मुंबईत महापालिकेच्या मराठी शाळेत शिकून नंतर नागपूरच्या इंजिनीअरींग महाविद्यालयातील ती पहिली सुवर्णपदकविजेती विद्यार्थिनी. पुढे ‘बेस्ट’मधली पहिली स्त्री अभियंता ठरते आणि यशाची कमान चढती ठेवत थेट अमेरिकेतल्या ‘ओरॅकल’ कंपनीच्या प्रोग्राम मॅनेजमेंटची व्हाइस प्रेसिडेंट बनते. त्या विनिता पवनीकर, अमेरिकेतील विशेष निष्णात स्त्री अभियंत्यांपैकी एक. त्यांच्याविषयी..

मुंबईच्या न्यू सायन महानगरपालिका शाळेच्या मराठी माध्यमात सहावीपर्यंत शिकलेली विनिता.. शाळेसाठी घरातून निघताना अनेक रस्ते ओलांडावे लागायचे. सोबतीला असायची तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी बहीण सुमेधा.. सुमेधाचा हात घट्ट पकडून सांभाळून रस्ते ओलांडणारी चिमुकली विनिता बघता बघता इतकी मोठी झाली की आज त्याच विनिता पवनीकर सॉफ्टवेअरमधील जगप्रसिद्ध ‘ओरॅकल’ कंपनीच्या प्रोग्राम मॅनेजमेंटच्या व्हाइस प्रेसिडेंटपदावर असून अमेरिकेच्या निष्णात स्त्री अभियंत्यांमध्ये त्यांची निवड झाली आहे.
अलीकडेच प्रकाशित झालेल्या व अमेरिकेतील व्यावसायिक वर्तुळात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘बिझनेस इनसायडर’ या नियतकालिकाने अमेरिकेतील २६ विशेष निष्णात स्त्री अभियंत्यांची निवड केली. आंतरराष्ट्रीय महिला अभियांत्रिकी सप्ताहाच्या निमित्ताने या विविध जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान स्त्री अभियंत्यांना त्यांच्या योगदानाबद्दल गौरविण्यात आले. त्यात ‘गुगल’च्या डायन ग्रीन, ‘मायक्रोसॉफ्ट’च्या एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेन्ट पेगी जॉन्सन, ‘अ‍ॅपल केअर’च्या व्हाइस प्रेसिडेंट तारा बंच यांच्यासारख्या अतिशय कर्तबगार स्त्रियांसोबत हे एक मराठमोळं नाव होतं, ‘ओरॅकल’च्या प्रोग्राम मॅनेजमेंटच्या व्हाइस प्रेसिडेंट विनिता पवनीकर (पूर्वाश्रमीच्या विनिता गोंगाडे). या यादीत त्या १४व्या क्रमांकावर आहेत. इतकंच नाही तर नुकताच अमेरिकेत प्रकाशित झालेल्या ‘इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर्स टाइम’ या नियतकालिकाने इलेक्ट्रॉनिक्स या विषयात काम करणाऱ्या सर्वोत्कृष्ट स्त्रियांचा गौरव केला त्यातही विनिता यांचा समावेश पहिल्या सहा अभियंत्यांमध्ये करण्यात आला आहे.
विनिता पवनीकर या मूळच्या नागपूरच्या. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातली ही मुलगी. वडिलांच्या सरकारी फिरतीच्या नोकरीमुळे मुंबई, अकोला व नागपूरमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. मुळातच विलक्षण चिकाटी, अविरत कष्ट करण्याची तयारी व अभ्यासात अतिशय हुशार! अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, वक्तृत्व स्पर्धा व शाळेतील इतर उपक्रमांत त्यांचा नेहमी सहभाग असे. वडील शिवाजीराव गोंगाडे यांना शिक्षणाचं महत्त्व फार होते. मुलींनी देखील उच्चशिक्षित व्हावं असं त्यांना नेहमी वाटायचे, त्यांच्याकडून कधी तरी त्यांच्या कष्टमय जीवनाविषयी ऐकले की, विनितांनाही आपण चांगला अभ्यास करून त्यांच्याकडून शाबासकी मिळवावी असं वाटायचं. त्यांच्या पुढील आयुष्यात व व्यक्तिगत जडणघडणीत शाळेत अभ्यासात पक्का झालेला पाया, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, त्यांची शिकवण्याची पद्धत, वातावरण व वडिलांकडून मिळणारे प्रोत्साहन खूप मोलाचे ठरले!
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी नागपूरच्या मेहता सायन्स कॉलेजमधून पूर्ण केले. बारावीत गुणवत्ता यादीत आल्यावर पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी नागपूरच्या प्रतिष्ठित विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनीअिरग कॉलेजमध्ये (आताचे व्हीएनआयटी) इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल शाखेत त्यांनी प्रवेश घेतला आणि अंतिम परीक्षेत सुवर्णपदकाची मानकरी ठरल्या. त्या कॉलेजची ती पहिली सुवर्णपदकविजेती विद्यार्थिनी. अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना उद्योग जगतातल्या कार्पोरेट क्षेत्रात काम करावं, अशी त्यांची मनापासून इच्छा होती आणि कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्य़ूत, मुंबईच्या ‘बेस्ट’च्या इलेक्ट्रिकल विभागात काम करण्याचा अनोखा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या ठरल्या ‘बेस्ट’च्या पहिल्या स्त्री अभियंता.
विनिता यांना, संगणकशास्त्रात महाविद्यालयीन काळापासून फार रुची होती. ‘बेस्ट’नंतर नेल्कोत (टाटा ग्रुप) काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात, म्हणजे मायक्रो प्रोसेसरवर काम करायला मिळालं. पुढे झेनिथ कॉम्प्युटर्समध्ये गेल्यावर, संगणक हार्डवेअर संबंधित व्यावसायिक प्रवास तिथेही चालू ठेवला व लवकरच डेव्हलेपमेंट मॅनेजरचा हुद्दा मिळवला. या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये काम करताना त्यांच्या प्रतिभेला अधिक गती मिळाली.
वर्ष १९९३, सॉफ्टवेअर व्यवसायाला प्रचंड मागणी होती, त्या दरम्यान विनिताला सिमेन्स इन्फॉम्रेशन सिस्टीम्स् लिमिटेड (एसआयएसए’त)मध्ये कृत्रिम बुद्धिमतेवर (आर्टिफिशल इंटेलिजन्स)आधारित सॉफ्टवेअर प्रकल्पात काम करण्याची संधी (पान ४ वर) (पान १ वरून) चालून आली. त्या अनुषंगाने त्यांना जर्मनीत काम करायला मिळाले. ‘सिमेन्स’मध्ये काम करीत असताना पुढच्या आव्हानात्मक संधीच्या शोधात त्यांनी अमेरिकेत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता, कारण तोपर्यंत त्यांचं लग्न झालं होतं आणि नंतर मुलगीही झाली. तिची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर होती. त्यांना करिअर व कुटुंब अशा दोन्हीही जबाबादाऱ्या पार पाडायच्या होत्या. जड अंत:करणाने व दृढ निश्चयाने, त्या प्रथम एकटय़ाच अमेरिकेकडे रवाना झाल्या. विनिता सांगतात की, ‘‘अमेरिकेत पाऊल ठेवल्यावरचा सुरुवातीचा काळ, त्यांच्या दृष्टीने फारच आव्हानात्मक होता. त्यांच्या क्षेत्रातली त्यांच्याबरोबर काम करणारी मंडळी बरीच उच्चशिक्षित होती, कुणी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून आलेला तर कुणी बर्कलेमधला. या लोकांबरोबर नवीन क्षेत्रात, नवीन वातावरणात काम करताना आव्हानांना सामोरे जावे लागत होते. संगणक तंत्रज्ञान क्षेत्र फार आव्हानात्मक आहे. इथे नित्य नवे बदल होत असतात. होणारे नवीन बदल समजून घेण्याकरिता काही वेळ राखून ठेवावा लागतो. त्यासाठी त्या त्या विषयावरील वाचन, नेटवìकग, विविध सेमिनार्समध्ये सहभाग घेऊन त्या विषयामधील परिपक्वता वाढवावी लागली. ते करत असताना, सगळ्या गोष्टी आत्मसात करताना दिवसाचे तास अपुरे पडतात. म्हणूनच या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना आपले करिअर व कौटुंबिक जबाबदारी यामध्ये तोल राखणे कठीण जाते. साहजिकच बहुतेक स्त्रिया कमी आव्हानात्मक, कमी आíथक मोबदला देणारे काम स्वीकारतात. तर कधी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतात. मात्र माझ्याबाबतीत माझे पती विवेककडून मला उत्तम साथ मिळाली.’’
विवेक पवनीकर, मुंबईच्या आय.आय.टी. संस्थेचे पदवीधर तसेच उत्तम चित्रकार आहेत. ते सध्या ‘ओरॅकल’मध्ये सीनिअर डायरेक्टर (डेव्हलपमेंट) आहेत. विवेक यांनी विनिताच्या करिअरला पूर्णपणे पािठबा दिला आणि म्हणून ते दोघेही आयुष्याची वाटचाल, खऱ्या अर्थाने एकत्रितपणे करू शकले.. अगदी आजही. विनिताला त्यांच्या कामाच्या व्यापामुळे लहानग्या वृषालीला पाळणाघरात ठेवाव लागायचं. कधी कधी विनिताला, आपल्या छोटीला वेळ देता येत नाही, म्हणून अपराध्यासारखंही वाटायचं, पण सुदैवाने लहानग्या वृषालीतही कमालीची समज होती. विवेक व वृषाली दोघांनीही विनिताला त्यांची यशाची पायरी चढायला सातत्याने मदत केली. समजूतदारपणे वागत वृषालीही मोठी झाली आज ती कान्रेजीमेलन या जगप्रसिद्ध युनिव्हर्सटिीची पदवीधर असून सध्या अमेरिकेतील रॉकेट लॉयर या कंपनीत सीनिअर प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
अमेरिकेत पोहोचताच संधीचे माहेरघर मानण्यात येणाऱ्या या अमेरिकेत, विनिताकडे त्यांच्या कर्तृत्वाला साजेशा अनेक नोकऱ्या चालून आल्यात. त्या दरम्यान त्यांनी सायबेस, मायक्रोसॉफ्ट, व्हीएम वेअर व शेवटी ओरॅकलसारख्या या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये काम केले. ११ वर्षांपूर्वी विनिता यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम सोडून एन्टरप्राइज मॅनेजर या सॉफ्टवेअरच्या रीलिज मॅनेजमेंटची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. मोजक्याच लोकांपासून सुरुवात करीत लोकांची संख्या वाढवत नेली आणि सध्या हजाराच्यावर समावेश असलेल्या सॉफ्टवेअरनिर्मिती करणाऱ्या संघाच्या रीलिज मॅनेजमेंट व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची जबाबदारी सांभाळत, त्यांनी आतापर्यंत दोनशेच्यावर रीलिज् हाताळले आहेत.
या क्षेत्रात मिळालेल्या यशाबद्दल त्या सांगतात, ‘‘माझ्या दृष्टीने तांत्रिकदृष्टय़ा सक्षम व अनुभवी व्यक्ती ज्यांना रीलिज मॅनेजमेंटची आवड आहे, अशा लोकांचा कार्यक्षम गट निर्माण करणे आवश्यक होते. मी स्वयंचलनावर फार भर देते. माझा गट सॉफ्टवेअरनिर्मितीला लगणाऱ्या बऱ्याच प्रक्रिया स्वयंचलित करण्यात कार्यरत असतो. जेणेकरून मानवी हस्तक्षेप कमीत कमी होऊन वेळेची बचत व कार्यक्षमता वाढणे शक्य होते. यामुळे माझ्या गटाचा कार्यभाग त्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी आव्हानात्मक पण तरीही आनंदाचा झाला आहे. संस्थेची चांगली प्रतिमा ही तिथे काम करणाऱ्या लोकांमुळे ठरत असते, त्यामुळे निष्ठावान, प्रामाणिक व बुद्धिवान लोकांना टिकवून ठेवणे हेसुद्धा एक कसब असते. मला चांगली माणसे जमवता आली हे महत्त्वाचं.’’
या क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे का? असे विचारता, त्या म्हणाल्या, ‘‘होय, नक्कीच. सध्या या क्षेत्रात अनेक स्त्रिया उत्तम कामगिरी करून आघाडीवर आहेत. पूर्वी मॅनेजमेंटच्या मीटिंगमध्ये नजर टाकली तर एखादी स्त्री इंजिनीअर असायची. आता तुलनेने तिप्पट स्त्रिया व्यवस्थापनपदावर आहेत, शिवाय नित्य नव्या येतही आहेत. मला तर वाटतं, अधिकाधिक स्त्रियांनी या क्षेत्राकडे वळायला हवं. ‘ओरॅकल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी साफरा कॅट्झ या माझ्या रोल मॉडेल आहे. त्या नेहमीच स्त्रियांना या क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन देत असतात. आपल्या व्यवसायात त्यांच्या एवढे मोठे होणे, हे माझे व अनेकांचे स्वप्न आहे.’’ नवीन पिढीला कुठला सल्ला देशील? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘‘बी युवरसेल्फ अ‍ॅण्ड डू वॉट यू फिल पॅशनेट अबाऊट, आपण करीत असलेले काम झोकून देऊन उत्कटतेनं केलं तर ते उत्तमच होणार!’’
आपल्या यशाचे श्रेय त्या आपल्या कुटुंबीयांना, शिक्षण घेतलेल्या शिक्षण संस्थांना व संपर्कात आलेल्या कार्पोरेट क्षेत्राला देतात. आज विनितांना त्यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते, जेव्हा वृषाली त्यांना म्हणते, ‘‘आई तू माझी रोल मॉडेल आहेस’’, तेव्हा कृतार्थतेची भावना त्यांना समाधान देऊन जाते. विनिता यांची ही महापालिकेच्या मराठी शाळेतून थेट अमेरिकेतील ओरॅकलपर्यंतची झेप सर्वच होतकरू व महत्त्वाकांक्षी मुलींच्या पंखांना बळ देणारी आहे.