scorecardresearch

ज्याचा त्याचा कोपरा!

कादंबरी वाचायला सुरुवात केली..

ऑस्ट्रेलियन लेखक ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स यांनी लिहिलेली ‘शांताराम’ ही कादंबरी दुकानांमध्ये झळकली आणि ती वाचलीच पाहिजे असं वाटलं. त्याचं एक कारण असं होतं की, लेखक ऑस्ट्रेलियन असला तरी ती कादंबरी मुंबईमध्ये घडणारी कथा सांगत होती आणि कादंबरी काल्पनिक असली तरी त्याला वास्तवाचा भक्कम आधार होता. नेहमी आपण ज्या नायकांबद्दल वाचतो त्यापेक्षा वेगळा लेखक-नायक, तुरुंगवास भोगून, तुरुंग फोडून बाहेर आलेला आणि आपल्यासाठी सगळ्यात भिडणारी गोष्ट म्हणजे मराठी बोलणारा, महाराष्ट्राच्या खेडय़ात राहून आलेला..

कादंबरी वाचायला सुरुवात केली.. कुलाबा, रिगल सिनेमा, कफ परेड, भायखळा अशा सगळ्या ओळखीच्या, आवडत्या ठिकाणांचा उल्लेख आला, मी रंगत गेले आणि कधी तरी नकळत कादंबरी एका वेगळ्याच दुनियेत शिरली. ती मुंबई माझ्या ओळखीची नव्हती. अर्थात ती कादंबरी आहे, काल्पनिक आहे, हे झालंच, पण त्यात लिहिलेल्या गोष्टी पूर्णत: काल्पनिक नक्कीच नव्हत्या. मला वाटलं, ही मुंबई आहे? मुंबईत हे पण आहे? त्या मुंबईत जाण्याचा रस्ता कुठला? हॅरी पॉटरच्या शाळेकडे जाणारी ट्रेन जशी पावणेदहा (९ ३/४) नंबरच्या फलाटावर येते, तसा एखादा वेगळाच छुपा रस्ता आहे का या मुंबईकडे जाणारा? ज्या ठिकाणांचा उल्लेख होता, ती ठिकाणं माझी नेहमी जाण्याची ठिकाणं होती, तरीही मला त्या लिहिलेल्या गोष्टींचा सुगावाही नव्हता. मला कधी ती मुंबई दिसलीच नव्हती, तिथेच फिरणारी ती माणसं दिसलीच नव्हती! ‘शांताराम’मध्ये न पाहिलेली जी मुंबई भेटली त्या मुंबईत काही खतरनाक, विकृत गोष्टी होत्या; पण तोपर्यंत गुन्हेगारी जग जसं असतं असं मला वाटत होतं त्यापेक्षा त्या खूप वेगळ्या होत्या, पण वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या असाव्यात अशा रीतीने लिहिलेल्या होत्या. गुन्हेगारी जग कसं असतं याच्याबद्दलच्या माझ्या ज्ञानाचं स्रोत अर्थातच ८०-९०च्या काळातला हिंदी सिनेमा! त्या चित्रपटाचं जगच वेगळं! ते चित्रपट पाहणाऱ्यालाही मंजूर. उलट तो चित्रपट पाहणं हे मुळी आपल्या जगातून दुसऱ्या जगात पाऊल टाकण्यासारखं! कादंबरी वाचून मी चक्रावले! प्रत्येक जण आपापल्या जगात राहत असतो आणि आपल्याच कोपऱ्याला जग समजतो..  आणि जाणवलं ज्याचात्याचा कोपरा त्याच्यापुरताच असतो खरा!

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे- त्या काळात मी जपानी भाषेची दुभाषी म्हणून काम करत होते. अनेक वेगवेगळ्या लोकांसाठी, कंपन्यांसाठी काम करायचे. दर वेळेला नवा व्यवसाय, तिथे भेटणारी नवी माणसं, त्यांच्या विचाराची पद्धत, त्यांच्या व्यवसायाची आव्हानं, सगळंच नवं असायचं. त्या काळात एका आयटी कंपनीचे जपानी अधिकारी भेटले. कामाशिवायच्या वेळात आमच्या गप्पा चालायच्या. बोलता-बोलता मी त्यांना सांगितलं, मी नाटक करते, दिग्दर्शक आहे, लिहितेही. चित्रपटही करायचा आहे, पण तिकडे जम बसेपर्यंत हे काम करते आहे वगैरे वगैरे. त्यांनी मला त्यांच्याकडे नोकरी करशील का, म्हणून विचारलं. काम काय, तर त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसांशी गप्पा मारायच्या. असंही काम असतं? मला खूपच मजा वाटली! जी गोष्ट करण्यासाठी अनेक वेळा शाळेत शिक्षा झाली त्या कामासाठी पगार मिळणार? मी लगेच हो म्हणायला हवं होतं, पण माझ्या डोक्यात नाटक पक्कं बसलं होतं, त्यामुळे मी ती नोकरी नाही घेतली; पण मी त्यांना विचारलं की, हे काय काम? तर ते म्हणाले की, आमच्याकडे- म्हणजे जपानमध्ये- लोक खूप जास्त काम करतात. त्या कामाच्या व्यापात त्यांना इतर काही बघायला वेळ मिळत नाही, मग ते हळूहळू बंदिस्त होत जातात, त्यांचं जग छोटं आणि अधिक छोटं होत जातं. त्यांना जगात इतरही अनेक गोष्टी आहेत याचं भान असायला हवं. तर असं कुणी तरी हवंय जे त्यांच्याशी त्यांचं काम सोडून इतर विषयावर बोलेल. कुठचाही विषय, त्यांना ज्यात रस वाटेल असा. मला वाटलं मी किती लकी आहे! माझ्या कामाच्या निमित्ताने मला रोज नवीन माणसं भेटतात, नवीन जग बघायला मिळतं! तरीही किती राहूनच जातं.. एका पुस्तकाच्या दुकानाच्या कॅरी-बॅगवर एक छान चित्र होतं. एक खूप मोठ्ठा पुस्तकांचा ढिगारा आणि त्याच्यासमोर एशियन पेन्टच्या गट्टूसारखा दिसणारा एक मुलगा- तो त्या ढिगाऱ्याच्या कळसाकडे बघत म्हणतोय, ‘‘किती कमी वेळ आणि किती ऱ्हायलंय वाचायचं..’’ माझ्या मनातलंच कुणी तरी सांगतंय असं वाटलं. माझा कोपरा मोठा

होत असला तरी तो कोपराच राहतो. किती अफाट आहे जग.. किती आहे बघण्यासारखं.. किती पाहिलं तरी न पाहिलेलं खूप काही शिल्लक राहतंच..

काही वर्षांपूर्वी मी ‘दूरदर्शन’साठी पर्यावरण या विषयावर एक मालिका केली होती- ‘हमारी जमीन हमारा आसमान’ या नावाची. म्हणजे माझ्या कोपऱ्याच्या बाहेरचाच विषय! त्यातलाच एक भाग होता सागरी पर्यावरण, मासेमारी, माशांची रोडावणारी पैदास इत्यादी. त्या वेळी मी पहिल्यांदा ऐकलं की ठरावीक मासे समुद्राच्या ठरावीक भागात राहतात. त्यांची खोली, विभाग, पाण्याची उष्णता, सगळं ठरलेलं असतं. हा शोध लागल्यावर लगेच मी ते माझ्या एका ज्येष्ठ मित्राला सांगितलं. ते म्हणाले, मग तुला काय वाटलं? अख्ख्या जगात अशा किती तरी अदृश्य भिंती आहेत, गज आहेत. आपल्याला वाटतं पक्षी किती नशीबवान- आपण पक्षी व्हावं, उंच-उंच आकाशात उडावं, असं काही नसतं. त्यांचा उडण्याचा मार्ग, उंची सगळं काही ठरलेलं असतं. कुणी प्रवासी पक्ष्यानं ठरवलं की, या वर्षी मी रशियाहून भारतात नाही, तर आफ्रिकेला जाईन, तरी त्याला तसं करता येत नाही. त्याचं जग, त्याच्या सीमा ठरलेल्या असतात. तो काही अफाट गगनात हिंडत वगैरे नाही! हे ऐकून मला म्हटलं तर थोडं वाईट वाटलं, पण जरा बरंही वाटलं- आपल्यावर काही सक्ती नाही सगळंच माहीत असण्याची. आपला कोपरा आपण शक्य तितका उजळून काढला की झालं!

मला मृत्यूनंतरच्या जगाबद्दल- आफ्टर-लाइफबद्दल फार आकर्षण आहे. मी त्याच्यावरची अनेक पुस्तकं वाचली आहेत. आपल्या जगात जसे देश किंवा प्रदेश असतात, तसे त्या जगात स्तर असतात, विभाग असतात. आपसातला संवाद फक्त लहरींद्वारे- व्हायब्रेशन्सद्वारे – होत असतो. जर दोन व्यक्तींच्या व्हायब्रेशन्सची फ्रीक्वेन्सी जुळली नाही, तर त्यांच्यात संवाद होऊ शकत नाही! म्हणजे त्यांच्या जगात त्यांच्यासारख्याच आणि फक्त त्यांच्यासारख्याच माणसांशी त्यांचा संवाद होऊ शकतो. त्यामानाने आपण फार भाग्यवान आहोत. म्हणजे उद्या जर मला फक्त माझ्यासारख्याच लोकांशी बोलता आलं, त्यांच्याचबरोबर ऊठ-बस करावी लागली, तर मला नवनवीन गोष्टी कळणार कशा? म्हणजे माझ्या मनातले तेच ते हेवेदावे, राग-लोभ हेच मला बघायला-ऐकायला मिळणार! म्हणजे जे काही शिकायचं, आत्मसात करायचं ते याच जगात, याच जन्मात! प्रगतीची, विकासाची संधी जितकी या जगात आहे, तितकी त्या जगात नाही! मात्र त्यासाठी आपल्याला आपल्या कोपऱ्याबाहेर बघण्याची सवय लावायला हवी. आपल्या कोपऱ्यासारखेच (आणि तितकेच सनदशीर!) असंख्य कोपरे मिळून हे जग बनलंय हे लक्षात घ्यायला हवं..

मी पूर्णपणे माझा कोपरा उल्लंघून जाऊ शकत नसले तरी मला इतरांच्या कोपऱ्यात डोकावता येतं, त्यात काही चांगलं दिसलं तर घेता येतं, माझ्यातलं हीण टाकता येतं.. म्हणूनच हे जग सुंदर आहे.. हे आयुष्य सुंदर आहे.. लाइफ इज ब्युटिफुल!

प्रतिमा कुलकर्णी

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व लाइफ इज ब्युटिफुल ( Life-is-beautiful ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pratima kulkarni articles in marathi on her experience of life

ताज्या बातम्या