विनोद द. मुळे vinoddmuley@gmail.com

पंचेचाळीस वर्ष लोटली आहेत त्या घटनेला. मी तेव्हा जेमतेम १९-२० वर्षांचा असेन. ‘डलहौसी’च्या यूथ हॉस्टेलमध्ये प्रवेश करतच होतो, की मुख्य दाराजवळ असलेल्या त्या फलकाकडे लक्ष गेलं. इंग्रजीत एक सुभाषित लिहिलं होतं, ‘our life would have been a heavenly one,  had we not introduced so many complications in itl. (आमचं आयुष्य स्वर्गासारखं झालं असतं, जर आम्ही त्यात इतका गुंता निर्माण केला नसता तर.)

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?

त्याच क्षणी ते वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलं, अन् मला सुखी आयुष्याची गुरुकिल्ली सापडली ती कायमसाठी. त्या क्षणापासूनच आयुष्य एका सरळ रेषेत, म्हणजेच काहीही गुंतागुंत निर्माण न करता जगण्याचा प्रयत्न करतोय. असं करण्यात मला थोडंबहुत नव्हे, तर बरंचसं यश मिळालं आहे. शिक्षण पूर्ण केलं, बँकेत नोकरीला लागलो, लग्न केलं आणि आयुष्याचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात गुंतागुंती निर्माण होण्याचे अनेक प्रसंग आले. अशा वेळी ते वाक्य घोकत बसलो आणि त्या गुंतागुंती होऊच न देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आयुष्याचा प्रवास एका सरळ रेषेत सुरूच ठेवला. जे जे शिकावंसं वाटलं ते शिकलो, अनेक उत्तम छंद जोपासले, भरपूर भटकंती केली आणि आयुष्याचा भरपूर आनंद घेतला. अगदी इतका, की हे लिहीत असताना जरी देव समोर उभा ठाकला असता, अन् त्यानं म्हटलं असतं की, ‘चल, तुला न्यायला आलोय, चलतोस का?’ तर पटकन मी त्याला ‘हो’ म्हणून मोकळा झालो असतो! 

हे सर्व करत असताना आयुष्याला कधीही कृत्रिमतेची किनार लागू दिली नाही. कधीही मी जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. तसं कधी वाटलंही नाही. हे लिहिताना एक प्रसंग आवर्जून नमूद करावासा वाटतो. बँकेतून कर्ज काढून घर बांधायला काढलं होतं. आपण जेव्हा घर बांधायचं ठरवतो, तेव्हा बजेट आवाक्याबाहेर हमखास जातंच. पण मी तसं होऊ दिलं नाही. बजेट जर शंभर रुपयांचं असेल, तर साठ रुपयेच खिशात आहेत, असं इंजिनीयरला दाखवलं. परिणाम अपेक्षेप्रमाणेच झाला. गवंडी जेव्हा घराचं शेवटचं काम पूर्ण करून निघू लागले, तेव्हा त्यांच्या हातावर त्यांच्या कामाचा मोबदला ठेवूनच निघू दिलं. असं केल्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारले गेले- आपल्या घराचं सुखही लाभलं आणि मानसिक शांतीही टिकून राहिली. पुढे मुला-मुलींची लग्नंही केली आणि परदेशवारीही. पण प्रत्येक प्रसंगी ‘डलहौसी’च्या त्या फलकावर लिहिलेलं ते सुभाषित डोळय़ांसमोर ठेवलं आणि तसंच वागत आलो.

आज सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य भरभरून जगतोय. कुठलीही आधी किंवा व्याधी आतापर्यंत तरी नाहीये. अर्थातच ईश्वराच्या कृपेशिवाय हे शक्य नाहीच, पण तरीही हे मान्य करावंच लागेल, की फलकावर लिहिलेल्या त्या सुभाषिताचा अर्थ ऐन तारुण्याच्या उंबरठय़ावर असतानाच उमगल्यामुळे आणि तसंच समाधानी आयुष्य जगायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यामुळे असेल कदाचित, मन कायम सुखी राहिलं आणि त्यामुळे शरीरही. त्यामुळे आज आयुष्याला अर्थ लाभलाय. थोडक्यात काय, तर आयुष्यात कुठलाही गुंता होऊ देऊ नका, मग आयुष्याला अर्थ देणाऱ्या अनेक गोष्टी करता येतील.