वैशाली देवडीकर
त्या गर्दीने भरलेल्या हॉलमध्ये वेगवेगळ्या वयाची मुलेमुली इकडेतिकडे मोकळेपणाने हिंडत होती आणि त्यांचे पालक अवघडलेल्या, दबलेल्या अवस्थेत इकडेतिकडे बघत बसलेले होते. थोड्याच वेळात आयोजक, समुपदेशक असे सगळे समोर ठेवलेल्या खुर्च्यांवर येऊन बसले. त्यांच्यामागच्या फळ्यावर ‘एलजीबीटीक्यूआयए सपोर्ट ग्रुप’ असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं. हळूहळू हॉलमध्ये शांतता पसरली. आयोजकांपैकी एकाने स्वागतपर दोन शब्द बोलून एका समुपदेशकाला बोलण्याची विनंती केली. त्यांचे बोलून झाल्यावर त्यांच्यातील एकीनं काही अनुभव सांगून समुपदेशन केलं.
कोणालाही कसलीही अडचण आल्यास दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर त्यांना मदत मिळेल असं सांगून मागे असलेल्या फळ्यावर समुपदेशकांचे आणि काही संपर्क क्रमांक लिहिण्यात आले. शेवटी आयोजकांपैकी एकीनं सगळ्यांचे आभार मानून मुलामुलींपैकी कोणाला विचार मांडायचे असतील तर या आणि शक्य असेल तर पालकांना घेऊन या, म्हणजे ओळख होईल असे सांगितले. मुलेमुली उत्साहात येऊन बोलली. काहींचे पालक आले, काहींचे जागेवरून उठलेही नाहीत.
जे आले ते ओळख करून दिल्यावर, सगळ्यांना नमस्कार करून जागेवर जाऊन बसले. ‘आजच्या संमेलनामुळे आम्हाला खूप धीर आला’, पाठिंबा मिळाला, समाजात वावरण्याचा आत्मविश्वास मिळाला, मनातल्या खूप सार्या शंका दूर झाल्या, अशी संमेलने सतत झाली पाहिजेत, अजूनही काही अडचणी/शंका आल्यास तुम्हाला हक्काने त्रास देऊच,’ असे जवळजवळ सगळ्या मुलामुलींनी व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांना सांगितले, त्यांचे आभार मानले.
सौरभ उभा राहिला, त्याने आईबाबांकडे पाहिलं. त्याच्या आईनं काहीतरी मनाशी ठरवलं आणि तीही उठली. बाबांनी त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही. सगळ्यांसमोर येऊन सौरभनं स्वत:ची आणि आईची ओळख करून दिली. समाजात वावरताना येणार्या अडचणी, घरातील संघर्ष, मानसिक आंदोलने, स्वत:च्या ओळखीचा धूसर आणि गुंतागुंतीचा रस्ता, या सगळ्या प्रवासात समुपदेशकांनी केलेली मदत असं सांगत त्यानं त्याला मदत करणार्या सगळ्यांचे आभार मानले. त्याच्या लक्षात आलं की, त्याची आई जागेवर जाऊन न बसता तिथंच उभी आहे. तो थोडा दचकला. त्यानं तिच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं. मग समोर पाहिलं तर बाबा शांतपणे समोरच बघत होते पण त्याच्याकडे बघत नव्हते.
त्यानं परत आईकडं अवघडून पाहिलं. आई पुढे आली आणि म्हणाली, ‘‘मलाही बोलायचं आहे.’’ आधी त्याला एकदम आनंद झाला कारण इतर कोणतेच पालक बोलले नव्हते. पण तो थोडा गोंधळला. आई आपल्याला आधी काही बोललीच नव्हती, मग अचानक कसं ठरवलं? तो हळूच आईला म्हणाला, ‘‘तू काय बोलणार आहेस? मला आधी काही बोलली नाहीस.’’ आईनं त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि ती पुढे आली. आता तो आईच्या बाजूला उभा राहिला. ‘‘मी वसुधा, सौरभची आई, नमस्कार सगळ्यांना. मी इथे येताना किंवा आल्यावर, काही बोलायचं असं ठरवून आले नव्हते, त्यामुळे सौरभ गोंधळला आहे.
पण सगळ्या मुलांचे विचार ऐकून वाटलं आपण बोलावं.’’ खरं तर, आई काय नक्की बोलणार या विचाराने सौरभ थोडा अस्वस्थ झाला.
‘‘आत्ता मी सगळ्या मुलांचे आणि समुपदेशकांचे विचार ऐकले. अशा अनेक मुलामुलींना त्यांची खरी ओळख पटल्यावर त्यांच्या आयुष्यात होणार्या गोंधळात समुपदेशक मदत करतात हे पाहिलंही आहे. आता सर्वोच्च न्यायालयापासून ते समाजातील छोट्या घटकापर्यंत या वेगळ्या श्रेणीची ओळख होऊ लागली आहे. आमच्या मुलामुलींना न्याय मिळतो आहे, जगण्याचा विश्वास निर्माण होतो आहे.
मी त्यांना मदत करणार्या या सगळ्यांचीच आभारी आहे. पण तुम्ही सगळ्यांनी आम्हा पालकांचा विचार केला आहे का?’’ सगळे स्तब्ध होऊन ऐकत होते. अतिशय शांतपणे वसुधाताई विचार मांडत होत्या. त्यांच्या शेवटच्या प्रश्नानं सगळ्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे. पालक तर चक्क सावरून बसले. ‘‘तुम्ही केकचं मिश्रण पाहिलं आहे, आधी पातळ असतं, ते आपण वेगवेगळ्या आकाराच्या साच्यात टाकलं, ओव्हनमध्ये ठेवलं की घट्ट, एकसंध केक तयार होतो. मग त्याचा आकार बदलता येत नाही. एकदा आकार बदलला की सुरुवातीच्या कच्च्या म्हणू हवं तर आपण, तर त्या कच्च्या किंवा मूळ स्वरूपाकडे परत जाता येत नाही. हा नियम आहे. तसेच मने कच्ची, अपरिपक्व असतात तेव्हा बदल चटकन स्वीकारता येतो.
पण पक्व असलेल्या आमच्यासारख्या मनुष्य मनाचं काय? आम्ही ज्या पिढीत जन्मलो, वाढलो ते फारच वेगळं होतं. आता जग प्रचंड वेगानं बदललं आहे. तो वेग आम्हाला झेपत नाही तरीही आम्ही धावतो, मागे न राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मुलांना आपल्यामुळे कमीपणा येऊ नये म्हणून आम्ही या बदललेल्या जगाचे नियम शिकतो, आम्हाला धाप लागते पण आम्ही धावतो आणि शिकतो. त्याच वेळी आमच्या मागच्या पिढीचा हात आम्हाला सोडायचा नसतो, आम्हाला तेही हवे असतात. मग आम्ही आमचा वेग कमी करतो आणि त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करतो. ही धावपळ कोणाला जमते, कोणाला जमत नाही. आमच्या आधीच्या पिढ्या ज्या चौकटीत राहिल्या, आम्हीही त्याच चौकटीत राहून इथपर्यंत आलो.
आयुष्य असंच असतं असंच आम्हाला माहिती होतं. आईबाबा, मित्रमैत्रिणी, शिक्षण, लग्न, नोकरी, मग मुले, त्यांचे शिक्षण, पुढे त्यांची लग्ने, त्यांची मुले म्हणजे आमची नातवंडे, आमचं म्हातारपण हा आम्हा पालकांचा साचा होता आणि आहे. लहानपणापासून आजूबाजूला हे पाहत आलो आणि आपलं हेच होणार हे माहिती होतं, मोठं झाल्यानंतर समजुती घट्ट झाल्या, मनाची ठेवण विशिष्ट झाली आणि आम्ही तसं जगत आलो. या आमच्या साच्यात घट्ट झालेल्या आमच्या समजुतीत मुलगा मुलीशी लग्न करतो आणि मुलगी मुलाशी लग्न करते. आमच्या आयुष्यात यापेक्षा वेगळं काही घडलंच नाही. नर आणि मादी हेच एकत्र येतात हे आम्ही वर्षानुवर्षे वाचत, ऐकत, बघत आलो.
बृहन्नडेचा अवतार अर्जुनाने स्वत:ला जगापासून लपवायला घेतला होता हे आम्हाला माहिती होतं. पण अशा लोकांसाठी समाजाकडे विशिष्ट शब्द होते. आजूबाजूच्या घरात एखादा मुलगा स्त्रीसारखा वागायला लागला तर ‘बायल्या’ म्हणून त्याला हिणवलं जाई.’’ वसुधाताई क्षणभर थांबल्या परंतु त्याच प्रवाहात त्या बोलू लागल्या. ‘‘जेव्हा सौरभला त्याची स्वत:ची ओळख कळली तेव्हा त्यानं आधी मला सांगितलं, तो दिवस मी आयुष्यात विसरणार नाही. मी ते कसं ऐकलं, तिथून पुढे मी कसं वागले, यांना कळू न देता आधी स्वत:ला कसं शांत केलं, त्याच वेळी सौरभ दुखावला जाणार नाही याची काळजी घेत कसं जगले हे माझं मला माहिती आहे. माझ्या लग्नानंतर सौरभच्या वेळी मला दिवस गेले तेव्हा तर त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे मी सगळं केलं. देवधर्म, पथ्य, व्रतवैकल्ये पाळली. मग असं कसं झालं? याचं उत्तर मला मिळालं नाही.
सौरभला मुलगा आवडतो म्हणजे नक्की काय हेच मुळात मला किती दिवस समजत नव्हतं. मुलींना बघून त्याला काहीही वाटत नाही, पण एखाद्या मुलाला बघून त्याला काहीतरी विशिष्ट होतं म्हणजे नक्की काय हे मला आमचे डॉक्टर, जवळचा भाऊ, अगदी बहीणही समजवू शकले नाही. विश्वासाच्या परिघात उत्तरे मिळाली नाहीत, मी हरले आणि एके दिवशी सौरभच्या बाबांना कसंतरी सांगितलं. त्यांचाही कितीतरी वेळ विश्वास बसला नाही. ते सगळे दिवस आम्हाला तिघांनाही खूप कठीण गेले.
खरं सांगायचं तर दिवस रोजच्या कामात जात असे, संध्याकाळनंतरची वेळ खूप अवघड असायची, कामावरून घरी आल्यावर एक विचित्र शांतता घरात पसरायची, रात्र रात्र डोळ्याला डोळा लागायचा नाही. डोळ्यातलं पाणी थांबायचं नाही. नक्की कोणाला समजावयाचे हे कळायचं नाही. सुरुवातीला आम्ही दोघांनी त्यालाच समजावून पाहिलं. डॉक्टरांकडे नेलं, पण त्यांनी आम्हालाच समजावलं. आम्ही हताश होऊन घरी आलो. हे सगळं आमच्या समजण्याच्या पलीकडचं होतं.’’ ‘‘मी कला शाखेची, सौरभचे बाबा वाणिज्य शाखेचे म्हणून आम्हाला विज्ञान कळत नव्हतं का? त्याची संगत चुकीची होती किंवा आहे का? त्याच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवलं नाही म्हणून असं झालं का? आता आमच्या आईबाबांना आम्ही काय सांगायचं?
तो मुलाशी लग्न करणार म्हणतो म्हणजे नक्की काय? मग आम्हाला सून येणार की जावई? मग ते दोघं कुठे राहणार? आमच्याकडे की त्या मुलाच्या आईवडिलांकडे? आम्ही त्या मुलाला काय म्हणायचं? समाजाला काय सांगायचं? आम्ही पाहिलेल्या नातवंडांच्या स्वप्नांचं काय? आमच्या मुलाची उत्तम असलेली नोकरी जाणार की काय? शेजारी, नातेवाईक आमच्याशी कसे वागतील, आमच्या घरी कोणी येईल का? आमची कामवाली कामाला येणार का?’’ बोलताना सौरभच्या आईला एकदम भरून आलं, त्यानं पटकन तिला तिथं ठेवलेलं पाणी दिलं. खरं तर, तिथल्या प्रत्येक आईवडिलांच्या घालमेलीचं हे प्रतीक होतं, सगळ्या पालकांच्या डोळ्यांत पाणी आलेलं होतं.
‘‘खूप विचित्र वादळात आम्ही सापडलो होतो हो, कोणीच हात देणारं नव्हतं. हताश झालो होतो. जे शब्दही लहानपणापासून उच्चारले नाहीत, जवळपास फिरकू दिले नाहीत ते आपल्या पोटी जन्माला कसे आले याचं उत्तर दोघांनाही मिळत नव्हतं. सामान्य माणसे आम्ही, सौरभ नाही म्हणत असताना देवाधर्माचे उपायसुद्धा केले. आमचा जीव आहे सौरभ, आम्ही त्याला एकटा सोडणारच नव्हतो. तोही एकाच वेळी आमच्याशी आणि समाजाशीही लढत होता. पण हे नक्की काय झालं हे कळायच्या पलीकडे होतं.’’ बोलता बोलता त्या एकदम खुर्च्यांवर बसलेल्या समुपदेशकांकडे वळून कळकळीनं म्हणाल्या, ‘‘माझी अगदी आतून विनंती आहे की, या मुलांचं समुपदेशन कराच हो, पण त्यांच्याबरोबर आम्हा पालकांचंही करा, आम्हाला समजवा की हे नक्की काय आहे, कसं हाताळायचं, कसं वागायचं, समाजाला कसं तोंड द्यायचं?
आमच्या मनातल्या घट्ट समजूती बदलणं अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही. इथे आलेले पालक पाहिल्यावर लक्षात आलं की सगळे आमच्याचसारखे गोंधळलेले आहेत. आम्हाला, समाजाला समुपदेशनाची, तुमच्या पाठिंब्याची अत्यंत गरज आहे. ही विनंती आज इथे प्रत्येक पालकाच्या मनात असणार. हा प्रश्न आणि आम्ही यांतील अंतर कमी करायला तुमची आम्हाला मदत होईल का? म्हणजे या मुलांचे आमच्याशी आणि समाजाशी झगडणे कमी होईल, ते मोकळा श्वास घेऊ शकतील. आमच्या मुलांकरता आम्ही स्वत:ला बदलू कारण आम्हाला आमच्या मुलांबरोबर समाजात ताठ मानेने जगायचं आहे, आम्हाला आमच्या मुलांबरोबर जगायचं आहे.’’ त्या एकदम रडायला लागल्या. सौरभ रडत होता. त्याचे वडील हळूहळू चालत त्यांच्याजवळ आले, त्यांनी दोघांना जवळ घेतलं. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं.
सौरभ माइकसमोर आला म्हणाला, ‘‘आता चौकट मोडायला हवी. समाज आणि पालकांच्या विचारांची चौकट बदलते आहे. आई, बाबा, समाज सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला आपलंसं करायचं ठरवलं. आई, तुझी कळकळ मला कळते, मी पुढे मूल दत्तक घेणार आहे, तुला नातवंड नक्की मिळेल आणि आम्ही लग्नानंतर आपल्या घरी नाही, पण तुमच्याजवळ घर घेऊन राहू. आम्हालाही तुम्ही हवे आहात.’’
बदल हा नेहमी हळूहळूच होतो. सगळ्यांना बरोबर घेऊन झालेला बदल टिकतो आणि यशस्वी होतो हा इतिहास आहे.
uvaishalidevdikar@gmail.com
