|| प्रतिमा कुलकर्णी

मुंबईच्या एका धावत्या रस्त्यावर किंचित आतल्या बाजूला एक लाकडी फाटक, ते उघडून आत शिरलं की एक प्रशस्त आवार, त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक प्रकारची झाडं, त्या झाडांच्या मध्येच एका बाजूला एक झापाची कुटी, दुसऱ्या बाजूला एक दगडी छत्री, त्याच्याखाली बसायला बाकं, मग प्रत्यक्ष घरात शिरताना ओसरीच्या मधोमध असलेल्या भल्या-मोठय़ा उघडय़ा दारातून आरपार दिसणारा समुद्र.. हे दृश्य कदाचित आपल्यापैकी काही जणांना आठवत असेल. ज्यांनी १९९९ मध्ये त्या काळच्या अल्फा टीव्हीवर सुरू झालेली ‘प्रपंच’ मालिका पहिली असेल त्यांना सगळ्यात जास्त काय आठवत असेल तर त्यातलं हे घर, त्याच्या मागचा समुद्र आणि मग, त्यानंतर त्यातली माणसं!

१९९९च्या ऑक्टोबरपासून २००१च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे घर आमचंच घर झालं होतं. आमचं म्हणजे ‘प्रपंच’ मालिकेशी संबंधित सगळ्यांचं. महिन्यातून अवघे चार दिवस आम्ही तिथे असायचो. पण त्या तेवढय़ा अवधीमध्ये महिनाभर पुरेल इतकी ताजी हवा, आनंद, मजा आणि ‘आयुष्य सुंदर आहे’ – लाइफ इज ब्युटीफुल- असा विश्वास घेऊनच आम्ही परतायचो. रसिकासारखी वर-वर फटाकडी वागणारी मुलगीसुद्धा ‘आश्रय’मध्ये आल्यावर जिवाला थंडावा मिळतो, म्हणायची. सुनील बर्वे म्हणतो, ‘प्रपंच’ मला बदलून गेली. भरत आजही भेटला तरी जुन्या आठवणी काढतो. त्यातली पात्रं आजही एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांना त्यांच्या ‘प्रपंच’ मधल्या नावाने हाक मारतात! त्याचं कारण त्या घराने निर्माण केलेले भावबंध. एका सुंदर घरात, भांडत, हसतखेळत, पण एकमेकांना जीव लावत आपण एकत्र राहिलो, असं त्या सगळ्यांना आजही वाटतं.

७८ भागांची ‘प्रपंच’ दीड र्वष चालली. लेखनाला सुरुवात केली तेव्हा जिथे तीन पिढय़ा राहू शकतील, असं एक घर एवढाच विचार होता डोक्यात. मग तीन पिढय़ा राहतात म्हणजे घर जुनं असेल, मोठं असेल, असा उलटा विचार करत गेले. वांद्रय़ाच्या हिल रोडवर असं एक जुनं घर आहे. तिथे जावं, असं मनात असताना माझा मित्र आणि कार्यकारी निर्माता प्रवीण बांदोडकर म्हणाला की, मी दुसरं एक घर बुक केलं आहे वर्सोव्याला. त्याच्या नऊ र्वष आधी वर्सोव्याच्या या घरात मी शूट केलं होतं. ‘स्त्री-जातक’ मालिकेतली ‘सोबत’ ही कथा होती एका विजनवासात गेलेल्या, मानसिकदृष्टय़ा दुर्बल अभिनेत्रीची. त्या कथेमध्ये ते घरही त्या अभिनेत्रीसारखं दु:खी, निराश, उदास वाटत होतं. त्यामुळे माणसांनी गजबजलेल्या घरासाठी ते लोकेशन मला योग्य वाटत नव्हतं. काहीशी नाराज होऊनच मी त्या घरात गेले. गेल्यावर मात्र त्या घरात असलेले अनेक कोपरे, झाडं, जुनं फर्निचर, छपरी पलंग, झोपाळा आणि शिवाय समोर पसरलेला अफाट समुद्र बघून मी खूश होऊन गेले.

पहिले आठ भाग ते घर न बघता लिहिलेले होते. जर आज त्या व्यक्तिरेखांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की, पुढच्या काही भागांत त्या व्यक्तिरेखा बदलल्या आहेत. सुरुवातीला काहीसे भांबावलेले, नवीन पिढीसमोर दबलेले आजोबा हळूहळू सगळ्यांचा आधार, बलस्थान, भल्या-बुऱ्याचं नेमकं भान असणारे आणि ते नेमक्या, मोजक्या शब्दात उकलून सांगणारे असे जणू भीष्म-पितामह झाले!

या सगळ्याची कारणं अनेक होती. अण्णांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सुधीर जोशी हे त्याचं मुख्य कारण! त्याने ज्या पद्धतीने अण्णा उभे केले, त्यामागला विचार, भूमिकेसाठी त्याने वापरलेला आवाज, कधी खटय़ाळ तर कधी गंभीर, प्रसंगी भांडखोरसुद्धा- अशी अनेक रूपं सहजपणे वागवणारं त्याचं व्यक्तिमत्त्व आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अण्णा देशमुख या व्यक्तिरेखेबद्दल त्याला वाटणारं प्रेम आणि आदर! तो मनापासून अण्णा झाला, अण्णांच्या कुटुंबाला त्याने आपलं मानलं आणि ‘प्रपंच’मधल्या झाडून सगळ्या तरुण मंडळींना त्याचं प्रेम अनुभवता आलं.

हीच गोष्ट थोडय़ा-फार प्रमाणात सगळ्यांच्याच बाबतीत घडली. प्रत्यक्ष नट समोर आल्यावर त्यांच्या सवयी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सावली त्या-त्या व्यक्तिरेखेवर पडत गेली. त्या घराने ती कथा फुलवायला, त्यातले सीन रंगवायला अतोनात मदत केली. कथेतल्या आजोबांचे- अण्णांचे- अनेक प्रसंग झोपाळ्यावर घडायचे. सुधीर तिथे एकटा बसला असेल तर एक मोठा तत्त्वचिंतक होऊन जायचा आणि त्याच्या अवतीभोवती सगळी नातवंडं जमली असतील तर लेकुरवाळा, मुलात मूल होणारा प्रेमळ आजोबा वाटायचा.

आधी म्हटल्याप्रमाणे पहिले आठ भाग काहीसे धूसर होते. एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंब, एवढंच होतं डोक्यात. त्यामुळे पात्रांची नावंदेखील अण्णा, अक्का, माई, दादा, बाळ अशी- जवळजवळ जेनेरिक होती! पण त्या आठ भागाचं चित्रीकरण सुरू झालं आणि त्या घराने त्या सगळ्या अण्णा, माई, अक्कांना आपापला चेहरा, आकार, स्वभाव दिला. तो का हे सांगता येत नाही, पण त्या जुन्या कौलारू घरात परंपरेचा वास होता, माती, झाडं, पानं, फुलं होती. शिवाय समोर, अगदी पायाशी अथांग पसरलेलं पाणी होतं.. त्या सगळ्यामुळे तिथे कुठच्या कोत्या वृत्ती शिरू शकल्या नाहीत. मालिकेतला अण्णांचा मित्र बाबल्या- मच्छिन्द्र कांबळी- म्हणतो तसं- ‘‘राज भवनातल्या गव्हर्नरसारखा राहतोस तू इथे.. तुला कधी काही प्रॉब्लेम असेल असं वाटतच नाही.’’ पण अर्थात ते खरं नसतं..

काही मोठी समस्या उभी राहिली की आपसूक ती व्यक्ती झोपाळ्यावर बसलेल्या अण्णांकडे जायची. त्या झोपाळ्याची गती त्या पूर्ण प्रसंगाला एक शांत, संथ लय बहाल करायची. बाहेरून येणारी समुद्राची गाज अण्णांना तात्त्विक बैठक द्यायची आणि त्यांच्या समोर बसलेल्या पात्राचं सांत्वन करायची. बघणारे आपणदेखील शांत, आश्वस्त व्हायचो. मी स्वत:लापण ‘बघणाऱ्या’मध्ये मोजतेय कारण माझ्याकडून अशा अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या, केल्या गेल्या की ज्या कुठून येतायत, कशा आल्यायत ते मला कळण्या पलीकडचं होतं. मी फक्त साक्षीदार असल्यासारखी वाटायचं मला.

हा, आता काही गोष्टी अशा होत्या की ज्या अगदी ठरवून, मुद्दाम केल्या होत्या. त्याच काळात आलेला ‘कहो ना प्यार है’पण त्याच घरात शूट झाला होता. त्यांनी घरामागच्या खडकांचा फार सुंदर वापर केला होता. म्हटलं आपणही करावा. म्हणून त्या खडकांवरून अलकाचा (रसिका) मित्र मंग्या (आनंद) आला. आला तो कानामागून येऊन तिखट झाला आणि घरातल्या सगळ्यांचा मित्र झाला! एरवी ते घर स्वायत्त होतं, त्याला बाहेरच्या जगाची गरज नाही असं वाटत होतं. सगळ्यात धाकटी कालिका तर तसं बोलूनही दाखवायची! पण कुठचीच गोष्ट तशी नसते आणि चिरकाल टिकणारीही नसते.

खूप लोक अजूनही विचारतात. ‘प्रपंच’ बंद का केली? त्याचं सरळ-साधं उत्तर आहे, त्याची गोष्ट संपली. एकदा आदरणीय श्री.ना. पेंडसे यांना भेटण्याचा योग आला. त्यांनादेखील कुणी तरी विचारलं की ‘यशोदा’, ‘गारंबीचा बापू’ आणि ‘गारंबीची राधा’ या तिन्हींच्या दरम्यान गारंबीमध्ये काय घडलं? ते म्हणाले, ‘काही नाही, माणसं श्वास घेत राहिली!’ थोडक्यात- मुद्दाम सांगण्यासारखं काही घडलं नाही. ‘प्रपंच’ तेव्हा बंद झाली नसती तर लोकांनी ‘आता पुरे’ म्हटलं असतं. सांगण्यासारखं काही उरलं नाही तेव्हा म्हटलं आता पूर्णविराम द्यावा हेच योग्य!

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com