वृद्धांची काळजी घेणार्‍या अनेक खासगी काळजीवाहू संस्था उभ्या राहिल्या आहेत. मात्र त्या खर्चीक असल्याने सगळ्यांना परवडतातच असं नाही. त्यामुळे अनेक वृद्ध पालक आपल्या घरातच राहणंं पसंत करतात. मुलांच्या सहवासाची भूक कितीही असली तरी ही मंडळी एकटेपण मन मोठं करत स्वीकारतात. सगळ्यांना जोडून राहतात. स्वत:च्या नियमाने जगतात… अशाच काही जीवनसन्मुख वृद्धांविषयी सांगणारा ‘न परतीच्या वाटेवरचे पाल्य’ या लेखाचा हा उत्तरार्ध. २०११ मध्ये भारतात परतलेल्या प्रसाद भिडे आणि सौरभ देसाई (एक मराठी, एक गुजराती) यांच्याबद्दल सांगितल्याशिवाय ‘अनिवासी भारतीय पाल्य आणि त्यांचे पालक’ या विषयावरचं लेखन पुरं कसं होणार?

अभियंता प्रसाद भिडे, हे ‘टाटा कन्सल्टन्सी स्व्हिहसेस’मधलं उत्तम पद, अमेरिकेतला उज्ज्वल भविष्यकाळ वगैरे सोडून २०११ मध्ये भारतात परतले; कारण त्यांच्या आईची तब्येत बिघडली होती. आणि तिची काळजी घेणारं दुसरं कुणी नव्हतं. आई बरी झाल्यानंतर ते पुन्हा अमेरिकेत गेले, तेव्हा ते राहत असलेल्या ठाण्यात- मुंबईत वृद्धांची काळजी घेण्यासाठी काही व्यवस्था उभारायचं त्यांच्या डोक्यात सुरू झालं होतं. अमेरिकेत ‘होम हेल्थ एड’ हा पदविका अभ्यासक्रम करून ते कायमसाठी भारतात परतले. वृद्ध पालक आणि त्यांच्या पाल्यांच्या समस्येचं नेमकं स्वरूप जाणून घेण्यासाठी त्यांनी पाचशे कुटुंबांसोबत चर्चा केली. तेव्हा लक्षात आलं की, घरोघरीच्या वृद्धांना सांभाळायला मदतीची गरज लागतेय. मदत करणारे स्त्री-पुरुष प्रशिक्षित नाहीयेत. घरकाम करणार्‍या ्त्रिरयाच बव्हंशी वृद्धांची देखभाल करण्यात मदत करताहेत. अकुशल, अल्पशिक्षित पुरुषही या कामात आहेत.

प्रसाद यांनी त्यासाठी वृद्धांच्या देखभालीचं प्रशिक्षण सुरू केलं. इतकंच नाही तर हे प्रशिक्षण घेणार्‍यांना प्रत्येकी दहा हजार रुपये द्यायला सुरुवात केली. प्रशिक्षणार्थींची संख्या वाढत गेली, तसं ही रक्कम कमी करत नेली. २०१४ मध्ये आजी-आजोबांना सेवा देणारी एक संस्था त्यांनी सुरू केली. आत्तापर्यंत २७ हजारांच्या वर कुटुंबांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. स्मृतिभ्रंशग्रस्त रुग्णांना मदत, वृद्धांची काळजी घेणारे प्रशिक्षित स्त्री-पुरुष पुरवणं आणि वृद्धांना राहण्यासाठीची मुंबई, ठाणे आणि पुणे इथली केंद्रे उपलब्ध करून देणं,हे या संस्थेचं काम.

प्रसाद भिडे सांगत होते, ‘‘पालक-पाल्य यांच्यात अंतर पडत चाललंय. डिमेंशिया, अल्झायमर्स (स्मृतिभ्रंश) असलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यांची काळजी घेताना घरचे नातलग शरीर-मनाने प्रचंड थकून जातात. ही देखभाल दीर्घकाळ चालते. अशा स्थितीत घरातलं वातावरण, नातेसंबंध बिघडतात. मुलं परदेशी असली की नवरा-बायकोलाच एकमेकांची काळजी घ्यायची असते. अशात काळजी घेणार्‍याचीही काळजी घेणं गरजेचं असतं. या सगळ्यांचा विचार करून आम्ही मदत देतो. अशांसाठी आमचे २४ तास उपलब्ध असलेले ‘केअरगिव्हर्स’ (काळजीवाहक) किंवा आमची केंद्रं सोयीची पडतात.’’

सौरभ देसाई हे ‘आयटी’ क्षेत्रातले, अमेरिकेत त्यांचं उत्तम चाललेलं होतं, तिथल्या दहा वर्षांच्या वास्तव्यानंतर आई-वडिलांसाठी ते भारतात परतले. वडील आजारी झाले आणि एकट्या आईवर भार नको म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठीच्या पुण्यातल्या सुविधासुसज्ज अशा एका संस्थेचे ते संचालक आहेत. ‘एनआरआय’ पाल्यांचे बरेचसे पालक इथं राहतात. व्याही-व्याही, विहिणी-विहिणी असे एकत्र राहणारेही बरेच आहेत. इथं राहणार्‍या पालकांच्या मुला-मुलींचा या संस्थेने एक ‘व्हॉट्सॲप’ गट केला आहे. तिथं रोजचा जेवणाचा ‘मेन्यू’ आणि दिवसभरातले उपक्रम याची माहिती दिली जाते. जवळच्या रुग्णालयांशी संपर्क, रुग्णवाहिनी, डॉक्टर, नर्स, तपासण्या हेही उपलब्ध आहेच. मी सौरभ यांच्याशी बोलले तेव्हा संस्थेत राहाणार्‍या १७८ व्यक्तींमध्ये २५ जोडपी, ७० एकट्या ्त्रिरया आणि ५० एकटे पुरुष होते.

सौरभ म्हणाले, ‘‘मी अमेरिकेहून परतलो, तेव्हा आई-वडिलांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. हे लक्षात घेऊनच मी आमच्या संस्थेमध्ये अशी व्यवस्था तयार केली आहे की, परदेशातल्या मुलांना आई-वडिलांची काळजी वाटायला नको. आणि मी पाहतो, एकत्र कुटुंब असलं, तरी आई-वडिलांशी दिवसभरात पाच-सात मिनिटांपलीकडे त्यांचं बोलणं होत नाही. उलट, काही मुलांना तर ते ओझंच वाटतं. म्हणजे घरातदेखील वृद्धांना एकाकीपणा वाटू शकतो. त्यात जोडीदाराचं आजारपण काढावं लागलं तर खूपच ओढाताण होते. आमच्याकडे ही मंडळी खूश असतात. इथल्या उपक्रमात रमतात. अनपेक्षित आजारपण आलं तर इथं हाताळलं जातं. इथं स्वत:च्या छंदांकडे लक्ष द्यायला उसंत मिळते. ऐंशीच्या उंबरठ्यावरच्या एका आजोबांनी चक्क पुस्तक लिहिलंय.’’

प्रसाद भिडे आणि सौरभ देसाई यांनी वैयक्तिक गरजेतून समाजाच्या गरजा पुर्‍या करणारे व्यवसाय सुरू केले. मात्र या सेवा घ्यायला पालकांना किंवा पाल्यांना भरपूर पैसा मोजावा लागतो. त्यामुळे त्या मूठभरांपुरत्याच राहतात, हेही तितकं च खरं. मुलं परदेशी असली तरी वृद्धाश्रमात जाण्यापेक्षा स्वत:च्या घरीच राहणं पसंत करणारे अनेक पालक आहेत. या विचाराने एकट्या राहणार्‍या ्त्रिरयादेखील आहेत. यशोधरा काटकर या लेखिका, अनुवादक, सत्तरीच्या. एकुलती एक मुलगी परदेशी. पुढे वेळ आलीच तर अनुभव घ्यावा म्हणून एका वृद्धाश्रमात वर्षभर राहून त्या स्वत:च्या घरी परतल्यात. वृद्धाश्रमातला अनुभव बरा वाटला. पण त्यांना शक्य तितकं स्वत:च्या घरी राहायचं आहे.

अमेरिकेला राहणारी मुलगी आणि जावई यांच्याशी छान नातं आहे. पण वय वाढतंय, तसं मुलगी जवळ असती तर बरं झालं असतं, असंही वाटतं. सहवासाची भूक राहते. एकट्याने राहायची भीती, एकाकीपणा मुळीच वाटत नाही, परंतु या वयात चिकटणारी परावलंबित्वाची काळजी वाटते. रोजचा व्यायाम, आहार आणि सक्रियता हे महत्त्वाचं. यशोधरा अनेक उपक्रमांमध्ये भाग घेतात. शिवाय त्यांच्या गोव्याच्या घरी जात राहतात. मुंबईमध्ये किंवा आणखी कुठे जाताना कोणी गाडी पाठवण्याचं सुचवलं तरी शक्यतो नाकारायचं. आपलं आपण जायचं. यशोधरा यांची स्वत: सगळं करत राहण्याची सवय अनुकरणीय आहे. नवं तंत्रज्ञान अवगत असल्याने बँकेचे व्यवहार, रेल्वेचं तिकीट, टॅक्सी बुक करणं किंवा बाहेरून काही मागवणं हे सहजी जमतं. यशोधराचं म्हणणं असं की, सध्या वृद्ध पालकांची स्थिती पूर्वीच्या तुलनेत काळजी करण्यासारखी आहे. कारण समाज फार एककल्ली होत चालला आहे. शेजारधर्म लुप्त होत चाललाय. ‘तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघू’, असं झालंय. समाजा- मधला तुटलेपणा नातेसंबंधांमध्येही आला आहे. त्यामुळे मन घट्ट करून राहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

अनेक ‘एनआरआय’ पालक सहा महिने मुलांकडे परदेशात आणि सहा महिने भारतात असं वर्षानुवर्षं करतात. दोन्हीकडची मजा लुटता येते, असं त्यांचं म्हणणं. अलीकडे, परदेशांत भारतीयांची दाट वस्ती असते, तिथं हिंदू सण-उत्सव पूर्वीच्या तुलनेत अधिक जल्लोषात साजरे होतात, याचाही अनेक पालकांना अभिमान वाटतो. यामुळेच कदाचित त्यांना भारताबाहेर असल्याचं फारसं जाणवत नसेल.

‘अनिवासी भारतीय पाल्यांचे पालक’ हा विषय संपवताना उषा फाटक यांच्याबद्दल थोडं. त्यांच्याकडे जणू ‘सुखी माणसाचा सदरा’ आहे. ८० च्या उंबरठ्यावरच्या उषाताई, ‘‘तुम्ही तिकडे मजेत राहा, मी इकडे मजेत राहते’’, असं त्यांच्या परदेशस्थ पाल्यांना सांगणार्‍या… वार्धक्याच्या वाटेवरच्या प्रवाशांनी शिकावं, असं बरंच काही त्यांच्याकडे आहे. त्या सांगतात, ‘‘तीस वर्षांपूर्वी दोन्ही मुलं घर सोडून बाहेर गेली. प्रथम शिक्षणासाठी, मग नोकरीसाठी. आधी देशात, नंतर परदेशात. त्याच वेळी मनाशी खूणगाठ बांधली, आता यापुढे आपणच आपल्यासाठी. एकदा मनाची तशी धारणा झाल्यावर पुढचं फार सोपं होतं. शक्यतो कुणावर अवलंबून राहायचं नाही. एकदा करायला लागलं की सगळं जमतंच.’’

वयाच्या पन्नासाव्या वर्षी उषाताई क्लासला जाऊन संगणक शिकल्या. मुलांना इ-मेल करू लागल्या. नंतर सगळी समाज माध्यमं, सगळंच. त्या म्हणतात, ‘‘मुलं पुढे पुढे धावताहेत, तर आपण थोडं चालायला तरी हवं. आपण एकाच जागी बसून राहिलो, तर आपल्यातलं अंतर वाढतच जाईल. करोनाच्या काळात ऑनलाइन व्यवहार सोपे झाले. ऑनलाइन खरेदी, बँकेचे व्यवहार ऑनलाइन करायला शिकले. आणि काही अडलंच, तर विनासंकोच कुणाला तरी विचारते.’’ त्यांचा मुलगा त्यांना कायमचं अमेरिकेत राहायला बोलावतो. उषाताईंना तिथल्या आयुष्याशी जमवून घेणं अवघड वाटतं आणि मुलाला आपल्यासाठी परत बोलावणंही योग्य वाटत नाही. त्या सांगतात, ‘‘जीवन हे पाण्यासारखं प्रवाही आहे. ते पुढे पुढे वाहत जाणार, मागे परतून येणार नाही.

भारतातच राहायचं, हा निर्णय सर्वस्वी माझाच. मग एकटं राहायला लागतं याची खंत कशाला? कुठेही राहिलं तरी काही चांगलं, काही वाईट असणारच.’’ नियमित व्यायाम, संतुलित आहार, क्रियाशीलता आणि चांगला विचार करत राहाणं, हे उषाताईंच्या आनंदी जीवनाचे चार मजबूत खांब. त्या म्हणतात, ‘‘आयुष्यात शंभर टक्के चांगलंच घडतं असं नाही, तसंच सगळं वाईटच घडतं असंही नाही. जे वाईट आहे, त्यालाच धरून बसू नका. ते विसरायचा प्रयत्न करा. सर्व नातेवाईक, शेजारी यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. अगदी सोसायटीच्या पहारेकर्‍याशी. झाडू मारायला येणार्‍यांशीसुद्धा मी जाता-येता दोन शब्द बोलते, त्यांची चौकशी करते. कारण मला माणसं जोडायची आहेत. मित्रमंडळी आहेत, स्वत:चे छंद आहेत. आणि नव्या नव्या गोष्टी शिकायला मला अजून आवडतं. वेळ कसा घालवायचा, हा प्रश्नच कधी पडत नाही.

’’ घरात अर्धवेळ मदतनीस आहेत. किरकोळ बाजारहाट, थोडाफार स्वयंपाक, घराची स्वच्छता, गरज पडल्यास डॉक्टरकडे जाणं हे सगळं त्या एकटीने करू शकतात. त्यांनी सांगितलं, ‘‘एक गोष्ट मात्र मी आता कटाक्षाने करते. मी जरी माझी सगळी कामं स्वत: करत असले, तरी कोणी आपणहून काही मदत देऊ केली, तर नाही म्हणत नाही. नाही तर खरोखरच गरज पडेल, तेव्हा कोणी जवळ येणार नाही.’’ अखेरपर्यंत असंच राहावं, शक्यतो स्वतंत्रपणे आपल्या घरीच राहावं, ही त्यांची इच्छा. मात्र वेळ आलीच तर वृद्धाश्रमात राहायला जायचं, हाही विचार त्यांनी केलाय. आजच्या तरुण पिढीला त्यांचं सांगणं आहे, ‘‘म्हातारपणासाठी आर्थिक तरतूद करता, तशी शारीरिक आणि मानसिक तरतूदही करा. शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम आणि मानसिक आरोग्यासाठी आवडीचा छंद जोपासा. स्वत:चं विश्व निर्माण करा. आणि मुख्य म्हणजे झाल्या-गेल्याची खंत करणं सोडून द्या. वृत्ती समाधानी ठेवा.’’

आधी प्रेम द्यावं आणि मग प्रेम घ्यावं. आपण दुसर्‍यासाठी होईल तितकं करत राहायचं. आपल्यावर वेळ आली तर कोणी तरी नक्की धावून येईल, यावर उषाताईंचा पक्का विश्वास… अशी जीवनसन्मुखता सगळ्यांना लाभो…!

ऐंशीच्या उंबरठ्यावरच्या उषा फाटक आपल्या जगण्याचा मूलमंत्र सांगतात, ‘‘नियमित व्यायाम, संतुलित आहार, क्रियाशीलता आणि चांगला विचार करत राहणं, हे आनंदी जीवनाचे चार मजबूत खांब आहेत. आयुष्यात शंभर टक्के चांगलंच घडतं असं नाही, तसंच सगळं वाईटच घडतं असंही नाही. जे वाईट आहे, ते विसरायचा प्रयत्न करा. सर्व नातेवाईक, शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवा. माणसं जोडा. मित्रमंडळी जमवा. आधी प्रेम द्यावं आणि मग प्रेम घ्यावं. आपण दुसर्‍यासाठी होईल तितकं करत राहायचं. त्यामुळे आपल्यावर वेळ आली तर कोणी तरी धावून येईल हे नक्की.’’