निरंजन मेढेकर niranjanmedhekar1@gmail.com

प्रीती,रती, शृंगार, प्रणय या उत्तम वैवाहिक सहजीवनाच्या पायऱ्या लुप्त होऊन सेक्स ही फक्त उरकून टाकण्याची गोष्ट होत चालली आहे का, अशी शंका यावी असा अनुभव अनेकांना येतो आहे. याचं कारण ठरते आहे ती बदलती जीवनशैली. बिंज ड्रिंकिंग, कामातील, जगण्यातले वाढते ताणतणाव, बाहेरचं खाणं, व्यायामाचा अभाव, झोपेचं विस्कटलेलं चक्र, यामुळे वाढलेले शारीरिक-मानसिक आजार, याशिवाय समाजमाध्यमं, पॉर्न साइट्स, गेमिंग अ‍ॅप्स आणि ओटीटी प्लॅटफॉम्र्समुळे आभासी विश्वात रमण्याचं वाढतं प्रमाण, याचा थेट परिणाम जोडप्यांच्या कामजीवनावर पडतो आहे. तो कसा, या विषयीचा विविध तज्ज्ञांशी बोलून घेतलेला हा धांडोळा..

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

राकेश आणि गीता, दोघंही इंजिनीअर. राकेश मॅन्युफॅक्चिरग क्षेत्रात बडय़ा पदावर, तर गीता सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात. बारा वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केलं, तेव्हा ते दोघंही निव्र्यसनी होते. गीतानं तिची ही जीवनशैली नुसती कायम ठेवली नाही, तर धावणं, पोहणं असे शारीरिक तंदुरुस्तीचे वेगवेगळे छंद जोपासत आपलं आरोग्य उत्तम राखलं. ती एका मोठय़ा मुलाची आई आहे हे आज सांगूनही खरं वाटत नाही इतकं तिनं शरीर बांधेसूद ठेवलं आहे.  दुसरीकडे कामाच्या वाढत्या व्यापामुळे, दौऱ्यांमुळे, ‘कॉर्पोरेट कल्चर’मुळे, की सगळय़ाचा एकत्रित परिणाम म्हणून राकेश त्याच्याही नकळत दारूत बुडत गेला. आज परिस्थिती अशी, की ‘फिटनेस’ हा गीताच्या आयुष्याचा आणि दारू-सिगारेट हा राकेशच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. परिणामी शारीरिक, मानसिक, भावनिक अशा सगळय़ाच पातळय़ांवर त्यांच्या नात्यातली वीण वेगानं उसवायला लागली आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या लैंगिक जीवनावर होऊ लागला. विचारांतली कटुता त्यांच्या व्यवहारात दिसू लागली. आणि कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात असलेले हे दोन जीव एकमेकांचे वैरी झाले.

तुमच्याही आजूबाजूला, ओळखीत राकेश-गीतासारखी अनेक जोडपी असतील. काही तर संसारात रूढार्थानं सगळं काही स्थिरस्थावर असूनही ‘अनसेटल्ड’ झालेली! वेगवेगळय़ा प्रकारची व्यसनं आपल्या समाजात पूर्वीपासून प्रचलित असली, तरी गेल्या काही वर्षांत त्यांना मिळत असलेलं ग्लॅमर, अधिमान्यता हा काळजीचा विषय बनत चालला आहे. ‘एंजॉयमेंट म्हणजे वीकेंड दारू पाटर्य़ा’, ‘पिकनिक म्हणजे हमखास दारू पाटर्य़ाच’ हे समीकरण गेल्या काही वर्षांत आणखी दृढ झालंय. दारू पिण्याचं प्रमाण वाढल्यानं त्याचा थेट परिणाम यकृत, मूत्रिपड आणि हृदयावर होतोय. ‘आज मजा करू, जो होगा देखा जाएगा’ अशीच एकूण मानसिकता असल्यानं तिशी-पस्तिशीतच अनेकांच्या मागे वेगवेगळे आजार लागत आहेत. ‘मधुमेह, उच्च रक्तदाब होईल तेव्हा बघू, रोज एक गोळी घेतली की झालं,’ असा समज असला, तरी त्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि लैंगिक समस्या आयुष्यभरासाठी जडू शकतात याचा प्रत्येकानं डोळसपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

 मद्यपानाचा विचार करता, तरुणाईमध्ये आज ‘बिंज ड्रिंकिंग’चं प्रमाण वाढत आहे. म्हणजे एकदा का मित्रांसोबत प्यायला बसलं, की इतकी दारू प्यायची, की सगळय़ा जगाचा, रोजच्या नकोशा जगण्याचा विसर पडायला हवा. आपला जोडीदार आपल्याला समजून घेत नाही, कुटुंबात मला कुणी विचारत नाही, मी अपयशी आहे, अशी भावना असलेले लोक बिंज ड्रिकिंगमध्ये स्वत:ला बुडवून टाकतात. ‘बिंज ड्रिंकिंग’ हे ‘बायपोलर डिप्रेशन’शीही निगडित असू शकतं. खरंतर सहजीवनाचा अर्थच सोबत जगणं, सोबत मोठं होणं, पुढे जाणं हा असतो. बऱ्याचदा प्रेमात पडून लग्न करतानाही एकमेकांच्या भावभावना, इच्छाआकांक्षा याबद्दल जोडप्यांचं एकमेकांशी बोलणं झालेलं नसतं. त्याला व्यसनांची जोड मिळाली की गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होतात आणि नातं तुटण्यापर्यंत मजल जाते. दुसरीकडे जोडीनं व्यसनं करणाऱ्या जोडप्यांचं प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत असल्याचं निरीक्षण ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’च्या संचालक आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. मुक्ता पुणतांबेकरांनी नोंदवलं. ‘‘आमच्याकडे आलेल्या एका प्रकरणामध्ये ‘सोशल स्टेटस्’ म्हणून नवऱ्यानंच बायकोला मद्यपानाला उद्युक्त केलं. पुढे वाढलेल्या व्यसनातून नवीन समस्या निर्माण झाल्यानं समुपदेशनासाठी ते ‘मुक्तांगण’मध्ये आले होते. पण सगळय़ांनाच ही उपरती होत नाही. दारूबरोबरच ‘वीड’ म्हणजे गांजाचं सेवन करण्याचं आकर्षणही तरुणाईमध्ये खूप आहे. कोणतंही व्यसन सुरू करताना प्रत्येकाला माझा स्वत:वर संयम आहे, मी मनात आणीन तेव्हा व्यसन थांबवू शकतो, असंच वाटत असतं. पण वस्तुस्थिती तशी नसते. करोना, टाळेबंदी यामुळे मानसिक,आर्थिक ताण वाढलेत. त्यामुळेही व्यसनांचं प्रमाण वाढलं आहे. ’’

 जुईली आणि यश यांचा प्रेमविवाह. लग्नाआधी ते सहा वर्ष सोबत होते. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले, पण लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांचं नातं तुटण्यापर्यंत येऊन पोहोचलं. दोघांच्याही घरच्यांना हा मोठाच धक्का होता. स्त्रीरोगतज्ज्ञ, सेक्सॉलॉजिस्ट आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे त्यांच्याकडे आलेल्या या जोडप्याविषयी सांगत होत्या. त्या दोघांमधल्या बेबनावाचं कारण म्हणजे त्या तरुणीला रात्रीतून चार-पाच वेळा बाथरूमला जावं लागायचं आणि यामुळे त्याची, तिच्या नवऱ्याची झोप सतत चाळवली जायची. याचा परिणाम त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या कामावर  व्हायचा. लग्नाआधी दोघं एकत्र राहात नसल्यानं जुईलीनं ही गोष्ट यशला सांगितली नव्हती. तिला ती तितकी महत्त्वाची वाटली नव्हती. पण झोपेत लघवीसाठी उठावं लागण्याचा त्रास तिला अनेक वर्ष होता, ज्याचं मूळ तिच्या चिंताक्रांत स्वभावात (Anxiety disorder) होतं. ‘‘आपल्या बायकोला रात्रीतून इतक्या वेळा उठावं लागतंय, तर त्यावर उपाय शोधत तिचा त्रास कसा कमी होईल हे बघण्यापेक्षा यशनं पटकन घटस्फोटाचा सोपा पर्याय निवडला. हा बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आहे. आजच्या जगात ब्रेकअप्स आणि घटस्फोटांकडे ‘इझी वे आऊट’ म्हणून पाहिलं जातं. सध्या २० ते ५० या वयोगटात असणाऱ्या पिढय़ांचं गेल्या काही वर्षांत ‘कंडिशिनग’ असं झालंय, की आवडलं नाही तर टाकून द्यायचं. मग ती एखादी वस्तू असो की नातेसंबंध. आजच्या जगात गोष्टी, संसाधनं इतक्या सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात, की ‘यूज अँड थ्रो’ संस्कृती  चांगलीच रुजलीय. गेल्या पंधरा वर्षांतला समाजातला हा ठळक बदल आहे.’’ डॉ. देशपांडे सांगत होत्या.

सतत बाहेरचं खाणं, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव, झोपेचं विस्कटलेलं चक्र, व्यसनं, यामुळे तिशी-पस्तिशीतच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा यांसारखे जीवनशैलीशी निगडित आजार मागे लागत आहेत. पुरुषांच्या बाबतीत या विकारांमुळे शीघ्रपतन, इरेक्टाईल डिसफंक्शन यांसारख्या लैंगिक समस्या कमी वयातच भेडसावत आहेत. यातूनच अनेक नवविवाहित जोडप्यांमध्ये ‘अनकन्झ्युमेटेड मॅरेज’ची समस्या (वैवाहिक जीवनातील अयशस्वी लैंगिक संबंध) वाढत आहे. याविषयी माहिती देताना सायकियाट्रिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट डॉ. निकेत कासार म्हणाले, ‘‘अनकन्झ्युमेटेड मॅरेज म्हणजे लग्नानंतर वारंवार प्रयत्न करूनही संभोग न जमणं. सेक्सविषयीचा नकारात्मक दृष्टिकोन, अनाठायी भीती, घृणा, भिन्निलगी व्यक्तीच्या शरीराबद्दलचं अज्ञान, तीव्र स्वरूपाचं नैराश्य,

ही यामागची कारणं असतात. वेगवेगळय़ा संशोधनांनुसार आशियाई आणि मध्य आशियाई देशांमध्ये ही समस्या असलेल्या जोडप्यांचं प्रमाण मोठं आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे ढासळलेलं शारीरिक आरोग्य हेदेखील अनकन्झ्युमेटेड मॅरेजचं कारण असू शकतं.’’

संभोग जमत नसल्याची समस्या घेऊन  कासार यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण लक्षणीय आहे. ‘‘लग्नानंतर पहिल्या दिवसापासून ते अगदी लग्नाला आठ-दहा वर्ष झाल्यावरही संभोग होत नसल्याची जोडप्यांची समस्या असते. अनेकदा घरच्यांनी मूल होऊ देण्यासाठी तगादा लावल्यामुळे जोडपी आमच्याकडे उपचारांसाठी येतात. शारीरिक लक्षणांचा- व्याधींचा विचार करता पुरुषांमध्ये शीघ्रपतन आणि इरेक्टाईल डिसफंक्शन, तर स्त्रियांमध्ये ‘पीसीओडी’ (पॉलीसिस्टिक ओव्हरियन डिसीज), ‘डिस्पॅरीयुनिया’ म्हणजेच संभोगादरम्यान होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या वेदना, ही सामान्यत: कारणं असतात. बऱ्याचदा व्यसनांमुळेही लैंगिक आकर्षणाची भावना कमी होते. तसंच प्रमाणापेक्षा वाढलेल्या वजनामुळे म्हणजेच ‘ओबेसिटी’मुळेही कामेच्छा कमी होते, हे जोडप्यांनी समजून घेतलं पाहिजे.’’

डिस्पॅरीयुनिया या समस्येत संभोगाबद्दलच्या अनाठायी भीतीमुळे स्त्रीचे योनीचे स्नायू तिच्याही नकळत आकुंचित पावतात. परिणामी संभोग (penetrative sex) होऊ शकत नाही. ही समस्या भेडसावणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण मोठं असलं, तरी आपल्याला ही समस्या आहे आणि त्यावर उपचार आहेत, ही जाणीवच अनेक स्त्रियांना नसते. डिस्पॅरीयुनियामुळं आतापर्यंत दोन वेळा घटस्फोट झालेली एक रुग्ण सध्या

डॉ. नीलिमा देशपांडे यांच्याकडे उपचार घेत आहे. लग्नापूर्वी शारीरिक संबंधांची पुरेशी माहिती नसणं हेसुद्धा यामागचं कारण आहेच.

करोनाचे, त्याच्या वारंवार येणाऱ्या लाटांचे, नवनवीन ‘व्हेरियंट’चे आणि टाळेबंदीचे दृश्य-अदृश्य परिणामही नातेसंबंधांवर खोलवर झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती चांगलीच रुजलीय. इस्थर पेरेल या लेखिकेच्या ‘मेटिंग इन कॅप्टिव्हिटी’ या पुस्तकात वर्णन केलेली ‘अतिपरिचयात अवज्ञा’ अनेक जोडप्यांना प्रणयाच्या बाबतीत भेडसावत आहे. पहिल्या टाळेबंदीपासून चोवीस तास सतत एकमेकांसोबत असल्यानं शरीरसंबंधांतली उत्सुकता, नावीन्य, ओढ कमी झालीय.

डॉ. देशपांडे यांच्याकडे कामेच्छा कमी झाल्याची समस्या (Loss of desire) घेऊन येणाऱ्या जोडप्यांचं प्रमाणही मोठं आहे. त्या सांगतात, ‘‘लग्नाला दहा वर्ष झालेलं एक जोडपं माझ्याकडे ही समस्या घेऊन आलं होतं. दोघांची ‘केस हिस्टरी’ घेताना लक्षात आलं, की टाळेबंदीपूर्वी त्या दोघांनी कधीच इतका वेळ सोबत घालवलेला नव्हता. आपल्या बायकोची घरात कामाला येणाऱ्या बायकांबरोबरची, तसंच सासू-सासऱ्यांशी असलेली वर्तणूक नवऱ्याला त्याआधी माहितीच नव्हती. ती वर्तणूक पटत नसल्यानं त्यांच्यात वाद होऊ लागले व त्याचा थेट परिणाम त्यांच्या लैंगिक जीवनावर झाला.’’

 गेल्या दोन वर्षांत जीवनशैलीत झालेला आणखी एक मोठा बदल म्हणजे ‘स्क्रीनटाइम’ मध्ये झालेली प्रचंड वाढ. ‘झूम’, ‘गूगल मीट’, ‘टीम्स’ या अ‍ॅप्समुळे बालवाडीच्या मुलांपासून ते आजीआजोबांपर्यंत सगळे जण एका क्लिकवर जगाशी ‘कनेक्ट’ व्हायला लागले. दुसरीकडे समाजमाध्यमं, पॉर्न साइट्स, गेिमग अ‍ॅप्स आणि ओटीटी प्लॅटफॉम्र्समुळे आभासी विश्वात रमणाऱ्यांचं प्रमाण झपाटय़ानं वाढलं. ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’त येणाऱ्या स्क्रीनचं, सतत ऑनलाइन राहण्याचं व्यसन असलेल्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. याविषयी बोलताना

डॉ. मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, ‘‘आपण अधिक वेळ स्क्रीनवर असतो, त्याचं व्यसन लागलंय, हेच बऱ्याचदा रुग्णांना मान्य नसतं. त्यामुळे स्क्रीनग्रस्त रुग्णांना आम्ही किंबर्ली यंग यांनी विकसित केलेली ‘इंटरनेट अ‍ॅडिक्शन टेस्ट’ करायला सांगतो.(जी इंटरनेटवर उपलब्ध आहे) यातून आपला स्क्रीनटाइम मर्यादित आहे, की तो व्यसन म्हणावा इतका जास्त आहे ते कळतं.’’ इंटरनेट अ‍ॅडिक्शन टेस्ट ही २० प्रश्नांची चाचणी आहे. सहजीवनाचा विचार करता यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ‘जोडीदारासोबत वेळ घालवण्यापेक्षा इंटरनेटवर रमणं तुम्हाला अधिक एक्साइटिंग वाटतं का?’ गेल्या दहा वर्षांत सहजीवनात झालेल्या स्मार्टफोनच्या शिरकावामुळे प्रीती, रती, श्रृंगार, प्रणय या उत्तम सहजीवनाच्या पायऱ्या लुप्त होऊन सेक्स ही फक्त उरकून टाकण्याची एक गोष्ट होत आहे का, अशी शंका यायला वाव आहे. डॉ. नीलिमा देशपांडे म्हणाल्या, ‘‘आज बागेत, मल्टिप्लेक्स, मॉल कुठेही गेलात तरी किती जोडपी खरोखर मनानं एकमेकांसोबत आहेत असं दिसतं? दोघांपैकी कुणीतरी एक जण किंवा दोघंही निम्मा वेळ तरी फोनवरच काहीतरी करत आभासी विश्वात भरकटलेले असतात. सेक्स थेरपीसाठी समुपदेशन करताना म्हणूनच आम्ही जोडप्यांना हे आवर्जून विचारतो, की तुम्ही एकमेकांना किती वेळ देता? तुमच्यात स्पर्शाचं प्रमाण किती आहे? तुम्ही एकमेकांच्या कामाविषयी उत्सुकतेनं, आपुलकीनं विचारपूस करता का? कारण या सगळय़ा गोष्टी ‘कपल इंटिमसी’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.’’

बदलत्या जीवनशैलीचा आणखी एक पैलू म्हणजे आभासी जगाचा वाढता शिरकाव. आभासी विश्वात रमताना डोपामाईन, एंडॉर्फिन ही सुखासीन संप्रेरकं (happy hormones) स्रवत असल्यानंही आभासी विश्वात अधिकाधिक काळ राहण्याचं व्यसन जडू शकतं. यातही गंमत म्हणजे ‘ओटीटी’वर एखादा चित्रपट पाहावा का?’ या नुसत्या विचारानंही मेंदूला डोपामाईन हिट मिळतं. त्या स्वरूपाचं डोपामाईन हिट जोडीदाराशी बोलून किंवा प्रणय करूनही मिळत नाहीये याची जाणीव एकदा का मेंदूला झाली, की जोडीदाराशी, घरातल्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यापेक्षा सगळा वेळ स्क्रीनवर, मग तो टीव्हीचा असो, की मोबाइल-लॅपटॉपचा घालवण्याची सवय जडते.

याच आभासी जगाचं टोकाचं उदाहरण म्हणजे अश्लील साहित्याचं आकर्षण.  ‘मुक्तांगण’मध्ये ‘पॉर्न साइट्स’चं व्यसन जडलेल्या रुग्णांच्या येण्याचं प्रमाणंही वाढलं आहे. ‘‘आमच्याकडे एक साठीचे गृहस्थ पॉर्न साइट्स बघण्याच्या व्यसनावर उपचार घेण्यासाठी नुकतेच आले होते. तरुणांमध्ये तर पॉर्न साइट्स बघण्याचं प्रमाण वाढतं आहेच. सतत पॉर्न क्लिप्स वा फिल्मस् पाहिल्यानं जोडीदाराबरोबरचं नातं असंच असतं, असा गैरसमज या तरुणांच्या मनात तयार होतो. तसंच फिल्म बघितल्याशिवाय ‘परफॉर्म’ करता येत नाही, हा एक गैरसमज अनेकांच्या मनात रुजला आहे. खरंतर प्रत्यक्ष जोडीदाराबरोबरचं नातं हे संवादाच्या, एकमेकांना समजून घेण्याच्या, जपण्याच्या भक्कम पायावर उभं असतं, हे यामुळे कळत नाही.’’ डॉ. मुक्ता सांगत होत्या.

ताणाचा आणि सेक्सचाही छत्तीसचा आकडा असल्यानं अनाठायी ताण हा वेगवेगळय़ा लैंगिक समस्यांना आणि शारीरिक व्याधींना जन्म देतो, असं म्हटलं जातं. करोनाच्या टाळेबंदीमुळे  अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले. यातून अनेक कुटुंबं आजही सावरलेली नाहीत. त्यामुळे मूलभूत गरजा भागवण्याचा, तगून राहण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं, वाढलेल्या ताणामुळेही अनेक जोडप्यांमध्ये दुरावा आला आहे. आपलं आयुष्य आता पूर्वपदावर येत असताना रोजच्या जगण्यातले ताणेबाणे खरंच वाढलेत, की आपला दृष्टिकोन तसा झालाय, हेही एकदा सगळय़ांनी तपासून पाहायला हवं, असं डॉ. देशपांडे सुचवतात. त्या म्हणतात, ‘‘वास्तविक सध्याचा वर्तमान हा मानवी इतिहासातला, मनुष्याच्या उत्क्रांतीतला सुवर्णकाळ आहे. त्याचा लाभ उठवायला हवा.  लोकांना साधंसोपं आयुष्य हवंय. पण त्यांना हे कळत नाही, की तुमचं आयुष्य जितकं सोपं असतं, तितकंच तुमचं मानसिक आरोग्य बिनसलेलं असतं. याउलट तुमचं आयुष्य जितकं आव्हानात्मक असेल, रोज नवं काही करण्याची-शिकण्याची आस असेल, तितकं शारीरिक-मानसिक आरोग्य कणखर असण्याची शक्यता वाढते. त्यामुळेच सहजीवनात आव्हानं, अडचणी या हव्यातच. त्यातून पळवाट काढण्यापेक्षा आपल्या जोडीदाराबरोबर त्यांना भिडण्याची तयारी हवी.’’

चुकीच्या जीवनशैलीमुळे आपलं सहजीवन बिनसलंय ही जाणीव खरंतर अनेकांना असते. परंतु ‘कळतंय पण वळत नाही’ अशीच थोडय़ाफार फरकानं बहुतेकांची स्थिती असते.  लैंगिक समस्यांवर वेळीच उपचार घेणं केवळ निरोगी सहजीवनासाठीच नाही, तर त्यातून दुसऱ्या कुठल्या गंभीर शारीरिक व्याधी वा समस्या उद्भवू नयेत म्हणूनही आवश्यक असतं. उदाहरणार्थ- पुरुषांच्या लैंगिक ताठरतेचा संबंध हा हृदयाच्या आरोग्याशी असतो. इरेक्टाईल डिसफंक्शनमध्ये संभोगादरम्यान लिंगाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. तर हृदयविकाराच्या झटक्यामध्ये हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे लैंगिक ताठरतेची समस्या दीर्घकाळ भेडसावणाऱ्या पुरुषांना हृदयरोग होण्याची शक्यता असते.

दररोज सात-आठ तासांची पुरेशी झोप, गॅजेट्सचा गरजेपुरता वापर, आभासी विश्वात रमण्याची स्वत:ला घालून दिलेली मर्यादा, रोजचा अर्धा-पाऊण तास व्यायाम, सकस आहार, जोडीदाराबरोबर-मुलांबरोबर नियमित संवाद, अशा साध्या-सोप्या उपायांनी, नीरस झालेलं आयुष्य आणि सहजीवन पुन्हा फुलवता येऊ शकतं. ते लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. कारण बाकी तंत्रज्ञानानं कितीही प्रगती केली असली तरी ‘काम’ ही मनुष्याच्या आदिम प्रेरणांपैकी एक आहे. तर निरामय लैंगिकता हा प्रत्येक जोडप्याचा आणि सज्ञान स्त्री-पुरुषांचा हक्क आहे. तो प्रत्येकानं मिळवायलाच हवा..  (लेखक मुक्त पत्रकार आणि पॉडकास्टर असून ‘सेक्सवर बोल बिनधास्त’ हा त्यांचा निरामय लैंगिकतेवरचा पॉडकास्ट आहे.)