scorecardresearch

दहावी फ

‘‘मी थिएटरशिवाय जगूच शकत नाही..’’ एक छोटीशी, शाळकरी दिसणारी तरुण मुलगी माझ्यासमोर बसून सांगत होती.

‘दहावी फ’ या सिनेमात ‘फ’ वर्गाचा अर्थ वेगळा आहे, ज्यांना शाळेत जाण्याची, शिकण्याची संधी मिळत नाही, पण तरीही जे जिद्दीने शिकतात, अशी मुलं. पण तेव्हापासून जे ‘अ’ वर्गातले, कायम शहाण्यासारखं वागणारे नसतात, त्यांना मी प्रेमाने ‘दहावी फ’ म्हणायला लागले. अशा मुलांसाठी माझ्या मनात एक कोपरा कायमचा राखून ठेवलेला आहे..

अनेक वेळा लोक अचानक कुठे तरी थांबवून सांगतात, तुमचा ‘दहावी फ’ चित्रपट फार आवडला. मग मी नाइलाजाने सांगते, तो चित्रपट सुमित्रा भावेंचा आहे, माझा नाही. नाइलाजाने अशासाठी की ‘दहावी फ’ पाहिला तेव्हा हा चित्रपट आपल्या हातून व्हायला हवा होता, असं मला फार वाटलं होतं!

सिनेमात ‘फ’ वर्गाचा अर्थ वेगळा आहे, ज्यांना शाळेत जाण्याची, शिकण्याची संधी मिळत नाही, पण तरीही जे जिद्दीने शिकतात, अशी मुलं, पण तेव्हापासून जे ‘अ’ वर्गातले, कायम शहाण्यासारखं वागणारे नसतात, त्यांना मी प्रेमाने ‘दहावी फ’ म्हणायला लागले. अशा मुलांसाठी माझ्या मनात एक कोपरा कायमचा राखून ठेवलेला आहे..

‘‘मी थिएटरशिवाय जगूच शकत नाही..’’ एक छोटीशी, शाळकरी दिसणारी तरुण मुलगी माझ्यासमोर बसून सांगत होती. रात्र झाली होती, पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी काही कामासाठी आलेल्या त्या अनोळखी मुलीबरोबर गप्पा रंगत गेल्या आणि अंधार कधी पडला ते आम्हाला कळलंच नाही. पण हे ‘जगू न शकण्याचं’ वाक्य आलं आणि तिथे मी जराशी ठेचकाळले. त्याच्या आगे-मागे पण अशा झपाटलेल्या मुली माझ्याकडे येऊन गेल्या होत्या, त्यातल्या काही पुढेही बरोबर राहिल्या. आज अशा ‘फ’ तुकडीतल्या मुलांच्या गोष्टी.

एका सकाळी एका मुलीचा फोन आला, मला तुम्हाला भेटायचं आहे. वेळ ठरली, ती घरी आली, त्या वेळी मी शिवाजी पार्कला राहत होते. ती चेंबूरहून आली होती. मी तिला विचारलं, कशी आलीस, ती म्हणाली, चालत. मला फार वाईट वाटलं. ‘प्रपंच’ मालिका नुकतीच संपली होती आणि ‘झोका’ सुरू झाली होती. त्या मुलीला दिग्दर्शन सहायक म्हणून आमच्या टीममध्ये यायचं होतं. त्या आधी तिने एका नाटकात अभिनय केला होता आणि आता ‘‘मला अभिनय करायचाच नाही,’’ असं ती ठासून सांगत होती. तिच्या बोलण्यात एक उत्कटता होती, सच्चेपणा होता. मला ती आवडत गेली. दिसायलाही तरतरीत. नीट पाहिलं तर तिच्या कानात डूल, बुगडय़ा, अंगावर चांगले कपडे.. हिला परत जायला बसचे पैसे द्यावेत का, का तिला वाईट वाटेल असा विचार करत असताना ती म्हणाली, ‘‘मी कधीही कुठेही चालतच जाते. चेंबूरहून मंत्रालयापर्यंतही चालत जाते, कारण मी एक जिमनॅस्ट आहे आणि हे माझं ट्रेनिंग आहे!’’

मी तिला म्हटलं, सहायक होण्याबद्दल मी सांगू शकत नाही, मला इतरांना विचारावं लागेल, पण तू प्लीज अभिनय कर ‘झोका’मध्ये. ती आढेवेढे घेत राहिली. कारण अभिनय करणार नाही, असा तिने निश्चय केला होता. तिने केलेल्या एका व्यावसायिक नाटकात तिला काही माणसांचा फार वाईट अनुभव आला होता. पण मी तिला विश्वास दिला की मी स्वत: तुझ्यावर लक्ष ठेवेन, आमच्या युनिटमध्ये असं काही होत नाही..  मला ती हवी होती कारण मला तिच्यामध्ये एक पात्र- व्यक्तिरेखा- या अर्थाने दिसत होतं. तिचे सीन शूट व्हायला लागले. तिच्या जिम्नॅस्ट असण्याचा मी खूप वापर करून घेतला. आमचे हात जिथे पोचत नाहीत, तिथे तिचे पाय लीलया जात होते! पण फक्त तेवढं करून ती थांबली नाही. दिग्दर्शनात काही तरी लुडबुड करत राहिली. हळूहळू आम्ही सगळे तिला कामं सांगायला लागलो आणि माझ्या सह-दिग्दर्शिकेने – सुवर्णा मंत्रीने- जेव्हा ‘४०५ आनंदवन’ केलं, त्या वेळी ती मुलगी- भाग्यश्री- आपोआपच आमच्या युनिटचा एक भाग झाली!

एक ही भाग्यश्री आणि दुसरी ज्योती. ‘लोकसत्ता’नेच एक कार्यक्रम केला होता- ‘कुलकण्र्याच्या लेकी-सुना.’ कार्यक्रम होता दादरच्या पाटकर सभागृहात. ज्योती पनवेलला राहत होती. ती त्या कार्यक्रमाला आली, मला भेटली आणि म्हणाली, ‘‘मला कॅमेरामन व्हायचं आहे!’’ मला फार नवल वाटलं आणि कौतुकही. पण मनात आलं की हिला माहीत असेल का कॅमेरामन नक्की काय करतात? तोपर्यंत आलेल्या अनेक अनुभवातून मीही काही शिकले होते. त्यातली एक गोष्ट म्हणजे सगळं काही आपण कमिट करायचं नाही. बॉल समोरच्याच्या कोर्टात टाकून काय होतंय ते बघायचं. त्या प्रमाणे मी तिला माझा नंबर दिला आणि अमुक एका दिवशी(च) फोन कर म्हणून सांगितलं. तिने बरोब्बर सांगितल्या दिवशी, सांगितलेल्या वेळी फोन केला. मग मी तिला लोकेशनचा पत्ता दिला, दिवस सांगितला आणि सांगितलं माझा कॅमेरामन आहे, शब्बीर नाईक. त्याला येऊन भेट.

ती आली, शब्बीर म्हणाला, ‘‘कॅमेरा वगैरे खूप नंतर. आधी लाईट उचल. मोठ-मोठ्ठाले, जड-जड लाईट उचलताना मी मुलगी आहे, मी कशी उचलणार असलं काही चालणार नाही.’’ ती बरं म्हणाली आणि अक्षरश: तसं वागली. तीसुद्धा आमच्या युनिटचा एक भाग बनून गेली. कुठच्याही चित्रवाणी मालिकेचं काम कमीत कमी १२ तास चालतं. ज्योती रोज पनवेलहून जुहूला यायची! ती घरी किती वाजता पोचायची, परत सकाळी किती वाजता निघायची- कोण जाणे. पण कायम आनंदी आणि उत्साही असायची. पुढे ती एका न्यूज चॅनेलमध्ये गेली, मुंबईत रेल्वेमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाले तेव्हा जिवावर उदार होऊन जड कॅमेरा हातात घेऊन भिंतीवर चढून, उंचावरून उडय़ा मारून तिने असं शूटिंग केलं की ज्यामुळे अनेक कुटुंबांना आपले नातेवाईक शोधायला मदत झाली.

अशा या वेडय़ा मुली. त्यांच्या सारखाच एक वेडा मुलगा जुनैद कुरेशी. भाग्यश्री आणि ज्योती त्या मानाने भाग्यवान. कारण त्या मुंबई, परिसरातील होत्या, आपल्या भाषेत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना सहभागी होता आलं. पण जुनैद खूप लांब काश्मीरच्या कुपवाडा इथे राहणारा. या गावाचं नाव आपण ऐकतो ते फक्त बातम्यांमध्ये- तेसुद्धा अतिरेकी कारवायांच्या बातम्यांमध्ये. जुनैद तिकडच्या पोलीस ऑफिसरचा मुलगा. चांगला मॅनेजमेंट शिकत होता, पण डोक्यात अभिनयाचं वेड होतं. एकदा कॉलेजमध्ये बसलेला असताना त्याला वाटलं आपण हे काय करतोय, आपल्याला हे करायचंच नाही आहे. तसाच पळून श्रीनगरला गेला आणि आईला फोन केला की मी मुंबईला जातोय. आईने ऐकलं आणि सांगितलं आता काही तरी बनल्यावर मगच घरी ये, तोपर्यंत तुला घराचे दरवाजे बंद! तो बोलायचा पूर्ण काश्मिरी धाटणीने. मी त्याला मंटोच्या एकांकिकेत उर्दू बोलणाऱ्या पात्राचा रोल दिला, तो त्याने फार छान केला. पण त्यानंतर तो अभिनय शाळेबाहेर पडल्यावर मात्र मी त्याच्यासाठी काहीही करू शकले नाही. तो म्हणाला मी मराठीतही काम करायला तयार आहे. पण मी अजिबात मदत करू शकले नाही याची मला आजही खंत आहे.

त्या नाटकाशिवाय जगू न शकणाऱ्या मुलीशीही तेवढा माझा संपर्क राहिला नाही. का ते मलाही कळत नाही. पण त्यामुळे तिचं काही फार अडलं नाही. त्यानंतर काही दिवसांतच तिने एका मालिकेसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. मग यथावकाश एका चॅनेलमध्ये काम करायला लागली आणि तिथेच वर-वर चढत आज ती मोठय़ा पदावर पोहोचली आहे. कदाचित असं असेल की माझं-तिचं जमलं नाही, कारण ती ‘फ’ तुकडीतली नव्हती!

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व लाइफ इज ब्युटिफुल ( Life-is-beautiful ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kathakathan by pratima kulkarni in loksatta chaturang

ताज्या बातम्या