scorecardresearch

Premium

सैराट व्यसनाधीनता?

व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या स्त्रियांची संख्या गेल्या काही वर्षांत १५ टक्क्यांनी वाढली आहे.

सैराट व्यसनाधीनता?

धूम्रपान आणि तंबाखू खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यात स्त्रियाही मागे नाहीत. केवळ धूम्रपान करणाऱ्या नव्हे तर त्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या स्त्रियांची संख्या गेल्या काही वर्षांत १५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांमधील व्यसनाधीनतेविषयी.. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे ३१ मे हा ‘नो टोबॅको डे’अर्थात तंबाखूवज्र्य दिवस म्हणून जगभर पाळला जातो. त्यानिमित्ताने..

हल्ली अनेकदा प्रवास करताना आपल्याला एक दृश्य हमखास दिसू लागलेलं आहे.. त्या चारचौघी आणि ते चारचौघे किंवा त्यांच्यात ती एकटीच. त्यांच्या दुचाकी गाडय़ांवर एका आडोशाला एकत्र बसलेले असतात आणि एक सिगरेट सगळ्यांची तल्लफ भागवत साऱ्यांच्या हातातून वावरत असते.. हे दृश्य दिसणं काही वर्षांपूर्वी खरंच इतकं सामान्य होतं का? व्यसनाबाबत स्त्रियांचं हे निर्भीड वर्तन इतक्या मोठय़ा प्रमाणात आधी का बरं नसावं? इतकं काय बदललं आहे आपल्या समाजात? नुसती सिगरेट, हुक्का किंवा दारू या व्यसनांमध्येच नाही तर भांगसारख्या व्यसनांनादेखील मुली सहज बळी पडताना दिसतायेत. गेल्या ५-६ वर्षांत मुलींमध्ये भांग व्यसन दहा पटीनं वाढलं आहे आणि सिगारेटचं व्यसन दहा वर्षांत १५ टक्क्यांनी वाढलं आहे.
या बिघडलेल्या समतोलासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. या लेखात आपण फक्त शहरी वर्गातील बदलतं चित्र पाहतो आहोत. ग्रामीण भागातील व्यसनग्रस्त स्त्रियांची संख्या आणि कारणं खूप वेगळी आहेत. त्याचा सविस्तर विचार करावा लागेल. पूर्वीच्या काही रूढी-परंपरांमुळे म्हणा, कमी असलेल्या सामाजिक दर्जामुळे किंवा असमानतेमुळे म्हणा मुलींच्या शिक्षणाची, व्यक्तिमत्त्व विकासाची प्रचंड आबाळ झाली. आता तसं नाही, मुलींना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांचे आई-वडील आणि परिवार त्यांना त्यांच्या आवडीचे, निवडीचे प्रगतिशील आयुष्य जगण्याची मुभा देतायेत.. पण या प्रगतिशील स्वातंत्र्याचा अनेकदा दुरुपयोग होतानाही आढळून येतोय.. आम्ही मुलांसारख्याच तर आहोत, ते धूम्रपान करतात तर आम्ही का नको, या भूमिकेतून असेल किंवा अनेकदा मुली शिक्षणासाठी, नोकरीसाठी घरातून बाहेर पडून स्वतंत्र राहतात आणि मग घरच्यांच्या धाकाचे बंधन जणू नाहीसं होत जातं, लक्ष ठेवणारं, ओरडणारं कोणी नसतं अशा वेळी मनमौजी जगण्याकडे कल वाढत जातो. पब्सना, विविध अमान्य पार्टीजना लावली जाणारी हजेरी, विविध ड्रग्सची होणारी पहिली तोंडओळख हे या वयाचे पुढील मनमौजी कारभार ठरतात. संस्कारांची शिदोरी बांधून घेऊन घरातून स्वत:चं सामथ्र्य आणि अस्तित्व सिद्ध करायला निघालेल्या या मुलींना स्वातंत्र्याच्या आड व्यसनांचेही महामार्ग सहज सापडतात आणि एकदा का त्या विळख्यात अडकल्या की नंतर सर्व बंधनं झुगारून या व्यसनांना आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवतात. गंमत म्हणून केलेली सुरुवात नंतर जिवाशीही बेतू शकते. अनेकींना त्याचा फटका बसलेला आहे.
ज्ञानेश्वरी प्रतिष्ठानतर्फे चालविण्यात येणाऱ्या तंबाखू मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत व्यसनमुक्तीसंदर्भात काम करत असताना अशा अनेक तरुणी, स्त्रिया भेटल्या. त्यांची व्यसन प्रकरणे हाताळल्यानंतर कळलं, कुठे तरी त्या मुलींना मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर, आईवडिलाचं झालेलं दुर्लक्ष, कुटुंबामधला संपत चाललेला संवाद, व्यसनी मित्रांची/ मैत्रिणींची संगत, कोवळ्या वयात हातात पडलेला जास्तीचा पैसा, व्यसनांबद्दलची लवकर जागृत होणारी उत्कंठा, कमी होत चाललेले सामाजिक भय, कमी पडत असलेली नियमांची शासकीय अंमलबजावणी, पोलिसी भय यांसारखी अनेक कारणे मुलींच्या या ‘सैराट’ व्यसनाधीनतेला जबाबदार आहेत.
तंबाखू, सिगरेट, खैनी, पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ हे तंबाखूच्या पानांमधून पूर्ण किंवा अंशत: अर्क घेऊन बनविले जातात. आपली देशी तंबाखू ही आत्ताची आधुनिक पिढी सिगरेट आणि हुक्क्यामधून जास्त प्रमाणात सहजपणे स्वीकारताना दिसते. ते एक मॉडर्न युगाचे स्टेटमेंट वाटते या तरुणाईला! एकदा सिगरेट ओढली की ती पुन्हा ओढली जातेच किंवा ओढावीशी वाटतेच.. ही ओढ म्हणजे त्या तंबाखूजन्य पदार्थातील निकोटिन नामक द्रवाची किमया. हे निकोटिन आपल्या शरीरात अड्रेनलिन निर्माण करते जे की आपल्या शरीरात साधारणत: एखाद्या अतिशय आल्हाददायी क्रियेनंतर निर्माण होणारे रसायन आहे. अड्रेनलिन निर्माण झाल्यावर त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढतात आणि रक्तदाबही उच्चांकी वाढतो. या दोन्ही शारीरिक बदलांमुळे तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला आधीपेक्षा अधिक दक्ष/ जागरूक/तल्लख किंवा अलर्ट असल्याची भावना निर्माण होते. शरीरातील निकोटिन काही सेकंदातच मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचते. या निकोटिनच्या प्रभावात आपला मेंदू डोपामिन नामक दुसरे रसायन निर्माण करतो आणि ते रसायन मेंदूच्या आनंद केंद्रांना उत्तेजित करते. या शारीरिक बदलांमुळे तंबाखूचे सेवन करणाऱ्याला त्याची तल्लफ नकळतपणे लागून जाते. पण या निकोटिनचा परिणाम दीर्घकालीन नसल्यामुळे या तलफीमुळेच त्याचे सेवन करण्याची पुन:पुन्हा इच्छा होत राहते आणि सहज म्हणून केलेली सुरुवात नंतर व्यसनाकडे वेगाने प्रवास करू शकते.
तंबाखू जवळजवळ शरीरातील प्रत्येक अवयवावर घातक हल्ला करते. तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग विशेषत: फुप्फुसाचा कर्करोग, फुप्फुसाचे रोग(COPD, Emphysema), नपुंसकत्व, हृदयविकार, उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग (peripheral vascular disease) ज्यामुळे मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव, हृदयविकाराचा झटका, अर्धागवायूचा झटका, स्वरयंत्राचा रोग, दृष्टी कमी होणे, दात-हिरडय़ांचे रोग, अकाली त्वचेचे सुरकुतणे अशा अनेक व्याधी निर्माण होतात. याशिवाय स्त्रियांमध्ये कमी हाडांची घनता, संधिवात, मोतीबिंदू, हिरडय़ांचे आजार, कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर जखम भरून येण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत विलंब, उदासीनता, अधिक अनियमित किंवा वेदनादायक मासिक पाळी, लवकर मासिक पाळी बंद होणे, गर्भधारणा होण्यासाठी त्रास, ‘एसआयडीएस’चा वाढलेला धोका , श्वास घ्यायला त्रास होणे, अकाली वंध्यत्व, अकाली गर्भपात, जन्माला आलेल्या अर्भकाच्या मेंदूवर परिणाम, अर्भकाचे जन्मत: कमी वजन असणे यासारखे घोर दुष्परिणाम आढळतात.
धूम्रपान प्रत्यक्षात अकाली मृत्यू आणि लैंगिक समस्या निर्माण करतं, मात्र तरुणाईमध्ये ते स्टेटस सिम्बॉल मानलं जात असल्याने त्याला उगाचच प्रतिष्ठेचं, संपत्तीचं वलय लाभलेलं आहे. तंबाखूचे दुष्परिणाम इतके आत्मघातकी असूनसुद्धा तो जगात आजही अजिबात गंभीरपणे घेतला जात नाही. अर्थात देशात अनेक तंबाखूविरोधी कायदे आहेत, सार्वजनिक धूम्रपान निषिद्ध आहे, त्याच्या सेवनासंदर्भात जाहिरातदेखील दाखवणं व्यज्र्य आहे, पण तरीही आपल्या राज्याचीच नाही तर संपूर्ण देशाची खूप मोठी कमावती लोकसंख्या या व्यसनाच्या विळख्यात अडकलेली आहे आणि आजारग्रस्त आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१२ च्या सर्वेक्षणानुसार जगातील एक अब्ज धूम्रपान करणाऱ्या लोकांमधल्या सुमारे २० कोटी स्त्रिया आहेत. केवळ धूम्रपानाने दर वर्षी ५० लाख लोक मृत्युमुखी पडतात. तंबाखू सेवनामुळे होणारे आजार जगभरात होणाऱ्या अकाली मृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. मात्र या आजाराला बचावयोग्य रोगांमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले असल्याने वेळेत त्यावर आळा घालण्यात यश मिळाल्यास व्यसनाधीनतेच्या वाढणाऱ्या टक्केवारीला सामोरे जाणे आणि व्यसनी लोकसंख्येला यातून बाहेर काढणे अधिक सोपे होऊ शकेल, असे अनेक सामाजिक संघटनांना वाटते.
पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या कारणांसाठी व्यसन करतात आणि वेगवेगळ्या कारणांसाठी व्यसन सोडतात हे अभ्यासाने सिद्ध झाले आहे. पुरुष अनेक वेळा धूम्रपान एक सवय किंवा बाह्य़रूपाची सकारात्मक संवेदना दर्शवण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी धूम्रपान करतात. स्त्रिया त्यातही बहुतांश तरुणी नकारात्मक भावनेविरुद्ध प्रतिबंधात्मक म्हणून (बफर) धूम्रपान करतात. एक मात्र दिसून आलं आहे की ५६ टक्के पुरुष हे आपल्या मित्रांसोबत असताना किंवा प्रवासात सिगारेट पितात त्या तुलनेत ४८ टक्केच स्त्रिया घराबाहेर सिगारेट पितात. मुली मुलांपेक्षा वजन वाढण्याची भीती जास्त बाळगून असतात म्हणून अनेकदा या व्यसनाचा आरंभ वजन नियंत्रणासाठी होण्याची शक्यता अधिक असते. सिगरेट सोडल्यास वजन पुन्हा वाढेल अशी भीती त्यांना वाटते. पूर्वी स्त्रिया बहुतांशी एकटय़ा असताना सिगरेट प्यायच्या, पण हे चित्र आता बदलते आहे. मुली सर्रास उघडपणे, रस्त्यावर, ऑफिस कॅम्पसमध्ये, मित्रांसह कट्टय़ावर सिगरेट पिताना दिसू लागल्या आहेत, शिवाय खूप उशिरापर्यंत काम केल्यानंतर रिलॅक्स वाटावं यासाठीही अनेकदा मुली सिगरेट ओढताना दिसतात. त्याचं प्रमाण इतकं वाढतं आहे, की सामाजिक आणि कायद्याचं भय त्यांच्यासाठी संपल्यात जमा आहे. निदान शहरात तरी.
स्त्रियांच्या या व्यसनाधीनतेचं आणखी एक कारण म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची सिगरेट सहज सुटत नाही. एखाद्या पुरुषाने ठरवलं आणि त्याला योग्य आधार, उपचार मिळाले तर तो सिगरेट कायमची सोडू शकतो, कारण पुरुषांच्या शरीरावर निकोटिनच्या अभावाचा वेगळा परिणाम होतो. स्त्रियांच्या बाबतीत मात्र हा प्रतिसाद वेगळा असतो. एखाद्या स्त्रीचं व्यसन सुटलेलं असलं तरी भावनिक नैराश्य आणि संप्रेरक मात्रांचा बिघडलेला समतोल तिला पुन्हा त्याच वेगाने व्यसनाकडे नेऊ शकतो. अर्थात प्रयत्नातील सातत्याने व्यसनावर मात करता येऊ शकते.
धूम्रपान करणं किंवा तंबाखू सेवन करणं असो जोपर्यंत ते मर्यादित आहे (तेही असू नयेच) तोपर्यंत ते सोडणं शक्य तरी होतं, मात्र एकदा का त्याचं व्यसन लागलं तर सहज सुटत नाही. तसा प्रयत्न केल्यास हात थरथरणे, भरपूर घाम येणे, चिडचिड, हृदयाचे ठोके वाढणे, तल्लफ येत राहणे, तणावाच्या काळात तीव्रपणे व्यसन करावंसं वाटणं इत्यादी अनुभव जास्त येतात त्यामुळे उलट व्यसन न सोडण्याची इच्छा जास्त दीर्घकाळ टिकते. त्यामुळे व्यसन लागू शकतंय हे कळताच ते सोडणं हे सर्वात चांगलं, पण तसं नाही झालं तर मात्र जवळच्यांनी, हितचिंतकांनी त्या व्यक्तीला ते व्यसन सोडण्यास मदत करायला हवी. अनेक संस्था, समुपदेशकही हे काम करतात. जमल्यास त्यांचीही मदत घ्यावी. त्यासाठी आधी तंबाखू आणि निकोटिन व्यसनावर उपाय म्हणून तंबाखू आणि दुष्परिणामांची संपूर्ण माहिती करून द्यायला हवी. कुटुंबीयांनीच नव्हे तर सामाजानेही त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. त्यांच्यातलं मानसिक बळ वाढण्यासाठी मित्र-आप्तेष्टांकडून सहकार्य आणि सातत्याने प्रेरणा मिळायला हवी. निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी (ठफळ) ज्यामध्ये निकोटिनची तल्लफ ही त्याचे अर्क असलेली हाताला पट्टी लावून, स्प्रे किंवा इन्हेलर देऊन त्याची शरीरातली मात्रा वाढवून तल्लफ हळूहळू कमी केली जाते. ती तल्लफ व्यसन न करताच भागवली जाते आणि काही काळातच यावर ताबादेखील मिळवता येतो. या थेरपीज हळूहळू शरीराला तंबाखूचा वियोग सहन करण्याचं शिकवून व्यसन सोडवण्यास मदत करते, त्याची मदत घ्यावी. मानसिक आरोग्य सल्ला केंद्राचा आधार घ्यावा त्यामुळे वागणुकीतले बदल, चिडचिड, व्यसन-नियंत्रणाचे सातत्य राखण्यासाठी प्रेरक साथ मिळते.
बहुतांश घटनांमध्ये, अनेक उपचार पद्धती आवश्यक असतात आणि त्यांचे सुयोग्य संयोजन केल्यास व्यसन सोडवणं सोप्पं होतं. शिवाय मनाचा निग्रह खूप मोलाचं काम करतं. स्त्रियांना व्यसन सोडण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताण कमी करणे, त्यासाठी मदत मिळणं आवश्यक असतं. मार्गदर्शनपर ध्यानधारणा, शास्त्रीय ध्यानधारणा, एकाग्रता वर्ग, प्राणायाम, योग यांच्याबरोबर किंबहुना सर्वात महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक आधार, मदत. जेव्हा जेव्हा या व्यक्तींना ती गोष्ट घेण्याची तल्लफ येते तेव्हा तेव्हा घरच्या कुणी किंवा मित्रमैत्रिणींनी जर त्यांना ते करण्यापासून परावृत्त केलं, त्यांना समजून घेत मदत केली तर ही माणसं नक्कीच या व्यसनातून बाहेर पडू शकतील.
२००९-२०१० च्या जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार, भारतामध्ये सरासरी ३४.६ टक्के प्रौढ लोक तंबाखूचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवन करतात ज्यातील २५.९ टक्के लोक तंबाखूचे चघळून सेवन करतात, ९.२ टक्के लोक बिडीच्या स्वरूपात तर ५.७ टक्के लोक सिगरेटच्या स्वरूपात करतात. यातील ६० टक्के लोक असे आहेत की ज्यांना सकाळी उठल्यानंतर अध्र्या तासात तंबाखूचे सेवन करावेच लागते. प्रत्येक १० मधील ५ लोकांना अप्रत्यक्ष धूम्रपानाचा त्रास होतो आणि त्यातील ५० टक्के लोक हा त्रास त्यांच्या घरीच अनुभवतात तर २५ टक्के लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वर्तुळात हा त्रास होत असल्याचे सांगतात.
तंबाखूचे सेवन करणाऱ्या प्रत्येक ५ मधील ३ लोकांना म्हणजे जवळजवळ ६१.१ टक्के लोकांना तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या पाकिटांवरील आरोग्य धोक्याची सूचना निदर्शनास आली आणि त्यामधील प्रत्येक ३ मधील १ व्यक्तीने म्हणजेच जवळजवळ ३१.५ टक्के लोकांनी त्या तंबाखूचे सेवन केवळ ही चित्रमय आरोग्य इशारा पाहिल्यामुळे त्यातील गांभीर्य लक्षात येऊन ते सोडण्याची तयारी दाखवली. साधारणपणे ग्रामीण भागातील ३२.५ टक्के लोक तर शहरी भागातील २१.१ टक्के लोक धूम्रपान आणि तंबाखू सेवन करतात. ं हे व्यसन सोडवण्यात ग्रामीण भागात ५ टक्के यश आलं आहे तर शहरी भागात ६ टक्के यश आलं आहे.
इच्छा आहे तेथे मार्ग आहेच. तेव्हा व्यसनापासून मुक्त होणं गरजेचं आहे, पण त्याआधी त्या व्यसनाची पहिली पायरी म्हणजे सिगरेट ओढणं वा पहिला तंबाखूजन्य पदार्थ खाणं, हीच जर नष्ट केली तर कितीतरी जण निरोगी तर रहातीलच पण कित्येकांचे प्राण वाचतील. तेव्हा येत्या ३१ मार्चच्या तंबाखूवज्र्य दिनी व्यसन न करण्याची शपथ घ्या. स्वत: बरोबरच कुटुंबातील कुणी हे व्यसन करत असतील तर त्यांनाही त्यापासून रोखा. आपण निरोगी तर आपला समाजही निरोगी. समाजाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण हे करायलाच हवं.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

तंबाखू सेवनाचे प्रकार
सिगरेट : सहजपणे घेतला जाणारा आणि सर्वात हानीकारक
विडी : भारतात या स्वरूपात सहजपणे सेवन
सिगार : उच्चभ्रू वर्गाची निवड
हुक्का : सध्याच्या तरुणाईच्या हातचे नवे स्ट्रेस-किलर (हबल बबल) शीशा
तंबाखू चघळणे : ग्रामीण भागातील सर्वमान्य ‘औषधी’ व्यसन
क्रेतेक्स (लवंग सिगरेट) : किशोरवयीन मुलांची पहिली सिगरेट
तपकीर : ओलसर आणि कोरडी नाकाने हुंगण्याची
मिसरी : भाजलेली तंबाखू पूड, अनेकदा दात घासण्यासाठी वापरली जाते
ई-सिगरेट : आत्ताचे इलेक्ट्रॉनिक आगंतुक

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Special article on addiction of tobacco and smoking

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×