scorecardresearch

देणाऱ्याने देत जावे.. 

वेदात आयुष्य चार टप्प्यांत विभागून दिलं आहे. पहिला टप्पा- ब्रह्मचर्य, जो विद्यार्जन अणि मजा-मस्तीत भर्रकन उडून जातो.

देणाऱ्याने देत जावे.. 
देणाऱ्याने देत जावे.. 

अंजली म. यावलकर

वेदात आयुष्य चार टप्प्यांत विभागून दिलं आहे. पहिला टप्पा- ब्रह्मचर्य, जो विद्यार्जन अणि मजा-मस्तीत भर्रकन उडून जातो. गृहस्थी सुरू झाली की संसारचक्र वेग घेतं. ऑफिसमध्ये कुणी सहज सांगितलं, की माझी पंचवीस वर्षांची नोकरी झाली की आश्चर्य वाटायचं. यांची इतकी वर्ष कशी गेली असतील? पण माझ्या बाबतीतसुद्धा एकदा संसारचक्रानं गती घेतल्यावर मुलांचं संगोपन, नोकरीत बढती वगैरेत तीस वर्ष कशी गेली कळलंच नाही. या सगळय़ात कधी कुठल्या कला जोपासत, कुठे थोडंफार लिखाण, कधी आध्यात्मिक वृत्तीनं कुठल्या आश्रमाशी जोडून घेणं, यात काही वर्ष गेली.

आयुष्य एका चाकोरीबद्ध स्थितीत, सरळ रेषेत जात होतं. मात्र एकूण जीवनाचा विचार करता, खूप शिकून पैसे कमवायला सज्ज व्हायचं, कमावलेली संपत्ती पर्यटन किंवा ‘हॉटेलिंग’मध्ये उडवायची अणि दरवर्षी गुंतवणूक करून संपत्तीचा संचय वाढवायचा ही समाजात रूढ असलेली जीवनपद्धती खटकू लागली. जीवनाचं सार काय, असा विचार केला नाही. पण एका क्षणी जाणवलं, की संपत्ती किती जमवत राहायची त्याला काहीतरी मर्यादा असावी. मोह तरी किती करायचा? सतत गुंतवणुकीचे पर्याय शोधून कंटाळा आला. सगळय़ात पहिल्यांदा एक निश्चय केला, की दागिन्यांचा मोह करायचा नाही. तसेही ते फार कमी वापरले जातात अणि फक्त लॉकरची शोभा वाढवतात. म्हातारपणाची सोय झाल्यावर लोभ करण्यात अर्थ नाही असं वाटू लागलं. कुठेतरी शेवट हवाच हे प्रकर्षांनं जाणवू लागलं. मग किती संपत्तीचा संचय करायचा याची मर्यादा आखून घ्यायचा निश्चय केला.

यात ‘अहं ब्रह्मास्मि’- म्हणजे मी, माझं घर, माझी नोकरी, संसार याच्याबाहेरही खूप मोठं जग आहे याची जाणीव झाली. ‘शेवटी माणसाला जागा तरी किती लागते?’ असे प्रश्न आपसूकच मनात यायला लागले. रस्त्यावर फिरणारी उघडीवाघडी बालकं बघून मन अस्वस्थ व्हायला लागलं. आपण समाजाला काही देणं लागतो हे जाणवू लागलं. समाजातली विषमता त्रासदायक टोचणी देऊ लागली. मी क्रांती घडवू शकत नाही, पण मी माझा खारीचा वाटा उचलला पाहिजे असे विचार मनात रुंजी घालू लागले. त्यातून मग अनाथालय शोधून तिथे चकरा सुरू झाल्या. त्यात खरं समाधान मिळू लागलं. आत्मशांती तिथे मिळाली. अनाथ मुलांचं वेगळं जग समोर आलं, मी त्यात ओढली गेले.

घरातली पाखरं नोकरीला लागली, घराबाहेर पडली की संसारात खूप एकटं वाटतं. पिल्लं उडून गेली आणि परदेशात म्हणतात तसं ‘एम्प्टी नेस्ट सिन्ड्रॉम’ जाणवू लागलं. पण तेव्हाच अनाथालयातली मुलं माझी वाट बघायची आणि ‘काकू उद्या कधी येणार?’ विचारायची, ती भावना इतकी सुखावणारी होती! इमारतीच्या वॉचमनलाही शिकवायचा प्रयत्न केला. तो वाचू लागल्यावर एकदा मला सांगत होता, ‘ताई, ती गोष्ट वाचून मी इतका हसलो!’ थोडंसं लिहिता-वाचता आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसलेला निव्र्याज आनंद मलाही खूप समाधान देऊन गेला.

पण माझीही एक दिनचर्या होती. त्यामुळे मी इतर गोष्टींसाठी फार वेळ देऊ शकत नव्हते. हे बंधन असल्यामुळे मग आर्थिक मदत करावी असं वाटलं. झेपेल तेवढी देणगी द्यायला सुरुवात केली. त्यासाठी अभ्यास करावा लागला. काही संस्थांना भेटी दिल्या, तिथली कार्यपद्धती समजून घेतली. इंटरनेटवर खूप संस्था दिसतात, पण मनात गोंधळ होतो की कोणती संस्था देणगी देण्यायोग्य ठरेल? आपले मेहनतीचे पैसे सत्कारणी लागतील की नाही अशी शंका येते. ‘लोकसत्ता’मध्ये गणपतीच्या दिवसांत ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात १० दिवस सामाजिक संस्थांची माहिती येते, शिवाय नवरात्रीच्या वेळेस ९ दिवस ‘दुर्गा पुरस्कार’प्राप्त कर्तबगार स्त्रियांची माहिती येते, त्याचा मला अशा वेळी फायदा झाला आहे. देणग्यांना आयकरातही सूट मिळत होती, म्हणजे एक प्रकारे देणगीवरही फायदाच होता. काही वेळा हा आर्थिक फायदा असूनही घरून विरोध झाला. घरातली विद्याविभूषित मंडळी सामाजिक बांधिलकी मानणारी होती, तरी स्वकष्टार्जित पैसा का दान करायचा, असं त्यांचं मत होतं. कुटुंबातली धार्मिक मंडळीही राजी नव्हती. त्या विरोधाला मी शांतपणे सामोरी गेले, कधी सोयीस्कर दुर्लक्ष केलं. पण फक्त एकदा जरी वंचितांकरिता मदत केली तरी किती आत्मसमाधान मिळतं, हे मला या प्रवासात समजलं. विंदा करंदीकर ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे’ या शब्दांत जीवनाचं सार सांगून गेलेत तसं!

mryawalkar@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Life world cycle child rearing office job ysh