आम्ही नाटकामुळे एकत्र आलो तरी तालमी प्रयोगादरम्यान एकत्र असणे वेगळे आणि आयुष्यभरासाठी एका घरात, एका छताखाली एकमेकांना समजून घेत जगणे वेगळे. शोभाचे बालपण गोवालिया टँकसारख्या गुजराथीबहुल वस्तीत गेलेले. लहानपणापासून ती अदि मर्झबानबरोबर, आयएनटीमध्ये गुजराथी तसेच काही मराठी नाटक सिनेमात रुळलेली प्रसिद्ध अभिनेत्री होती.  मला आठवतंय, त्यावेळच्या प्रसिद्ध सिने साप्ताहिकात बातमी आली की, ‘‘सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभा वकील यांचा विवाह किशोर प्रधान यांच्याशी संपन्न झाला.’ या बातमीने एकाच क्षेत्रातील असूनही आमच्या स्थानातील तफावत लग्न झाल्याक्षणी लक्षात आली.’’ सांगताहेत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक किशोर प्रधान आपल्या शोभा प्रधान यांच्याबरोबरच्या पन्नास वर्षांच्या सहजीवनाविषयी..
आमच्या सहजीवनाबद्दल लिहायचे म्हटल्यावर असंख्य आठवणी तुकडय़ातुकडय़ाने डोळ्यासमोर येऊ लागल्या. एकाग्रतेने त्यांना संगतवार लावायला गेलो तर त्यांचा ५० वर्षांपूर्वीचा  छोटासा ‘ब्लॅक आणि व्हाईट’ जमान्यातील चित्रपटच बनला. ज्यात मी नायक आणि शोभा नायिका. नागपूरच्या अत्यंत प्रतिष्ठित, सधन आणि सुसंस्कृत कुटुंबात वाढलेला नायक म्हणजे मी. आमचे घर तसे सुधारकांचे. मालतीबाई प्रधान म्हणजे माझी आई स्वत नाटय़छटा लिहिणारी-बसवणारी. त्या सर्वाला वडिलांचा भक्कम पािठबा. अभिनयाचे बाळकडू मला आईकडून मिळाले. घरातील तालमी बघत मी मोठा झालो. मुंबईत एम.ए. झाल्यावर ‘टीआयएसएस’ मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळवून शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच ‘ग्लॅक्सो’सारख्या कंपनीत चांगल्या हुद्याची नोकरीही मिळाली. धोपटमार्गाने विचार करता आयुष्याची घडी छानच बसली म्हणायची. नोकरीने पोटापाण्याचा, जगण्याचा प्रश्न सोडवला होता. पण अंगातील कला, नाटकाची ओढ जगण्याचे कारण शोधू पाहत होती. नागपूरमध्ये असताना सातत्याने नाटकात काम केलेला मी. इथे  कामावरून घरी परतल्यावर नाटकाचे विचार स्वस्थ बसू देत नसत. त्याच ध्यासातून बांद्रा येथील एमआयजी कॉलनीतल्या हौशी नाटकवेडय़ांना एकत्र करून ‘नटराज’ नाटय़संस्था काढली आणि ‘तीन चोक तेरा’ हे हलकेफुलके फार्सकिल  नाटक करायचे ठरवले.
नाटकाची सगळी जमवाजमव तर झाली, पण नायिकेची भूमिका कोण करणार हा आमच्यापुढचा यक्षप्रश्न होता. बरीच शोधाशोध केली पण व्यर्थ. आता नाटक होणार की नाही अशी भीती वाटू लागली इतक्यात कुणीतरी बातमी आणली की आपल्या कॉलनीतली एक मुलगी नाटकात काम करते पण तिचे नाव वगरे माहीत नव्हते. चित्रपटातील टिपिकल नायकाप्रमाणे मित्रांच्या मदतीने मी तिच्या ठावठिकाण्याची, नावगावाची शोधमोहीम हाती घेतली. त्यासाठी तासन्तास बसस्टॉपवर ताटकळत राहिलो. ५-६ दिवसानंतर आमच्या प्रयत्नाला यश आले. म्हणजे तेव्हा तिचे फक्त तिचे दर्शन झाले. आणि.. हीच आपली नायिका (त्या क्षणी फक्त नाटकाचाच विचार होता हं)असेल हे मनाशी पक्के केले. पण हा सर्व एकतर्फी निर्णय होता. तिची तिच्या घरच्यांची परवानगी मिळवण्याचे अग्निदिव्य पार पाडायचे होते. दिग्दर्शक या नात्याने सर्वानी ही कामगिरी माझ्यावर सोपवली. पण कल्पनेनेच माझे अवसान गळले. कारण यापूर्वी २-४ ठिकाणी नकारघंटा मिळाली होती. आधी तर मी साफ नकारच दिला, पण मग विचार केला जास्तीत जास्त काय होईल, अजून एक नकार पचवू. शिवाय आम्ही हेरलेली नायिका सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकिलांची कन्या म्हणजेच शोभा वकील आहे हे कळल्यावर मनात कुठेतरी अंधूकशी होकाराची आशा होती. खरंच सांगतो, तद्दन नायकाप्रमाणे तिच्याकडे जाण्याआधी मंदिरात देवदर्शन करूनच आम्ही त्यांच्या घराकडे मोर्चा वळवला. तिच्या वडिलांनी दार उघडून आमचे हसत स्वागत केले. येण्याचे कारण विचारले, पण युद्धभूमीवरच्या अर्जुनाप्रमाणे ‘सीदन्ति  मम  गात्राणि  मुखं च परिशुष्यति’ अशी माझी अवस्था झाली. माझा बुरूज साफ कोसळल्याचे पाहून मित्राने सर्व सूत्रे हाती घेतली आणि आमचा प्रस्ताव त्याच्यासमोर मांडला आणि अहो आश्चर्यम! कसलेही आढेवेढे न घेता त्यांनी तत्काळ परवानगी दिली. युद्ध जिंकल्याच्या थाटात आम्ही तिथून निघालो.
यथावकाश गच्चीवरच्या मिणमिणत्या प्रकाशात आमच्या तालमी सुरू झाल्या. त्या दोन महिन्याच्या काळात आम्ही सगळे नाटकात आकंठ बुडालो होतो. दिवसभर फक्त तोच आणि तोच विचार. नाटक मस्त आकार घेत होते म्हणून आम्ही खूश होतो आणि.. जगात ८० टक्के ठिकाणी जे घडते तेच आमच्या बाबतीत घडले. दिग्दर्शकाने खऱ्या अर्थाने नायिकेला ‘पटवले’. तालमीच्या निमित्ताने शोभाच्या आणि माझ्या भेटी वारंवार होत राहिल्या. आम्हा दोघांत वेगळेच नाते तयार होतेय याची जाणीव होऊ लागली. अखेर वास्तव आयुष्यातही दोघांनी जीवनसाथी व्हायचे ठरवले. मी तर बािशग बांधून तयारच होतो. पण प्रेमकथा इतकी सरळसोट असून चालत नाही ना.. त्यात थोडे गरसमज वादविवाद असायला हवेत, अशी अडथळ्यांची शर्यत पार पडली की मगच नायकाचे नायकत्व सिद्ध होते नं.. तसाच प्रकार आमच्याही हलक्याफुलक्या प्रेमकथेत झाला आणि अखेर आमचे २३ ऑक्टोबर १९६६ ला शुभमंगल  झाले.
 अल्ल ि३ॠी३ँी१ ३ँी८ ’्र५ी िँंस्र्स्र््र’८.. हा चित्रपटाचा शेवट असू शकतो, पण वास्तवात गोष्ट  घडते ती वैवाहिक जीवन सुरु झाल्यावर. आम्ही  नाटकामुळे एकत्र आलो तरी तालमी प्रयोगादरम्यान एकत्र असणे वेगळे आणि आयुष्यभरासाठी एका घरात, एका छताखाली एकमेकांना समजून घेत जगणे वेगळे. शोभाचे बालपण गोवालिया टॅंकसारख्या गुजराथीबहुल वस्तीत गेलेले. लहानपणापासून ती अदि मर्झबानबरोबर, आयएनटीमध्ये गुजराथी तसेच काही मराठी नाटक सिनेमात रुळलेली प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्याउलट ‘काका किशाचा’ मुळे किशोर प्रधानचे थोडे नाव झाले तरी तसा मी रंगभूमीवर धडपडणारा नवोदितच. मला आठवतंय, त्यावेळच्या प्रसिद्ध सिने साप्ताहिकात बातमी आली की,
‘ सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभा वकील यांचा विवाह किशोर प्रधान यांच्याशी संपन्न’ या बातमीने एकाच क्षेत्रातील असूनही आमच्या स्थानातील तफावत लग्न झाल्याक्षणी लक्षात आली.
ते असो, तर तत्पूर्वी, कॉलनीतल्या छोटय़ा कम्युनिटी हॉलमधे सादर केलेल्या ‘तीन चोक तेरा’ नाटकाचा तुफान रंगलेल्या प्रयोगामुळे लेखक शाम फडके प्रभावित झाले होते आणि त्यांनी आम्हाला  नवे कोरे नाटक  लिहून दिले. त्याचे नाव ‘काका किशाचा’. ज्याने पुढे इतिहास घडवला. राज्य नाटय़स्पध्रेपर्यंत विजयाची पताका फडकावली आणि व्यावसायिक रंगभूमीवरही लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. त्या नाटकाने खऱ्या अर्थाने मला फार्सचा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून मान्यता मिळाली. आज ४० वर्षांनंतरही लोक मला ‘काका किशाचा’ म्हणूनच ओळखतात
‘या घर आपलंच आहे’, ‘लागेबांधे’सारख्या नाटकात एकत्र काम करताना किंवा एरवीही आमची एकमेकांशी स्पर्धा मात्र कधीच नव्हती. कारण रंगभूमीपुरतेच माझे कार्यक्षेत्र मर्यादित नव्हते. माझ्या ऑफिसमधील कामात मी अतिशय समाधानी होतो. नोकरी माझे करिअर होती तर अभिनय माझी आवड होती. नोकरीतील कामाच्या स्वरूपामुळे कदाचित तर्कनिष्ठ आणि ‘ऑर्गनाइज्ड’ बनत चाललेल्या माझ्या दृष्टिकोनाचा उपयोग नाटकासाठीही झाला. नोकरीने मला आíथक स्थर्य मिळाले  तर रंगभूमीने मला नावारूपास आणले. दोन्हीचा समतोल साधल्याने माझे व्याक्तिमत्त्व एकांगी राहिले नाही. नाटय़ व्यवसाय म्हणजे अळवावरचे पाणी ही शोभाची धारणा असल्याने  तिच्याप्रमाणे अभिनय हे माझे पूर्ण वेळ कार्यक्षेत्र नव्हतेच. याबाबतीत आमचे १०० टक्के एकमत राहिले.
 आमच्यात नाटक हा  समान दुवा असला तरी अखेर दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे आहेत म्हटल्यावर मतभिन्नता अपरिहार्यच म्हणायला हवी. मी ऑफिसमधून परत येतेवेळी ती गुजराथी नाटकाच्या तालमींना गेलेली असे. ही नित्याची बाब होऊन गेली होती. तिने तालमी संपल्यावर तडक घरी येऊन माझ्यासाठी जास्ती वेळ द्यावा, असे मला वाटे. नव्या नवलाईत किवा विचारांच्या अपरिपक्वतेमुळेही असेल कदाचित, तिच्याकडून मी जास्ती अपेक्षा ठेवतोय असे लवकरच लक्षात आले, कारण लग्नाआधीच या नाटय़ व्यवसायाचे स्वरूप आणि त्याच्या मागण्यांची मला पूर्ण जाणीव होती. एका प्रस्थापित अभिनेत्रीशी पूर्ण विचारांती लग्न करताना हे सर्व स्वीकारले होते. तेव्हा एखाद्या टिपिकल नवऱ्याप्रमाणे तिच्याकडून अपेक्षा ठेवणे अयोग्य नव्हते का? कदाचित नागपूरच्या काहीशा परंपरावादी वातावरणात वाढलेला मी आणि मुंबईच्या मोकळ्या वातावरणातील संस्कृतीत वाढलेली शोभा. आम्हा दोघांच्या विचारपद्धतीतील फरक यासाठी कारणीभूत असेल. अर्थात हे कबूल केलेच पाहिजे की तिने नाटकातील अभिनेत्रीप्रमाणेच  घरातील गृहिणीची भूमिकाही तितक्याच समरसतेने वठवली. दौरे, शूटिंगसाठी बाहेरगावी गेली तरी ती घरात खाण्यापिण्याची सोय करून जाई.
‘आमच्या सहजीवनात कितीही सुसंवाद असला तरीही  रोजच्या जगण्याच्या ताणतणावातून कुरबुरी होतातच’ हे विधान नाकारणारे जोडपे तद्दन खोटे बोलते हे माझे ठाम मत आहे. मुळात कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतातच. म्हणूनच आमच्यातही स्वभावभिन्नतेमुळे नाराजीचेही प्रसंग अनेकदा आले. तिला माझ्यासोबत प्रवास करण्याची हौस होती. पण दौऱ्याशिवाय एरवी फिरायचा मला कंटाळा. तिला माझ्याबरोबर िहदी सिनेमा बघावासा वाटे, पण मला मात्र ती नेहमीच शिक्षा वाटे. त्यातही तिने टिपिकल बायकोसारखा त्रागा न करता मध्यम मार्ग काढला. माझ्या दौऱ्यांच्या काळातच ती मत्रिणींबरोबर भटकून प्रवासाची, सिनेमा पहाण्याची हौस फिटवून घेई.
  पुढे मी प्रसिद्धीझोतात आल्यावर कुणी तिला ‘मिसेस किशोर प्रधान’ म्हटले म्हणजेच कुणी तिची पूर्वीची ओळख पुसट केली, पण तिने तेही सहजपणे स्वीकारले. पण याच सहजपणे ती जेव्हा  कुणाशी स्पष्टपणे मते मांडते तेव्हा मात्र मला त्याचा त्रास होतो. समोरच्या व्यक्तीला आहे तसे स्वीकारण्याचा किवा आपल्या मताचा अतिरेक न करता शक्य तितके जुळवून घ्यायच्या माझ्या स्वभावाला तिचा स्पष्टवक्तेपणा खटकतो. अर्धागी या नात्याने तिच्या स्वभावातील पारदर्शकता मला जाणवत असली तरी अशा बोलण्याने माणसे विनाकारण दुरावतात, दुखावतात ही जाणीव मला अस्वस्थ करते. आजकाल मात्र तिच्या या स्वभावाची धार काहीशी बोथटलेली वाटते. आताशा कुठे आम्ही एकत्र मुलाखतीला गेलो तर एखाद्या अडचणीच्या वाटणाऱ्या प्रश्नाला ती फटकन उत्तर  देत नाही.  माझ्याशी नजरेच्या भाषेतून संवाद साधून नेमके उत्तर देणे तिला चांगले साधलेय.   
एकमेकांनी एकमेकांसाठी असण्याचा अबोलपणे परस्परांना समजून घेण्याचा एक प्रसंग कायम स्मरणात आहे. तिचा  ‘मत्स्यगंधा’ नाटकाचा प्रयोग ज्या दिवशी नागपुरात होता, त्याच दिवशी माझ्या वडिलांचे निधन झाले. काकासाहेब प्रधान या प्रतिष्ठित व्यक्तीच्या निधनाच्याच दिवशी त्यांच्या सुनेने त्यांच्याच कर्मभूमीत नाटक करणे तिला पटण्यासारखे नव्हतेच. त्याहीपेक्षा आपल्या जोडीदाराला आणि कुटुंबीयांना किती क्लेशकारक होईल या जाणिवेने तिने तात्काळ ‘गोवा िहदू असोसिएशन’ कडे पर्यायी अभिनेत्रीसाठी विनंती केली. मीही माझ्या परीने प्रयत्न केले पण ते शक्य झाले नाही. ‘शो मस्ट गो ऑन’ नुसार तिने प्रयोग केला. त्याप्रसंगी अव्यक्तपणेच आमच्या भावना एकमेकांना उमजल्या. अर्थात पहिला भावनावेग ओसरल्यावर तटस्थपणे विचार केल्यावर असा प्रसंग निभावून नेणारे अनेकजण आठवले. पण पत्नी सहचरी म्हणून तसेच एक सून म्हणून लोकापवाद टाळण्यासाठीची तिने केलेली धडपड मी विसरू शकत नाही.
तिच्या चतुरस्रपणाबद्दल मला शंका नव्हतीच, पण ‘संभव-असंभव’ या गुजराथी नाटकाचा तिने मराठीत ज्या सहजतेने अनुवाद केला, तेव्हा तिची भाषेवरची पकड पाहून तिच्यातील याही पलूची नव्याने ओळख झाली. खूप कौतुक वाटले मला तेव्हा तिचे.
५० वर्षांपूर्वी स्टेजवर नायक-नायिकेच्या भूमिका साकारताना खऱ्या आयुष्यातले जोडीदार बनलो. आज या टप्प्यावर आल्यावर आमच्या सहजीवनाचा विचार करू जाता जाणवतेय की या प्रवासात अनेक चढ-उतार आणि वळणे येत गेली. खऱ्या अर्थाने जगायला शिकलो, शिकत गेलो. या अनेक चढउतारातून असंख्य अनुभवातून. पती-पत्नी या नात्याने एकमेकांना आधार देत एकमेकांचा आधार घेतच आमचे सहजीवन संपन्न झाले, असे मला निश्चित वाटते.
शब्दांकन- अलकनंदा पाध्ये