रथ सहजीवनाचा!

कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमानंतर दोन महिन्यांच्या आत आमचं लग्न झालंसुद्धा! लग्नाच्या आधी फारशा गाठीभेटी न झाल्यामुळे एकमेकांशी ओळख नव्हती.

रथ सहजीवनाचा!

वर्षां भिसे

कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमानंतर दोन महिन्यांच्या आत आमचं लग्न झालंसुद्धा! लग्नाच्या आधी फारशा गाठीभेटी न झाल्यामुळे एकमेकांशी ओळख नव्हती. दोघांनाही एकमेकांच्या स्वभावाचा फारसा अंदाज येत नव्हता. फक्त लग्न जमायच्या वेळीच मी सांगितलं होतं, की नोकरी करणं हे बंधनकारक नसावं. माझं मी ठरवेन, की मला काय करायचं आहे. माझ्या नवऱ्यानं- केदारनं याला पूर्ण पाठिंबा दिला आणि अशा प्रकारे आमच्या सहजीवनाची सुरुवात झाली.  

लग्न झाल्या झाल्या दहा दिवसांत आम्ही अमेरिकेला गेलो. दोन ते तीन वर्ष तरी तिथे राहू असा बेत होता. परंतु गेल्यावर साधारण तीन-चार महिन्यांतच माझ्या लक्षात आलं, की मी तिथे रमत नाहीये आणि आपण भारतात परत जावं. माझ्या या निर्णयाला केदारनं पाठिंबा दिला आणि सहा महिन्यांत आम्ही भारतात आलो. त्यानंतर पहिल्या मुलाचा- ईशानचा जन्म झाला. त्यानंतर आमच्या दोघांचा केंद्रिबदू  मुलगा होता, सगळे निर्णय त्याच्याभोवती फिरत होते. अशातच केदारच्या परदेशवाऱ्या चालू झाल्या. मुलासाठी शाळा शोधण्याची जबाबदारी माझ्यावर आली. आम्ही पुण्यात नवीन असल्यामुळे काहीच माहिती नव्हतं. मग मी सकाळी मुलाला घेऊन प्रत्येक शाळेत जाऊन बोलून यायचे आणि फोनवर नवऱ्याशी चर्चा करायचे. अशाप्रकारे आम्ही शाळा ठरवली. काही वर्षांत प्रथमचा जन्म झाला. आता तर माझी जबाबदारी अधिकच वाढली होती. नवऱ्याच्या परदेशवाऱ्याही वाढल्या होत्या. पण अशा वेळेस घर आणि मुलं मी सांभाळायचं हे मी आधीच ठरवलं होतं. एकदा नवरा परदेशात असताना अचानक प्रथम आजारी पडला आणि उपचारांसाठी छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यावेळी पटापट निर्णय घेऊन सगळं पार पाडावं लागलं. नवरा परदेशात आणि मुलांचं आजारपण हे अगदी ठरलेलं असायचं. एकदा मोठय़ा मुलाच्या शाळेच्या वेळेस नेमका छोटया मुलाला फणफणून ताप आला. त्याला औषध देऊन, उचलून घेऊन मोठय़ाला सोडायला जावं लागलं, कारण घरात दुसरं कुणीही नाही. अशा वेळी नवऱ्याचीसुद्धा खूप घालमेल झाली, पण परदेशात असल्यामुळे त्याचा इलाज नसायचा. ‘आयटी’मध्ये मंदी चालू झाली की ताण यायचा, की आपली नोकरी तर नाही ना जाणार? तेव्हा ‘मी आहे, जे होईल ते निभावून नेऊ,’ हा विश्वास पुरुषाला बायकोनं देणं खूपच गरजेचं आहे असं प्रकर्षांनं जाणवलं. बायको कोणत्याही परिस्थितीत आपल्याबरोबर आहे हे एकदा पुरुषाला जाणवलं की तो जास्त प्रगती करतो, असं मला वाटतं.

मुलं मोठी होऊ लागली तसं स्वत:चं काहीतरी करावं असं मनात आलं. गंमत म्हणून काही वर्षांपूर्वी केलेल्या छोटय़ाशा ज्वेलरी कोर्सचा मला उपयोग झाला. फक्त ‘इमिटेशन ज्वेलरी’ करायची नाही, काहीतरी सर्जनशील करावं, ज्यातून आपण काहीतरी नवीन करतोय याचा आनंद मिळावा ही इच्छा होती. त्यातून जन्म झाला माझा ब्रँड ‘सृजना बाय वर्षां’ याचा. सुरुवात क्रोशा ज्वेलरीनं केली आणि हळूहळू काही वर्षांनी त्यात फॅब्रिक ज्वेलरीचीही भर पडली. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये दागिने कितीसे विकले जाणार,  व्यवसाय वाढवायला पाहिजे हे मनात आलं. नवऱ्यानं सुचवलं, की छोटी छोटी प्रदर्शनं करत जा, त्यातून ग्राहक वर्ग वाढेल. पण मी प्रदर्शनाला गेल्यावर मुलांकडे लक्ष कोण देईल, या काळजीनं फक्त शनिवार- रविवारची प्रदर्शनं घेतली. त्यामुळे नवऱ्याला पूर्णपणे मुलांकडे लक्ष देता यायचं. नंतर हळूहळू मोठी प्रदर्शनं चालू केली. तीन ते चार दिवसांचीसुद्धा प्रदर्शनं केली. अशा वेळेस नवरा पूर्णपणे मुलांसाठी घरात थांबायचा आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचा. त्यासाठी अगदी त्याच्या परदेशवाऱ्याही त्यानं ‘अ‍ॅडजस्ट’ केल्या आहेत.

 आता मुलं मोठी झाली आहेत, पण नवऱ्यानं आतापर्यंत माझ्या कामाला दिलेल्या आदरामुळे मुलांच्यासुध्दा हे लक्षात आलं आहे, की आईसाठी घर हे पहिल्या क्रमांकावर आहे, पण तरीही तिला स्वत:चा व्यवसायसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे घरातल्या कामांमध्ये त्यांचाही सहभाग सतत असतो. त्यांना असं घडवण्यात नवऱ्याचा खूप मोठा वाटा आहे. घरामध्ये नवरा असल्यामुळे मला घराची काळजी अजिबात वाटत नाही. ‘‘तू तुझ्या कामाकडे लक्ष दे, खूप छान बिझनेस कर,’’ हेच कायम नवरा सांगत आला आहे. त्यानंच मला माझ्या ज्वेलरीचा ब्रँड करण्यास भाग पाडलं आणि ‘सृजना बाय वर्षां’ हा क्रोशे आणि फॅब्रिक ज्वेलरीमधला आता रजिस्टर्ड ट्रेडमार्क झाला आहे. गेल्या काही वर्षांत हळूहळू केदारनं कामाचं स्वरूप बदलत बदलत स्वत:ची सॉफ्टवेअर कन्सल्टन्सी सुरू केली आहे. आता कोणाच्या हाताखाली काम करावं लागत नसल्यामुळे स्वत:च्या वेळेनुसार मनासारखं काम करता येतं. हे सगळे बदल होत असताना माझ्यावर घराचा ताण थोडा जास्त आला होता, पण एकमेकांशी बोलून हे सगळं ठरवल्यामुळे आम्ही ते व्यवस्थित पार पाडलं. अशा प्रकारे आमच्या सहजीवनाचा रथ कधी उजवीकडच्या चाकावर, तर कधी डावीकडच्या चाकावर जोर देत यशस्वीपणे घोडदौड करतो आहे!

kedarvarsha@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Life marriage temperamental compulsory husband support ysh

Next Story
सप्तपदीनंतर.. : तपपूर्तीच्या दिशेने..
फोटो गॅलरी