नेले. या नवदुर्गाचा सन्मान ‘लोकसत्ता’ आयोजित, ‘व्हीम’ प्रस्तुत, ‘केसरी’ सहप्रायोजित आणि ‘एबीपी माझा’ प्रसारण प्रायोजित ‘दुर्गा २०१६’ या कार्यक्रमातून करण्यात आला.

यानिमित्ताने  ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाचं वाढतं महत्त्व विशद करताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी एरव्ही स्त्रियांच्या पुरवण्यांची बोळवण मेकअप आणि पोशाखाच्या टिप्स, रेसिपीज् अशा विषयांवर केली जाते. सुदैवाने असे काहीही न करता ‘लोकसत्ता’ने स्त्रीविषयक वेगळा दृष्टिकोन पुरवण्यांच्या माध्यमातून सशक्तपणे मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्ट केलं. या उपक्रमाला ‘शोध नवदुर्गा’चा असंच संबोधलं जातं, याचं कारण नव्या विचाराने काम करणाऱ्या या दुर्गा कुठल्याही सरकारी अनुदानाविना, कुठल्याही राजकीय-सामाजिक संस्थेचं पाठबळ न घेता आत्मबळावर आणि आत्मसन्मानाने सक्रिय समाजकार्य करणाऱ्या आहेत. म्हणूनच त्यांचा यथोचित सन्मान व्हायला पाहिजे, त्यांच्या कार्याची ओळख समाजाला करून द्यायला हवी, या उद्देशानेच सातत्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाचं हे तिसरं वर्ष, आत्तापर्यंत २७ ‘दुर्गा’ची ओळख समाजाला करून देण्याचा आनंद आणि सार्थ अभिमान लोकसत्तेला वाटत असल्याचं सांगून यंदाही या नऊ‘दुर्गा’ निवडीचं काम आव्हानात्मक होतं, असं ‘चतुरंग’ पुरवणीच्या संपादिका आरती कदम यांनी सांगितलं. या उपक्रमासाठी वाचकांकडूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सामाजिक कार्य उभारणाऱ्या दुर्गाची माहिती घेतली जाते. यावेळी दुर्गाची निवड करताना चाकोरीबाहेरच्या विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्राधान्याने विचार केला गेला. तसंच बीड, अकोला, सोलापूर, नागपूर, तुळजापूर, पालघर, पुणे आणि ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या ‘दुर्गा’ची निवड करून संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र समोर आणण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अनेक चाळण्यांमधून, विचारप्रक्रियेतून निवडलेल्या या दुर्गा वेगळ्याच, त्यांच्या वाटाही वेगळ्या तसंच त्यांच्या सुखदु:खांचा काटाही वेगळा, असं सांगत या नवदुर्गाचे अनोखे रंग प्रेक्षकमनांपर्यंत सूत्रसंचालक उत्तरा मोने यांनी आपल्या ओघवत्या शैलीत पोहोचवले.

या तिसऱ्या पर्वाच्या सन्मान सोहळ्याची सुरुवातच विलक्षण ठरली. सुकृता पेठे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या अंधेरीतील ‘मैत्री’ ढोलताशा पथकाच्या सादरीकरणाने या सोहळ्याची नांदी झाली. गेली कित्येक र्वष ज्या क्षेत्रांमध्ये पुरुषांचं वर्चस्व होतं आज तेच वजनदार ढोल घेऊन लीलया वादन करणाऱ्या या महिलापथकांची सलामी हे आजच्या काळाचं वास्तव आहे. मात्र याच काळात स्त्री सक्षमीकरणाचा विचार करताना आजही त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, मुलींपेक्षा वंशाच्या दिव्याला, मुलाला प्राधान्य दिलं जातं या वास्तवाकडे दुर्लक्षून पुढे जाता येत नाही. कित्येक वर्षांच्या या रूढी-प्रथांच्या बळी ठरलेल्या तुळजापूरच्या भारतबाई देवकर या साध्यासुध्या, कपाळावर ठसठशीत कुंकू लावलेल्या, अडाणी असल्या तरी आपल्याबरोबर इतर स्त्रियांना व्यावहारिक शहाणपण शिकवणाऱ्या दुर्गेचा पहिला सन्मान करण्यात आला. अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी आपल्या नेहमीच्या हसतखेळत शैलीत भारतबाईंना बोलतं केलं. आज त्यांच्याबरोबर शंभरजणी साफसफाईचं काम करतात. मात्र तरीही माझा महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर व्हावा हा एकच ध्यास आहे आणि हेच मागणं अंबाबाईच्या दारी दररोज मागते, असं त्यांनी सांगताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा कुठलाही अभिनिवेश न बाळगता शांतपणे स्वच्छतेचा वसा घेतलेल्या भारतबाईंचं टाळ्यांच्या क डकडाटात कौतुक झालं.

शिक्षणाची आवड म्हणून शिकतानाच पर्वतरोहण, सायकलवरची भ्रमंती हे छंद जोपासताना भारती ठाकूर यांच्यासारखी स्त्री नर्मदा परिक्रमा करते काय.. आणि मग अत्यंत सुपीक जमीन, मुबलक पाणी अशा या समृद्ध खोऱ्यातील पिढी व्यसनांपायी वाया जाते आहे हे लक्षात आल्यानंतर ‘नर्मदालय’सारखी संस्था उभारून या नव्या पिढीला वाचवण्याचं कार्य करते ही गोष्टच नवलाईची वाटते. विडी-गुटख्यात अडकलेल्या नर्मदेच्या परिसरातील मुलांना शिक्षणाची संजीवनी देत त्यांना व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण केला, असं भारती ठाकूर यांनी सांगितलं तेव्हा त्यांचा सन्मान करण्यासाठी आलेल्या पहिल्या बालनाटय़ संमेलनाच्या अध्यक्षा कांचन सोनटक्के यांनी त्यांच्या शाळेतील मुलांना नाटकाच्या माध्यमातून नवे धडे देण्याचा संकल्प सोडला.

खाकी वर्दीची एक अजब प्रतिमा चित्रपटांच्या माध्यमातून समाजमनावर उमटलेली असते. त्यामुळे सोलापूरमध्ये गुन्हे शाखेत साहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम करताना स्त्रियांची अवैध विक्री करणाऱ्यांना, वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांना पकडून त्यांना जेरबंद करणाऱ्या धाडसी शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांचा सन्मान करताना पडद्यावर दाखवला जाणारा पोलीस आणि गुन्हेगारांचा धरपकडीचा खेळ प्रत्यक्षातही तसाच असतो का? हे कुतूहल खुद्द पोलीस अधिकाऱ्याकडूनच शमवण्याचा मोह प्रसिद्ध शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांनाही आवरला नाही.

चौदा र्वष बँकिंग क्षेत्रात काम केल्यानंतर अनुराधा देशपांडे यांनी ‘परफेक्ट एम’ही एचआर प्रशिक्षण देणारी कंपनी सुरू केली. कोकणात किंवा अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत तरीही युवकांना काम का मिळत नाही, याचं कारण शोधून त्याप्रमाणे प्रशिक्षण त्यांनी सुरू केलं. नारळाच्या काथ्यापासून फायबर तयार करत त्याला एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवणं आणि त्यासाठी स्त्रियांना रोजगार उपलब्ध क रून देणं या दोन्ही गोष्टी लीलया साधणाऱ्या अनुराधा देशपांडे यांचं कौतुक करताना नाटय़निर्मात्या लताबाई नार्वेकर यांनी त्यांचं कार्य कोकणात पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

छोटं ध्येय ठेवणं हा गुन्हा आहे, असं माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या संदेशातूनच औषधनिर्मिती संशोधन क्षेत्रात कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळाली, असं उत्तर डॉ. कल्पना जोशी यांनी दिलं. तेव्हा

कर्क रोग, संधिवातासारख्या आजारांवर औषध तयार करून त्यासाठी १० आंतरराष्ट्रीय पेटंट घेणाऱ्या कल्पना यांच्या कार्यभरारीला त्यांचा सन्मान करण्यासाठी आलेल्या मुंबई जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनीही सलाम केला.

कधी आई, कधी पत्नी, कधी डॉक्टर, कधी उद्योजिका म्हणून नानाविध रूपांतील या दुर्गाशक्तीला सलाम करताना पुरुषांनी केलेल्या स्त्रियांवरच्या कविता ते अमृता प्रीतम यांच्या नजरेतून आलेली स्त्रीची व्यथा, सुधा मूर्तीना आपल्याच प्रवासातून उलगडलेली स्त्री-शक्ती, मंगला गोडबोले यांनी स्त्रीला जडलेल्या ‘सुपरवुमनायटिस’ या मानसिक आजारावर केलेले भाष्य, ‘चारचौघी’ नाटकातला प्रशांत दळवी यांनी लिहिलेला वेगवेगळ्या वयातील ‘चारचौघीं’चा संवाद असं कधी खटय़ाळ तर कधी गंभीर करणारं अभिवाचन अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आणि कविता मेढेकर यांनी सादर केलं. प्रेक्षकांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

निसर्गाशी एकरूप होताना तिथल्या आजारी प्राणीमित्रांची सेवा हा नावातच ‘सृष्टी’ असणाऱ्या सृष्टी सोनावणे यांचा जगावेगळा ध्यास. आपण प्राण्याला प्रेम दिलं तर ते कित्येक पटीने आपल्याला प्रेम देतात हा स्वानुभवातून आलेला विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि त्यांचा सन्मान करताना प्रतीक्षा लोणकर यांनी त्यांचं सृष्टी हे नाव किती सार्थ ठरवलं आहे, अशा शब्दांत त्यांचं कौतुक केलं.

सातपुडय़ाच्या दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाचं कार्य करणारी नासरी चव्हाण ही या सगळ्यांमधली सगळ्यात तरुण दुर्गा. स्वत: बारा बारा कि.मी. पायपीट करून शिक्षण घेणाऱ्या नासरीने केवळ शिक्षण प्रसाराचं कार्य हाती घेतलेलं नाही तर त्याबरोबरच कुपोषण आणि गर्भवती स्त्रीच्या समस्यांवरही ती काम करते आहे ही खूप प्रेरणादायी असल्याचं मत तिचा सन्मान करणाऱ्या अभिनेत्री कविता मेढेकर यांनी व्यक्त केलं.

गावातील स्त्रियांनाही प्रशिक्षण दिलं की त्या आपल्या गरजा पूर्ण करू शकतात, त्यांचं मानसिक स्थित्यंतर होऊ शकतं, हा आपला अनुभव असल्याचं स्वत: डॉक्टर असलेल्या सुजाता गोडा यांनी सांगितलं. २५ गावांमधून, १५० पाडय़ांमधून त्यांनी आपल्या रुग्णसेवेचा विस्तार केला आहे ही गोष्ट नेत्रतज्ज्ञ असलेल्या डॉ. रागिणी पारेख यांनाही थक्क करून गेली.

स्वत: अंध असून दुसऱ्यांचं आयुष्य प्रकाशित करण्यासाठी झटणाऱ्या राधा बोरडे या दुर्गेचा सत्कार मध्य रेल्वेच्या पोलीस उपायुक्त डीसीपी रुपाली अंबुरे यांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हा त्यांच्या कामाने त्या भारावून गेल्या होत्या.

स्त्री-पुरुष असमानतेचं वास्तव, त्याची जाणीव झाल्यानंतर स्वत:च्या उत्कर्षांसाठी झटणारी स्त्री आणि समाजात बदल करण्याइतपत सक्षम झालेल्या स्त्रीचा सन्मान झालाच पाहिजे. तिच्या समर्थतेची योग्य ती जाण ठेवत शिवशक्तीप्रमाणेच स्त्री-पुरुषांनी एकत्र आलं पाहिजे. परस्परांसाठी पूरक होऊन वाटचाल केली पाहिजे, या विचारांपर्यंत हा सन्मान सोहळा पोहोचला. प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सोनिया परचुरे यांनी आपल्या पदन्यासातून तर त्यांच्या थिरकत्या पावलांबरोबर आपल्या कुंचल्याने रंगाविष्कार करत चित्रकार शुभांगी सामंत यांनी शिवशक्तीच्या केलेल्या आविष्काराने उपस्थितांची मनं जिंकली. या संगीतमय कार्यक्रमाची निर्मिती ‘मिती क्रिएशन्स’ यांची होती. लवकरच हा कार्यक्रम ‘एबीपी माझा’वर प्रसारित होणार आहे.

untitled-6

नवदुर्गाचा सत्काराचा हा सोहळा वाचक-रसिक प्रेक्षकांच्या भरघोस उपस्थितीत आणि त्यांनी केलेल्या नवदुर्गाच्या कौतुकात रंगतदार होत गेला.

प्रमुख पाहुण्या म्हणतात

मला हा उपक्रम अतिशय आवडला. स्वच्छतेचा वसा घेऊन काम करणाऱ्या भारतबाई देवकर या तूळजापूर भागामध्ये काम करीत आहेत. शालेय शिक्षण घेतले नसतानाही स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी त्या अनवाणी फिरत आहेत. समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या या स्त्रियांच्या कर्तृत्वाचे जितके कौतुक केले जाईल ते कमीच आहे. मात्र या नवदुर्गाना सन्मान करण्याबरोबरच त्यांना आर्थिक साहाय्य केले तर स्त्रियांच्या कामाला बळ मिळेल.

वंदना गुप्ते

या उपक्रमामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणाऱ्या मात्र प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात आले. ज्या क्षेत्रांची दखलही घेतली जात नाही अशा क्षेत्रातील स्त्रियांचा गौरव केल्यामुळे या स्त्रियांना अधिक  प्रोत्साहन मिळेल.

अश्विनी जोशी

सुखवस्तू जीवनशैली सोडून गरीब, अज्ञान आणि कठीण परिस्थितीतील मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या भारती ठाकूर यांचे खूप अभिनंदन. या दुर्गा आपले काम जिद्दीने आणि सातत्याने करीत आहेत ही अतिशय मोठी बाब आहे. कितीही अडचणी आल्या तरी या दुर्गा खंबीरपणे काम करीत आहे. समाजाला चांगला संदेश पोहोचविण्याचे काम या नवदुर्गा करीत आहेत, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.

कांचन सोनटक्के

लोकसत्ताच्या नवदुर्गाचा सन्मान ही संकल्पनाच मला खूप भावली. या उपक्रमामुळे तळागाळात काम करणाऱ्या खऱ्या दुर्गाचा सन्मान करण्यात आला. अनुराधा देशपांडे ही नवदुर्गा तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी झटत आहे. देशाचा विकास करावयाचा असेल तर तरुण पिढीला घडविण्याची गरज आहे. येथे आलेली प्रत्येक दुर्गा समाजाच्या विकासासाठी अनोखे कार्य करीत आहे.  लोकसत्ता समूहाचे अभिनंदन.

लता नार्वेकर

नवदुर्गा उपक्रमात निवडण्यात आलेली प्रत्येक दुर्गा आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काम करीत आहे. या स्त्रियांच्या कामासाठी माध्यमांकडून होणारा सत्कार महत्त्वाची भूमिका बजावतो. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आम्हा सर्वजणींना नवदुर्गाबद्दल कुतूहल होते. त्यांच्या कामामध्ये झपाटलेपण आहे. त्या प्रत्येक नवदुर्गाची कथा प्रेरणादायी आहे. या सन्मानामुळे समाजापुढे अनेक आदर्श निर्माण झाले आहेत.

देवकी पंडित

‘लोकसत्ता’च्या ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमामुळे सामाजिक काम करणाऱ्या मात्र प्रसिद्धीपासून कैक योजने दूर असणाऱ्या स्त्रियांना समाजासमोर सन्मानित करण्यात आले हे कौतुकास्पद. आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या डॉ. सुजाता गोडा यांचे काम निश्चितच महत्त्वाचे. या कार्यक्रमातील प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या सामान्य कुटुंबातील असमान्य काम करणाऱ्या स्त्रियांना माझा सलाम.

डॉ. रागिणी पारेख

या सर्व नवदुर्गाचे काम थक्क करणारे आहे. तळागाळात काम करणाऱ्या या स्त्रियांना ‘लोकसत्ता’ने व्यासपीठ मिळून दिले आहे. आधार नसताना या दुर्गा ताकदीने आपले कार्य करीत आहेत याचे कौतुक आहे. आपण मंदिरात देव शोधतो, मात्र खरे देवत्व या स्त्रियांमध्ये आहे. समाजातील प्रत्येकीने  या दुर्गाना आपला आदर्श मानायला हवा.

रुपाली अंबुरे

या उपक्रमामुळे तळागाळात काम करणाऱ्या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या प्रत्येकीचे काम खूप मोठे आहे. नासरी चव्हाण शालेय शिक्षण घेण्यासाठी १६ किमी चालत जात होती. हे पाहून थक्क झाले. या समाजाभिमुख उपक्रमाचा मला भाग होता आले याबद्दल लोकसत्ताचे आभार.

कविता मेढेकर

लोकसत्ताच्या या उपक्रमामुळे समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. स्त्री ही सौंदर्याची मूर्ती नसून तिच्या कर्तृत्वात समाज बदलण्याची ताकद आहे. सृष्टी सोनवणेला साप, तरससारख्या प्राण्यांना सांभाळण्याची प्रेरणा कुठून मिळाली असेल? सध्याच्या जगात सर्वजण स्वत:पुरता विचार करतात, मात्र प्राण्यांना प्रेम देण्याचा सृष्टीचा विचार खूप मोठा आहे.

प्रतीक्षा लोणकर

chaturang@expressindia.com  

(संकलन -मीनल गांगुर्डे)