जपानमध्ये आलेला एक अनुभव (यश चोप्रांच्या सिनेमात जसं वारंवार प्रेम येत राहतं, तसं माझ्या लेखांमध्ये वारंवार जपान येत राहील!) मी नागोयाहून दुसऱ्या बेटावर असलेल्या इमाबारी या एका छोटय़ा गावाला निघाले होते. स्टेशनवर गेले, १०.४३ ची गाडी होती. १०.४०च्या सुमाराला गाडी आली, त्यावर इमाबारी असं लिहिलंय याची खात्री करून गाडीत चढले. अत्यंत खुशीत खिडकीतून बाहेर बघत असताना टीसी आला, तिकीट मागितलं, मी ऐटीत बाहेर काढून ते दाखवलं आणि त्याचा चेहरा गंभीर झाला! मला म्हणाला, हे तिकीट चुकीचं आहे. मी म्हटलं, थांबा, मी कदाचित परतीचं तिकीट दिलं असेल. तो म्हणाला, नाही, तिकीट नागोया-इमाबारी असंच आहे. पण ही गाडी एक्स्प्रेस आहे, तुम्हाला पैसे भरावे लागतील.

पैसे म्हटल्यावर भाषा-बिषा कुछ नही! हे बहुधा माझ्या चेहऱ्यावर लिहिलं असावं. शब्दांशिवायच त्याला ते कळलं. तो म्हणाला, ‘‘तुझं तिकीट १०:४३च्या गाडीचं आहे. ही १०:४१ची गाडी आहे!’’ ३००हून जास्त की.मी. दूर शहरी जायला २-२ मिनिटांच्या फरकाने गाडय़ा असतील असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. एक क्षणभर थांबून हळू आवाजात त्याने मला सांगितलं, ‘‘एक काम कर- १५ मिनिटांत अमुक एक स्टेशन येईल, तिथे उतर. तिथे २ मिनिटांनंतर त्याच प्लॅटफॉर्मवर तुझी गाडी येईल.’’ हे बोलून मी त्याचे आभार मानायच्या आत तो निघून गेला. ते स्टेशन आलं, मी उतरले. आता माझा नेहमीचा आत्मविश्वास नाही म्हटलं तरी डळमळीत झाला होता. त्यामुळे जरा बावचळून इकडे-तिकडे बघत असताना मला थोडासा दूर उभा असलेला तो टीसी परत दिसला. मी त्याला पाहिलंय हे लक्षात आल्याबरोबर आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात त्याने मान फिरवली. हे करताना त्या जपानी मनाला किती यातना होत असतील याची मला पूर्ण कल्पना आहे. नियमाप्रमाणे त्याने माझ्याकडून पैसे वसूल करायला हवे होते. एका परदेशी नागरिकाला माणुसकी दाखवून तो देशाचं नुकसान करत होता. स्वत:ला काही लाभ नसून! मिनिटभरात गाडी आली, ती आल्यावर मात्र त्याने माझ्याकडे पाहिलं, त्या पाहण्यातून मला कळलं की हीच ती गाडी. मी त्याच गाडीत चढतेय याची खात्री झाल्यावर तो निघून गेला.

आम्हा दोघात बोलणं झालंच नव्हतं. पण कर्मचारी म्हणून, नागरिक म्हणून आणि एक माणूस म्हणून त्याच्या मनात काय चाललंय हे त्याच्या त्या थांबण्याच्या एका कृतीतून कळलं होतं! कृतीचा आवाज शब्दांपेक्षाही मोठा असतो म्हणतात. तसे तर शब्दकोशात पण खंडीभर शब्द सहज मिळतात. पण शब्द फसवू शकतात, कृती नाही.

जसजसे आपण मोठे होत जातो तसे शब्द चतुरपणे वापरायला लागतो. माझी एक मैत्रीण तिच्या ५-६ वर्षांच्या भाच्याला घेऊन दिल्लीहून आग्रा येथे जात होती. आगगाडीतून जात असताना पलीकडच्या बाजूने धडधडत दुसरी आगगाडी गेली. तिचा भाचा दचकून उभा राहिला- आगगाडी निघून गेली, तोही शांत झाला. त्याला काय वाटलं होतं ते त्यांनी शब्दांशिवाय सांगून टाकलं होतं. पण आता तो मोठा होत होता- शब्द चतुरपणे वापरायला शिकत होता! तो परत उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘हमें तो डर भी नहीं लगता!’’

चित्रपटात आलेले काही संवाद अजरामर होतात यात शंकाच नाही- ‘मेरे पास माँ है’, ‘जो डर गया वह मर गया’, ‘चिनाय सेठ, जो शीशे के घर में..’ इत्यादी. हे येता-जाता बोलायचे संवाद. पण हृदयाच्या कोपऱ्यात सामावून राहिलेले क्षण हे शब्दांशिवायचेच असतात. ‘अ वेनस्डे’ या चित्रपटातला शेवटाकडचा सीन आठवा. नसिरुद्दीन शाह भाजीच्या पिशव्या घेऊन उतरतो, त्याला अनुपम खेर भेटतो. अनुपम खेर- म्हणजेच पोलीस कमिशनरला चांगलंच माहिती आहे की दिवसभर आपल्याला धारेवर धरणारा, खेळवणारा सामान्य नागरिक तो हाच. पण त्या नागरिकाच्या सच्चेपणाची त्या पोलिसाला खात्री आहे. त्याच्याबद्दल आदरही आहे. पोलिसाच्या पदावर असून आपण जे करू शकत नाही, ते या सामान्य नागरिकाने करून दाखवलं याबद्दल कृतज्ञताही आहे. दिवसभर शहराला वेठीला धरणारा माणूस आपण आहोत हे या पोलिसाला कळलंय हे नसिरुद्दीन शाहलाही कळतंय. पण दोघं बोलतात ते पिशवीतल्या भाजीविषयी. हे सगळं आपल्याला कळतं ते त्यांच्या शब्दातून नाही, त्यांच्या डोळ्यातून, स्वरातून, लयीतून.. आणि म्हणूनच तो सीन मनात घर करून राहिला आहे.

नटांना एक खोड असते- अपवाद असतील- त्यांची माफी मागते- त्यांच्या हातात स्क्रिप्ट पडलं की आधी ते त्यांचे संवाद किती आहेत ते बघतात. त्यांचीही चूक नाही, कारण अजूनही आपल्याकडे उत्तम संवाद म्हणणं म्हणजे अभिनय असं समजलं जातं. देहबोली, लय, उत्तम प्रकारे समोरच्याचं ऐकणं हे सगळं उत्तम अभिनयाचा भाग आहे हे सहसा लक्षात घेतलं जात नाही.

वसंत कानेटकरलिखित ‘कस्तुरीमृग’ हे मराठी रंगभूमीवरचं एक महत्त्वाचं नाटक. एक प्रगल्भ, प्रतिभावान गायिका आणि तिच्या आयुष्यात आलेले तितकेच प्रसिद्ध, प्रतिभावान पुरुष आणि त्यांच्या मैत्रीचे विविध पैलू- हा त्या नाटकाचा मुख्य विषय. डॉ. लागू आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या तगडय़ा भूमिका होत्या त्यात- अर्थातच प्रमुख भूमिका. पण त्यांच्या इतकाच माझ्या मनात घर करून राहिला तो म्हणजे मोहन गोखले. एक गाणारी नायिका, तिचा जिवा-भावाचा मित्र, नायक-नायिका बोलत असताना तो फक्त मागे उभा असायचा. शांतपणे आणि काहीशा हताशपणे. दाराच्या आडोशाला. त्याच्या त्या केवळ उभं राहण्यातून त्याचं एकाकीपण मनावर ठसत असे. तो ज्या तऱ्हेने उभा राहायचा, ज्या जागी, त्यामुळे पुढे चाललेल्या सीनला एक वेगळा अर्थ मिळायचा. मला तो कोपऱ्यात ठेवलेल्या तानपुऱ्यासारखा दिसायचा. त्या नाटकात तानपुऱ्याला एक विशेष महत्त्व होतंच!

विजयाबाई मेहतांनी ‘शाकुंतल’ नाटक केलं होतं ते संपूर्ण संस्कृत नाटय़शैलीत. त्यात स्टेजवर मागे गायक-वादक बसतात आणि संपूर्ण नाटकभर संगीत चालू असतं. त्या नाटकाचं संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं. नाटकाच्या शेवटी दुष्यंत, शकुंतला आणि छोटा भरत भेटतात तो प्रसंग. पहिल्या अंकातल्या शृंगारिक प्रसंगातली अल्लड युवती, त्यांच्यातलं प्रेम, पुढे विरह, आता अनेक वर्षांनंतर होणारी भेट. एक प्रेमिका म्हणून नाही, तर त्याच्या मुलाची आई म्हणून. असं अनेक पदरी, अनेक भावनांनी भरलेला आणि भारलेला असा तो प्रसंग संपूर्ण शांततेत व्हायचा. संवाद होते की नाही ते आठवत नाही, पण असलेच तर अत्यंत माफक. इतक्या भावनिक प्रसंगात संगीत नाही? असं का- हे विचारल्यावर चंदावरकरांनी सांगितलं की नाटकभर संगीत कानावर पडल्यानंतर येणारी शांतता खोलवर परिणाम साधून जाईल आणि तसंच व्हायचं. त्या शांततेत प्रेक्षक पूर्णपणे दुष्यंत शकुंतलेशी समरस व्हायचे.

शब्दांवर माझा विश्वास नाही असं नाही. हा लेख मी लिहितेय ते शब्दांच्याच भरवशावर. पण- आपल्या आसपास शब्दांचे जादूगार वावरत असतात, ते चहुबाजूंनी आपल्यावर शब्दांचा मारा करत राहतात. आपण फसता कामा नये- शब्दांच्या आजूबाजूलाही पाहायला हवं!

शब्दांतून ब्रह्मांड उभे करणारे शब्दप्रभूही आहेत- शब्दांची रचना, लय, नाद याच्यातून अलौकिक अनुभव देतात- त्यांच्याबद्दल- पुन्हा कधी तरी!

प्रतिमा कुलकर्णी

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com