|| प्रतिमा कुलकर्णी

मागच्या दोन लेखांत ‘प्रपंच’विषयी लिहिल्यामुळे मी अजूनही त्या भूतकाळातच वावरते आहे. त्या काळातल्या अनेक आठवणी, अनेक आनंदाचे क्षण परत नव्याने अनुभवते आहे. चार दिवस चित्रण, मग चार दिवस संकलन, मग संगीत, मग पुढच्या भागांचं लिखाण.. असं करत महिना कसा जायचा ते कळायचं नाही.. आणि परत ‘आश्रय’मध्ये जाण्याची वेळ व्हायची! एकाच टीमबरोबर अनेक दिवस काम करत असताना आपली एक खास अशी भाषा बनते, नेहमीच्याच शब्दांना एक वेगळी छटा मिळते. त्यातलाच एक शब्द- किंवा एक टर्म- ‘उपर से क्यूड!’

सुवर्णा रसिक हिने मराठी भाषेला बहाल केलेले हे शब्द. त्याचा अर्थ आहे आपण काही खास न करता आपोआप जुळून आलेली एखादी गोष्ट. ‘प्रपंच’ आणि ‘झोका’ मालिकांना सुवर्णा माझी सहदिग्दर्शक होती आणि पुढे ‘४०५ आनंदवन’ या मालिकेचं दिग्दर्शन तिने केलं. सगळ्या मालिकांचं संकलन आणि संगीत करताना आम्ही दोघी नेहमी स्टुडिओत हजर असायचो. साप्ताहिक मालिका असल्यामुळे ते शक्य होतं. आमच्याकडे काही संगीताचे तुकडे होते. एकाच थीमचे वेगवेगळे तुकडे. कधी जलतरंग, कधी मुलींच्या आवाजातलं हमिंग, तेही वेगवेगळ्या मूड्सचं. प्रसंगाप्रमाणे आम्ही ते संगीत निवडत जायचो. त्या प्रसंगातही एखादा असा क्षण यायचा, काही एक हावभाव किंवा हालचाल, एखादा कटाक्ष- की त्या वेळी संगीतातली एक विशिष्ट जागा आली तर फार बहार यायची. ती तशी आली नाही तर आमची संकलक भक्ती मायाळू संगीत थोडं पुढे मागे करून, काही तुकडे रिपीट करून ते जुळवायची- म्हणजेच ‘क्यू’ करायची. पण अनेकदा असंही व्हायचं की संगीतातली ती जागा आणि ते दृश्य तंतोतंत जुळून यायचं! तसं झालं की सुवर्णा म्हणायची, ‘उपर से क्यूड’! म्हणजे ‘वरून’ कुठून तरी हे जुळवलं गेलं आहे!

जेव्हा मनापासून आपल्याला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ‘पुरी कायनात’ कामाला लागते असं म्हटलं की ते फिल्मी वाटतं पण जेव्हा ते आपल्याच बाबतीत घडतं तेव्हा मात्र ते एक वैश्विक सत्य असल्याचा भास होतो. पण ही गोष्ट आम्ही पुन:पुन्हा अनुभवली आहे आणि म्हणून आमच्यासाठी ते एक निर्विवाद सत्य आहे.

मुळात ‘प्रपंच’मध्ये वापरलेलं ते घर मी निवडलं नव्हतं. त्या घराविषयी माहीत असूनही मी तिथे गेले नव्हते आणि तरी प्रवीण बांदोडकरमुळे ते घर आम्हाला ‘लाभलं’ – सगळ्या अर्थानी! त्याच्यात संगीताचे जे तुकडे वापरले होते ते सगळे राहुल रानडेचेच होते, पण आमच्यासाठी केलेले नव्हते. लताबाई नार्वेकरांनी अत्यंत मोठय़ा आणि मोकळ्या मनाने त्यांच्या नाटकांसाठी केलेलं संगीत आम्हाला वापरू दिलं. त्यातले रवींद्र साठेंच्या आवाजातले आलाप होते लताबाईनिर्मित प्रेमानंद गज्वी-चेतन दातार यांच्या ‘गांधी आणि आंबेडकर’ नाटकातले, तर मुलींच्या आवाजातले तुकडे होते मी दिग्दर्शित केलेल्या मंगला गोडबोले लिखित ‘श्रीकृपेकरून’ या नाटकातले! ‘प्रपंच’मध्ये ते संगीत इतकं चपखल बसलं की काही काळानंतर ते आमचं नाही हे आम्हीदेखील विसरलो!

शीर्षक गीत रेकॉर्ड करताना राहुल रानडेने स्वत: पेटीचे काही तुकडे वाजवून ठेवलेले होते कारण दादा – संजय मोने कामधाम सोडून, भान विसरून पेटी वाजवतो असे अनेक प्रसंग पुढे येणार होते. त्या वेळी मालिकेत काय तऱ्हेचे प्रसंग येतील, कुठची गाणी लागतील याची सुतराम कल्पना नव्हती. ते एक ‘जनरल’ गाणी वाजवत असतील म्हणून राहुलने काही नाटय़संगीत, इतर गाणी अशी वाजवली. वेळ येईल तशी आम्ही ती वापरत गेलो. या ‘जनरल’ वाजवून ठेवलेल्या गाण्यांनी शेवटी एक वेगळीच उंची गाठली, पण ते जरा नंतर.. पण एक मात्र खरं की ‘प्रपंच’ घडत गेली.. ‘प्रपंच जस्ट हॅपन्ड..’

या लेखमालेत चित्रकार द. ग. गोडसेंचा उल्लेख या आधीही येऊन गेला आहे. त्यांचा अनेक क्षेत्रात वावर आणि व्यासंग होता आणि त्यातलं एक क्षेत्र होतं – सौंदर्यशास्त्र. मी स्वत: त्याचा अभ्यास केलेला नाही पण त्यांच्याकडून कार्ल युंगच्या सिद्धांताविषयी ऐकलं होतं- ते असं की या सृष्टीत एक सामूहिक मन- प्रेरणा असते/असतात आणि त्यातून अनेक कलांची निर्मिती होत असते. त्यामुळे काही प्रतीकं/प्रतिमा सगळ्या जगात एक समान पाहायला मिळतात. त्या सामूहिक मनातून आकार घेतलेल्या काही कलाकृती असतात. सत्यजित राय यांच्या ‘जलसाघर’ या चित्रपटाबद्दल मी एक गोष्ट वाचली होती. ‘जलसाघर’ ही एक बंगालमधली, लयाला चाललेल्या सरंजामशाहीच्या पडझडीच्या काळाची कहाणी. एक जमीनदार, ज्याला आपल्या कुलीन, घरंदाज खानदानाबद्दल गर्व आहे, जो आपल्या सरंजामी परंपरा पूर्वीच्याच इतमामात चालू ठेवू पाहतो पण या पडझडीच्या काळात ती धडपड केविलवाणी आणि विघातकही ठरते. तो जमीनदार आपल्याच विश्वात मश्गूल राहतो, वास्तवापासून पळ काढत राहतो आणि त्यातच त्याचा अंत होतो. मी वाचलं ते असं की चित्रपट लिहून झाल्यावर त्याच्यासाठी योग्य ती लोकेशन शोधायला सत्यजित राय बंगालमध्ये हिंडायला लागले. खूप शोधल्यावर बांगलादेशमध्ये ढाक्याजवळ त्यांना हवी तशी लोकेशन मिळाली. त्या गावातल्या लोकांशी बोलताना त्यांनी आपल्या चित्रपटाची कहाणी त्यांना सांगितली. ती ऐकल्यावर गावकरी म्हणाले- या गावच्या जमीनदाराची गोष्ट तुम्हाला कशी कळली? राय यांनी ती गोष्ट आपल्या कल्पनेतून साकारली आहे हे त्यांना खरं वाटेना! मग त्या सामूहिक मनानं तर ती गोष्ट राय यांच्यापर्यंत पोचवली नसेल? आणि ते मन तर त्यांना त्या घरापर्यंत ओढून घेऊन गेलं नसेल?

मी लिहायला लागायच्या किती तरी आधीपासून, जवळ-जवळ लहान वयापासून मी हे सगळं ऐकत आले होते. तेव्हा काही तरी नवल म्हणून त्या गोष्टी वाचल्या होत्या. गोडसे बोलायचे आणि मी नवल म्हणूनच ते ऐकायचे. म्हणून लहान का होईना असे अनुभव माझ्याही वाटय़ाला आले, याचं मला फार अप्रूप वाटलं.

पेटी रेकॉर्ड करताना राहुलने सहज म्हणून ‘बाबुल मोरा..’ हे गाणं वाजवलं होतं. मालिका संपेपर्यंत ते आम्ही कुठेही वापरलं नव्हतं. शेवटच्या भागाचं शूट ठरलं, सगळ्यांच्या तारखा घेतल्या- १९ फेब्रुवारी २००१. पण नेमका संजय मोनेच्या नाटकाचा प्रयोग लागला. तो एका महोत्सवातला प्रयोग होता, त्यामुळे त्याला नाही म्हणता येईना आणि तारीखही बदलता येईना. शूटिंगचा शेवटचा दिवस असल्यामुळे आम्हीही तारीख बदलू शकत नव्हतो. आम्ही दीड र्वष संजयला महत्त्वाच्या प्रसंगी पेटी वाजवताना दाखवलं होतं- राहुलने ‘सहज म्हणून’ ‘बाबुल मोरा..’ रेकॉर्ड करून ठेवलं होतं.. ते सुद्धा दीड वर्ष आधी!

संजयचा प्रयोग नसता तर मी त्याला इतर सगळ्यांबरोबर घरासमोर उभं केलं असतं यात शंका नाही. शेवट चांगलाच झाला असता, पण ‘बाबुल! मोरा नैहर छुटो जाय..’ हे त्या पेटीच्या सुरांतूनही आपल्या मनात वाजणारे शब्द, भैरवीचे स्वर, रोषणाई केलेली वास्तू- जी परत कधीच दिसणार नाही आहे.. यातली आर्तता कुठून आली असती? राहुलची भैरवी, संजयचं नाटक-यातलं काहीच मी ठरवलेलं नव्हतं- ते होतं- ‘उपर से क्यूड..’

pamakulkarni@gmail.com