scorecardresearch

परकायाप्रवेश

गेल्या लेखात रंगमंचाच्या समोरच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांकडे पाहिलं.

गेल्या लेखात रंगमंचाच्या समोरच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांकडे पाहिलं. आज पाहू या त्या रंगमंचावर वावरणाऱ्या, आपल्यासमोर एक स्वतंत्र, स्वायत्त जग निर्माण करणाऱ्या अवलियांकडे.  विश्राम बेडेकरांच्या ‘एक झाड दोन पक्षी’ यात मास्टर दीनानाथांची फार अर्थपूर्ण तरीही हृद्य अशी आठवण दिलेली आहे. दीनानाथांची बलवंत नाटक कंपनी कायदेशीर अडचणीत आली आणि कंपनीच्या तीनही भागीदारांना पोलीस ठाण्यात जावं लागलं. मास्टर दीनानाथ गोव्याचे, म्हणजेच पोर्तुगालचे नागरिक. पोलीस ठाण्यात त्यांना सांगितलं गेलं की, ‘मी पोर्तुगालचा नागरिक आहे, ब्रिटिश सरकार माझ्यावर कारवाई करू शकत नाही’ असं सांगून तुम्ही सुटका करून घेऊ शकता. त्या वेळी मास्टर दीनानाथ म्हणाले, ‘‘नाही! माझ्या दोन भागीदारांचं जे होईल तेच माझं होईल.’’ गोष्ट इथे संपत नाही. दुसऱ्या दिवशी मास्टर दीनानाथ म्हणाले की, ‘‘काल मी असं का बरं बोललो असेन?’’ त्याचं उत्तरही त्यांनीच दिलं- ‘‘कदाचित रोज रात्री मी नाटक करतो, त्यात नायकाची भूमिका करतो आणि प्रत्येक नायक शेवटच्या अंकात असं काही तरी धीरोदात्त वगैरे बोलतो. माझ्यावर त्याचा तर प्रभाव पडलेला नाही ना?’’ थोडक्यात रोज रात्री ते परकायाप्रवेश करत, त्यांच्यात कुणा दुसऱ्याचा संचार होत असे, जसा सगळ्या नटांमध्ये, किंबहुना सगळ्या कलाकारांमध्ये होतो. त्या रोजच्या संचाराचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला – त्यांच्या मते- की तशीच – म्हणजे नाटय़मय- वेळ आली, तेव्हा ते तसेच संवाद म्हणून गेले!

‘‘आयुष्य हे मूर्खानी सांगितलेली मूर्खानी ऐकलेली एक निर्थक गोष्ट आहे..’’ अशा प्रकारचं एक वाक्य बऱ्याच ठिकाणी उद्धृत केलं जातं आणि वर असंही म्हटलं जातं की शेक्सपिअर म्हणालेलाच आहे.. वगैरे. पण हे वाक्य शेक्सपिअर बोलला का मॅकबेथ? जर तो स्वत: बोलला असता, जर त्याला खरोखरच असं वाटत असतं, तर त्याने एवढी नाटकं लिहिली असती का? त्याचं आयुष्य पाहिलं तर फार ‘कलरफुल’ जगला तो. तरीही तो असं वाक्य लिहून जातो. कारण- परकायाप्रवेश! त्याच्या अंगात मॅकबेथ संचारला, त्याची त्या वेळेची अवस्था- निराशा, वैफल्य या सगळ्यांनी शेक्सपिअरच्या मनाचा ताबा घेतला आणि त्याने ते वाक्य लिहिलं. जोपर्यंत हा संचार होत नाही, त्याला कलाकार संपूर्णपणे शरण जात नाहीत, तोपर्यंत हातून काही अस्सल घडत नाही.

परकायाप्रवेशाचं पहिलं उदाहरण म्हणजे आदि शंकराचार्य असं म्हणतात. त्यांना एका स्त्रीने आव्हान दिलं की त्यांना कामजीवनाबद्दल काही माहिती नाही. तेव्हा त्यांनी तिच्याबरोबर वादात जिंकण्यासाठी परकायाप्रवेश करून तोही अनुभव घेतला असं सांगितलं जातं. ही झाली ऐकीव गोष्ट. पण प्रत्येक सर्जनशील कलाकार हेच करत असतो. ‘मोहे पनघट पे..’ म्हणताना मधुबाला म्हणजेच अनारकली-  राधा होते, पोटच्या पोरावर बंदूक रोखताना नर्गिस ‘मदर इंडिया’ होते, तिच्या जिवा-भावाशी समरस होते.. अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना विचारलं जातं की – तुला नट का व्हायचंय- काही हुशार विद्यार्थी म्हणतात एकाच हयातीत अनेक आयुष्यं जगायला मिळावीत म्हणून! म्हणजेच – परकायाप्रवेश करता यावा म्हणून! पण हा परकायाप्रवेश सहज साध्य होत नाही. त्यासाठी साधना लागते, आराधना लागते आणि ती चोवीस तास, तिन्ही त्रिकाळ करायची असते. संवाद पाठ करून ते म्हणणं, ठरल्या वेळी ठरल्याप्रमाणे उठणं, बसणं, हालचाल करणं, फक्त एवढाच अभिनय नसतो. किंवा एक गोष्ट रचून मग काय घडलं, कसं घडलं, कोण काय म्हणालं ते सांगणं हे लेखन नसतं. आयुष्य आरपार बघणं, माणसांविषयी, त्यांच्या जगण्याविषयी आस्था असणं; त्यांच्याशी एक नातं जडणं, या सगळ्यातून एक दिवस अचानक तो परकायाप्रवेश साध्य होतो.

खूप वर्षांपूर्वी- म्हणजे- सई परांजपेंचा ‘स्पर्श’ सिनेमा आला त्या वेळी ‘दूरदर्शन’वर नसीरुद्दिन शाह यांची मुलाखत पहिली होती. त्यांना विचारलं तुम्ही या सिनेमासाठी खूप अंध माणसांना भेटलात का? त्यांचा अभ्यास केलात का? ते म्हणाले, ‘‘तुम्ही जर आयुष्यभर काही बघत नसलात तर फक्त असं एका भूमिकेसाठी अभ्यास वगैरे करून काही होत नाही!’’ तुम्हाला सतत बघावं लागतं, दिसावं लागतं. तो सगळा डेटा वर्षांनुवर्ष कुठे तरी स्टोअर होत असतो आणि एक दिवस अचानक- पण योग्य वेळी- ती फाइल ओपन होते.’’

यालासुद्धा तालीम लागते. ज्युलिया रॉबर्ट्स म्हणते की, अजूनही मी कुठलीही भूमिका वर्कशॉप केल्याशिवाय करूशकत नाही. म्हणजेच त्या साचलेल्या फायली त्यांना अ‍ॅक्टिवेट कराव्या लागतात. स्वत:च्या अंतरंगात त्या खोल शिरून बघतात तेव्हाच त्यांना त्या करत असलेल्या पात्राच्या अंतरंगात शिरता येतं. त्यांच्यात त्या पात्राचा संचार होतो.

संचार म्हटलं की उग्र, अक्राळविक्राळ असं काही तरी डोळ्यासमोर येतं. पण या प्रक्रियेची दोन अतिशय नाजूक, तरल उदाहरणं मी पाहिलेली आहेत. विजयाबाई मेहता ‘लाइफलाइन- जीवनरेखा’ ही मालिका करत होत्या, मी त्यांची सहायक होते. त्यामुळे मला ते दोन शॉट्स अनेक वेळा पाहता आले, तालमीत, चित्रीकरणाच्या वेळेस आणि संकलनात. केवळ वर्णन करून त्यांना न्याय देता येणार नाही, पण त्यांच्याबद्दल लिहिल्याशिवाय मला राहवतही नाही.

एक प्रसंग होता शफी इनामदार यांचा. ते एका कर्करोगग्रस्त रुग्णाची भूमिका करत होते. एक अतिशय यशस्वी उद्योजक, आपल्याला आतून काही तरी पोखरतंय हे माहिती आहे, पण मान्य करायचं नाही आहे. ते एम.आर.आय. मशीनमधून बाहेर येतात असा शॉट होता. ते बाहेर आले, उठून बसले, क्षणभराचा पॉज घेतला आणि ओरडले, ‘‘माझ्या चपला कुठे आहेत?’’ माणूस आतून-बाहेरून हादरला आहे हे त्या ओरडण्यातून आणि त्यांच्या बसण्यातून जाणवलं.

दुसरा प्रसंग पंकज कपूर यांचा. माणूस एकटा आहे, बायको सोडून गेली आहे, मुलगी परदेशात राहतेय. एका तरुण डॉक्टरशी बोलता-बोलता ते हे सांगून जातात. त्याला आश्चर्य वाटतं. ‘‘तुम्हाला मुलगी आहे?’’ तो विचारतो. ते म्हणतात, ‘‘तुला बघायचा आहे का माझ्या मुलीचा फोटो?’’ तो डॉक्टर- के. के. रैना, म्हणतो, ‘‘बघू.’’ तेव्हा पंकज कपूर उठतात आणि पाच पावलांवर असलेल्या कपाटाकडे चालत जातात. ती पाच पावलं फक्त एका बापाची आणि बापाचीच होती. आपल्या दूर असलेल्या मुलीला- फोटोत का होईना- बघायला आतुर झालेल्या बापाची होती. ही उदाहरणं काही भल्या-मोठय़ा स्वगताची नाहीत की पल्लेदार वाक्यांची देखील नाहीत. पण पूर्णपणे सात्त्विक अभिनय- पात्राशी एकरूप होऊन केलेल्या अभिनयाची आहेत. ज्यामुळे मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात ती भावना साकार होते, त्यांना त्याचा प्रत्यय येतो, अशा अभिनयाची आहेत.

‘वक्त’ सिनेमात ‘ए मेरी जोहरा जबीं’ म्हणणारे बलराज साहनी सगळ्यांच्या लक्षात आहेत. पण कोर्टाच्या सीनमध्ये एक टॅक्सीवाला म्हणून समोर चाललेली सुनावणी ऐकणारे बलराज साहनी मुद्दाम बघा. एरवी पडद्यावर दिसले तरी उठून उभं राहावं असं व्यक्तिमत्त्व होतं त्याचं. पण या सीनमध्ये ते कसे उभे आहेत, सुनावणी ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावर काय भाव आहेत, हे अभ्यास करण्यासारखं आहे. त्या अभिनयाला दाद देण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत- आहे फक्त घशात एक आवंढा आणि डोळ्यांत पाणी!

– प्रतिमा कुलकर्णी

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व लाइफ इज ब्युटिफुल ( Life-is-beautiful ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Articles in marathi on spiritual energy

ताज्या बातम्या