scorecardresearch

अद्भुत अवकाश

अगदी मनातलं सांगायचं तर भव्य, नेत्रदीपक नाटकात मी स्वत:ला हरवू शकत नाही.

रंगमंचावर किंवा कॅमेऱ्यासमोर काय आणि कसं सादर केल्यावर समोर किंवा घरात बसलेल्या प्रेक्षकांच्या मनात नाटक घडेल याचा विचार दिग्दर्शक करत असतो. त्यानुसार तो नट, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत या सगळ्याचा घाट, लय आणि सूर निश्चित करत असतो. जेव्हा रंगमंचाच्या बाहेर बसलेल्या प्रेक्षकांच्या मनातही नाटक घडायला लागतं, तेव्हा सगळ्यांच्या मिलाफातून जो तयार होतो तो म्हणजे नाटकाचा रंगलेला प्रयोग.

रंगमंचाचा नक्की अवकाश किती? नाटकावर लिहायला घेतलं आणि हा प्रश्न डोक्यात आला. म्हटलं, आपल्या अनेक दिग्दर्शक, नेपथ्यकार मित्रांपैकी कुणाला तरी फोन करून विचारावं- मग म्हटलं, स्टेजची नक्की डायमेंशन्स माहीत नसताना आपण इतकी नाटकं केली, तर एक लेख नक्कीच लिहू शकतो. कारण स्टेजची लांबी, रुंदी, उंची या सगळ्या गोष्टी बदलू शकतात, बदलत असतात, पण नाटक नाटकच असतं, तितकंच भुरळ पाडणारं, तितकंच जादूई!

न्यूयॉर्क, लंडनमधल्या मुख्य धारेच्या रंगभूमीवर डोळे दिपून जावेत असं भव्य, तरीही क्षणार्धात बदलणाऱ्या नेपथ्यात केलं जातं तेही नाटकच आणि देवळाच्या आवारात, झाडाच्या पारावर, सोसायटीच्या गच्चीत, अमेरिकेतल्या मराठी बांधवांच्या घरच्या बेसमेंटमध्ये केलं जातं तेही नाटकच. पीटर ब्रूक यांचं ‘द महाभारत’ हे नाटक तर दगडाच्या खाणीत घडलं होतं. तर मग नाटकाची अशी काही जागा, असा काही ‘अवकाश’ असतो का? अर्थातच असतो. नाटक घडतं ते तुमच्या-आमच्या मनात. आपण समोर जे पाहत असतो, ते केवळ एक स्टिम्युलस असतं, ते आपल्या मनात नाटय़ निर्माण करतं.

अगदी मनातलं सांगायचं तर भव्य, नेत्रदीपक नाटकात मी स्वत:ला हरवू शकत नाही. माझं मन सतत जागरूक राहतं, विस्मयाने भरलेलं राहतं, कसं करत असतील हे सगळं? किती तालमी केल्या असतील? कसं साधत असतील इतकं अचूक टायमिंग? हा विचार करता करता नाटक थोडं मागे पडतं आणि त्या विचारातून बाहेर आल्यावर धावती बस पकडावी तसं नाटकामागे धावून त्याला पकडावं लागतं. पण ‘‘महाराज, महाराज घात झाला, ते पहा शत्रूचं सैन्य इथेच चाल करून येत आहे.’’, असं म्हणत एक शिपाई धावत आला की आपल्याला प्रचंड सैन्य दिसायला लागतं!

सुप्रसिद्ध दिग्दर्शक रतन थिय्याम म्हणतात की, ‘‘जेव्हा माझ्या नाटकाचा नायक मागच्या पडद्याकडे बोट दाखवून म्हणतो की ‘तो पाहा चंद्र..’ तेव्हा तिथे काहीही नसतं, पण प्रेक्षागृहात बसलेल्या प्रत्येकाच्या दृष्टीला आपापला चंद्र दिसतो- जो त्यांच्या मनात दडलेला चंद्र असतो. मी प्रेक्षकांना त्यांच्या मनात दडलेला चंद्र दाखवण्यासाठी नाटक करतो!’’

एक उत्तम कविता, उत्तम कथा, आपल्या मनात काही प्रतिमा उभ्या करते, आपल्याला आपल्याच मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेल्या भावनांना एक उजळ माथा बहाल करते, आणि तिथे ती कविता पूर्ण होते, ती कथा खरा आकार घेते. गोष्ट ऐकणं कुणाला आवडत नाही? मग ती आजीने सांगितलेली असो, कथेकरी बुवांनी सांगितलेली असो, की नाटक, चित्रवाणी, सिनेमातून ऐकलेली असो. आपल्याला गोष्ट ऐकायची असते. लहानपणी गोष्ट ऐकल्याशिवाय न जेवणारी, न झोपणारी अशी कितीतरी मुलं असतील आपल्यामध्ये. आश्चर्य हे की आजीच्या गोष्टी त्याच त्याच असतात. तरीही आपल्याला त्या परत परत ऐकायला आवडतात. ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक..’ ‘राजा भिकारी..’ किंवा अकबर-बिरबलाच्या गोष्टी. मग आपण त्या गोष्टी परत परत का ऐकतो? कित्येक वेळा असंही होतं की आजी स्वत:सुद्धा गोष्टीत रंगते, मग त्या वेळी ती त्यात काहीतरी नवा रंग, नवा रस भरते. बाळाला तो आवडतो, लक्षातही राहतो पण पुढच्या वेळी आजी नेमका तो विसरते. कारण कदाचित चुलीवर दूध ठेवलेलं असतं, आजीचा दुसरा एखादा बाळ घरी आलेला नसतो. मग गोष्ट ऐकणारा बाळ तिला आठवण करून देतो- दुर्योधनाला डोंगर, झाडं, आकाश सगळं दिसलं की मनातल्या मनात बाळ खूश होतो. मग तो वाट बघायला लागतो- अर्जुन म्हणाला गुरुजी, ‘मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतोय.’ हे ऐकलं की त्या गोष्टीचं सार्थक होतं! माहिती असलेला, ओळखीचा असलेला तो रंग, तो रस त्याला पुन्हा एकदा अनुभवायचा असतो.

लहानपणी शबरीची गोष्ट ऐकताना लक्ष्मणाने बोरं टाकून दिली की मला वाईट वाटायचं आणि रामाने खाल्ली की मन हळवं होऊन डोळे भरून यायचे. पुढे मोठेपणी गुरू पार्वतीकुमारांनी एक गोष्ट सांगितली. ती खरी नसेल, पण ती गोष्ट सांगून ते आम्हा मुलींना मेहनत करायला लावायचे. त्यांच्या समोरच्या विद्यार्थिनींनी जरा आळस केला तर ते म्हणायचे- ‘‘ही लक्ष्मणाची बोरं आहेत!’’ ते सांगायचे की लंकेच्या युद्धात जखमी झाल्यावर हनुमानाने ज्या झाडाचा पाला आणला, ते झाड शबरीच्या टाकलेल्या बोरांमधून उगवलेलं होतं! मी जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा मोठी असूनही मला शबरीला न्याय मिळाल्याचं अतीव समाधान झालं होतं! माझ्यासाठी शबरीची गोष्ट त्या क्षणी पूर्ण झाली होती.

प्रत्येक नाटक एक गोष्ट सांगत असतं, आपल्याला त्या गोष्टीत हरवून जायला आवडतं. कारण आपल्या सगळ्यांच्यात मनात काही बिल्ट-इन भावना असतात, भय असतं, राग-लोभ असतात. त्याला मधनं मधनं कढ येणं गरजेचं असतं. मनोरंजनाचा उद्देशच मुळी तो आहे. प्लेटो जेव्हा त्याच्या आदर्श नगरीतून मनोरंजनाला हद्दपार करायला निघाला, तेव्हा अ‍ॅरिस्टॉटलने आपल्या थोर गुरूच्या त्या कल्पनेला विरोध केला. तो म्हणाला मनोरंजन नसेल तर जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल, बंड होईल.. हीच त्याची सुप्रसिद्ध कॅथार्सिस थिअरी.

बरेच वेळा नाटक बघताना प्रेक्षक हसतात, ते हसले की नट, मागे असला तर दिग्दर्शक अस्वस्थ होतात. कारण त्या हसण्याच्या जागा नसतात. काहीच विनोदी घडलेलं नसतं! माझ्या मनाच्या समाधानासाठी मी स्वत:ला असं सांगितलेलं आहे की प्रेक्षक इतर कुठल्याही पद्धतीने नाटकात सहभागी होऊ शकत नाहीत. ते तुमच्यामध्ये आपले संवाद घालू शकत नाहीत, ज्याप्रमाणे गाण्याला दाद देतात तशी दाद द्यावी असंही काही घडत नसतं. मग त्या वेळी त्यांच्यापुढे हसण्याखेरीज काही पर्याय नसतो. ते आपसूकच हसतात. हे खरं आहे का, असल्यास कितपत- का सपशेल खोटं- याची मला कल्पना नाही, पण ते खरंच आहे असं समजून घ्यायला मला आवडतं. (तरीसुद्धा हेही खरंच आहे की नटांना त्याचा त्रास होतो. आपलं काहीतरी चुकलंय असं वाटत राहतं.)

गोष्ट ऐकून, नाटक बघून किंवा सिनेमा बघून आपल्या मनात जे घडतं, ते महत्त्वाचं आहे. रंगमंचावर किंवा कॅमेऱ्यासमोर काय आणि कसं सादर केल्यावर समोर किंवा घरात बसलेल्या प्रेक्षकांच्या मनात नाटक घडेल याचा विचार दिग्दर्शक करत असतो. त्यानुसार तो नट, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत या सगळ्याचा घाट, लय आणि सूर निश्चित करत असतो. जेव्हा रंगमंचाच्या बाहेर बसलेल्या प्रेक्षकांच्या मनातही नाटक घडायला लागतं, तेव्हा सगळ्यांच्या मिलाफातून जो तयार होतो तो म्हणजे नाटकाचा रंगलेला प्रयोग.

एक उत्तम कविता, उत्तम कथा, आपल्या मनात काही प्रतिमा उभ्या करते, आपल्याला आपल्याच मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेल्या भावनांना एक उजळ माथा बहाल करते, आणि तिथे की कविता पूर्ण होते, ती कथा खरा आकार घेते. अनेक वेळा आपल्याच आयुष्याचं प्रतिबिंब आपल्याला समोर दिसतं. एखादा प्रसंग प्रत्यक्षात घडताना आवर घातलेल्या आपल्या भावनांना तो रंगमंचावर बघताना — (लिहित असतानाही!)— मोकळी वाट मिळते.

मागच्या लेखात मी शब्दाच्या जादूगारांविषयी लिहिलं होतं. इथे इतके शब्द खर्ची घालून मी जे म्हणतेय ते शब्दांच्या एका खऱ्या आणि फार मोठय़ा जादूगाराने- साहीर लुधियानवीने अत्यंत कमी शब्दात अचूकपणे म्हणून ठेवलं आहे-

कौन रोता है किसी और की खातीर ऐ दोस्त

सब को अपनी ही किसी बात पे रोना आया..

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व लाइफ इज ब्युटिफुल ( Life-is-beautiful ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pratima kulkarni article on drama