मुंबईची महिला विशेष गाडीअर्थात लेडीज स्पेशलला नुकतीच पंचवीस र्वष पूर्ण झाली. प्रत्येकाच्या आयुष्यात रेल्वेचं एक विशेष स्थान असतंच, परंतु नोकरदार स्त्रीच्या आयुष्यातलं तिचं स्थान मर्मबंधातल्या ठेवीप्रमाणे! कारण तेवढाच काळ फक्त तिचा असतो. त्या काळात ती फक्त तीअसते. सारी दु:खे, वेदना मागे ठेवून येणारी किंवा त्याच सुखादु:खात वाटेकरी मिळाल्याने शांतावणारी! आमच्या असंख्य स्त्री प्रवाशांनी आमच्याकडे असे अनुभव पाठवले. काही हळवे, काही अस्वस्थ करणारे, काही सुखद तर काही चटका लावणारे. वर्षांनुवर्षे एकाच वेळेत, एकाच वाटेवर प्रवास करणाऱ्या तरीही वेगळेपण जपणाऱ्या आमच्या या मैत्रिणींचे फिरत्या चाकावरचेहे काही निवडक अनुभव.. 

भावनेचा ओलावा

लग्न, नोकरी आणि बोरिवली – चर्चगेट प्रवास याची तशी एकदमच सुरुवात झाली. आधी फस्र्टक्लासचा पास काढला, पण आलेले अनुभव थोडे कटूच होते. मग सेकंडक्लासचा पास काढला आणि लाकडी सीटवर बसणाऱ्यांची माणुसकी उलगडत गेली..

गरोदर असताना मैत्रिणी सीटवरून उठू तर द्यायच्या नाहीतच, पण छोटय़ा डब्यांतून डोहाळेही पुरवायच्या. एकदा तर वेगळाच अनुभव आला. गाडी थांबायच्या आधीच आत उडी मारली आणि एक ठोसा बसला, वळले, उतरून त्या बाईला २-३ ठोसे लगावले आणि मगच गाडीत चढले. एरवी शांत स्वभावाच्या माझ्या या अवताराकडे मैत्रिणी बघतच राहिल्या. चाळिशीनंतर नेरुळला शिफ्ट व्हावे लागले. मग सुरू झाला प्रवास नेरुळ – सी.एस.टी.चा. वाटले या वयात कोण आपल्याला ग्रुपमध्ये सामावून घेणार? पण लवकरच एका ग्रुपचा अविभाज्य भाग बनले. माझ्या सासूबाई आजारी असताना मला जागरण व्हायचं. पनवेलच्या सख्या मला खिडकीची जागा द्यायच्या आणि सी.एस.टी.पर्यंत डोळे मिटून बसायला लावायच्या. एके दिवशी नेरुळला चढल्यावर एका छोटीने मला स्वत:ची सीट दिली आणि, ‘आई तुझ्या मांडीवर बसते’ म्हणाली. मग हे रोजचेच होऊन गेले. एक वेगळंच नातं निर्माण झालं. गेल्या वर्षी पत्ता शोधत ‘मदर्स डे’ला भेटायला आली. नेरुळ सोडून दहिसरला आलो आणि आता विरार ट्रेनने जायचे, या कल्पनेने पोटात गोळाच आला. पण तुला सवय नाही म्हणून गाडीत आधी कोंबून नंतर चढणारी मैत्रीणही मिळाली.

नोकरी सोडून आता बारा वर्षे झाली, तरी मर्मबंधातल्या आठवणींचे, असे हे गाठोडे आजही माझ्यापाशी आहे.   निर्मोही करंदीकर, दहिसर

 

तीही हिरकणीच!

प्रत्येकाच्याच मनात मुंबईच्या या जीवनवाहिनीशी निगडित असंख्य आठवणी असतात. २६ जुलै २००५ चा पाऊस, ११ जुलै २००६ चे बॉम्बस्फोट असे काही प्रसंग दशांगुळे ‘वर’ असतात. असाच एक अविस्मरणीय प्रसंग मी अनुभवलेला.

लवकर निघण्याची परवानगी घेऊन मी ऑफिसमधून घरी – बोरिवलीला – निघाले होते. साधारण ४.१५- ४.३० च्या दरम्यान चर्चगेटहून विरारसाठी सुटणाऱ्या जलद गाडीचा द्वितीय श्रेणीचा स्त्रियांसाठीचा आरक्षित शेवटचा डबा. गाडी सुटायला थोडाच वेळ असताना त्या डब्यात  शिरले. विरार जलद गाडय़ा बोरिवलीला साधारणपणे ज्या ४ क्रमांकाच्या फलाटाला लागतात त्या बाजूला उभी राहिले. (पश्चिम रेल्वेने बोरिवलीचे क्र. १, २, ३ चे फलाट ‘विरार’ गाडय़ांना ‘आंदण’ दिले त्यापूर्वीचा हा काळ होता.) माझ्यासारखाच विचार करून अजूनही काही जणी आल्या आणि एक ‘ती’ आली, माझ्या शेजारीच धापा टाकत उभी राहिली.

गर्दी वाढता वाढता वाढतच गेली, पण आपण दाराच्या जवळच उभ्या आहोत, उतरू शकू बोरिवलीला असे वाटत होते, पण तसे घडायचे नव्हते. बोरिवली येण्यापूर्वी गाडीने आपला मार्ग बदलला व ती क्रमांक ४ ऐवजी ३ वर जाणार हे स्पष्ट झाले. आमच्या सगळ्यांच्याच पोटात गोळा उठला, कारण या गर्दीतून विरुद्ध बाजूला जाऊन तो दरवाजा गाठायचा म्हणजे ‘दिव्य’च होते आणि बोरिवलीकरांशी ‘सनातन वैर’ असलेल्या आमच्या इतर सहप्रवासिनींनी आम्हाला उतरू न देण्याचा चंग बांधला. सटासट वाग्बाण सुटले. मी निर्णय घेऊन टाकला दहिसरला उतरण्याचा – आलाच समोर टीसी तर बघू – असा विचार करून – पण शेवटी आलेली, माझ्या शेजारी उभी होती ती एक असहाय ‘आई’ होती. तिचे पाळणाघरात असलेले मूल आजारी होते असा निरोप मिळाल्याने ती धावत निघाली होती. तिने सारे सांगून पाहिले, आम्हीही ‘निदान तिला तरी उतरू द्या’ असे विनवून पाहिले, पण त्यांच्यातील एकाही माऊलीला (!) दया आली नाही. बोरिवली स्थानकात गाडी शिरताना याचा कडेलोट झाला आणि फर्मावले गेले, ‘‘एवढीच काळजी आहे मुलाची तर मार या विरुद्ध बाजूने उडी आणि जा त्याच्याकडे.’’ तिचे, आमचे सारेच शब्द गोठले आणि त्या हिरकणीने फक्त आणि फक्त तिच्या बाळासाठी विरुद्ध बाजूच्या दारातून खाली उडी मारली.

या ‘धमनी’शिवाय मुंबईकरांचा ‘प्रवाह’ वाहूच शकत नाही. पण सण, समारंभ, वाढदिवस सारे सारे साजरे करत तिच्यातून प्रवास करताना वर्षांनुवर्षे मागे पडतात, पण असे काही प्रसंग मात्र प्रश्न विचारतात – फक्त ‘परचक्र’ आल्यावरच आपण एक व्हावे का? एरवी बोरिवली विरुद्ध विरार, विरार विरुद्ध डहाणू असे हे सनातन वाद कधी संपणार? या वैराचा अंत कधी होणार?  शोभा श्रीयान, अंधेरी (पूर्व)

 

ट्रेनच्या ग्रुपची आपुलकी

संध्याकाळची ५.२७ ची दादर-विरार लोकल. लेडीजचा प्रथम वर्गाचा डबा. आमचा १० ते १२ जणींचा ग्रुप. वेगवेगळ्या धर्माच्या, जातीच्या समाजातील सर्व स्तरावर क्षेत्रात काम करणाऱ्या आमचा एक मस्त ग्रुप झाला होता. काहीही झाले तरी ट्रेन पकडायचीच हे ठरलेलं. आटापिटा करत ट्रेन मिळवायचीच. शेवटच्या क्षणी धापा टाकत गेले की कोणी तरी पटकन उठून आधी बस बस म्हणत असे. लगेच कुणी तरी पाण्याची बाटली पुढे करीत असे. इतकी आपुलकी, प्रेम, वाट बघणारी माणसं फक्त लोकलच्या ग्रुपमध्येच!

माझ्या आयुष्यातला तो आनंदाचा दिवस. ऑफिसची लेखी परीक्षा मी उत्तीर्ण झाले होते. पेढे घेऊनच संध्याकाळी ट्रेनमध्ये गेले. माझा आनंद बघून मैत्रिणीही खूश झाल्या.  हा आनंद तेवढय़ावरच थांबला नाही. दुसऱ्या दिवशी मैत्रिणींनी ट्रेनमध्ये पार्टी साजरी केली. साडी, गजरा, ओटी भरून माझा आनंद द्विगुणित केला. माझे प्रमोशन हा त्यांचाच आनंद होता. खरंच दुसऱ्याच्या दु:खात सहभागी व्हायला माणसाचं मन मोठं असावं लागतं पण त्याहीपेक्षा दुसऱ्यांच्या सुखात सहभागी व्हायला मन जास्त मोठं असावं लागतं. हा झाला आनंदाचा भाग. परंतु एकमेकींची दु:खं, अडचणीसुद्धा आम्ही तितक्याच तत्परतेने वाटून घेत होतो. १ डिसेंबर २००२ चा दिवस आम्ही सकाळी विरार-दादर ट्रेनमध्ये होतो. आमच्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याला कार्यालयात जाताना ट्रेनमध्येच हृदयविकाराचा झटका आला होता. तिला फोन आला. आम्ही चार-पाच मैत्रिणी तिच्याबरोबर दादरला हिंदू कॉलनीतल्या डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते. दहा हजार रुपयांचे इंजेक्शन द्यायचे होते. आम्ही सर्वानी मिळून पैसे भरले. दिवसभर तिच्यासोबत थांबलो. तिचे नातेवाईक आले. त्यानंतरही ८ ते १० दिवस रुग्णालयात आमची ये-जा चालू होती. कुणी तिच्यासाठी नाश्ता तर कुणी जेवणाचा डबा घेऊन जात होतो. अजूनही १ डिसेंबरला तिचा फोन येतो. म्हणते, ‘नवऱ्याचा पुनर्जन्म झाला तुमच्यामुळे.’    अंजली सौंदणकर, नासिक

पंचवीस वर्षांची साथसोबत

मला ती संध्याकाळ आजही चांगली स्मरणात आहे. ५ मे १९९२ हा तो दिवस होता. माझ्या आयुष्यातील गर्भपाताच्या अतिशय दु:खद घटनेनंतर दीड महिन्यांनी मी त्या दिवशी ऑफिसला आले होते. त्यामुळे शारीरिक व मानसिक धक्क्यातून मी पुरती सावरलेलीही नव्हते. कसाबसा ऑफिसचा दिवस भरला आणि कधी नव्हे ते ‘बसायला जागा मिळाली तर ठीक नाहीतर एवढय़ा गर्दीतून घरी कसं जायचं?’ या चिंतेतच चर्चगेट स्टेशन गाठलं. मात्र स्टेशनवर येताच सुखद धक्का बसला. प्लॅटफॉर्म क्र. १ वर नवी कोरी, झेंडूंच्या माळांनी सजविलेली आमची लाडकी जीवनवाहिनी मोठय़ा दिमाखात उभी होती. महिला विशेष गाडी’ (लेडीज स्पेशल). खास आम्हा स्त्रियांसाठी! पूर्ण ९ डब्बे अगदी आमच्या तैनातीत असणार होते. आजपासून जणू ती माझ्या दिमतीला उभी आहे अशी कृतज्ञतेची भावना तिच्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकीच्या मनात उमटली ती आज २५ वर्षांनंतरही तशीच आहे.

तिला पाहिलं आणि मला आलेला शारीरिक, मानसिक थकवा कुठल्या कुठे पळाला. गेली २५ र्वष आमची फारच गट्टी जमली आहे. ऑफिसमधून सुटलं की धावत-पळत त्या गाडीच्या कुशीत शिरलं की शांत-निवांत वाटतं. गेली २५ र्वष सातत्याने प्रवास करणाऱ्या माझ्यासारखीला या कुटुंबसखीनं, लेडीज स्पेशलनं मानसिक, शारीरिक आधार तर दिलाच आहे, पण त्याचबरोबर भावनिक जाणिवा, एकोपा, सहकार्य इत्यादींचं महत्त्व शिकवून वेळप्रसंगी कणखर होत आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याचं सामथ्र्यही दिलंय. पुढल्या वर्षी मी सेवानिवृत्त होत असल्यामुळे आत्तापासूनच माझ्या या लाडक्या महिला विशेष गाडीची होणार असणारी ताटातूट सहन करण्याची मानसिक तयारी मी करतेय.    मृदुला दामले, खार मुंबई</strong>

 

तो वेगळाच दिवस

ऑफिसबाहेर पडून मैत्रिणींबरोबर शेअर टॅक्सी पकडून चर्चगेट गाठले. गाडी आधीच आली होती म्हणून बसायला जागा नव्हती. मी बरी जागा बघून उभी राहिले व पुस्तक वाचायला घेतलं. गाडी अगदी वेळेवर सुटली. चर्नीरोड स्टेशनला गाडी थांबली. तोपर्यंत ती बऱ्यापैकी भरली होती. एका १८ -२० वर्षांच्या सडपातळ मुलीने पहिली उडी मारली व ती शिताफीने आत आली. दाराजवळ एक जाड गावंढळ बाई उभी होती. त्या बाईला या मुलीचा धक्का लागला व भांडण सुरू झाले. ‘‘मला धक्का का मारला?’’ म्हणत त्या बाईने मुलीच्या एक श्रीमुखात भडकवली. त्या हल्ल्याने ती मुलगी गडबडली. माझ्या जवळच्या रिकाम्या जागेवर येऊन उभी राहिली नि रडू लागली. २-३ मिनिटे तिचे स्फुंदून स्फुंदून रडणे चालूच होते. इतर वेळी डब्यात आवाज-कलकलाट असतो, पण आता ‘पिन ड्रॉप’ शांतता होती. सर्वजणी घडलेला प्रकार ‘पाहात’ होत्या. दोन स्टेशन्स गेली तरी तिचे हुंदके थांबेनात. तेव्हा मी तिच्या पाठीवर हात ठेवला व थोडं थोपटलं. तिचे हुंदके कमी झाले. नंतर मी त्या बाईला सुनावलं, ‘धक्का लागल्यावर मारतात का? गाडीत धक्का लागतोच व या डब्यात सर्व बायकाच आहेत. तू हे बरोबर केलं नाहीस.’’ त्याबरोबर ती मुलगी रडायची थांबली. नंतर प्रकरण शांत झालं असं वाटलं. गाण्याच्या भेंडय़ा – गलका सुरू झाला. मीही पुस्तक उघडलं. जोगेश्वरी आलं. ती बाई उतरण्यासाठी पुढे सरकली. त्याबरोबर करंट लागल्यासारखी ती मुलगी त्या बाईपाठोपाठ जाऊ लागली. स्टेशन आलं. चढण्या-उतरण्याच्या गलक्यात एक फाडकन मुस्काटात मारल्याचा व ‘मुझे क्यूँ मारा?’ असे आवाज एकाच वेळी आल्यामुळे मी काय झालं म्हणून दाराकडे पाहू लागले. बाहेर पाहिले तर ती मुलगी वेगाने पळत होती व ती बाई गाल चोळत गोंधळून उभी होती. मी नजर परत डब्यात वळवली तर ‘मिळून साऱ्याजणी’ माझ्याकडे पाहात होत्या. मी शांतपणे पुस्तकात डोकं घातलं..     नीता मठकर, अंधेरी

 

घाबरट असल्याचा साक्षात्कार

आता मी सेवानिवृत्त आहे, पण माझ्या उमेदीच्या काळात मी केवळ कुल्र्याला येणाऱ्या संध्याकाळी ६.१० च्या रेल्वे (ट्रेनसाठी)नोकरी केली असे म्हटले पाहिजे. या प्रवासातला एक दिवस वेगळा उगवला. गाडी थोडी उशिरा आली. गर्दी तुडुंब होती. मधल्या डब्याचा पहिला दरवाजा. नेहमीप्रमाणे मी पहिली चढले आणि कोणी तरी माझ्या पाठीवर चापटी मारली. अंदाजाने मी त्याची परतफेड केली. माझाच हात तो, जरा जास्त लागला असणार. हे सर्व क्षणांत घडलं. मी आत खिडकीत पोहोचले आणि ती ठाण्याला उतरण्यासाठी दरवाजात. सुरक्षित अंतर पाहून दोघींनीही तोंडाचे पट्टे सोडले. बराच वेळ वाद रंगला. ‘उद्या ये मग बघते’ असा सज्जड दम देऊन ती गेली.  दुसरा दिवस उजाडला. सबंध दिवस कसाबसा घालवला, पण संध्याकाळी गाडीची वेळ होताच माझे हात-पाय गळाले. मैत्रिणींना नेहमीच्या वेळेत जाऊ दिले. मी घाबरून ब्रिजवरच उभी राहिले. ६.१० ची नेहमीची ट्रेन जाऊ दिली. आणखी दोन गाडय़ा सोडल्या आणि मगच प्लॅटफॉर्मवर उतरले. माझ्यासारख्याच घाबरून तिने गाडय़ा सोडल्या असतील तर.. मला गँग, ग्रुप, मारामारी याचा काहीच अनुभव नव्हता. आता येणाऱ्या गाडीचे तोंड दिसताच मी मधल्या डब्याकडून शेवटच्या डब्याकडे धावायला सुरुवात केली. (तेव्हा नऊ डब्यांच्या गाडय़ा होत्या); पण गर्दीमुळे मला अपेक्षेप्रमाणे धावता येईना. मी डब्यापर्यंत पोहोचले आणि गाडी हलली. आतल्या बाईने मला हात दिला आणि वर ओढून घेतलं. आभार मानण्यासाठी मी मोठ्ठा श्वास घेतला आणि बघितलं तर काय? तीच कालची, धमकी देणारी, बघून घेईन म्हणणारी, मी जिला घाबरले होते ती. दोघीही आम्ही एकमेकांकडे पाहून मनमोकळ्या हसलो. दोघीही घाबरलो होतो. दोघींनाही कालचा प्रसंग टाळायचा होता. ठाणे स्टेशन आलं तेव्हा ती खिडकीपाशी आली आणि हसून मला टाटा-बाय् बाय् करून गेली. खरंच जगात कोणीच वाईट नसतं. वाईट असे ती परिस्थिती!    शुभदा पाटकर, डोंबिवली

 

केवल महिलाओं के लिए

‘केवल महिलाओं के लिए’ असं लिहिलेल्या त्या काही चौरस फुटांच्या जागेत संपूर्ण स्त्री जातीचं विश्व उलगडत जातं. सर्व जाती-धर्माच्या, सर्व आर्थिक, सामाजिक स्तरांतून येणाऱ्या, सर्व वयोगटांतील स्त्रियांसाठी असलेला हक्काचा ‘लेडीज डबा’. रोज या डब्यातून प्रवास करता करता छंदच लागून गेला.. त्यांचं निरीक्षण करायचं. शांतपणे त्यांच्या गप्पा ऐकायच्या, काही निष्कर्ष बांधायचे.. खूप एन्जॉय करायला लागलेय मी हे सगळं. खूप ऊर्जा देऊन जातो हा ‘केवल महिलाओं के लिए’ असलेला डबा. स्टेशनवर उभं असल्यापासूनच निरखून पाहाव्यात एकेकीच्या अदा.. कुणी स्वत:चा चेहरा स्कार्फमध्ये पूर्ण झाकून घेऊनदेखील डोळ्यांतून स्वत:च्या सुंदरतेची अस्फुट झलक दाखवणारी. कुणी असते सदा हसऱ्या चेहऱ्याची. कुणी फोर्थ सीटवर बसलेली असूनही स्वत:हून ‘मी उतरेन, तुम्ही बसा’ असं म्हणणारी.. तर कुणी आपण कुठे उतरणार असं विचारल्यावर भलतंच विचारतोय, अशा आविर्भावात ‘कुर्ला’ आदी रूक्षपणे सांगणारी.. कानातलेवाला आल्यावर कुणी सहज एक-दोन बघते आणि पटकन घेऊन टाकते.. कुणी खूप वेळ बघून झाल्यावर ‘नै चैये’ असं सांगते.

इथल्या कॉलेज गोइंग मुलींचे ग्रुप्स म्हणजे ‘आजकालच्या या मुली म्हणजे ना..’ अशा टिपिकल डायलॉगचे सहज शिकार ठरतात. त्यांचे ते फॅशनच्या नावाखाली ठरावीक काळाने बदलत जाणारे कपडय़ांचे पॅटर्न्‍स, हेअर स्टाइल्स, चपलांच्या पॅटर्न, पर्सच्या डिझाइन्स.. सगळं मन रमून जाईल असं. त्यांच्या गप्पा मात्र टिपिकल काही ठरावीक विषयांभोवती पिंगा घालणाऱ्या.. उदाहरणार्थ, ‘हिचा बॉयफ्रेंड, त्याची गर्लफ्रेंड, यांचा ब्रेकअप, त्यांचा पॅचअप, असाइन्मेंटच्या डेट्स, कॉलेजचे डेज आणि मोस्ट कॉमन म्हणजे ‘शॉपिंग’.. त्या मानाने मोठय़ा बायकांच्या गप्पांचा आवाका फारच मोठा.. यात ‘नवरा, मुलं, सासूसासरे, नातेवाईक, नातेवाईकांची लग्नं, शेजारीपाजारी, बॉस, मैत्रिणी, रेसिपीज, साडय़ा, डिस्काउंट ऑफर्स, डाळींचे वाढते भाव, पोटाचा घेर कमी करण्याचे, पाळीची दुखणी कमी करण्याचे, त्वचा गोरी करण्याचे उपाय, एखाद्या समस्येवर तोडगा असलेले स्तोत्र.. आणि बरंच काही. कुणी खिडकीत बसून केसांच्या बटा सोडवत गालातल्या गालात हसणारी.. कोणाचे तरी केसांत गुंतलेले श्वास हळुवार बोटांनी सोडवणारी. तर कधी तिच्याच बाजूला बसलेली लठ्ठ तिच्याकडे उगाचच तिरक्या डोळ्यांनी पाहणारी, संबंध नसतानाही तिच्याकडे सारखे कटाक्ष टाकणारी.

या सर्वजणींना काही तासांसाठी अथवा काही मिनिटांसाठी आपलंसं करतो हा महिलांचा डबा. कधी आपली स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी, कधी आपल्या माणसांचं आयुष्य अधिक सुंदर बनवण्यासाठी.. कधी स्वत:ची नवीन ओळख बनवण्यासाठी.. तर कधी स्वत:च्या समस्या विसरण्याला गर्दीचा आसरा शोधण्यासाठी. समस्त स्त्रीजात हक्काचे आणि निश्चित काही क्षण घालवते या ‘केवल महिलाओं के लिए’ असणाऱ्या डब्यात. खरंच इथे काही वेळ घालवताना विसरून जायला होतं स्वत:ला आणि विश्वात निर्माण झालेल्या या ‘स्त्री’जातीबद्दल असणारं अप्रूप, आदर अधिकच दुणावतो.    विजया कवले

 

हूड पण जबाबदार मुलं

१९६९चा काळ. मी नुकतीच आठवीला माध्यमिक शाळेत जायला लागले होते. आम्ही भायखळ्याला राहात होतो आणि शाळा होती दादरला मुलींची. आमच्याच मजल्यावर माझ्याबरोबर सातवी उत्तीर्ण झालेली मुलगी होती. एकमेकींना सोबत होईल म्हणून तिला ही माझ्याच शाळेत घातले होते. आमची शाळा सकाळी सातची असल्याने सकाळी सहालाच निघायचो. आमचा फर्स्ट क्लासचा पास होता. पण त्या डब्यात फारच कमी स्त्रिया असायच्या. एकटय़ादुकटय़ा मुलींनी असा रेल्वेच्या डब्यातून प्रवास करण्यात काय धोके असतात हे समजण्याचे ते वय नव्हते. आमच्या डब्यात आमच्याच वयाच्या शाळेत जाणाऱ्या चार-पाच मुलांचं टोळकं चढत असे. ती मुलं खूप दंगामस्ती करीत. पण त्यांनी आम्हाला कधी त्रास दिला नाही. एक दिवस नेहमीप्रमाणे त्यांची मस्ती चालली होती आणि त्यांनी दादर ज्या बाजूला यायचे तो दरवाजा बंद केला. नंतर दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तर तो उघडेना. आम्ही दोघी हे सारे केविलवाणे होऊन पाहात होतो. दादर स्टेशन आले पण दरवाजा काही उघडला नाही. ट्रेन दादरला थांबताच त्या मुलांनी पलीकडच्या दरवाजातून खाली उडय़ा मारल्या. पण एवढय़ा उंचीवरून उडय़ा मारणे आम्हाला शक्य नव्हते. आम्ही हतबल होऊन त्यांच्याकडे पाहात आहोत, हे त्याच्या लक्षात येताच क्षणाचा ही विलंब न लावता त्यांनी आम्हाला उतरायला मदत केली. पलीकडच्या बाजूला अगदी लागूनच भिंत होती. ट्रेन आणि भिंत यामध्ये फार तर एक फुटाचे अंतर असावे. ट्रेन जाईपर्यंत आम्ही सर्व जण भिंतीला चिकटून उभे होतो. जरा जरी आम्ही हालचाल केली असती तर आमचे काय झाले असते माहीत नाही. ट्रेन जाताच ती मुले काहीच घडले नाही अशा आविर्भावात निघून गेली. आज जाणवते की अल्लड आणि हूड वाटणारी ती मुले प्रसंग येताच क्षणार्धात सजग आणि जबाबदार झाली होती.   नीता मयेकर

 

अनोळखी हातांची मदत

१५ मे १९७७ ला विवाहबद्ध होऊन वेंगुल्र्याहून मुंबईस आले. येथील चाळवस्ती, ट्रेनप्रवास व घाईगर्दीचे जीवन पाहून सुरुवातीला थोडी घाबरलेच. पण अल्पावधीतच मुंबईच्या लोकल ट्रेनने मला आपलेसे केले. परळला शिरोडकर हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी. गाडीत हळूहळू मैत्रिणीही मिळाल्या. शिंदे, बोवलेकर या दोन सख्या रोज माझ्या सोबत असायच्या. फलाटावर माझी वाट पाहणे, गाडीत चटकन चढून माझ्यासाठी जागा मिळवणे यात त्यांनी कधी कुचराई केली नाही.

नंतर १९८५ पासून माझा मुलुंड-परळ असा ट्रेनप्रवास सुरू झाला तो २००७ मध्ये निवृत्त होईपर्यंत. मात्र १९९२ पासून संध्याकाळी ६.२३ ला परळला येणाऱ्या महिला लोकलने पुढील १५ वर्षे प्रवास केला. दुपारी ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळी आम्ही एकमेकांना थोडा वेळ बसायला जागा द्यायचो. गाडीत विविध शाळांच्या शिक्षिका असल्याने शालेय विषयांवर अधिक गप्पा होत. चव्हाण, नाग, जाणवलेकर वगैरे शाळेतील मैत्रिणी, देशपांडे, करंदीकर, कामत, नाईक, चरेगावकर इत्यादी अन्य शाळांमधील शिक्षिका व इतर असा मैत्रिणीचा मोठा ग्रुप होता. वर्षांनुवर्षांच्या सहप्रवासाने आमची मैत्री अधिकाधिक दृढ होत गेली. आम्ही एकमेकांच्या सुख:दु:खात सहभागी व्हायचे, त्यामुळे सबंध दिवसाचा शीण निघून जायचा.

एकदा मी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ट्रेनमध्ये भांडुपला अचानक बेशुद्ध झाले होते. पण इतर सहप्रवाशांच्या प्रयत्नांनी परत शुद्धीवर आले. डोळे उघडून पाहिले तर मला सीटवर झोपवून डब्यातील सहप्रवासी माझ्यावर उपचार करीत होत्या. त्यांनी मला पाणी पाजले व माझी चौकशी करून कुठे जाणार असे विचारले. मी परळला शिरोडकर शाळेत जाणार असे कळताच डब्यातील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन-चार मुली पुढे आल्या व परळ स्टेशनवर गाडी थांबताच त्यांनी मला आधार देऊन फलाटावर उतरविले. पण जिना चढण्याचे बळ माझ्या अंगात नसल्याने त्यांनी पुन्हा मला परतीच्या प्रवासासाठी ठाणे ट्रेनमध्ये बसवून दिले आणि गाडीतील स्त्रियांना मुलुंड स्टेशनला उतरविण्यास सांगितले. त्या दिवशी त्या शिकाऊ  डॉक्टर मुली व स्त्रियांनी मला केलेली मदत कायम माझ्या स्मरणात राहिली. या पत्राच्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद देते.  विभा भोसले, मुलुंड (पूर्व)

 

माणुसकीचे अनुभव

फिरत्या चाकावरचा हा प्रवास गेली २७ वर्षे चालू आहे. मालवणसारख्या छोटय़ा गावातून लग्न होऊन मी डोंबिवलीला आले आणि डोंबिवलीकर होता होता मी या मुंबईच्या धकाधकीच्या वातावरणाशी चांगली रुळले. एकदा मी डोंबिवलीला जाण्यासाठी ठाण्याला लोकल पकडली, माझ्यापाठोपाठ मोठा गर्दीचा लोंढा आला आणि मी जशीच्या तशीच चेंगरून उभी राहिले, गाडी चालू झाल्यानंतर मी माझा हात जरा सावरायचा प्रयत्न केला, पण हाय रे देवा,! माझा हात एका बाईच्या पर्समध्ये अडकलेला होता. मी हाताची हालचाल करताच त्या बाईच्या ते लक्षात आले आणि ती माझ्या अंगावर ओरडलीच, ‘काय गं, गर्दीचा फायदा घेऊन चोरी करते का?’  मला धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे असे वाटले. भाजीवालीने चुकून दोन रुपये जरी जास्त दिले तरी परत करणारी मी आणि आज माझ्यावर हा कुठला प्रसंग येऊन ठेपला. मी तिला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तिला माझे म्हणणे पटले की नाही कळले नाही, पण ती थोडय़ा वेळाने शांत झाली, एवढे खरे.

२६ जुलैचा पाऊस तर सर्वाच्याच लक्षात आहे. तेव्हा ट्रेन पूर्ण बंद पडल्या होत्या. त्यानंतर चार-पाच दिवसांनी दळणवळण पूर्ववत मार्गावर येत असतानाच वैतागून मुंब्य्राच्या लोकांनी रेल रोको केले. गाडी सीएसटीला जाऊ  न देण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. बराच वेळ वाट बघून शेवटी इतर लोकांप्रमाणे मीही गाडीतून खाली उतरायचे ठरवले. पण ते एवढे सोपे नव्हते. त्या वेळी तिथल्याच मुसलमान आंदोलनकर्त्यांनी मला गाडीतून उतरायला मदत केली व समोरच्या ट्रॅकवर उभ्या असलेल्या परत डोंबिवलीला जाणाऱ्या गाडीत चढवले. त्या तेवढय़ा वेळात माझी पर्स त्या माणसाच्या हातात होती, हे माझ्या नंतर लक्षात आले. पण पर्ससकट मला सुरक्षित पोहोचविणारा तो खरंच परोपकारी माणूस होता.

याउलट अनुभव नंतर बऱ्याच वर्षांनी दिवा स्टेशनला आला. रेल रोको करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना न जुमानता गाडीवर चक्क दगडफेक केली. त्यातून कसेबसे सुटका करून दिवा गावात गेलो तर डोंबिवलीला जाण्यासाठी रिक्षावाल्यांनी लूट आरंभली. प्रवासात कुणाचा कसा अनुभव येईल कुणी सांगावं?    दीपिका सामंत, डोंबिवली

 

हाफ डेवाचवण्यासाठी

धुवाधार पाऊस. प्लॅटफॉर्म नं. २ वर स्लो ट्रेनची वाहतूक पूर्णपणे ठप्प. चार नंबर प्लॅटफॉर्मवर फास्ट ट्रेन येत होत्या. त्याही विलंबाने. ट्रेन थांबताच जिवाच्या आकांताने आम्ही ट्रेनमधल्या लेडीज डब्यामध्ये चढण्याचा.. छे छे घुसण्याचा प्रयत्न करीत होतो. ‘‘या महिन्यात आधीच दोनदा उशिरा गेलेय. आज पुन्हा उशीर झाला. तर माझा हाफ डे जाईल.’’ मीराने सांगितले. ‘‘मग आता जी ट्रेन येईल त्यात तुला घुसायलाच पाहिजे.’’ माझा पोक्त सल्ला.

अखेर लांबून ट्रेन येताना दिसली. आम्ही छत्र्या, पर्सेस, ओढण्या, पदर सावरून वीरश्रीच्या आवेशात उभे राहिलो. गाडी आली. टेकली. मोठमोठी दप्तरे घेऊन कॉलेजकन्यका अवतरल्या. पर्सेस, छत्र्या संभाळत स्त्रिया उतरल्या. डब्यात आधीच इतकी प्रचंड गर्दी होती की चढायला जागाच नव्हती. मी जीव मुठीत धरून आतमध्ये शिरले. मीरा माझ्यामागे होती. मी आतल्या स्त्रियांना पुढे सरकण्याची विनंती करीत होते, कारण मीराला पाऊल ठेवायला जागाच नव्हती. अशातच गाडी सुटली. त्यामुळे मीरा आणि अनेकजणी गाडीत चढूच शकल्या नाहीत. मी गाडीत आधी न चढता मीराला पुढे करायला हवे होते, असे मनात राहून राहून येऊ लागले. बिचारीचा नाहक हाफ डे जाणार, मला वाईट वाटत होते. मीराचा चेहरा दिवसभर डोळ्यासमोर येत राहिला. माझ्याकडे तिचा मोबाइल नंबरही नव्हता.

दुसऱ्या दिवशी मी वेळेच्या आधीच प्लॅटफॉर्मवर पोचले. मीराची वाट पाहू लागले. ती लांबून येताना दिसली. मला पाहून निव्र्याज हसली. ‘‘काल तुझी गाडी चुकली. हाफ डे गेला ना?’’ मी खंतावून विचारले. ‘‘हो. हाफ डे गेला’’ बस इतकंच. परत नेहमीसारखे हसून बोलू लागली. मला वाटले होते की आज ती आल्यावर ‘‘तुम्ही आधीच घुसलात. मला चढायला जागाच ठेवली नाही.’ असं वैतागून म्हणेल.  यापैकी काहीच झाले नाही. लांबून गाडी येताना दिसली. मी मीराचा हात धरून पटकन  ‘‘मीरा, तू चढ बाई आधी. मी तुझ्यामागून चढेन.’’ असं हसून म्हणत गाडीत चढण्यासाठी सज्ज झालो.   प्रीती ठाकूर, मुलुंड

 

विश्वरूप दर्शन!

गती..अन् गतीसाठी धावणारी गर्दी अंधारातून येणारे हात, पाय, बॅगा आणि छत्र्या उगारलेली बोटं रोखलेले श्वास  त्या एका विसाव्याच्या सीटसाठी त्यांच्या नजरा सांगून जातात बरंच काही..

काल घरी झालेली भांडणं, मुलांचे अभ्यास तर क्वचित रात्री अवचित रंगलेली सुरेख मैफिलही त्यांचं बाईपण कधीच सोडून जात नाही त्यांना..त्या नेहमीच असतात कुणाची बायको, सून किंवा आई अन् त्या.. तिथे दारात लटकणाऱ्या – यांची कथाच वेगळी जिवाच्या आकांताने पकडून ठेवलेले हात, अन् ‘अंदर चलो!’ चा गजर..  लटकता लटकता पडून मरू नये यासाठी. कल्लोळ.. शब्दांचा, भावनांचा आणि सुखाच्या शोधाचा. ही ट्रेन नाही, हे विश्वरूप दर्शन आहे हा उत्सव आहे, मानवी हपापलेपणाचा हे सोपं नाही, पण म्हणूनच सुंदर आहे एक इवलंस हसू .. सहानुभुतीचं जड बॅग उचलण्यासाठी मदतीला सरसावणारे अनेक हात.  रोजच्या प्रवासातून जडणारी जिवाभावाची नाती, सुख-दु:खाची देवाण-घेवाण. माणुसकीच्या नात्याने जोडलेले निखळ मैत्रीचे पाश.. हेच सारं तर जगवतंय यांना. जगाचं तत्त्वज्ञान याहून वेगळं काय आहे?  मल्लिका भट

 

पुरुषार्थ?

ही गोष्ट २०-२२ वर्षांपूर्वीची असेल. चर्चगेटच्या लोकलच्या फर्स्टक्लासमध्ये मी चढले. आणखी ५-६ जणी होत्या. वेळ दुपारी साधारण साडेबाराची. अशा वेळी फर्स्टक्लासमध्ये साधारणत: गर्दी कमीच असते. माझ्या समोरच्या सीटवर एक १९/२० वर्षांची तरुणी शांतपणे पुस्तक वाचत बसली होती. एवढय़ात एका स्टेशवर दोन टारगट मुले चढली आणि तिला खेटून बसत घाणेरडे बोलू लागली. ती मुलगी घाबरली. आम्ही सगळ्याजणी त्यांच्यावर ओरडायला लागलो. प्रत्येकजण त्यांना ओरडायला लागल्यावर ते आणखीनच चेकाळले आणि आम्हालाच शिवीगाळ करायला लागले. एवढय़ात दरवाजात बसलेला एक तृतीयपंथी उठला आणि त्याने त्यांची कॉलरच पकडली तर ते दोघे त्यालाही शिवीगाळ करू लागले. त्याबरोबर त्या तृतीयपंथीयाने दोघांच्या जोरात थोबाडीत लगावल्या आणि त्यांच्याच भाषेत धमकावले. मग मात्र ते घाबरले. एवढय़ात स्टेशन आले, त्याने त्यांना ढकलून उतरवले. हे सर्व बाजूच्या डब्यातील पुरुष बघत होते. पुरुष आणि बायकांच्या डब्यांत एका जाळीचे अंतर होते. पण एकाही पुरुषाने आम्हाला आवाज दिला नाही किंवा गाडीची चेनही खेचली नाही. किंवा दोघांना दरडावले नाही. पुरुषार्थ म्हणजे काय? त्या दोन गुंड मुलांना पुरुष म्हणावे की बघ्याची भूमिका घेणाऱ्या माणसांना? का आम्हाला संरक्षण देणाऱ्या त्या तृतीयपंथीयाला?    अनुराधा हरचेकर, गोरेगाव (पूर्व)

 

माणसामाणसांतला संवाद

माझ्या ट्रेन प्रवासाची सुरुवात जवळजवळ तीस वर्षांपूर्वीची. नुकतंच लग्न होऊन गोरेगाव लोकलची कायमस्वरूपी सभासद होऊ घातलेली मी. पुस्तकातला किडा. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. एक टारगट मुलींचा ग्रुप असायचा. सतत मला टोमणे मारणे, माझं वाचन, माझे कपडे, यावर विनाकारण सतत शेरेबाजी. फार असह्य़ झालं सारं. नाइलाजाने नवऱ्याला मध्ये पडावं लागलं. सज्जड दम वगैरे देऊन प्रकरण मिटलं. पण पुढे पुढे रोजचेच चेहरे, हसणे, ओळखी, मैत्री, ग्रुप कसा झाला कळलंच नाही. या सगळ्या धबडग्यात आमच्या ट्रेन प्रवासात लक्षात राहणारी व्यक्ती हमिदा. गोरीगोमटी, हसतमुख, प्रसन्न. ती आली की सारा माहोलच बदलून जायचा. सुरेख गळा, त्यामुळे गाण्याची मैफील जमवायची तर तिनेच. हसत खेळत प्रवास कधी संपायचा कळत नसे. आयुष्य घडय़ाळाच्या काटय़ाशी जुळलेलं. जीवनाचा पसारा-लग्नविधी, सोहळे चालूच असत. कशीबशी सुट्टी पदरात पडून उत्साहाने सोहळे साजरे करायचेच. मेंदी लावलीच पाहिजे. पण वेळ कुठे? कधी? अरे हमिदाला फोन करा! दुसऱ्याच दिवशी ठरलेल्या डब्यात हसरी हमिदा मेंदीचा कोन घेऊन हजर! अध्र्या तासात मेंदी लागायची. ऑफिस गाठेपर्यंत मेंदी सुकायची. दुसऱ्याच दिवसाच्या सोहोळ्याला आपण तयार! हमिदाबद्दल बरंच ऐकून होते. तिची दु:खं ठाऊक होतीच.  ती म्हणे, पोटापुरतं ठेवायचं, बाकी सर्व दान करायची. आम्ही दिलेले मेंदीचेही पैसे दान करते. ’ कुठून आलं हे बळ?  आज मागे वळून पाहताना कळते – तो व्हॉट्सअ‍ॅप किंवा सेल्फीचा जमाना नव्हता. होता तो माणसा-माणसांमधील निखळ संवाद. आता आपण स्वमग्न झालोय. ट्रेनचा प्रवासही कधीच सरला. अजूनही, तसाच असेल का ट्रेनचा प्रवास? व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकमुळे अजून गडद झाली असतील का नाती? की स्वकोषात गेल्या असतील का त्या साऱ्याजणी? माहीत नाही.    सुजाता तांडेल

 

एकमेकांचे सांगाती

अनुभव ६० च्या दशकातला! गाडीला तुफान गर्दी! त्या वेळी प्रवास म्हणजे दिव्यच! शिक्षण व नोकरी अशी दुहेरी कसरत. सांताक्रूझहून सकाळी ६ वाजताची लोकल त्यामुळे बसायला जागा मिळे – लगेच पुस्तक हातात घेत असे त्यामुळे ग्रुप नव्हता. रोज संध्याकाळी खिडकी पकडण्याचं तंत्र मला छान जमले होते – त्या वेळी पाय सटकेल – दांडा पकडता नाही आला तर आपण गाडीखाली जाऊ – गाडीत उडी बरोबर पडेल की नाही असे विचारच येत नसत. एकच लक्ष्य – खिडकीजवळची जागा!

आमच्या ऑफिसमधली एक मैत्रीण जोगेश्वरीची. वांद्रय़ाला मी तिला खिडकीजवळची जागा देत असे. तिची माझी विशेष दोस्ती. माझे लग्न ठरल्याचे मी प्रथम तिलाच सांगितले. अतिशय प्रेमाने हात हातात घेऊन माझे तिने अभिनंदन केले. ‘‘छान सुखाचा संसार कर,’’ म्हणाली. थोडय़ा वेळाने म्हणाली, ‘‘माझ्या नशिबात नाही.’’ ती प्रौढ वयातली होती. मी विचारले, ‘‘कुठे जमलेच नाही का?’’ तिचे डोळे भरून आले; ‘अगं! आई खूप लवकर गेली. मीच मोठी. लौकरच नोकरीला लागले. वडिलांना हातभार – लहान वयांत मीच भावंडांची आई झाले. वडील सतत जबाबदारीची जाणीव करून देत. आता भावंडे मोठी झाली. एक भाऊ व बहिणीने आपले लग्न ठरवले. घरात उत्साह ओसंडतो आहे. मला सगळेच जण गृहीत धरतात आज.’’  तिचे हे शब्द माझ्या मनात कायम घर करून राहिले. मैत्रीण म्हणाली, ‘‘ए, सॉरी गं, तुझी आनंदाची बातमी मी माझी रडकथा काय सांगते तुला?’’  मी म्हटले, ‘‘ए रडकथा काय? मन मोकळे केलेस गं!’’ ‘‘फिरत्या चाकावरती – जीवनास मिळे गती तसे कुणी कुणाचे नसती तरी ही एकमेकांचे सांगाती’’  – अनुराधा काळे, पुणे

 

आठवणींचा दरवळ

मुंबईतल्या ट्रेनचा प्रवास करायचा थांबूनही आता ५० वर्षे उलटली. पण ते अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. आता मॉलमध्ये खरेदी करायच्या कितीतरीपट आनंद ट्रेनमध्ये खरेदी करण्यात मिळायचा. पैशांची तेव्हा चणचण असल्यामुळे १ पेरू ३ मैत्रिणींमध्ये खाण्यात आनंद मिळायचा तो अवर्णनीय. मला सुगंधी फुले आवडतात म्हणून मैत्रिणीने वाढदिवसाला आठवणीने दिलेल्या गजऱ्याचा सुगंध अजून दरवळतोय.. मुसळधार पावसाने गाडय़ा बंद पडल्याचे समजल्यावर चर्चगेटवरच्या गर्दीत घामाघूम होऊन शोधत येणारा माझा भाऊ  आठवतो. माझे नवीन लग्न ठरले होते तेव्हाचा प्रसंग तर गमतीशीरच होता. ग्रॅन्टरोडला राहणारा माझा होणारा नवरा अंधेरीवरून आणि मी चर्चगेट वरून येऊन ग्रॅन्टरोड स्टेशनवर इंडिकेटरच्या खाली भेटणार होतो त्या प्रमाणे आम्ही इंडिकेटरच्या खाली उभे राहून १ तास एकमेकांची वाट बघून भेट न होताच घरी गेलो. कारण दोघेही विरुद्ध दिशेच्या इंडिकेटरखाली उभे होतो.

एकदा चुकून घाईघाईत फर्स्ट क्लासच्या डब्यात चढले आणि नेमका टीसी आला आणि कसा भरुदड भरला ते पण चांगलेच आठवते. चर्चगेटला गाडी पकडण्यापूर्वी भूक लागल्या वेळी रेल्वे कॅन्टीनमध्ये खाल्लेल्या डाळवडय़ाची सर ५ स्टार हॉटेलमधल्या पदार्थाना येणार नाही. गर्दीत बायकांनी काढलेल्या चिमटय़ांची आठवण आहे त्याहून जास्त त्यावेळेला मैत्रिणीबरोबर केलेल्या हितगुजाची आहे. मुख्य म्हणजे ती मैत्री अजून टिकून आहे.  शीला बर्डे, सिएटल, अमेरिका.

 

तृतीयपंथीयांसाठीही ब्युटीपार्लर

मला पहिल्यापासून नीटनेटकेपणाची आवड. गाडी पकडण्यासाठी घाईघाईत आलेल्या गबाळ्या बायका मला बिलकूल आवडत नसत. साडीचा पदर नीट लावलेला नाही. निऱ्या वर-खाली झालेल्या, गळ्याभोवती पावडर ऊर्फ भस्माचे पट्टे, केस इकडेतिकडे, अव्यवस्थित. बघूनच मला कसंसच होई. ते बदलण्याची सुरुवात मी मैत्रिणींपासून केली. गाडीने डोंबिवली सोडलं की ठाण्यापर्यंत आतल्या बायका व्यवस्थित सेटल व्हायच्या. मग कोणाच्या निऱ्या सारख्या करून दे, कोणाचा पदर लावून दे, कोणाची हेअर स्टाइल करून दे, असं मी ‘मिनी ब्युटीपार्लर’ सुरू करायची. या निमित्ताने गाडीत अनेक मैत्रिणी जोडल्या गेल्या. कोणाची निवृत्ती, कोणाचं डोहाळजेवण, कोणाला लग्नाला जायचंय, कोणाच्या लग्नाची पंचविशी, कोणाचा ‘बघण्याचा’ कार्यक्रम. गाडीत कितीही गर्दी असली तरी गुळाच्या खडय़ाकडे जशा मुंग्या पोहोचतात तशा या गरजू माझ्याकडे वाट काढत येत.  पण एकदा कमाल झाली. कळव्याला चढून दाराजवळ उभा राहणारा तृतीयपंथी माझी चौकशी करू लागला. त्यालाही साडी नेसवून हवी होती. आता आली का पंचाईत? ठाणे आल्यावर दारातली गर्दी जरा कमी झाली. आज त्याला कुठल्या तरी समारंभाला जायचं होतं. क्षणभर छाती धडधडली. घोगऱ्या आवाजात तो विनंती करत होता. ‘‘मॅडम नेसवा ना.’’ इतक्या जवळून मी कधी तृतीयपंथी व्यक्तीला पाहिलं नव्हतं. स्पर्श केला नव्हता. देवाचं नाव घेतलं, मनाचा हिय्या केला आणि साडी नेसवायला घेतली. मन ‘स्त्री’चं असलं तरी शरीर ‘पुरुषाचं’ होतं. जास्त उंची, आडवे खांदे, कंबरपण रुंद आपल्यासारखी साडी अंगासरशी बसणार कशी? सर्व कौशल्य पणाला लावलं. साडी भारीतली, तलम होती. ब्लाऊज अगदी फीटिंगचा, कोणत्या तरी मंद वासाचा परफ्यूम लावला होता. अंबाडय़ावर मोगऱ्याचा गजरा. साडी नेसवताना अगदी जवळून चेहरा बघितला. हिरव्या रंगाची हनुवटी सोडली तर बाईसारखाच मोहक चेहरा, पांढरेशुभ्र दात, तरतरीत नाकावर शोभणारी चमकी. त्याने येताना भरपूर आकडे, पिना आणल्या होत्या. मन लावून सुंदर साडी नेसवून दिली. अगदी खूश होऊन गेला. त्याने नव्हे, डब्यातल्या इतरांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा लक्षात आलं; गेली १५ मिनिटं साऱ्या जणींचं लक्ष आमच्याकडेच होतं. तेव्हापासून आत्तापर्यंत मी किती तरी तृतीयपंथीयांना साडी नेसवली असेल. आता पश्चिम रेल्वेचे तृतीयपंथीदेखील दादरच्या प्लॅटफॉर्मवर, जर खास कार्यक्रमाला जायचं असेल तर माझी वाट बघत थांबतात. मी कृतकृत्य होते.

साडी नेसवण्याच्या निमित्ताने या तृतीयपंथी मैत्रिणी मी आमच्यात सामावून घेतल्या आहेत. सर्वच काही दारुडे आणि टाळ्या वाजवून भीक मागणारे नसतात. त्यांच्याबद्दलचा नकारात्मक भाव नाहीसा झालाय.  अर्थात हा बदल रेल्वेतल्या ‘ब्युटीपार्लर’मुळे.   सुनीता आजगावकर

 

  • शोभा गुप्ते (मुलुंड), भारती धुरी (मुंबई), सुचिता कुलकर्णी (ठाणे), सुजाता जोगळेकर, प्रज्ञा कामत, सुनिता देसाई (बोरिवली), सविता केकरे ( पुणे), मेधा गोखले (डोंबिवली), नूतन करवंदे यांनीही पत्रे पाठवली.