‘ती’नेच लढायला हवा लढा, स्वत:साठी!

अंधश्रद्धेविरुद्धची लढाई खूप कठीण आहे; पण मग यातून बाहेर येण्याचा काही मार्गच नाही का?

अंधश्रद्धेविरुद्धची लढाई खूप कठीण आहे; पण मग यातून बाहेर येण्याचा काही मार्गच नाही का? मार्ग निश्चितच आहे. स्त्रियांमधील अंधश्रद्धा दूर करायच्या असतील तर तिच्या अगतिकतेची कारणे शोधून ती दूर करायला हवीत, त्यासाठी स्त्रीचं मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. प्रकरण अंधश्रद्धेचं असो वा नुकत्याच न्यायालयात शिक्षा सुनावलेल्या गुरमित रामरहीम सिंगचं असो, स्त्रीने घेतलेली खंबीर भूमिकाच यापुढे महत्त्वाची ठरणार आहे.

२० ऑगस्ट २०१७. अंधश्रद्धेच्या विरोधात लढणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्षे झाली आणि त्यांनी मांडलेले विचार समाजात रुजवणे किती गरजेचे आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. देशभरात एकाच वेळी उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, झारखंड आणि अगदी आपल्या प्रगत महाराष्ट्रातही नुकतीच एक अफवा पसरली. अफवा आहे भूत-भानामती आणि करणीच्या अंगाने जाणारी. अफवा आहे केस कापण्याची. या भागातील अनेक स्त्रियांचे म्हणे आपोआप केस कापले जात आहेत. एका स्त्रीच्या म्हणण्यानुसार तिच्या घरात रात्री सगळे झोपलेले असताना खिडकीतून उडी मारून एक काळी मांजर आली, पाहता पाहता तिने माणसाचे रूप घेतले, ती स्त्री घाबरून बेशुद्ध पडली आणि त्या व्यक्तीने का भुताने तिची वेणीच कापली.

वस्तू हलवणारी, अंगावर चट्टे उठवणारी, कपडे पेटवणारी, केस कापणारी या स्वरूपाची भानामती नावाची कुठलीही शक्ती निश्चित अस्तित्वात नसते. त्यामागे केवळ मानवी हात असतो. वरील प्रकारासारखी कोणतीही गोष्ट कार्यकारणभावाशिवाय घडत नाही. या गोष्टी घडण्यामागे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या – भौतिक, रासायनिक, जैविक, यांत्रिक स्वरूपाच्या – शक्तींचा हात असतो वा दिशाभूल व फसवणूकही असू शकते. हे सर्व घडवून आणणारा ‘हात’ शोधून काढला, फसवणूक, हातचलाखी उघड केली की या प्रकाराची वस्तुस्थिती लगेच समजते. वैफल्यग्रस्त, तिरस्कृत, अपयशी व्यक्ती बहुधा भानामतीच्या मागे असते. हे अपयश प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीच्या चुकीमुळेच आलेले असते असे नाही. अनेक वेळेला राजकीय, सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती त्याला कारणीभूत असते. त्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण किती त्रासात आहोत हे दाखवून लोकांची सहानुभूती व प्रेम मिळवण्यासाठी वरील प्रकारच्या आत्मक्लेशाच्या घटना संबंधित व्यक्तींकडून होतात, हे आत्तापर्यंतच्या अंधश्रद्धेच्या विरोधात काम करत असताना अनुभवास आले आहे.

वस्तुस्थितीचा महत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे या घटना पराचा कावळा करून सांगितल्या जातात. जसे आत्ताच्या केस कापण्याच्या घटनेमागे चीनच्या किडय़ाचा हात आहे. ते किडे केस खातात. आताही ज्या केस कापले जाण्याच्या घटना घडत आहेत, त्यामागेही अन्य कोणतेही गूढ घटक कार्यरत नाहीत. राजस्थानातील गोविंदगढ आणि कालाडेरा या दोन खेडय़ांत अशा तीन घटना घडल्या. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यात त्या स्त्रियांनीच आपले केस कापून टाकले होते, हे स्पष्ट झाले आहे. या स्त्रिया असं करतात याचं कारण त्यांच्या मनातील अंधश्रद्धेमध्ये आहे. तसेच हा एक मानसिक आजारही आहे. कौटुंबिक गुलामगिरीपासून मनातील न्यूनगंडांपर्यंत अनेक कारणे त्या आजारास कारणीभूत असतात, हेही आत्तापर्यंतच्या अनुभवातून स्पष्ट झालेले आहे.

वैफल्यग्रस्त व्यक्ती लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हे करते, हे चुकीचेच आहे. या प्रकारचे वागणे त्या अर्थाने मनोविकृत समजावयास हवे. (भानामती करणारी व्यक्ती मनोरुग्ण असतेच असा याचा अर्थ नव्हे.) असे होण्याची शक्यता स्त्रियांच्या बाबतीत नेहमीच अधिक असते आणि त्यामुळे भानामती घडवणाऱ्या अधिकांश वेळेला स्त्रियाच असतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीत (अंनिस) काम करताना असे आढळून आले की, फक्त भानामती बाबतीतच नव्हे तर समाजात पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अंधश्रद्धा जास्त आहेत. उपासतापास, नवससायास, व्रतवैकल्य, बुवाबाबा, गंडेदोरे, रूढी-परंपरांमधून चालत आलेल्या गोष्टींचे पालन अशा अनेक पातळ्यांवर त्या अंधश्रद्धेच्या बळी आहेत.

विज्ञानाच्या युगात, समाजसुधारकांच्या महाराष्ट्रात २१व्या शतकाच्या उंबरठय़ावर या सगळ्या थोतांडाचा विचार करण्याची गरज काय? असे आपल्याला वाटले तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. आजही मोठय़ा प्रमाणात स्त्रिया अंधश्रद्धेला बळी पडत आहेत किंवा त्याचा आधार घेत आहेत. अकोल्याजवळचे एक गाव. गावातल्या बायका पाणी भरायला, कपडे धुवायला नदीकाठावर जायच्या. एक दिवस त्यातली एक- सुनंदा- नदीवरून घरी आल्याबरोबर थरथर कापत होती. दातखीळ बसली होती. पाहता पाहता चक्कर येऊन पडली. घरात सासू-सासरे, दीर, नणंद सर्व होते. सुनंदा चक्कर येऊन पडल्यावर सासू घाबरली. तिला वाटले नदीवरून येताना भुताने झपाटले. तिने सुनंदाला एका खोलीत नेले. तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. गरम गरम चहा दिला. खायला दिले. सुनंदा ठीक होऊन पुन्हा कामाला लागली. बिचारी दिवसभर कामे करून करून थकायची. तिचे रोज नदीवर जाणे चालूच होते. पुन्हा एक दिवस हाच किस्सा घडला. सासू परत घाबरून दिमतीला आली; तोपर्यंत सुनंदाच्या लक्षात आले की, आपण चक्कर येऊन पडलो की सासू घाबरते. काम करू देत नाही. एवढेच नाही तर चांगलेचुंगले खायलाही घालते. त्यामुळे या प्रकाराची पुनरावृत्ती होत राहिली. प्रकरण इथेच थांबले नाही, तर नदीवर जाणाऱ्या ज्यांचा घरात छळ होत आहे अशा अनेक नवीन लग्न झालेल्या मुलीही हे करायला लागल्या. इतक्या मोठय़ा प्रमाणात हे व्हायला लागल्यानंतर हे प्रकरण समितीकडे आले. ते आम्ही सोडवलेही, पण मुख्य प्रश्न असा निर्माण होतो की, हे ढोंग आहे हे सांगितले तर ज्यांनी भुताने झपाटल्याचा आधार घेतला त्यांचे काय? मुळातच त्यांचा सासरी होत असलेला छळ अधिकच वाढेल. ही घटना फक्त सुनंदाच्या बाबतीत झाली असती तर अर्थातच ती मांत्रिकाकडे गेली असती; पण गावात अनेक जणींना भुताने झपाटल्यामुळे हे प्रकरण समितीकडे आले. सुनंदाने तिच्या स्वतंत्र, एकटीच्या घेतलेल्या मुलाखतीत तिला होत असलेल्या छळाबद्दल सांगितले तसेच मी मुद्दाम करते हेही सांगितले; पण माझ्या सासूला सांगू नका, हेही हातापाया पडून सांगत होती. अत्यंत सहानुभूतीने या प्रश्नाकडे पाहून हे प्रकरण सोडवायला लागले. हे का घडते हे समजून घेण्यासाठी आपली समाजरचना समजून घ्यायला लागेल. ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत २१व्या शतकातही स्त्रियाच अंधश्रद्धेच्या जास्त बळी ठरत राहणार. ही समाजरचना समजून घेण्यासाठी एक कुटुंबव्यवस्थासुद्धा पुरेशी आहे. कुटुंबव्यवस्थेतील तिचे स्थान समजून घेतले, की लोकशाहीच्या चारही खांबांमधील तिचे स्थान समजते. कुटुंबातील स्त्री-पुरुषांच्या नात्याची उभारणी लक्षात घेतली आणि तिचे स्थान कोणकोणत्या खुंटय़ांनी पक्के केले आहे हे कळले की मग तिच्या अंधश्रद्धांची उगमस्थाने आणि ते पसरवणारे संस्कार, रीतिरिवाज, व्रत, उत्सव यांचा अर्थ सापडतो. स्त्रीला तिची स्वत:ची स्वतंत्र ओळख नाहीच आहे. तिची ओळख कुठल्या ना कुठल्या पुरुषाशी जोडलेली आहे. जीवनातील प्रत्येक स्थितीत पुरुषांच्याच संदर्भातच तिचा उल्लेख होतो. एक तर ती कुमारी असते किंवा प्रौढ कुमारी, सौभाग्यकांक्षिणी किंवा सौभाग्यवती. अन्यथा परितक्त्या, घटस्फोटिता किंवा विधवा असते. लग्नाच्या वेळीही तिच्यासाठी वर पाहतात तो तिच्यापेक्षा वयाने मोठा, उंचीने जास्त, शिकलेला जास्त, ती मिळवती असेल तर त्याचा पगार तिच्यापेक्षा जास्त, कारण तो वर (उच्च) असतो. पत्नी जरा कुठे पुढे गेली तर तिची स्थिती ‘अभिमान’ चित्रपटातल्या जया भादुरीसारखी होते, अगदी आजही. हा समाज पुरुषसत्ताक आहे. पुरुषसत्ताक समाजामध्ये स्त्रीला दुय्यमत्व आहे, गौण स्थान आहे. स्त्रीला लग्नामुळे, नवऱ्यामुळे आणि मुलामुळेच प्रतिष्ठा मिळते. मग पतीच्या नात्याने चांगला पुरुष मिळावा म्हणून उपास, मिळालेला पती जन्मभर टिकावा म्हणून उपास हे चालूच राहाते. पुढे मुलगा होण्यासाठी नवस वगैरे. मुले होण्यासाठी करायचे विधी तर कोणत्याही थरांपर्यंत जाऊ शकतात.

पारनेरची उषा ही नवऱ्याची दुसरी पत्नी. पहिलीला मूल होत नाही म्हणून दुसरी केली. मात्र उषाची कूसदेखील उजवली नाहीच. नवऱ्याची तपासणी करण्याचा प्रश्न नव्हताच. यासाठी उषा पारनेर तालुक्यातील मालचौडीच्या डोहाजवळ आली. वांझ स्त्रीने या डोहात स्नान केले, तर तिला हमखास मूल होते म्हणे. आपल्या आईवडिलांसह, पतीसह उषा डोहाकडे आली. तिने सर्वाना सांगितले, ‘‘मी उपासना करायचे ठरवले आहे. सातव्या दिवशी तुम्ही साडीचोळी घेऊन या.’’ उषा डोहात उतरली व डोहातील जोरदार प्रवाहात सापडली. तळापर्यंत जाऊन वर आली. डोहाच्या एका कडेला तिचे फुगलेले पालथे शरीर लागले. तरीही लोकांचा विश्वास की ती पुन्हा जिवंत होईल.

धुळे जिल्ह्य़ातील असलोद येथील बोगस ‘डॉक्टर बाबा’चा भांडाफोड करताना तर स्त्रियांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या अनेक हृदयद्रावक कहाण्या समोर आल्या. (नुकताच न्यायालयात शिक्षा जाहीर झालेला गुरमित रामरहीम सिंग याच्याही अशाच कहाण्या प्रसिद्ध होत आहेत.) सुमारे बारा वर्षांत चार हजार पाचशे एकोणसत्तर वांझ स्त्रियांना अपत्यप्राप्ती करून दिल्याचा व त्याच्या प्रसादाने एक हजारच्या वर स्त्रिया गर्भवती राहिल्या आहेत, असा दावा हा ‘डॉक्टर बाबा’ करत होता. असलोदमध्ये बाबा आपला चमत्काराचा धंदा १३ वर्षे करत होता. वृत्तपत्रांमध्ये अधूनमधून या बाबाच्या कृत्यांबद्दल छापून येत असे. त्यामुळे स्थानिकांचा त्याच्यावर फारसा विश्वास नव्हता; पण थेट गुजरात, नाशिक, मध्य प्रदेशमधून लोक येत असत. दर अमावस्या पौर्णिमेला त्याचा ‘दरबार’ भरत असे आणि मूल नसलेल्या बायका या दरबारात प्रसाद घ्यायला येत असत. नवीन आलेल्या लोकांची डॉक्टर बाबाचे एजंट वेगवेगळे प्रश्न विचारून उलट तपासणी घेत. बाबाकडे मेडिकल कौन्सिलचे कुठलेही सर्टिफिकेट नव्हते. बाबा ‘चारमिनार’चा चेन स्मोकर. त्यामुळे त्याला चारमिनारचे पाकीट व केळी असा प्रसाद दिला जाई. त्याच केळ्याने तो वांझ बाईची ओटी भरत असे व काही अपत्यहीन तरुणींना ८, १५ किंवा २१ दिवस आश्रमात राहण्याचा सल्ला देत असे. बाबाच्या आश्रमात इतके दिवस राहिल्यानंतर साहजिकच त्यातल्या अनेक जणी गर्भवती राहत असत. आजही मूल न होण्याचा किंवा फक्त मुलीच होण्याचा दोष स्त्रीवरच टाकला जातो. पुरुषाची चिकित्सा केली जात नाही आणि म्हणूनच आश्रमात राहणे म्हणजे काय हे माहीत असूनही नवरे आपल्या बायकांना तिथे ठेवायला तयार असत. अगतिक होऊन ती बाईही तिथे राहायला तयार होत असे. बाबाच्या आश्रमाची भांडाफोड झाली तेव्हा त्याच्या आश्रमातील एका बंद खोलीत अनेक स्त्रिया सापडल्या.

समाजातील हे वास्तव आणि मूल न झाल्यास त्यांची होणारी मानहानी, अपमान, उपहास हे जर आजही थांबलेले नाही तर अंधश्रद्धेला बळी जाणाऱ्या स्त्रिया तरी कशा थांबणार?

स्त्रियांमधील अंधश्रद्धा दूर करायच्या असतील तर तिच्या अगतिकतेची कारणे शोधून, ती दूर करायला हवीत. स्त्रिया अगतिक होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे कुटुंब, समाज व धर्मातील दुय्यम स्थान. जगातल्या सर्वच धर्मामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिले आहे. हजारो वर्षांच्या संस्काराने हा दुय्यम दर्जा तिच्या मनात खोलवर रुजला आहे. भारताच्या संविधानाप्रमाणे स्त्रिया आणि पुरुष समान आहेत. पण नुसतं बोलल्याने किंवा लिहिल्याने समाज बदलत नाही आणि समाज बदलल्याशिवाय, त्याची मानसिकता बदलल्याशिवाय स्त्री-पुरुष समानता येऊ  शकत नाही. म्हणूनच संविधानावरून समाजाच्या स्थितीचा अंदाज बांधता येत नाही. तो येतो रोजच्या जगण्यावरून. आणि संपूर्ण समाज व्यवस्थेवरून. आज स्त्रिया प्रगती नक्कीच करीत आहेत. स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार त्या बजावत आहेत, स्वतंत्र, मुक्त जगत आहेत. परंतु किती टक्के मुलींना, स्त्रियांना हे स्वातंत्र्य आहे?

आजही मुलगी ही डोक्यावरचं ओझंच असते. तिचं लग्न लवकर म्हणजे १४-१५ व्या वर्षीच करून दिलं जातं. या पुरोगामी महाराष्ट्रात आजही ४० टक्के मुलींची लग्ने १८ वर्षांच्या आत होतात. त्यानंतर पाठोपाठ येणारं गर्भारपण. मुलगी कुपोषित असते. त्यामुळे मूल जगण्याची शक्यता कमी किंवा मूल आरोग्यदायी असण्याची शक्यता कमी. बालमृत्यूचे प्रमाण भारतात इतर अविकसित देशापेक्षा जास्त आहे. मग त्याचा संबंध निरनिराळ्या अंधश्रद्धांशी जोडला जातो. त्याला जबाबदार स्त्रीच धरली जाते. वंशाला दिवा हवा, या हट्टापायी अनेक बाळंतपणे किंवा गर्भपात यामध्ये ती अशक्त, अ‍ॅनिमिक होते आणि त्यामुळे रोगाला लवकर बळी पडते. मग याचा संबंध दैवीकोप, कोणाचा तरी शाप, नाही तर करणीशी लावला जातो. युनेस्कोच्या पाहणीत भारतातील ८० टक्के स्त्रिया अ‍ॅनिमिक, अशक्त सापडल्या आहेत.

स्त्रियांच्या अंधश्रद्धेचे आणखी एक कारण म्हणजे आपल्या रूढी-परंपरा. रूढी-परंपरा यांचं दास्य स्त्रीला नेहमीच अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटत असतं. १५० वर्षांपूर्वी स्त्रिया शिकत नव्हत्या. पोथी, पुराणे, कथा, कीर्तन याचाच तिला आधार होता. आता शिक्षण आलं; पण तरीही कुटुंबात, समाजात, धर्मात रुजलेली ही मानसिकता नवं वर्तन करू शकत नाही. आजही स्त्रिया धर्माच्या, अंधश्रद्धांच्या रूढी-परंपरांच्या ओझ्याखाली वावरत आहेत. याला एकमेव कारण आहे ते म्हणजे प्रचार-प्रसार माध्यमे. स्त्रियांच्या धार्मिकतेला आणि स्वत:चे सामाजिक-आर्थिक गौण स्थान स्वीकारण्याला रोज घालण्यात येणारा मालिकांचा रतीब, जाहिरातींचा धुडगूस आणि आध्यात्मिक प्रवचनांचा वर्षांव खतपाणी घालीत आहेत. रूढी-परंपरा, अंधश्रद्धांचा मौखिक प्रचार-प्रसाराचे काम आज प्रचार-प्रसार माध्यमातून मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. २१ व्या शतकातली समाजमाध्यमंही हे काम अगदी चोख बजावत आहेत. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ही प्रसारमाध्यमे स्त्रियांना अज्ञान, अंधश्रद्धा यामध्ये गुंतवून ठेवण्याचे काम करत आहेत. कर्मकांड, बुवाबाजी याबद्दल माहिती, चमत्कार यावर प्रवचने दिली जातात. त्यासोबतच आत्मा, पुनर्जन्म, भुतंखेतं यांच्याही चित्तथरारक गोष्टींच्या मालिकांचा रतीब चालू आहे. सातत्याने याच गोष्टी दाखवल्यामुळे समाजातही हीच मानसिकता तयार होते. परिणामी स्त्रियाही तोच विचार आत्मसात करायला लागतात.

बहुसंख्य स्त्रिया सतत मानसिक दडपणाखाली असतात. सासरचा छळ, नवऱ्याचे प्रेम नसणे, संसारिक विसंवाद, घरात मान नाही, लैंगिक असमाधान, आर्थिक असुरक्षितता, प्रेमाचा अभाव यामुळे निर्माण होणाऱ्या असह्य़ ताणांनी तिचं व्यक्तिमत्त्व दुभंगतं. यातून बाहेर पडण्याचा मार्ग तिच्या अबोध मनाला न सापडल्याने ती अंधश्रद्धेचा वापर करते किंवा बळी ठरते, असे आढळून आले आहे. या सर्वावरून आपल्या लक्षात येतं की स्त्रियांवरील सर्व अत्याचारांचे मूळ हे पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेमध्येच आहे. ही समाजव्यवस्था गेली हजारो वर्षे चालत आली आहे आणि कितीही विज्ञान तंत्रज्ञानाने प्रगत अशा काळामध्ये आपण आज वावरत असलो तरीही समाजातल्या एका घटकाला अंधश्रद्धेच्या जोखडात बांधून ठेवलं आहे. यामध्ये समाजातल्या अनेक घटकांचे हितसंबंध जोडलेले असतात ते वेगळे. आणि पुरुषसत्ताक व्यवस्था हे हितसंबंध जोपासत असते.

स्त्रिया याविरुद्ध पेटून का उठत नाहीत, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मुद्दा हा आहे की त्यांना या अंधश्रद्धा वाटतच नाहीत. उलट त्यांच्या जगण्याला आवश्यक आधार देणाऱ्या अशा या श्रद्धाच आहेत, असा त्यांचा समज आहे. ही मानसिक गुलामगिरीच खरी गंभीर गोष्ट आहे. या फक्त ग्रामीण भागात आहेत आणि शहरी भागात नाहीत असे नाही. निरनिराळ्या ठिकाणचे प्रश्न भिन्न असतील पण दोन्हीकडे मानसिक गुलामगिरी आहे, पुरुषसत्ताक व्यवस्था आहे.

अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत असल्या तरी आपल्या देशात शिक्षणाची आणि त्याद्वारे प्रगती करण्याची संधी पांढरपेशा आणि त्यातही श्रीमंत असलेल्या वर्गामध्येच जास्त आहे. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असलेल्या स्त्रीचा नवरा सरपंचाच्या खुर्चीवर बसतो आणि त्याची सरपंच असलेली बायको त्याच्या पायाजवळ बसते हे दृश्य अजूनही काही ठिकाणी तर नक्कीच पाहायला मिळेल. सुशिक्षित स्त्रियाही आपला पगार नवऱ्याच्या अगर त्याच्या आईच्या हातात देतात आणि त्याचा विनियोग करण्याचा हक्क सोडून देतात. अशा साऱ्या वातावरणामध्ये मध्यम वर्गातील अशिक्षित वा सुशिक्षित, ग्रामीण वा शहरी, अर्थार्जन करणाऱ्या वा न करणाऱ्या स्त्रियांना आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, आपल्याला मेंदू आणि मनही आहे, आपल्यामध्ये अनेक क्षमता आहेत, कौशल्य आहेत, त्यांची जोपासना करणं आणि समाजासाठी त्यांचा उपयोग करणं हे आपलं कर्तव्य आहे याचं भानच उरत नाही असं वाटतं.

म्हणूनच अंधश्रद्धेविरुद्धची लढाई खूप कठीण आहे. पण मग यातून बाहेर येण्याचा काही मार्गच नाही का? मार्ग निश्चितच आहे. चळवळ करत असताना माणसं बदलतात यावर आमचा विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही चळवळीत आहोत. गोष्टी एका रात्रीत बदलत नाहीत. सतीप्रथा बंद व्हायला वेळ लागला, पण आज कायद्याने आपण ती अघोरी प्रथा बंद केली आहे. सर्वात प्रथम आपल्याला आर्थिक आणि मानसिक शोषण होत असलेल्या अंधश्रद्धांवर प्रहार करायला लागेल. पण स्त्रियांना स्वत:लाही काही पावले उचलावी लागतील. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासायला हवा. ज्या योगे ती परंपरा, व्रतवैकल्ये यांची व इतरही बाबींची चिकित्सा करेल. योग्य असेल ते स्वीकारून, अयोग्य नाकारण्याचा धीटपणा दाखवेल. बुवाबाजी, भानामती, करणी, चेटूक, शकुन-अपशकून, अंगात येणे, भुताने झपाटणे या स्वरूपाच्या अंधश्रद्धाना थेट व स्पष्टपणे विरोध करायला लागेल. या साऱ्याविरुद्ध बंड करावं लागेल. मात्र, त्यासाठी हळुवारपणाही हवा आणि खंबीरपणाही!

अलका जोशी यांनी ‘युनायटेड बँक ऑफ इंडिया’मध्ये २० वर्षे नोकरी केल्यानंतर सामाजिक कार्यासाठी निवृत्ती घेतली.  त्यानंतर ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या माध्यमातून अनेक वर्षे काम केले. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अंनिसचे काम करताना त्यांनी प्रामुख्याने बुवाबाजी करणाऱ्या साधूंची फसवेगिरी उघड करण्यात पुढाकार घेतला. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी राज्यभरात अनेक जनजागृती यात्राही काढल्या होत्या. सध्या त्या ‘अभिव्यक्ती’ गटाशी संलग्न असून त्या माध्यमातून स्त्रियांविषयीच्या समस्या, अनेक सामाजिक आणि पर्यावरणविषयक समस्या याविषयी विद्यार्थी आणि तरुणांमध्ये जागृती आणण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.

२१व्या शतकातही स्त्रिया अंधश्रद्ध का, या प्रश्नाचा ऊहापोह करतानाच लागलेला न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निकाल दुर्लक्षून चालणार नाही. आधी आसाराम,   आणि आता बाबा गुरमित रामरहीम सिंग यांना केलेली अटक. नावं बदलतायत, पण प्रवृत्ती तीच, स्त्रियांचं लैंगिक शोषण! गुरमित रामरहीम सिंगच्या दरबारात सातत्याने स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचं उघडकीस आलंय. ज्या साध्वीने प्राणांची पर्वा न करता हे धाडस दाखवलं तिच्या कुटुंबीयांची या बाबावर एवढी भक्ती की त्यांनी तिला जबरदस्तीने साध्वी व्हायला भाग पाडले. तिच्या इच्छेविरुद्ध पुन्हा आश्रमात पाठवले. तिने आपल्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची धमक दाखवली, मात्र मूक राहून वर्षांनुर्वष अत्याचार सहन करणाऱ्या किती स्त्रिया असतील कुणास ठाऊक? पुरुषसत्ताक समाजामध्ये स्त्रियांना तुच्छ, गौण व पुरुषांची मालमत्ता म्हणून वापरलं जातं आणि अनेक स्त्रियांनी ते स्वीकारलंही आहे. हे खरं तर स्त्रिया अंधश्रद्ध असण्याचं किंवा बहुतांशी वेळेला अंधश्रद्धेच्या बळी ठरण्याचं खरं कारण आहे. मग आपण १८व्या शतकात असो वा २१व्या!

– अलका जोशी

alkaj25@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Superstition and black magic in maharashtra

ताज्या बातम्या