मोठं होताना..

परवा एका तरुण मुलीला भेटण्याचा योग आला.

|| प्रतिमा कुलकर्णी

परवा एका तरुण मुलीला भेटण्याचा योग आला. ती समोर बसून तिचे पुढचे प्लॅन्स सांगत होती. बोलण्यात आत्मविश्वास तर होताच, पण एक ठामपणाही होता. ती पुढल्या काही वर्षांत काय करणार आहे, कुठे जाणार आहे, तिच्या आसपासच्या माणसांमध्ये कसे बदल घडवून आणणार आहे इत्यादी वगैरे. मला खूप मजा वाटली, जणू तरुणपणीच्या मलाच मी बघत होते.

दोन-तीनदा मनात आलं की तिला सांगावं- हे असंच होईल, असं गृहीत धरून चालू नकोस. आयुष्याच्या पोतडीत भरपूर ट्रिक्स असतात. ते पावला-पावलागणिक आपल्याला जादू दाखवत असतं. पण मी तसं म्हटलं नाही, कारण एक तर तिला ते पटलं नसतं आणि ते ऐकून ती अकारणच खट्टू झाली असती. त्याने काहीच साधणार नव्हतं. काही गोष्टी मोठं होता-होताच शिकायच्या असतात किंवा काही गोष्टी शिकत-शिकतच मोठं व्हायचं असतं. आत्ता ती याच वयात आहे की, ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ असं विश्वास तिला आहे. तो आवश्यकच आहे. त्या विश्वासावर ती खूप हात-पाय मारणार आहे. तिच्या मनात आहे त्याप्रमाणे होणारही नाही कदाचित. पण जे होईल त्यामुळे तिची प्रगतीच होणार आहे, विकास होणार आहे.

विजयाबाईंनी केलेली ‘लाइफलाइन’ ही मालिका डॉक्टर्सच्या आयुष्यावर होती. एका मोठय़ा हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपसाठी आलेले काही तरुण डॉक्टर्स आणि त्यांना आलेले अनुभव. चार वर्षांनी त्याचा दुसरा भाग करण्यासाठी माझी निवड झाली. आता या दुसऱ्या पर्वातले काही डॉक्टर्स तेच होते, काही वेगळे होते. जे तेच होते त्यांच्या व्यक्तिरेखेत चार वर्षांनंतर बदल झालेला होता. हा बदल काय असेल असा विचार करत मी जेव्हा त्या व्यक्तिरेखा लिहीत गेले तेव्हा जाणवलं की आता हे सगळे मोठे झालेले आहेत, त्यांना आयुष्याची जाण आलेली आहे. अगदी पूर्ण नाही, तरी पहिल्यापेक्षा अधिक. चार वर्षांपूर्वी ते ज्या नजरेने जगाकडे बघत होते, ती नजर आता बदलली आहे.

त्यानंतर ‘मोठं होणं- ग्रोइंग अप’ हा विचार माझ्या मनात सतत घोळत राहिला आणि पुढे कुठलीही मालिका लिहिताना हा एक सूक्ष्म धागा पकडूनच ती लिहिली गेली. ‘प्रपंच’ मालिकेचा पायाच हा होता. जरी ती एका एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे, असं ठळकपणे म्हटलं जातं, तरी देशमुखांची ५ मुलं आणि मंग्या या ६ मुलांच्या मोठं होण्याची ती गोष्ट होती. त्यातल्या कलिका या सगळ्यात धाकटय़ा मुलीला लेखक व्हायचं असतं आणि मोठी बहीण अलकाचा मित्र मंग्या तिला तिच्या लिखाणात ‘मार्गदर्शन’ करत असतो. त्याच्या परीने. त्या वयातल्या त्याच्या समजुतीनुसार. जरा काही लिहिलं की कलिका ते त्याला दाखवते आणि त्यावर त्याचे ‘सल्ले’ घेते. सगळं काही मजेत, उत्साहात, ‘फील गुड’ पद्धतीने चाललेलं असतं. पण हळूहळू घरात काही गोष्टी घडायला लागतात, लतिका या बहिणीचं लग्न मोडतं, मोठा भाऊ प्रशांत वेगळं राहण्याच्या गोष्टी करतो, दुसरा भाऊ नंदू त्याच्या गॅरेजमध्ये नकळत एका भलत्याच माणसाची संगत धरतो. आणि सगळ्यात कठीण म्हणजे त्यांचं लाडकं घर आता पाडायचं असं ठरतं. हे सगळं बघणारी कलिका आता तिचं लिखाण मंग्याला दाखवत नाही. मंग्या विचारतो तेव्हा सांगते, ‘‘मी आधी लिहिलेलं तुला दाखवत होते कारण ते खोटं-खोटं होतं. आता लिहितेय ते खरं, माझ्या मनातलं आहे, ते मी तुला नाही दाखवणार!’’ माणूस म्हणून चार गोष्टी बघत असताना लेखक म्हणूनही कलिका प्रगल्भ होत जाते.

‘अंकुर’ मालिकेचा पहिला भाग पाहून एका खूप जवळच्या मैत्रिणीचा फोन आला, ‘‘किती स्टुपिड (तिचाच शब्द) आहे तुझी  प्रीती!’’ तिचं बरोबरच होतं. ‘अंकुर’ मधली प्रीती नवऱ्याच्या दबावाखाली राहात होती आणि त्याची तिला जाणीवही नव्हती. आपलं दोघांचं मिळून एक घर आहे, संसार आहे आणि तो दोघांनी परस्पर प्रेम आणि आदर जपत उभा करायचा आहे, याचा तिला पत्ताच नव्हता. नवरा भरपूर कमावतो, वीकेंडला सिनेमाला नेतो, मॉलमध्ये शॉपिंगला नेतो, मुलाला आणि मला ‘डिनर’ खायला घालतो म्हणजे मी सुखी आहे अशी तिची समजूत असते. पण एक दिवस या कल्पनेला धक्का बसतो, नवऱ्यामध्ये साधी माणुसकीही नाही हे तिच्या लक्षात येतं. घर सोडून जाण्याइतकी धमक तिच्यात नसते, पण घराचे दरवाजे तिच्यासाठी बंद होतात. अशा या हतबल, अगतिक प्रीतीला एकटी पडल्यावर जगण्याचं भान येत जातं. काही महिन्यांनी अशी वेळ येते की ती स्वत:चं एक जग उभं करते आणि तिच्यासारख्या इतर मुलींना एक घर देते. प्रीतीचं हे मोठं होणं हाच या मालिकेचा विषय होता आणि म्हणून पहिल्या भागात ती ‘स्टुपिड’ असणं आवश्यक होतं. ज्या नायिका – किंवा इतर कुणीही पात्र – पहिल्या दिवसापासून हुशार, तडफदार, सुजाण असतात, त्या व्यक्तिरेखा म्हणून मला कंटाळवाण्या वाटतात. त्यानंतर त्यांच्या कथेत सांगण्यासारखं काही उरत नाही आणि मग येतात ते ओढून-ताणून आणलेले दुर्दैवाचे दशावतार आणि बेगडी नाटय़!

मोठं होताना मला सगळ्यात प्रकर्षांने जाणवलेली बाब ही की-आपल्या जगण्यात कुणाचा तरी मोठा हात आहे, एका मोठय़ा छत्राखाली, व्यवस्थेखाली आपण जगत असतो. असं म्हटलं की कुणाला यात एक निराश सूर ऐकू येईल. पण मला अजिबात तसं म्हणायचं नाही. अनेक वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राला मी हा माझा विचार बोलून दाखवला. तो म्हणाला, माझा याच्यावर विश्वास नाही. मी बराच विचार केला, की असं का असेल, लहानपणापासून एकत्र वाढलेलो, दिवसाचे अनेक तास एकत्र घालवणारे आम्ही दोघं इतका वेगळा विचार कसा करतो? काही दिवसांनी मी त्याला म्हटलं- ‘‘आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डाळ आणि पाणी एकत्र करून चुलीवर ठेवली की डाळ शिजते. आपण दोघांनीही हे केलं. तुझी डाळ शिजली, माझी नाही शिजली.’’ तेव्हा माझ्या लक्षात आलं की आयुष्यात कसलेही फॉम्र्यूले नसतात. अमुक केल्याने अमुकच होईल असं काही ठरलेलं नसतं. याचा अर्थ असा नाही की आपण काही करायचंच नाही. आपण करण्याचीच मजा घेत राहायचं. त्याच्यातून जे निष्पन्न होईल ते होईल. आपण मात्र ते करता करता शिकलेले, मोठे झालेले असू. आयुष्याचा सुंदर भाग हाच आहे. आता इतकं ‘मोठं’ झाल्यावरही अजून प्रत्येक गोष्ट करताना मी काही ठोकताळे मांडते, आता यानंतर असं होईल, मग अमुक घडेल इत्यादी. तसं नाही पण होतं – ते मान्य करण्याचं मोठेपण आहेच, पण परत नवीन ठोकताळे मांडण्याचं लहानपणही आहे!

मोठं होण्याच्या प्रक्रियेचा सुंदर भाग हाच आहे- आधीचं लहानपण हार्ड डिस्कच्या मेमरीमध्ये असतंच, त्यात फक्त नव्या फाईल्सची भर पडत जाते. हा लेख लिहितेय तो दिवस फ्रेंडशिप डे आहे. सकाळपासून फोनवर ताण पडतोय! पण त्यात काही अशा मित्र-मैत्रिणींचे मेसेज आहेत की ज्यांना भेटलो की आपण आता ‘मोठे’ झालोय याचा विसर पडून परत जुन्या फाईल्स उघडल्या जातात, लहान होता येतं!

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफ इज ब्युटिफुल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Life is beautiful

ताज्या बातम्या