मीनाक्षी म्हात्रे

आमची वारी सुरू झाली. बूट, टोपी, छत्री, गॉगल्स, सनस्क्रीन सगळी जय्यत तयारी असूनही त्या उन्हात चालवेना. रस्त्याच्या आजूबाजूला हिरवळ सोडा, नुसता रखरखाट. कुठून दुर्बुद्धी झाली आणि वारीला आलो असे वाटू लागले. बसत, उठत, रडकुंडीला येत, पाय ओढत ओढत कसेबसे पुणे गाठले. पायाच्या तळव्यांना मोठमोठे फोड आले होते. अंग तर करपून गेल्यासारखे वाटत होते. तिथल्या तिथे ठरवले, पुन्हा नाव काढायचे नाही वारीचे. मात्र नंतर पुढचा आषाढ महिना आला आणि..

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
contract farming
शेतमजूर ते शेतकरी!

काही वर्षांपूर्वी ‘मी वारीला जातेय’ या तीन शब्दांनी ऐकणाऱ्याच्या मुद्रेवरील भाव आणि ऐकलेल्या बातमीच्या धक्क्यातून सावरल्यानंतर तोंडून बाहेर पडणारी मुक्ताफळे यांनी माझी खूपच करमणूक झाली होती. (खरे तर मी फक्त आळंदी ते पुणे एवढंच अंतर पायी पालखीबरोबर चालायचं ठरवले होते.)

माझ्या एकूण अवतारामुळे मी आणि वारी हे कॉम्बिनेशन कुणाच्या पचनी पडत नव्हते. कोणताही उपवास, व्रतवैकल्य न करणारी ही बाई चक्क वारीच्या गोष्टी करते? कसा विश्वास बसणार? मी त्या सर्वव्यापी शक्तीला नक्कीच मानते; पण त्याचे प्रदर्शन करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. शिवाय व्रतवैकल्ये करून आपल्या जीवनात काही बदल होतात यावर माझा अजिबात विश्वास नाही. मागील काही वर्षांपासून टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनेल्सवरून वारीचे जे इत्थंभूत वर्णन पाहत, ऐकत होते तेव्हा हे लाखो लोक खरोखर कोणत्या ओढीने असे वर्षांनुवर्षे जात राहतात याची अनुभूती घ्यायचे मनात येत होते; पण एकेका दिवसात एवढे चालायचे या कल्पनेने मन माघार घेत होते. मात्र एकदा पुण्याहून बहिणीचा फोन आला, वारीला जाण्याबद्दल आणि मग ठरवून टाकले, आता जायचेच. फक्त आळंदी ते पुणे इतके चालायचे.

मग भल्या पहाटे पुण्याहून आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेऊन चालायला सुरुवात केली. इथे एकंदरीतच वातावरण कसे भारलेले होते. साधारणपणे कष्टकरी वर्गातले स्त्री-पुरुष मोठय़ा आत्मविश्वासाने मार्गक्रमण करीत होते. सकाळच्या त्या ताज्या हवेत अगदी प्रसन्न वाटत होते. विठुनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या साथीने भजने गात ज्या सहजतेने त्यांची वाटचाल चालली होती, त्या आत्मविश्वासाचा आणि सहजतेचा मागमूसही आमच्यात नव्हता. नाही तरी शहरात राहिल्याने मनातल्या मनात आपण स्वत:ला जरा (अति) शहाणे समजतोच. इथे त्या शहरी हुशारीचे मूल्य शून्य!

बहुतेक पुरुषांच्या पायात चपला दिसत होत्या, पण बहुतांश स्त्रिया अनवाणीच चालत होत्या. अनेकींच्या डोक्यावर तुळशी वृंदावने होती. इथे नुसते चालणेदेखील कष्टदायक वाटत होते, कौतुकच वाटले अगदी. आम्ही सैरावैरा इकडून तिकडून कसेही चालत होतो. मग पहिला झटका बसला. थोडा वेळ एखाद्या दिंडीबरोबर चालतो म्हटल्यावर एका वारकऱ्याने ठाम शब्दांत त्यांच्या दिंडीबरोबर न चालण्याचे बजावले. मला वाटले, आमचा शहरी पोशाख त्यांना आवडला नसावा. मग जरा रेंगाळून मागच्या एका दिंडीबरोबर चालू लागलो, तर त्यातल्या एका वारकऱ्याने विनम्रपणे त्यांच्या दिंडीसोबत न चालण्याचे सुचवले. ‘असे का’ अशी विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, बाहेरच्यांनी दिंडीबरोबर न चालता वेगळे चालायचे असते. आमची चूक आम्हाला उमगली. त्यांच्या शिस्तबद्ध चालण्यात आमच्यासारख्या लोकांमुळे व्यत्यय येत होता.

पाहता पाहता ऊन चढू लागले. आज पांडुरंगाने परीक्षा पाहायची ठरवले असावे. आमच्या पायात बूट काय, डोक्यावर टोपी काय, छत्री काय, गॉगल्स काय अन् सनस्क्रीन काय, सगळी जय्यत तयारी असूनही त्या उन्हात चालवेना. रस्त्याच्या आजूबाजूला हिरवळ सोडा, नुसता रखरखाट. कुठून दुर्बुद्धी झाली आणि हे वारीला यायचे काढले असे वाटू लागले. एखादे वाहन मिळते का पाहावे तर वाहनांसाठी सारे रस्ते बंद. आपल्याला जेव्हा कोणत्याही गोष्टीचा त्रास होतो तेव्हा त्याचे खापर आधी दुसऱ्यावर फोडण्याची आपली प्रवृत्तीच असते. त्याला मी तरी कशी अपवाद असणार? साधारणत: सर्वात सोपे टार्गेट शासन. माझी बडबड सुरू झाली- ‘‘प्रत्येक वर्षी हे लाखो वारकरी या ठरलेल्या रस्त्याने जातात. मग रस्त्याच्या दोनही बाजूंना झाडे लावायला काय हरकत आहे सरकारला? आणि त्या दानशूर व्यक्ती? कुठल्या कुठल्या देवाला आणि बुवा,महाराजांच्या पायावर धनराशी ओततात. मग या वारकऱ्यांसाठी थोडय़ा थोडय़ा अंतराने का होईना ताडपत्रीसारखे तात्पुरते छत का नाही उभारत?’’

पायात शूज असूनही चटके जाणवत होते. मग माझी नव्याने बडबड- ‘‘रस्त्यावर अधूनमधून चांगले पाण्याचे फवारे सोडले पाहिजेत. जे लोक अगदीच अनवाणी चालतात त्यांच्या पायाला किती छान गारगार वाटेल.’’ माझं मन कुठे तरीच भरकटायला लागले. मग भानावर येत स्वत:शीच म्हटले, मला कुणी जबरदस्ती केली होती? हे लाखो लोक वर्षांनुवर्षे कोणतीही तक्रार न करता चालतात. मी एकदाच येऊन थोडेसेच चालून काय काय अपेक्षा ठेवू लागले? त्यासुद्धा दुसऱ्यांनी पूर्ण करण्यासाठी. मी काय करू शकते हा विचार नाहीच. माझी मलाच लाज वाटली. बसत, उठत, रडकुंडीला येत, पाय ओढत ओढत, कसेबसे पुणे गाठले. पायाच्या तळव्यांना मोठमोठे फोड आले होते. अंग तर करपून गेल्यासारखे वाटत होते. तिथल्या तिथे ठरवले, वारीचा अनुभव घ्यायचा तो घेतला, आता या जन्मात परत नाव काढायचे नाही वारीचे.

मात्र नंतर पुढचा आषाढ महिना आला, की मागचे सारे विसरून नव्या उत्साहाने आम्ही आळंदी ते पुणेवारीबरोबर चालू लागलो. जमेल तसे जात राहिलो. आता शरीर साथ देत नाही; पण वारीचा विषय आला की एक प्रसंग कायम आठवतो. पोलीस दलातून एका उच्च पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांबरोबर बोलत असताना त्यांनी सांगितलेला अनुभव खूप काही सांगून जातो. ते स्वत: अल्पसंख्याकांपैकी असूनही त्यांचा हिंदू धर्माचा अभ्यास दांडगा.. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण इतकं तर्कशुद्ध आणि सोदाहरण करतात, की थक्क व्हायला होते.

त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दांत.. ‘‘मी त्या वेळी नव्यानेच पोलीस दलात रुजू झालो होतो. आषाढी एकादशीच्या बंदोबस्तासाठी इतरांबरोबर मलाही पंढरपूरला पाठवण्यात आलं. नवी नियुक्ती, नवी वर्दी, त्यामुळे उत्साहाच्या भरात कमरेला पिस्तूल वगैरे लावून मी बंदोबस्ताला हजर झालो. माझी नेमणूक मंदिरात आहे म्हटल्यावर योग्य काळजी घेऊन मी मंदिरात एका मोक्याच्या ठिकाणी उभा राहून दर्शनासाठी चाललेली भाविकांची लगबग लक्षपूर्वक पाहत होतो. प्रचंड गर्दीमुळे , नाईलाजास्तव विठ्ठलासमोर येणाऱ्या भाविकांच्या अक्षरश: मानेजवळ धरून त्यांचे डोके मूर्तीसमोर टेकवून त्यांना बाहेर काढले जात होते. एक अतिशय वृद्ध गृहस्थ रांगेमधून कसेबसे सरकत पुढे आले. काही कळायच्या आत त्यांचेही डोके टेकवून त्यांना पुढे पाठवण्यात आले. बिचारे काही तरी सांगण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्यांचे ऐकून घ्यायला कुणाला वेळ? मागच्या रेटय़ाने ते पुढे पुढे जाऊ लागले. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचे बावरलेपण, असहाय्यता आणि आशेने भिरीभिरी पाहणाऱ्या नजरेतील आर्तता मला आतून हलवून गेली. पटकन पुढे होऊन त्यांचा थरथरणारा हात धरून माझ्या उभं राहण्याच्या जागेजवळ त्यांना घेऊन आलो आणि म्हटलं, ‘आजोबा, या इथे उभे राहा. अगदी हवा तितका वेळ दर्शन घ्या. तुम्हाला येथून कुणीच घालवणार नाही.’ खरे म्हणजे माझ्या अंगावरच्या गणवेशाने तं थोडे गांगरलेच; पण माझ्या शब्दांनी एकदम खूश झाले. उभ्याउभ्या किती तरी वेळा नमस्कार करून किलकिल्या नजरेनं खूप वेळ विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहत राहिले. मग अचानक वळून त्या वयोवृद्ध आजोबांनी माझ्या पायांवर लोटांगण घातले. आता गांगरण्याची वेळ माझी होती. कसेबसे दोन्ही खांद्यांना धरून त्यांना उठवलं. त्यांच्या डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहत होते. म्हणाले, ‘पोरा, फार वर्षे झाली, वारीला येऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं मनात होतं, पण जमत नव्हतं. आता मरण्यापूर्वी तरी विठ्ठल दिसावा म्हणून कसं तरी जमवलं. आज तू नसतास तर इथवर येऊनही दर्शन न झाल्यानं ही शेवटची इच्छा घेऊनच वर गेलो असतो.’ आजोबांचे ते कळवळून बाहेर पडणारे शब्द आणि त्यांचा अश्रूंनी ओथंबलेला चेहरा आजही आठवला तर मन गलबलते.’’

एका वयोवृद्ध गरीब वारकऱ्याला त्याच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मदत करताना कोणताच धर्म आडवा आला नव्हता..

meenadinesh19@gmail.com

chaturang@expressindia.com