शाळेच्या पहिल्या दिवशीच बबलूनं धसका घेतला. जसे दिवस-महिने-र्वष गेली तसा मोठा होत जाणाऱ्या बबलूचा धसका वाढतच गेला. आधी फक्त शाळेचा धसका होता. मग खूप शिस्त लावणाऱ्या काही शिक्षकांचा, अभ्यासाचा आणि मुख्य म्हणजे परीक्षेचा धसका त्याला वाटू लागला. त्याची परीक्षा असली की स्मिताला तिचीच परीक्षा आहे असं वाटे..

स्मिताने स्कूटर सुरू केली. ‘‘आई आपण शाळा नुसती पाहायची ना?’’ बबलूनं विचारलं. ‘‘हो रे! आज तुझा शाळेतला पहिला दिवस आहे ना मग शाळेत काहीच होणार नाही!’’ ‘‘शाळेत काय होतं?’’ बबलूनं विचारलं. ‘‘काही नाही. शाळेतल्या टीचर शिकवतात, छान छान गाणी म्हणायला. खाऊ पण देतात. खेळ घेतात. शिवाय खेळायला तुझ्याएवढी खूप मुलं असतात. मग तुला नवे मित्र आणि नव्या मैत्रिणी मिळतील. तुझ्या शाळेत तर खेळणीसुद्धा मस्त मस्त आहेत. मज्जा ना बबलू?’’ बबलू आपल्या तीन र्वष पूर्ण वयाच्या सगळ्या क्षमतानीशी विचार करू लागला. म्हणाला, ‘‘अगं पण आई, तू मला खाऊ देतेस. बाबा नवी खेळणी आणतात. आजी टाळ्या वाजवून छान गाणी शिकवते. खेळायला आपल्या कॉलनीतले खूप मित्र-मैत्रिणी आहेत. मग शाळेत कशाला जायचं?’’ बबलूचा सवाल बिनतोड होता. स्मिता म्हणाली, ‘‘अरे शाळेत जाऊन शिकायचं असतं. शिकून मोठं व्हायचं. मग बाबांसारखं ऑफिसमध्ये जायचं.’’ बबलू म्हणाला, ‘‘मला नाही शाळेत जायचं. मला घरीच आवडतं. आई, मी एकदमच मोठा होऊन बाबांसारखा ऑफिसला गेलो तर?’’

आता स्मिताचा संयम संपला. ती म्हणाली, ‘‘गप्प बस. असं कधी होतं का?’’ आता बबलू पण हट्टाला पेटला. ‘‘पण का नाही होत?’’ स्मिताने आवाज चढवला, ‘‘नाही होत! सांगितलं ना!’’ बबलू पण ओरडू लागला, ‘‘पण का नाही होत?’’ एव्हाना शाळा जवळ आली होती. स्मिताने स्टँडला स्कूटर लावली. एका हातानं बबलूला आणि दुसऱ्या हातानं त्याचं नवं दप्तर, पाण्याची बाटली, डबा धरत ती शाळेच्या फाटकाजवळ आली. बबलूनं तिला घट्ट धरून ठेवलं होतं. पण शाळेच्या गेटला खूप रंगीत फुग्यांची मोठी कमान लावली होती. तिच्या खाली दोन शिक्षिका हसत उभ्या होत्या. त्यांनी बबलूचा हात धरला. दुसऱ्या शिक्षिकेनं त्याचं सामान धरलं आणि स्मिताला सांगितलं, ‘‘तुम्ही जा आता. दोन तासांनी या. आज अर्धाच दिवस शाळा आहे.’’ बबलू आधीच घाबरला होता. स्मिता जाऊ लागली तसं त्यानं भोकाडच पसरलं. मग एका शाळेतल्या मावशीने त्याला एका वर्गात नेलं. तिथे त्याच्या एवढीच खूप मुलं होती. बहुतेक जण रडत होती. जी रडत नव्हती ती रडवेली झाली होती. शाळेच्या पहिल्या दिवशीच बबलूनं धसका घेतला.

जसे दिवस-महिने-र्वष गेली तसा मोठा होत जाणाऱ्या बबलूचा धसका वाढतच गेला. आधी फक्तशाळेचा धसका होता. मग खूप शिस्त लावणाऱ्या काही शिक्षकांचा, अभ्यासाचा आणि मुख्य म्हणजे परीक्षेचा धसका त्याला वाटू लागला. त्याची परीक्षा असली की स्मिताला तिचीच परीक्षा आहे असं वाटे. मग ती त्याला सतत अभ्यासाला बसवायची. ‘‘अरे खेळतोस काय? परीक्षा आहे ना तुझी?’’, ‘‘ए! टीव्ही बंद कर आधी. जा अभ्यास कर.’’, ‘‘परीक्षा आहे! अजिबात खेळायला जायचं नाही.’’, ‘‘परीक्षा आहे! वडे, आईस्क्रीम, पिझ्झा काही असलं मिळणार नाही. जंक फूड खाऊन आजारी पडलास मग? परीक्षा आहे ना तुझी?’’ असे संवाद घरात वरचेवर बबलू ऐकू लागला. परीक्षेहून घरी आल्यावर स्मिता त्याचा पेपर घेऊन प्रत्येक प्रश्नाला त्यानं काय उत्तर लिहिलं ते विचारत असे. निकालाचा दिवस हे एक वेगळेच प्रकरण होते. घरी सर्व प्रश्नांची उत्तर पटापट आणि बरोबर देणारा बबलू परीक्षेत मात्र जेमतेम उत्तीर्ण होत होता. मग स्मिता आणि शिक्षकांमध्ये थोडी वादावादी होत असे. घरी आल्यावर, ‘‘एवढे कमी गुण तुला मिळतातच कसे?’’ असं स्मिता बबलूला रागानं विचारायची. पण बबलूलाही कळायचं नाही की आपल्याला इतके कमी गुण कसे मिळतात! मग स्मिता त्याला जास्त गुणमिळवणाऱ्या त्याच्या धाकटय़ा भावाचे उदाहरण द्यायची. ज्यांना खूप गुण मिळाले त्या त्याच्याच मित्रांशी तुलना करायची. ‘‘अरे तुला एवढय़ा टय़ूशन्स लावल्या. मी स्वत: अभ्यास घेते तुझा. पाण्यासारखा पैसा तुझ्या शिक्षणावर खर्च होतोय. पण तुला त्याचं काही आहे का? तू आपला ढीम्मच! एवढा अभ्यास करतोस पण डोक्यातच जात नाही तुझ्या. घरी येतं नि मग परीक्षेतच असं काय हातं?’’ पण दुर्दैवाने बबलूलाही नेमकं काय होतं ते माहीत नव्हतं.

असे अनेक बबलू घरोघरी आहेत. खरोखर हुषार असणारी ही मुलं परीक्षेतल्या अपयशानं पार कोमेजून जातात. त्यांचा अभ्यास- परीक्षा- निकाल- अपयश हे दुष्टचक्र सगळ्या कुटुंबावरच नकारात्मक परिणाम करत असतं. इतकं की शेवटी निकालाच्या धसक्याने निकालाच्या आधीच काही बबलू गळफास लावून घेतात, शीर कापून घेतात, विष पितात नाहीतर एखाद्या गाडीखाली जीव देतात. त्याची एवढीशी बातमी आपण वाचतो, हळहळतो आणि पुढच्या बातमीकडे वळतो. बबलू जीवानीशी जातो. आणि त्याचं सगळं कुटुंब दु:खाच्या खाईत जातं. त्याच्या आई-बाबांना समजतच नाही की त्यांचं काय चुकलं?

खरं तर चूक बबलूची नाही, त्याच्या आईबाबांचीही नाही तर सगळ्याच समाजाची आहे. पण समाज म्हणजे तुम्ही आम्हीच. आपणच. आपणच गुणांना अवास्तव महत्त्व देतो. गुण मिळाले चांगले तरच जणू विद्यार्थ्यांचं सर्वतोपरी कल्याण होणार असतं आणि नाही मिळाले गुण तर त्याच्या जीवनाला जणू काही अर्थच नाही! असं का? आपण बबलूसारख्या विद्यार्थ्यांला काय गुण मिळवायचं मशीन समजतो? त्याच्या विद्यार्थी जीवनात त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सगळा भाग हा काय त्याने मिळवलेले गुण आहेत? गुण चांगले तर बबलू चांगला. गुण वाईट तर काय बबलूही वाईट?

नाही! बबलू चांगलाच असतो. भरपूर क्षमता-वेगवेगळ्या क्षमता असणारा असतो. पण त्याला कुणी अभ्यास मुळातून का करायचा ते सांगत नाही. अभ्यास हा परीक्षा देऊन भरपूर गुण मिळवण्यासाठी आणि असे गुण असणारे सर्टिफिकेट हे चांगली नोकरी मिळवण्यासाठी आहे हेच त्याला माहीत असतं. कदाचित त्याचे आईबाबाही असाच विचार करतात आणि ओळखीचे अनोळखीचे सारेही असाच विचार बहुधा करतात. पण सत्य तर हे आहे की शाळा-महाविद्यालयामधला शिस्तशीर, ठरावीक अभ्यासक्रमाचा अभ्यास ही शिकण्याची एक सोपी पद्धत आहे. आपण अभ्यास नवे काही शिकण्यासाठी करतो. वाचन, आकलन, मनन, स्मरण, उजळणी या कृतींनी हा अभ्यास, हे शिकणं करायचं असतं. समजणं सोपं व्हावं म्हणून शाळा महाविद्यालय असतं आणि शिक्षक त्यासाठी मदत करतात. पण याव्यतिरिक्तही आपण सारे शिकण्याच्या कितीतरी वेगवेगळ्या पद्धती कळत-नकळत वापरत असतो.

आपण ऐकून शिकतो. दुसऱ्या माणसांचे, रेडिओ, दूरचित्रवाणीसारख्या माध्यमांचे ऐकून शिकतो. आपण बघून आणि निरीक्षणाने शिकतो. शाळेच्या प्रयोगशाळेत शिक्षकांनी केलेला प्रयोग बघून आपण जसा तो स्वत: करायला शिकतो तसंच जगण्यातल्या अगणित कृती बघून, निरीक्षण करून शिकतो. देहबोली शिकण्याचा मुख्य स्रोत निरीक्षण आहे. आपण अनुभवाने किती काय काय शिकतो. एखादी कृती केली की तिचा अनुभव येतो. मग त्या कृतीच्या चांगल्या-वाईट परिणामाच्या अनुभवानुसार आपण ती कृती पुन्हा करायची का नाही हे ठरवतो. मन उदास असताना मित्राच्या आग्रहाखातर बाहेर फेरफटका मारून आल्यावर मनाची उदासी जाऊन प्रसन्नता अनुभवली की पुन्हा कधी उदास वाटू लागताच आपण बाहेर जरा फिरून येतो. वाचन आपल्याला बसल्या जागी वेगवेगळी माहिती पुरवते. वर्तमानपत्रं, मासिकं, पुस्तकं, ग्रंथ यातून माहितीच्या ज्ञानाचे भांडार खुले असते. अनुकरण करून, नक्कल करून आपण कित्येक गोष्टी शिकतो. लहान मुले मोठय़ांचे अनुकरण करतात. चांगल्या कृतींची नक्कल प्रगतीकडे नेते. व्यसनांची, वाईट गोष्टींची केलेली नक्कल अधोगतीकडे नेते. आपण कल्पना करून, कृती आणि प्रयोग करून त्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकतो. शोध लावू शकतो. शाळेतल्या आणि महाविद्यालयामधल्या ठरावीक शिस्तशीर अभ्यासाला आपण या इतरही शिकण्याच्या पद्धतींची जोड दिली त्यामुळे आपली माणसांची एवढी प्रगती झाली. याचे भान ठेवत बबलूची गोष्ट आपण पुढच्या लेखात आणखी पाहू या!

अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in